संभ कहैं सुनि दीन दयाल सो |
मेरी हँसी भए तेरी हँसी है |
~ छत्रपती संभाजी महाराज [ सातसतक]
या महाराष्ट्र च्या इतिहास चे संभाजी नावाचे एक असे पान आहे ज्याला लिहण्यासाठी शाई नव्हे तर रक्ताला पुढे यावं लागलं….!!
पण आजपर्यंत च्या प्रवासात एका गोष्टी ची एवढी भयंकर चिड होती की संघर्षाच्या पायदंडावर अविरत लढलेल्या शंभुछत्रपतींबद्दल एवढ्या वर्षात न लोकांना जाणायचं होतं , न शंभु कळवुन घ्यायचा होता..
नितीन बानूगडे च्या व्याख्यान अगोदर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बदफैली आणि एका राष्ट्रपुरुषाच्या शब्दात बोललो तर मिनाक्षी आणि मदिराक्षी मध्ये गुंतलेला युवराज पलीकडे शंभुछत्रपती कुणाला माहितीच नव्हते…
पण त्यांचा अंत मात्र सर्वांना माहिती होता , बदनामी चे घात आयुष्यभर घालून धर्मवीर आणि संभाजी या शब्दात मात्र गर्वाने संघटना ,नाव वाढवण्यासाठी लोक उभे राहिले…
वा. सी बेंद्रेंनी शोधलेल्या शंभु वर तर खुद्द बाळशास्त्री हरदास सारख्या इतिहास अभ्यासकांनी एकांगी असल्याचे आरोप घातले….
कानिटकर पासून अनेकांनी पुढे सर्जा शंभु वर पारंपरिक आरोप लावायला तडजोड केलीच नाही…
तेवढ्यात कमल गोखले , विजयराव देशमुख ,जयसिंगराव पवार , केदार फाळके सारखे काही मंडळी शंभुछत्रपतींना खर्या अर्थाने पुढे आणण्यासाठी धडपडली …
ज्या शंभुछत्रपतींना एवढे वर्षे बदनाम करून सुद्धा त्यांच्या बलिदानाला कोणी लपवु शकले नाही तो.शंभु नेमका आहे काय ??
ज्याच्या नुसत्या नावाने शत्रूला कंप सुटतो , ज्याचा केवळ स्मरणाने शत्रूची रात्र आणि दिवस थरकापाने शहारली , ज्याच्या घोड्याच्या टापाखाली महाराष्ट्र उधळून उठल्याची नोंद खुद्द मनूची ने केली तो.शंभु म्हणजे राजकारण, समाजकारण, धर्मकारण या त्रिसूत्रात शोधताच येतो…
गृहकलह चे बळी पडले असतांना अणाजी पंताच्या गोठ्याने शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर लगेच शंभुछत्रपतींना कैदेत घालण्यासाठी घात टाकला असतांना वडिलांच्या दुख पचवून लगेच राजकारणात प्रवेश केला राजापूर ला माणसं पाठवून गड धान्यांनी परिपूर्ण केला , पन्हाळा वर बंदोबस्त वाढवला आणि गडातून एक पायही बाहेर न काढता सर्व स्वराज्य सुभेदारासह आपल्या बांजुंनी घेतले..
महाराष्ट्र मधून बंगाल ची सुत्रे हलली , दक्षिणेकडे चिक्कदेवरायचे सामर्थ्य जाणुन गोवळकोंडा चा सुलतान आणि इक्केरीच्या नायकाला आपल्या बाजूला करून दक्षिणेकडे मराठ्यांच्या पराक्रमी मेरु उभा करून चिक्कदेवराय तहासाठी गुडघ्यावर बसवला…
औरंगजेब भिडण्यासाठी आला असताना विजापूर घेण्यासाठी तो तयारी करत असतांना शंभुछत्रपतींनीच विजापूर च्या गडांवर हात टाकले…
फोंडा पोर्तुगीज पुढे टिकाव धरु शकणार नाही कळताच तो पाडून मर्दनगड उभा केला…
विजापूर आणि गोवळकोंडा च्या आदिलशाही आणि कुतुबशाही एकत्र घेऊन दक्षिणेची ढाल बनुन औरंगजेब ला भिडला..
राजकारणाच्या पलिकडे गेलो तर ‘” आबासाहेबांचे संकल्पीत तेच आम्हांस करणे अगत्य !! ” म्हणणारा शंभु सापडतो .
पोर्तुगीजांनी पोली आणि सिडकोली गाव लुटून उध्वस्त केली तेव्हा तिथल्या गरीब रयतेला मायेप्रमाणे जपणारा शंभु , जंजिऱ्याच्या सिद्दी आणि मुघलांनी कुलाबा उध्वस्त केल्यावर तिथल्या रयतेला पुन्हा वसवणारा शंभु ,वडिलांनी केलेल्या निवाड्यांना पुढे त्याच न्यायाने पुढे जाऊन अर्जोजी , गिर्जोजींचे निवाडे करणारा शंभु !!
या शंभुला धर्मवीर का म्हणावे ?
कारण औरंगजेब ने धर्म बदलण्यासाठी अट घातल्याचा कुठलाही उल्लेख आढळत नाही..
मग शंभुछत्रपती धर्मवीर नाही का? तर आहेच…
फोंडा च्या शिलालेख वर ” आता हे हिंदुराष्ट्र जाहले !! ” म्हणणारे शंभु , बुधभूषण मध्ये ” मृतो धर्मणे संयुक्तो दिर्घजीवी भविष्यती !! ” म्हणणारा शंभु…
रामसिंग ला ठणकावून ” आता त्या यवनाधमाला कैदेत टाकून आपल्या देवदेवतांच्या पुन्हा स्थापना करण्याचा !! ” शब्द टाकणारा शंभु !! जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केलेल्या हिंदूंना पुन्हा धर्मात घेणारा शंभु धर्मवीर आहे पण फक्त नाही..
मात्र हा शंभु इतिहास ने दुर्लक्षित केला, करत राहिला आणि त्यांच्या त्या भयावह अंतावर काही क्षणासाठी शंभु आठवल्या जाऊ लागला…
पण शंभुछत्रपतींचं चरित्र एवढे परिपूर्ण आहे की आम्ही त्याला मांडण्यासाठी आपण अपुर्ण ठरतो…छत्रपतींचा इतिहास म्हणजे फक्त त्यांचा शेवट नाही , शंभुछत्रपती म्हणजे फक्त धर्मवीर आणि मृत्युंजय नाही , शंभुछत्रपती म्हणजे स्वराज्यरक्षक , मालिक ए हिंद…तरीही श्रापीत राजहंस
म्हणून अजूनही तो शंभु आम्हाला सातसतक मधून पुन्हा पुन्हा विचारतोच आहे…
” संभ कहै मेरी पति तुअ हात रहै !
मेरे मन इहै तुम बिन लगावै तीर !!
माझी पत तुमच्याच हातात आहे , माझ्या जिवनाची नौका तुजविण कोण पार नेणार ??
काही गोष्टी काही तारखा या इतिहास मध्ये एवढ्या कलंकित आहे की आठवायला सुद्धा थरकाप उडतो….
* फेब्रुवारी १६८९
अशीच एक तारीख…
मुळात शंभुछत्रपतींवर कादंबरी लिहीत असताना… याच तारखेला संगमेश्वर चा प्रसंग लिहण्याचा क्षण आला…
काही अनपेक्षित असलं तरीही लेखक म्हणून तो क्षण जगावा लागतो…
लिहतांना जेव्हा म्हालोजी घोरपडे रणांगणावर धारातीर्थी पडततात तेव्हा आपुसकच डोळे मिटून क्षणभर थांबलो आणि मन पक्क करून विचार केला आपल्या राजांच्या अंगावर साखळदंड आदळणार आता…
ज्या हातात आपण आताच तलवार देऊन रणांगणात रणमर्द उभा केला त्याला बंदी बनवावं लागेल…
या पेक्षा आणखी वाईट काय असावं…
अनेक वेळा प्रश्न हाच घोंघावत असतो , मनात घर करून बसलेल्या शंभुराजेंना विचारावं वाटतं !! ” स्वामी अगर ऐसा न हुवा होता तो फिर क्या होता ?? “
आणि धाकले धनी मग मनालाच उत्तर देतात…
” जर असे झाले नसते तर मराठ्यांचं साम्राज्य अटकेपार गेला नसता लेकरा…धर्मध्वज उंचावला नसता… औरंगजेब च दार उल इस्लाम च स्वप्न पूर्ण झाले असते..!! या संभाजी चं रक्त वाहलं म्हणून मराठा साम्राज्य चा भगवा ध्वज उंच भरारी घेत आलम हिंदुस्थान चा रक्षणकर्ता झाला….!!”
पण हे सत्य असुनही आपल्या राजाला अश्या अवस्थेत बघणं ,विचार करणं भयंकर आहे…. हात अजूनही थरथरतात लिहायला , म्हणून कदाचित मी कधी शंभुछत्रपती वर कुठे बोलु शकलो नाही , सांगु शकलो नाही किंवा प्रयत्न केला नाही…
बुरहाणपुरला अब्दुल लतीफ च्या दरगाह पुढे हात वर करून औरंगजेब न मागणं मागितले होते…
” इस्स काफर बच्चे संभाजी की मौत हमारे हातो हुई तो हम हिंदोस्तान के आलम आलमगीर गाझी कहलायेंगे और इस हिंदोस्तान मे मुघल रियासत का परचम और भी बुलंद होगा…”
पण औरंगजेब च्या मनातील घालमेल प्रत्येक क्षणी सह्याद्री अडवून ठेवत होता… पण सह्याद्रीच्याच नरसिंहाला पकडून देण्यासाठी सह्याद्रीच्याच माणसाने सह्याद्री कोरुन मुकर्रबखान ला रस्ता दाखवून औरंगजेब च्या चेहऱ्यावर हरवलेलं हसू उभ केलं…
या कैदैनंतर शंभुछत्रपतींना काय यातना दिल्या गेल्या ते सर्वश्रुत आहे…
पण वाचतांना तुम्हाला जेवढे त्रास होतात त्या पेक्षा अधिक लिहणार्या ला ते जाणवतं..
पण काही क्षणाला भावनांवर ताबा ठेवावा लागतो , आणि डोळे बंद करून भवानी ला आठवुन लिहायला पुन्हा सुरुवात करावी लागते…
*आणि फेकले अनेक दोरखंड राजांवर , कवी कलशांवर…, भाल्याच्या टोका , तलवारी चोहोबाजूंनी घेरल्या.रक्ताने माखलेल्या शरीरावर दोरखंड उमटले….*
*आणि सुर्याला ग्रहण लागले ,सह्याद्री थर्रावला , गोदावरी थबकली , आकाश फाटले , महाराष्ट्र गहिवरला….*
वढूच्या त्या स्तंभावर बांधलेल्या दोन सजिवांनपैकी एक जिव कधीच शांत झाला ..
” राजन तुम हो सांचे …..!! ” एवढे अखेरच पुटपुटत कवी कलशांनी तुटलेल्या मस्तकासह देह त्यजला…
परंतु भोसल्यांच्या नकापुड्यातुन वाहणारे श्वास मात्र अजूनही तसेच होते सह्याद्रीच्या कणखरातुन वाहणार्या वार्याप्रमाणे…
आणि अचानक एक तलवार मानीवर आदळली आणि ” काफर जहन्नुम रफ्त …!! ” म्हणत स्वराज्यविराचं मस्तक वेगळ करण्यात आलं…
आणि चाळीस दिवस महाराष्ट्रधर्म राखत असलेला तो जीव देहमुक्त झाला…
पण शरीरातील अनेक तुकड्यांना वेगळे होत असतांना त्या देहाने औरंगजेबच्या दिलेल्या पाण्यास स्पर्शही केला नव्हता..
त्याच्या जलविरह जिभ्वा जेव्हा कापल्या गेली तेव्हा त्याने मागितले होते जगदंबेला मागणं या देवाधर्माच्या आणि राष्ट्राच्या सौभाग्याचे आणि धरला होता उपवास निर्जल स्वराज्याचा स्वराज्याभवानीचा…
तोच राष्ट्रधर्मरक्षणाचा उपवास कायम रहावा म्हणून ती शंभू बलिदानाची साक्ष कायम मनात राहु द्यायची…..
कदाचित ते बळ आपल्यालाही मिळेल शंभुचरित्रातुन….
अक्षय चंदेल..
आगामी काळात येणाऱ्या अग्निगंध कादंबरी चे लेखक.
फोटो गुगल साभार…