देदीप्यमान इतिहास पुसता येतो का ?

देदीप्यमान इतिहास पुसता येतो का ?

१९७३ पासून १६ डिसेंबर हा दिवस, बांगला देश विजय दिन म्हणून साजरा केल्या जातो.त्याच वर्षी सेनाध्यक्ष जनरल सॅम माणेकशॉ (नंतर फिल्ड मार्शल) यांच्या कार्यालयात ढाका येथील रेसकोर्स मैदानावर झालेल्या पाक शरणागतीचा फोटो लावण्यात आला होता.कोलकता येथील ईस्टर्न कमांड हेडक्वार्टर तेथे,दर वर्षी याच दिवशी भव्य परेडच आयोजन करत ज्यात बांगलादेशातील ६०७० नागरिक/जवान अतिथी म्हणून येतात.यंदा;सोमवार,१६ डिसेंबर, २०२४ला देखील,भारतातील निवृत्त सैनिकांनी आपापल्या शहरांमधील अमर जवान स्मारकावर १९७१च्या तिसऱ्या भारत पाक युद्धात शहीद झालेल्या सहयोग्यांना श्रध्दांजली अर्पण केली.पण कोलकता येथील परेडमधे बांगला देशाचा सहभाग नव्हता.

तिकडे;बांगला देशचे सांप्रत सर्वे सर्वा मोह्ममद युनूस यांनी १६ डिसेंबरला बांगला देशातील जनतेच अभिनंदन केल पण; भारत/भारतीय सेना किंवा शेख मुजीब उर रहमान यांच्या बांगला देश स्वातंत्र्य युद्धातील योगदानाचा उल्लेखही केला नाही.ईकडे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स सोशल मीडिया नेटवर्कवर बांगला देश युद्धातील देदीप्यमान कामगिरीसाठी  भारतीय सेनेच अभिनंदन केल असता, बांगला देशातील कायदे मंत्री आसिफ नझरुलनी;”हे अतिरंजित आहे,यात खरा पराक्रम बांगला जनतेचा होता,भारत केवळ एक सहयोगी मित्र होताअस ट्विट केल. मोहमद युनूस यांच्या कार्यालयानी या ट्विटच समर्थन केल आहे.त्यामुळे; दोन्हीकडे ऐतिहासिक विजयाचा इतिहास पुसून टाकण्याचा समन्वयी प्रयत्न होतो आहे का असा प्रश्न उभा राहिला तर ते वावग नसेल.

जुन्या छायाचित्रात पूर्व पाकिस्तान कमांडचे कमांडर,लेफ्टनंट जनरल एएके नियाझी हे,भारत बांगलादेशचे थिएटर कमांडर लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्या समक्ष आत्मसमर्पण करार/संयंत्रावर हस्ताक्षर करतांना दिसतात. या दोघांच्या  मागे व्हाइस ॲडमिरल कृष्णन, एअर मार्शल दिवाण, लेफ्टनंट जनरल सगत सिंग आणि मेजर जनरल जेकब उभे आहेत.हे छायाचित्र आपला राष्ट्रीय अभिमान वृद्धिंगत करणार आहे. १९७१मधे भारतीय सेनेकडे; अत्याधुनिक यंत्रणा नव्हती तरी देखील तीने १४ दिवस चाललेल युद्ध जिंकल होत.ढाकाच्या रेसकोर्सवर आत्मसमर्पण सोहळा पार पडला आणि सुश्री इंदिरा गांधींनी संसदेत विजयाची घोषणा केली. ३५०० भारतीय सैनिकांनी या जलद  युद्धात आपले प्राण आणि १५,००० वर सैनिकांनी आपले अवयव गमावले होते.या युद्धातून बांगलादेश या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. पाकिस्तानवर भारताचा हा निर्णायक विजय,राष्ट्र,लष्कर आणि प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानास्पद आहे.हे चित्र; भारताच्या महान लष्करी विजयाच सर्वात ज्वलंत प्रतीक आहे.

स्थलसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल एक्सनी एक फोटो शेयर केला आहे ज्यात भारतीय सेनाध्यक्षांच्या कार्यालयात एक नवीन पेंटिंग दिसत.नेपाळचे सेनाध्यक्ष, जनरल अशोक राज सिग्देल, ०९ डिसेंबर, २४ला भारताचे सेनाध्यक्ष,जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या कार्यालयात आले असतांना भारतीय लष्कराच्या तीनही संरक्षण दल प्रमुखांसोबत काढलेल्या फोटोत हा बदल उजागर झाला आहे.सेना मुख्यालयातील एडीजीपीआयच्या लष्करी सूत्रांनुसार;पूर्व लडाखमधील बर्फाच्छादित पर्वत आणि शांत पँगॉन्ग त्सोच्या (सरोवरा) पार्श्वभूमीवर,२८  मद्रास बटालियनच्या  लेफ्टनंट कर्नल थॉमस जेकब यांनी तयार केलेल हे पेंटिंग,तांत्रिक दृष्ट्या प्रगत,राष्ट्र धर्म रक्षक लष्कर दर्शवत. या पेंटिंगमधे: भारतीय लष्कर किती आधुनिक  झाल आहे हे दर्शवण्यात आल आहे. बर्फाच्छादित पहाडांच्या पार्श्वभूमीवर चितारलेल्या या पेंटिंगच्या पूर्वेला लदाखमधील प्यांगगोंग त्सो, डावीकडे आकाशात भरारी मारणारा गरुड पक्षी रथारुढ भगवान श्री कृष्ण आणि याच बरोबर भगवा वस्त्रधारी आर्य चाणक्य आणि टँकस्,ऑलटेरेन व्हेईकल्स, इन्फैंट्री व्हेइकल्स, पेट्रोल बोट्स, स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर्स एच ६४ अपाचे अटॅक हेलीकॉप्टर्स चितारले आहेत.

लष्करी सूत्रांनुसार;हे चित्र; आपली समृद्ध सभ्यता,न्याय्य शक्ती आणि तात्विक   सांस्कृतिक वारशाच कलात्मक प्रतीक आहे.नवीन चित्र लष्कराला; आर्य चाणक्यांची रणनीती,प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संलग्न करून,न्याय आणि नैतिक कर्तव्य पालन आणि आव्हानांना तोंड देत राष्ट्र रक्षणासाठी उद्युक्त करत.त्याच प्रमाणे हे चित्र; महाभारत आणि आर्य चाणक्यांची शिकवण तत्त्व, त्याग आणि शिस्त वारशाचा सन्मान आणि सीमा रक्षणासाठी लष्कराची वचनबद्धता उजागर करत.सेनाध्यक्षांच्या कार्यालयात लावण्यात आलेल हे नवीन चित्र;अर्ध पौराणिक चित्रकला, भारतीय सेनेची तांत्रिक प्रगती, धार्मिकता धर्मरक्षणासंबंधी कालातीत वचनबद्धता, आर्य चाणक्यांची लष्करी नेतृत्व, मुत्सद्देगिरी,युद्धाच्या दृष्टिकोनाची धोरणात्मक प्रेरणा आणि लष्कराची अत्याधुनिक प्रणाली   सुसज्जता प्रतिबिंबित करत. मात्र, सेनाध्यक्षांच्या  कार्यालयात लावण्यात आलेल्या या नव्या पेंटिंगमुळे एक नव्या वादाला तोंड फुटल आहेसेनाध्यक्ष कार्यालयातील ऐतिहासिक चित्र बदलून, ऐतिहासिक तथ्यांपेक्षा पौराणिक आणि सामंतवादी विषयांना प्राधान्य देत,९३,००० पाकिस्तानी सैनिकांच आत्मसमर्पण आणि बांगलादेश स्थापनेच चित्रण असलेल मूळ चित्र बदलण्याच्या  निर्णयामुळे; नॉर्दर्न कमांडचे माजी प्रमुख, लेफ्टनंट जनरल एचएस पनाग आणि निवृत्त एअर व्हाईस मार्शल मनमोहन सिंग  यांच्या समेत या युद्धात सहभाग घेतलेल्या माझ्यासारख्या असंख्य निवृत्त सैनिकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे

 ऑगस्ट,२०२०मध्यात, पूर्व लडाखमधीलऑपरेशन स्नो लेपर्डच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या या नवीन पेंटिंगमधे;आर्य चाणक्य,समकालीन शस्त्रास्त्रांचा स्नॅपशॉट आणि  महाभारतातील प्रतिमांच्या मेडले आहेत.ती एक मर्यादित कारवाई होती. उलटपक्षी, १९७१चा विजय; ९३,००० सैनिकांच्या संपूर्ण शरणागतीच प्रतीक असून, हा भारताच्या सर्वसमावेशक, देदीप्यमान, लष्करी विजयाचा दागिना आहे.या युद्धात सहभागी झालेल्या लष्करी दिग्गजांच्या मते; “जुने छायाचित्र बदलल्यामुळे,१९७१च्या विजयाची आठवण पुसून टाकण्याचा आणि/किंवा, देदीप्यमान विजयाच्या  लष्करी  इतिहासाला नवीन वळण देण्याचा प्रयत्न झालेला दिसत असून त्याद्वारे,या युद्धात जे लढले आणि बळी पडले त्यांचा अवमान झाला आहे”. १९७१मधे पाकिस्तानला दुभंगवून त्याची छ्कल केल्यानंतर, संसदेत श्री अटल बिहारी वाजपेयी आणि संसदेबाहेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी सुश्री इंदिरा गांधीच अभिनंदन केल होत.भारतीय लष्करी अभिमानाच्या क्षणावर पौराणिक पोर्ट्रेटच्या एअरब्रशमुळे; १६ डिसेंबर,१९७१ला ढाका येथे तेथील पाकिस्तानी सेना प्रमुखांच्या आत्मसमर्पण करारावरील स्वाक्षरीच  छायाचित्र असलेल्या निर्णायक विजय सोहळ्याला कमी लेखल्या गेल आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.

         भारत भेटीवर आलेले अनेक लष्करी राजकीय मान्यवर आणि परदेशी सेनाप्रमुख, भारतीय सेनाध्यक्ष कार्यालयाच्या लष्करी वारशातील महत्त्वपूर्ण घटनेच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार  आहेत.हा ऐतिहासिक विजय;भारतीय लष्कराच्या देदीप्यमान  भूतकाळाच प्रतीक आहे.याची प्रतारणा झाल्यास त्या भूतकाळाची सुसंगतता आणि स्थिरता हिरावून घेतली जाईल. भारताच्या पहिल्या मोठ्या लष्करी विजयाच प्रतीक असलेल छायाचित्र/ पेंटिंगच्या ऐवजी  पौराणिक कथा, धर्मभास्कर सरंजामी प्रतीक आणि आधुनिक शस्त्रास्त्र संपदा असलेल पेंटिंग,भविष्यातील विजयविषयक  प्रेरणा देऊ शकेल याची खात्री देता येत/येणार नाही.शिवाय;१९७२पासून  आजतायगत; इतर देशांचे मान्यवर आणि लष्करी प्रमुख ज्या  ठिकाणी भारतीय   लष्करप्रमुखांना भेटून, भारताच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयाच ज्वलंत प्रतीक पाहत असत त्याच ठिकाणी आता, त्यांना माहीत नसलेल्या  संदर्भमुळे समजण्यास अगम्य असलेल पेंटिंग दाखवण्याचा हा अट्टाहास कशासाठी हेच अनाकलनीय आहे.याच्या उलगड्यासाठी संपर्क साधला असता, लष्कराच्या प्रवक्त्याने भाष्य करण्यास नकार दिला.

    १९७१ मधील पाक सेनेच्या आत्मसमर्पणाचा फोटो,भारतीय सेनेच्या निर्विवाद विजयाच प्रतीक आहे. ते काढून  २०२०मधील पूर्व लदाखमधल्या मर्यादित भू राजकीय विजयाच चित्र लावल्यामुळे;१९७१ मधील बलिदानांच श्रेय गौण आहे असा आभास निर्माण झाला आहे.नवीन पेंटिंग, दृष्यदृष्ट्या आकर्षक असल तरी त्याला ऐतिहासिक अर्थ नसल्यामुळे ते, १९७१ विजयाच्या फोटो प्रमाणे प्रेरणादायक नाही.तो विजयवास्तविक लष्करी कामगिरीच प्रतीक आणि नव पेंटिंग  प्रतीकात्मकतेवर भर देणार आहे.१९७१ मधील पाक सेनेच आत्मसमर्पण हा एक महत्त्वाचा क्षण होता आणि  तत्त्वज्ञान आणि पौराणिक कथा केंद्रित हे नवीन पेंटिंग त्याच्या पासंगालाही पुरणार नाही.तत्त्वज्ञान आणि पौराणिक कथांवर लक्ष केंद्रित  करता,भारतीय सेनाधिकारी आणि सरकारनी, आपल्या देदीप्यमान भूतकाळाचा सन्मान कसा करावा याविषयीची व्यापक चर्चा या वादामुळे होणार असली/निर्माण झाली तर त्यात नवल नाही.

      एडीजीपीआय,सेना मुख्यालयातील सूत्रांनुसार; विजय दिवस २०२४च्या मुहूर्तावर सेनाध्यक्ष जनरल उपेंद्र त्रिवेदी यांनी; त्यांच्या कार्यालयातून काढलेल १९७१च्या पाक शरणागतीच चित्र,सांप्रत कार्यरत निवृत्त सैनिकांच अवलोकन अभ्यासासाठी,दिल्लीच्या माणेकशॉ सेंटर ऑफ एक्सलन्समधे लावल आहे.येथे विविध प्रकारच्या माध्यमांतून, भारतीय सेनेच्या देदीप्यमान ऐतिहासिक कारवायांच अवलोकन अभ्यास करता येतो.सेना मुख्यालयातील चित्र काढून माणेकशॉ सेंटरमधे लावण्यात आल आहे याचा अर्थ; भारतीय सेना माणेकशॉ सेंटरकडे पाक शरणागतीच पेंटिंग नव्याने बनवून लावण्यासाठी पुरेशी राशी नाही का की सेनाध्यक्ष/सरकारला या ऐतिहासिक विजयाच महत्व कमी झाल अस वाटतअसा प्रश्न उपस्त होतो/विचारला जातो आहे.सेनाध्यक्षांच्या कार्यालयातील शरणागतीचा फोटो, नेपाळ सेनाध्यक्षांनी भारतीय सेनाध्यक्षांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीनंतर बदलल्या गेला आहे.याच महिन्यात बांगलादेशमधे सुरू झालेल्या भारत विरोधी अभियानाच्या पार्श्वभूमीवर; भारतीय सेनाध्यक्षांच्या कार्यालयातील पाक शरणागतीचा हा फोटो बदल,विडंबनात्मक आहे.बांगलादेशचे मोहम्मद युनूस,१९७१ युद्ध आणि स्वातंत्र्य लढ्यातील मुजीब उर रहमान यांचे योगदान आदर्श आणि भारतीय सेना/भारताचा सहभाग नाकारत असतांना; ही कारवाई करून आपण त्यांच्याशी सहमत आहोत असा संदेश देत आहोत अस म्हटल्यास ते चूक नसेल

       फिल्ड मार्शल फिलिप चेटवूडनुसार; “सेनेत राजकारणाला स्थान नाही आणि  जर ती तीला राजकारणात ओढल्या गेली तर,ती अराजकता आणि गृहयुद्ध  अटळ आहे. अराजकतेची नांदी असेल”. सेनाध्यक्ष कार्यालयात १९७३ पासून डौलात झळकणार १९७१मधील पाक शरणागतीच चित्र काढून तेथे दुसर चित्र लावल्यामुळे सेनेला एक वेगळाच संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.नवीन चित्र; लष्कराची मूलभूत मूल्य आणि धर्मनिरपेक्ष चारित्र्याशी सुसंगत नाही असही या लष्करी दिग्गजांच मत आहे.१६ डिसेंबर हा या युद्धाचा विजय दिवस, भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोत्तम कामगिरीची जाणीव त्यात शहीद झालेल्या वीरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.त्याच सुमारास,चीनशी झालेल्या संघर्षाचा रंगमंच दर्शवणाऱ्या या नवीन पेंटिंगकडे,भारताच लष्करी समर्पण आणि चीनच्या राजकीय वर्चस्वाच द्योतक/प्रतीक म्हणून पाहिल्या जाईल अस लष्करी  दिग्गजांच मत आहे.

१६ डिसेंबरला राष्ट्रपती पंतप्रधांनानी या दिवसानिमित्त शुभ कामना दिल्यात.संरक्षण मंत्री तीनही संरक्षण दल प्रमुखांनी शहीद स्मारकावर पुष्पार्पण केल.सांसदांपैकी केवळ सुश्री प्रियंका गांधींनी सेनाध्यक्ष कार्यालयातील फोटो बदलावर भाष्य केल. महाराष्ट्रातील मराठी चॅनेल्स आणि वृत्तपत्रांना मात्र या दिवसाचा विसर पडलेला आढळून आला. याच दिवशी नागपूरला महाराष्ट्र सरकारच हिवाळी अधिवेशन सुरू झालं पण त्यांच्या तर्फे एकही प्रशासकीय अधिकारी,मंत्री,आमदार किंवा प्रसार माध्यमांचा प्रतिनिधी,नागपूरच्या अमर जवान स्मारकाकडे फिरकला देखील नाही.या युद्धात;माझ्या ५००० वर सहायोग्यांच प्राणार्पण आणि १५,००० वर सहायोग्यांना आलेल अपंगत्च याची; त्यात अनेक सैनिक महाराष्ट्रातीलही होते; स्वत:ला राकट,कणखर दगडांचा देश म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला चाड नव्हती हे आमच्या सारख्या निवृत्त सैनिकांच दुर्दैव.

१८/१२/२४:१६,भगवाघर कॉलोनी,धरमपेठ, नागपूर,१०:९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com. 

कर्नल अभय पटवर्धन ( निवृत्त )

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लेखन सुवर्ण मदिरातील झंझावात, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

भारतीय इतिहास.
Comments (0)
Add Comment