भगवान श्रीरामकृष्ण हे दिव्यत्वाची सजीव प्रतिमाच होते. त्यांचे जीवन म्हणजे सनातन धर्माचे मूर्त रूप होते. त्यांचे चरित्र म्हणजे स्थलकाल – निरपेक्ष असून अखिल मानवजातीला पथप्रदर्शन करणारे असे आहे. त्यांच्या जीवनातील अगदी सामान्य प्रसंगांना देखील गूढ गहन अर्थ आहे. त्यांच्या उक्ती म्हणजे नुसते शब्द नसून त्यांतून त्यांची अनुभूतीच प्रकटली आहे आणि याच कारणास्तव त्यात माणसाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे उत्कट सामर्थ्य आढळून येते.
श्रीरामकृष्ण या नावाने सगळ्या जगात विख्यात झालेले हे कमळ, तेजाने आणि पावित्र्याने नटलेले हे कमळ,अंतर्बाह्य शुचिता धारण करणारे हे कमळ, दक्षिणेश्वरी फुलले आणि विकसित झाले. कमळ खरंतर चिखलात फुलते. कारण त्याकाळी जिकडे तिकडे नुसता चिखलच माजला होता. अधर्म बोकाळला म्हणजे परमेश्वर अवतार घेतात आणि भगवंतांनी गीतेत सांगून ठेवले आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणजे गदाधरच्या रूपाने प्रगट झालेला अवतार आहे.
शके १७५७ फाल्गुन शुद्ध द्वितीयेला भगवान श्रीरामकृष्ण यांचा जन्म झाला. सर्वत्र नवचैतन्याचा संचार झाला. दक्षिणेश्वराच्या या
महामानवाभोवती सर्वसंगपरित्यागी नवतरुण जमू लागले. त्यांचा संदेश त्यांनी सातासमुद्रापलीकडे पोहचविला. सगळे जग विस्मयचकित झाले. कोणी म्हटले, “दिव्य भावसमाधी पाहायची असेल तर दक्षिणेश्वरी जा”; कोणी म्हटले, “विसंगतीतून सुसंगती साधणारा हा स्वर्गीय स्वरमेळ आहे”; कोणी त्यांना ‘समन्वयाचे आणि विश्वबंधुत्वाचे प्रणेते’ म्हटले तर कोणी त्यांना ‘युगावतार’ म्हटले. भगवान श्रीरामकृष्णदेव गीतेतील वचन खरे करण्यासाठीच दक्षिणेश्वरी आले. त्यांच्या तिथी जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम.
ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे ।
अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः ॥
– स्वामी विवेकानंद
सर्वेश फडणवीस