काँग्रेसने पुन्हा हिंदूंच्या आस्थेचा अपमान केला !
काँग्रेसने रामलला मंदिरात विराजमान होणार त्या मंगल व पवित्र सोहळ्याचे निमंत्रण नाकारले. उद्धव ठाकरे आणि सर्व जगाचे ज्ञान असलेल्या संजय राऊत यांनी सामना या मुखपत्रातून न मागता दिलेल्या अयोध्येला जाण्याच्या सल्ल्याला काँग्रेसने केराची टोपली दाखवली. आता पलटी मारून काँग्रेसची निमंत्रणाचा अस्वीकार करण्याची भूमिका कशी योग्य आहे, यावर संजय राऊत यांना दुसरा अग्रलेख लिहावा लागणार आहे. आपल्या नव्या ‘धनी’ ने नकार देतात उद्धव व राऊत यांनीही पलटी मारली आहे.
काँग्रेसचा असा निर्णय अपेक्षितच होता. जेव्हा वादग्रस्त ढाचात रामलला प्रगटले तेव्हा हिंदूंना आत प्रवेश देऊ नका, पूजा दर्शन सोपस्कार नको, उलट कुलुप लावा, असे आदेश देणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा सांगणारी काँग्रेस कुठल्या तोंडाने रामललाच्या दर्शनाला जाणार ?
देवबंदच्या उलेमांनी तार करून तक्रारी केल्या होत्या. लांगुलचालनाच्या तेव्हाच्याही नेहरूंच्या धोरणांना पाहता त्यांनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना बाबरी ढाचातून रामललाची मूर्ती हटविण्याचे आदेश दिलेत. 24 व 25 डिसेंबर 1949 असे दोन दिवस लखनौ मध्ये उच्च स्तरीय बैठका झाल्या. खूप खलबते झाली आणि रामललाची मूर्ती बाहेर राम चबूतऱ्यावर ठेवण्याचा निर्णय झाला. कारण नेहरूंचा सख्त आदेश अव्हेरण्याची ताकद मुख्यमंत्र्यांची नव्हती. मात्र, फैजाबादचे जिल्हा दंडाधिकारी के के नायर कोणाचाही आदेश ऐकायला तयार नव्हते. रामललाची मूर्ती हलवायला त्यांनी स्पष्ट नकार दिला. अयोध्येत रक्ताचे पाट वाहतील, ही स्थिती त्यांनी सरकारला कळवली.
सरदार पटेलांनी सोमनाथचा जिर्णोद्धार केला तसेच नेहरू श्रीरामजन्मभूमी मुक्त करून मंदिर उभारू शकले असते. पण त्यांना कायम हिंदू शब्दाचे वावडे होते. नेहरूंचीच अनुनयाची, तुष्टीकरणाची भूमिका काँग्रेसने समोर चालवली. आजही काँग्रेसला हिंदू शब्दाचे वावडे आहे. नेहरुंशिवाय काँग्रेसला देशातील अन्य महापुरुषांशी देणे घेणे नाही. सोयीनुसार महात्मा गांधी तेवढे ते वापरतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या थोर देशभक्ताला अपमानित करण्याचे मुख्य कारणच सावरकरांचे हिंदुत्व आहे. संपूर्ण जग दहशतवादाने ग्रस्त असताना जगाच्या पाठीवर सर्वात सहिष्णू असलेल्या हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचे पातकही याच काँग्रेसने केवळ मतांच्या लाचारीसाठी केले होते. काँगेसला हिंदुत्वासोबतच श्रीरामाचेही वावडे आहे. श्रीराम सेतू बचाव अभियानाच्या वेळी काँग्रेसने श्रीराम कधी अस्तित्वातच नव्हते आणि ते एक काल्पनिक पात्र आहे, असे शपथपत्र देऊन अधिकृत भूमिका घेतली होती. त्या सोनिया गांधी आणि या घराण्याची तळी उचलणारे मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी अयोध्येला जातीलच कसे ? कुठल्या तोंडाने जातील ? हिंदूंचा हा विजयी क्षण पाहताना तुमचे सुतकी चेहरे जगाला दिसतील, ही भीती आहे का ?
वास्तविक पाहता श्रीरामजन्मभूमी मंदिर ट्रस्ट ने यांना सोहळ्याचे निमंत्रण देऊन आपले औदार्य व विवेक दाखवला. पण ज्यांनी राम नाकारला त्यांना बोलवावेच कशाला असे तमाम रामभक्तांना वाटत होते. तरीही मोठे मन करून अगत्याने निमंत्रण दिल्यावरही काँग्रेसने निमंत्रणाचा अस्वीकार करून पुन्हा एकदा हिंदूंचा अपमान केला आहे. हा सोहळा भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याची टीका देखील काँग्रेसने केली आहे. मंदिर अर्धवट बांधले असल्याची खोचक प्रतिक्रिया पण दिली आहे. काँग्रेसने संघाला संपवण्याचा वेळोवेळी घाट घातला. अनेकदा बंदी पण घातली. अटकसत्र राबवले. पण प्रत्येकवेळी संघ उसळी घेऊन नव्या उर्मिने मोठा झाला. मुळात हा सोहळा हिंदू धर्माचा आहे. या देशाचा आहे. भाजपा आणि संघाविषयी असलेला द्वेष दूर ठेऊन या सोहळ्याकडे बघायला हवे. देशातील हिंदू रामललाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. संघ, भाजपावर आगपाखड करून या ऐतिहासिक क्षणाच्या वेळी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा कुटील डाव या प्रतिक्रियेमागे दडला आहे. मंदिर अर्धवट असताना रामलला विराजमान होत आहेत, यावर आक्षेप घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. जो स्वप्न देखते बाबर के हम उन्हे मिटाकर मानेंगे, ही हिंदूंची मानसिकता आहे. रामललाला किती काळ तंबूत ठेवायचे ? किती काळ भक्तांना दर्शनापासून वंचित ठेवायचे ? मंदिराचा जीर्णोद्धार करताना देवाला बसवूनच मंदिराची निर्मिती होते. अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या देवाचे मंदिर बांधताना देव तिथेच असतो. धर्माचार्यांना शास्त्राचे डोज पाजण्याचा अधिकार किमान विदेशी मुळाच्या व परधर्मीय व्यक्तीला तर बिल्कुलच नाही. तुमच्या कथित धर्मनिरपेक्ष कंपुचा एखाद दुसरा पित्तु सोडला तर बाकी समग्र समाज 22 जानेवारीच्या प्रतीक्षेत आहे. तुम्हाला नसेल यायचे तर नका येऊ पण आमच्या आस्थेची चेष्टा तर करू नका !
निवडणुकीच्या वेळी मतांसाठी मंदिरात जाणे, गोत्र सांगणे आणि जानवे घालणे किती बेगडी आहे, याचा प्रत्यय तुम्ही श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या निमित्ताने दिला आहे. पुन्हा तुम्ही हिंदू आणि हिंदुत्वाच्या व्याख्या सांगून हिंदू समाजाला शहाणपण शिकवाल तर हिंदू समाज खपवून घेणार नाही. कारण तुमचा हिंदूविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे.
photo – google..
– शिवराय कुळकर्णी