भावना जोशी च्या कर्तृत्वा साठी.

भावना जोशी च्या कर्तृत्वा साठी.

 

जीवनात अनुकूल परिस्थितीत तर विकास होणे स्वाभाविकच आहे. अर्थात त्यासाठीही इच्छा लागतेच. परंतु प्रतिकूल परिस्थिती ओळखून स्वतःला घडविण्यात एक वेगळीच कर्तबगारी लागते. त्यातून व्यक्तिमत्व आकाराला येते. म्हणतात ना “सोना तपता हैं ,तभी निखरत हैं”. अशाच प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यावर मात करणारी मैत्रीण म्हणजे भावना जोशी .पूर्वाश्रमीची भावना बरबडे. आजचा नवरात्राचा शब्द जागर भावनाच्या कर्तुत्वासाठी.

भावना घरात सगळ्यात लहान. पाच बहिणींच्या पाठी जन्माला आलेली. कॉलेजमध्ये असताना वडील रिटायर्ड झाले. मध्यमवर्गीय घरात जीवन जगताना थोड्याफार आर्थिक तडजोडी सुरू झाल्या. त्याची त्यावेळी जाणीव भावनाला झाली. घरी खर्चाचे पैसे मागताना संकोच व्हायचा. मला वाटते ही परिस्थिती त्या काळात कमी अधिक फरकाने सर्वांच्याच घरात होती. मात्र त्यावर उघड चर्चा होत नसेल. पॉकेटमनी नावाचा प्रकार त्यावेळी नव्हता .सुबत्ता तर नव्हतीच. त्या परिस्थितीत भावनाने आर्थिक स्वावलंबन म्हणून लहान मुलांचे शिकवणी वर्ग सुरू केले. अकरावी बारावी पासून तर तिने घरी जाऊन मुलांना शिकवले आहे .महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेची संपर्क आला. अर्थात घरी देखील संघाचे वातावरण होते. लग्नापूर्वी भावनाने आर्थिक स्वावलंबना खातर नोकरी देखील केलेली आहे .

दरम्यानच्या काळात लग्नानंतर भावना अमरावतीला वास्तव्याला आली. सासरच्या परिवारातील वातावरण वेगळे होते. दहा वर्ष पूर्ण पारिवारिक जीवनात घरी कष्टमय गेले. मात्र तशाही परिस्थितीत भावनाने दहा वर्षानंतर नोकरी करणे सुरू केले. सासऱ्यांचा विश्वास संपादन केला .त्यानंतर भावनाला निर्मल उज्वल पतसंस्थेत नोकरी मिळाली. ती तिच्या आयुष्यातील बदलाची नांदीच होती. निर्मल उज्वल मध्ये क्लार्क या पदावर तिची नेमणूक झाली. मात्र त्यानंतर आपल्या कर्तबगारीने प्रमोशन घेत घेत आज भावना निर्मल उज्वल पतसंस्थेच्या इर्विन शाखेची शाखाधिकारी आहे .माझ्या वकिली व्यवसायाचे काम देखील बँकांशी संबंधित असल्याकारणाने, मला बँकेच्या कार्यातील बारकाव्यांचा बऱ्यापैकी अनुभव आहे. त्यामुळे महिला शाखाधिकारी म्हटलं की मला त्यांचा आपसूकच आदर वाटतो .भावनाच्या शाखेच्या अधिपत्याखाली 18 शाखा येतात. बँकेचे काम करताना वेळ पडल्यास जप्तीसाठी जावे लागते .यामुळे तिच्यावर हल्ले झाले आहेत. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यात. मात्र भावना न डगमगता कर्तबगारीने सर्व विषय हाताळते .ती सांगते की इर्विन शाखेत ती शाखाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर वसुलीच्या केसेसची संख्या 345 होती .त्याची संख्या नाममात्र आज 37 वर आलेली आहे. त्यातही कोणी मृत पावले अथवा फरार झाले, त्यामुळे सदर प्रकरणे प्रलंबित आहेत. अन्यथा वसुलीचे प्रमाण अधिक वाढवता आले असते .मला तर बँकिंग क्षेत्रातील ती रणरागिणीच वाटते .

या सोबतच ती तितकीच कोमल आहे. मुळात एक कलाकार आहे.नागपुरात असतांना ती कथ्थक शिकली. हार्मोनियम देखील शिकलेली आहे. नागपुरात अनेक नामांकित कीर्तनकारांना कीर्तनाचे वेळी तिने हार्मोनियम ची साथ दिलेली आहे.

भावनानी तिच्या कार्यकाळात जवळपास 5000 बचत गटांना मायक्रो फायनान्स म्हणजे अल्प कर्ज वितरण केले आहे. हे कर्ज वितरण चार रीजन मधील उच्चांक निर्माण करणारे आहे .या सर्व कर्जाचे वितरण भावनाच्या शाखेतून झाले.या सर्व बचत गटांशी भावना संपर्क ठेवते. बचत गटांमधील महिलांचे ती समुपदेशन करते. त्यांना चांगल्या योजना सुचविते. व्यक्तिशः सर्वांशी तिचा संपर्क आहे .त्यामध्ये वसुलीची वेळ झाली तर प्रेमाने कोणाला न दुखावता माणुसकी जपत मात्र नियमानुसार कर्ज रक्कम वसूल करते. मला वाटते इथे महिला शाखाधिकारी म्हणून भावना अतिशय यशस्वी आहे.

सामाजिक दृष्ट्या विचार करायचे झाल्यास भावना सहकार भारतीचे अमरावती जिल्हा महिला संयोजक आहे. भाजप अमरावती शहर सोशल मीडिया प्रमुख आहे .विद्यार्थी विकास योजनेची ती जिल्ह्याची मेंटॉर आहे .त्याच्या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यास तिचा पुढाकार आहे. अर्थात हे सर्व यश भावनाने प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तुत्वाने मिळविलेले आहे . भावना हे देखील सांगते की, प्रतिकूल परिस्थितीमुळे आत्मविश्वास वाढला. भावनाच्या कर्तुत्वाची पताका अतिशय अभिनंदनिय आहे .उत्तरोत्तर तिचे कर्तृत्व असेच उंचावर जावो याकरता तिला मनापासून शुभेच्छा…..

ऍड. मनिषा कुलकर्णी.
नागपूर
9823510335

एड. मनीषा कुलकर्णी

लेखिका प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असून, अनाथ बालक - बालिकांसाठी अनाथाश्रमाच्या माध्यमातून सेवा कार्य करतात. मोबाईल नं - 9823510335

Comments (0)
Add Comment