धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज – भाग ४

धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज – भाग ४

धनकवडी निवासी योगीराज श्रीशंकरमहाराज.

भाग ४

लोकविलक्षण जीवन

महाराजांचे जीवनचरित्र अनंत घटनांनी भरलेले आहे.एकसुरी सलग चरित्र लिहिताच येणार नाही असे अद्भुत जीवन महाराज जगले.त्यांच्या चरित्रातील काही लोकविलक्षण गोष्टींचा मागोवा येथे घेतला आहे.

१)रत्ने- महाराजांच्या कडे रत्नजडित आठ अंगठ्या होत्या.त्या अनेकदा त्या अंगठ्या आठ बोटांत घालीत असत.तसेच त्यांच्याकडे हिरे-जडीत सुवर्ण हार होता.अनेकदा तो हार त्यांच्या शिष्यांकडे असे.महाराजांना लहर असली तर ते हार,अंगठ्या,जरीचा फेटा असा पोशाख करीत असत.मात्र अनेकदा साधे धोतर,पायजमा,सदरा,पितांबर,उपरणे असा वेष धारण करत.अनेकदा कोणतेही अलंकार नाहीत अशा वेषात ते असायचे.

२)सिगारेट आणि महाराज- महाराज सिगारेट ओढत असत.आजही त्यांच्या मठासमोर काही भाविक भक्त सिगारेट उदबत्ती सारखी पेटवतात व नमस्कार करतात.महाराज म्हणत मी या सिगारेटच्या धुरातून त्रैलोक्य संचार करून येतो.

३)स्वामी समर्थ व शंकर महाराज- श्री स्वामी समर्थांचे आणि शंकर महाराजांचे पिता पुत्रासारखे नाते होते. शंकर महाराज समर्थ स्वामी समर्थांना ‘मालक’ असे संबोधत असत. आपल्याला अगदी बालपणी हरीणाच्या मागे धावत असताना स्वामी समर्थांनी स्पर्शदीक्षा दिली होती असे महाराज सांगत असत.आपल्या हिमालयात्रेवरून परत येताना सुरुवातीला महाराज अक्कलकोट येथे आले व समर्थांच्या आज्ञेनुसारच शुभराय मठात आले असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. मात्र काही शिष्यांच्या आठवणीत आधी ते शुभराय मठात आले व तेथून जनार्दन बुवा यांच्यासोबत अक्कलकोटला गेले असेही उल्लेख आढळतात. मात्र स्वामी समर्थांविषयी शंकर महाराज नेहमीच पूज्य भावाने बोलत आणि तुम्हाला नामस्मरण करायचे असेल तर स्वामी समर्थांचे करा असेही सांगत.एकदा स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला महाराज जक्कल यांच्याकडे होते.मोठ्या पातेल्यात नैवेद्यासाठी खीर शिजवली होती.नेमकी त्यात एक चिमणी पडली,सगळे चिंता करू लागले.पण स्वामींचा प्रसाद भक्षण करून चिमणीचे जीवन वाढले आहे,असे म्हणत महाराजांनी ती हातात उचलली तर चिमणी एकदा चिवचिवाट करून भुर्रकन उडून गेली.एकूणच महाराजांची स्वामींवर अविचल निष्ठा होती.ते स्वामी समर्थांच्या सिद्ध परंपरेतील अवतारी पुरुष होते.

४)खिचडी प्रसाद- भरपूर भाज्या,मटार,हळद,मीठ,तिखट घातलेली डाळ तांदळाची खिचडी हे महाराजांचे आवडते अन्न होते.चहा,कांदाभजी,खिचडी हे त्यांचे नित्याचे आवडीचे पदार्थ होते.प्रसाद म्हणून ते खिचडीला प्राथमिकता देत असत.त्यांच्या जीवनचरित्रात खिचडीचे उल्लेख अनेक प्रसंगी आलेले आहेत. माता अन्नपूर्णा त्यांना प्रसन्न होती,त्यामुळे त्यांनी रांधलेली खिचडी कधीही कमी पडत नसे.त्यांची खिचडी तयार करण्याची पद्धतही वेगळीच होती.ते पाणी उकळायला ठेऊन त्यात भाज्या,मीठ मसाले,डाळ तांदूळ सगळे अंदाजाने घालत असत.परंतु त्यांनी शिजवलेली खिचडी अमृतासमान लागत असे. येशूख्रिस्ताची आपल्या शिष्यांना शेवटचे जेवण वाढण्याची कथा प्रसिद्ध आहे.श्रीशंकर महाराजांनी पण निर्वाणा पूर्वी स्वतःच्या हाताने खिचडी रांधून भक्तांना खायला घातली.आजही धनकवडीच्या मठामध्ये द्रोणातून खिचडी महाप्रसाद दिला जातो.वाराणसी येथे खिचडीबाबा मंदिरात रोज निशुल्क खिचडीचे वाटप होते.तेथील पहिले स्वामी हे शंकरमहाराज होते असे सांगितले जाते. तेथे महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे, तसेच मूर्तीच्या वर महाराजांचा एक कृष्णधवल फोटोही लावलेला आहे.

५)नाथपंथ – महाराजांचे नाथपंथाशी आंतरिक नाते होते.ते जेथे प्रकट झाले तो दावल मलिक पिर मच्छिंद्रनाथाचे स्थान आहे असे स्वतः महाराजांनी सांगितले आहे.गिरनार पर्वतावर देखील साधूंना बोलावण्यासाठी महाराजांनी अल्लख निरंजनचा पुकारा केला होता.डॉक्टर धनेश्वर यांना व त्यांच्या कुटूंबियांना मीननाथांचे दर्शन महाराजांनी घडवले होते. तसेच गहिनीनाथांना देखील त्यांनी एकदा पाचारण केले होते.नगरजवळच्या पुण्यक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या समाधीसमोर महाराजांनी धुनी पेटवली व ही परंपरा रक्षण करा असा आदेश दिला.ज्ञानेश्वर महाराजांच्या नाथपंथी गुरू परंपरेविषयी महाराज नेहमीच आदराने बोलत असत.

६)विविध देश व धर्मातील लोकांच्या संपर्कात-श्रीशंकर महाराजांनी प्रचंड भ्रमंती केलेली आहे.दीर्घ आयुष्य आणि सिद्धी या दोन गोष्टी त्यांच्याकडे होत्या.देह धारण केला आहे तोवर जमेल तितक्या साधकांना मार्गाला लावण्याचे त्यांचे जणू व्रतच होते.एका इंग्रज साहेबासोबत ते विलायतेस गेले.तेथे त्या साधकाला योगविद्या शिकवून तयार केले असे महाराजांनी डॉक्टर धनेश्वरांना सांगितले होते. तसेच लॉर्ड माउंटबॅटनलाही महाराजांनी स्वतःमध्ये येशू ख्रिस्ताचे दर्शन घडवले होते,अशी आख्यायिका सांगितली जाते. कलकत्ता येथील इंग्रज अधिकाऱ्याचीही अशीच गोष्ट आहे. महाराज अरबस्थान,जपान,युरोप सगळीकडे फिरून आले होते.नगरमध्ये आणि इतरही काही ठिकाणी त्यांचे शिष्य मुसलमान होते.नुरी साहेब,खान साहेब यांनी आपल्याला आलेली प्रचिती सांगितले आहे.हैदराबाद येथील निजाम पण महाराजांना मानत असे.त्याच्या नंतरच्या निजामशाही वारसाला महाराजांनी सांगितले की तुझे राज्य लयाला जाणार आहे,आणि कालांतराने तसेच घडले! देशाच्या विविध प्रांतात शंकर महाराजांची वेगवेगळी नावे संगीतली जातात.एकूणच महाराज जिथे जातील तिथल्या लोकांना त्यांनी साधकांच्या रुचिनुसार भक्तीमार्गावर,ज्ञानमार्गावर आणून सोडले.

७)महाराजांचे वय,डॉक्टरांची साक्ष-

डॉक्टर धनेश्वर हे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS झालेले निष्णात वैद्य होते. महाराजांच्या तोंडून खूप जुन्या पिढीतील गोष्टी ऐकल्यावर ते म्हणाले,महाराज तुमचे वय किती असेल? त्यावर महाराज हसून म्हणाले तू डॉक्टर आहेस,तूच सांग.
डॉक्टर धनेश्वरांनी खरोखरच महाराजांच्या शरीराची तपासणी केली आणि सांगितले की तुमचे वय सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक नक्की आहे. कारण शंभर वर्षे शरीर जगले तर नंतर त्यात हाडांची रचना वेगळी होणे,दातांचे कोन बदलणे वगैरे बदल होतात,जे तुमच्या शरीरात ठळकपणे दिसत आहेत.
त्यावेळी महाराजांनी स्वतःच्या पूर्वायुष्यातील काही घटना,नाथपंथाशी असलेला अनुबंध,स्वामी समर्थांकडून मिळालेली स्पर्शदीक्षा इत्यादी गोष्टी सांगितल्या.ही घटना साधारणपणे1930 सालातील असावी.

८)सर्व देवांचे अधिष्ठान-

दत्तगुरु,महादेव,तुळजाभवानी,विष्णू,बाळकृष्ण या रूपांत महाराजांनी आपल्या भक्तांना दर्शन घडवले आहे.
महाराजांनी वेळोवेळी वेगवेगळ्या देवांच्या स्वरूपामध्ये भक्तांना दर्शन दिले. कधी ते दत्तगुरूच्या स्वरूपामध्ये जनार्दन बुवांच्या समोर उभे राहिले, तर कधी मेहता बाबांच्या समोर ते विष्णूच्या रूपात उभे राहिले.गायिका यल्लूबाई हिला त्यांनी बाळकृष्णाच्या रूपात दर्शन दिले. एकदा तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती, म्हणून ते भक्तांना घेऊन बाजूला उभे राहिले आणि सर्वांना त्यांच्यामागेच प्रत्यक्ष तुळजाभवानी माता उभी असलेली दिसली. प्रधानांना आणि त्यांच्या मातोश्रींना श्री दत्तगुरूंच्या रूपाचे दर्शन महाराजांनी करवून दिले. कधी महाराज स्वतः अदृश्य होऊन त्या जागी विशिष्ट देवतेचे दर्शन करून देत तर कधी स्वतःच्या सोबत असताना त्या देवतेचे दर्शन घडत असे.महाराज नाथपंथी होते. शैव वैष्णव असा कोणताही भेद त्यांच्याकडे नव्हता .त्यामुळेच सगळ्या देवी देवतांचे स्वरूप ते धारण करीत असत आणि भक्तांना वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन हे घडवून देत असत.

९)ज्ञानेश्वरी,दासबोध,गुरुचरित्रावरचे प्रेम

महाराज ज्ञानेश्वरी बद्दल नेहमीच अतिशय आदराने व प्रेमाने बोलत असत. त्यांनी डॉ.धनेश्वरांना ज्ञानेश्वरीचे अंतरंग उलगडून सांगितले होते तर ताईसाहेब मेहेंदळे यांना ज्ञानेश्वरिवरचे प्रचवन करण्यासाठी आशीर्वाद व प्रेरणा दिली होती.दासबोध, गुरुचरित्र, एकनाथी भागवत हे ही त्यांचे अत्यंत आवडीचे ग्रंथ होते.वाशिम येथे महाराजांनी या सद्ग्रंथांचे पारायण घडवून आणले होते. यानिमित्ताने वाशिम गावात भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे मोठेच आयोजन करण्यात आले होते. यासाठी मन्नसिंग ठाकूर नावाच्या एका भक्ताने महाराजांना जागाही दिली आणि आर्थिक सहाय्य केले. हा सप्ताह खूपच छान रंगला. ठाकूर यांना देखील यामुळे फार आनंद झाला. येथे आजूबाजूचे सारे भाविक भक्त भक्तीचा रसामध्ये बुडून गेले. महाराजांचे भक्त डॉक्टर हरी खरे यांनी या सर्व गोष्टींना मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अशाप्रकारे चार ग्रंथांचे एकाच वेळी पारायण ही अद्भुत घटना वाशिम सारख्या एका विदर्भातील गावात महाराजांनी घडवून आणली. एकनाथी भागवत, दासबोध, गुरुचरित्र ,ज्ञानेश्वरी यांचा हा सप्ताह होता. यादरम्यान भरपूर अन्नदान करण्यात आले. खिचडी प्रसादाचे वाटपही करण्यात आले.महाराजांच्या जीवनात गुरुचरित्राचे स्थान काय होते हे एका घटनेवरून कळते. आपल्या समाधीच्या काही दिवस आधी त्यांनी एका भक्ताला गुरुचरित्र विशिष्ट पद्धतीने वाचण्यास सांगितले होते.समाप्तीच्या दिवशीच महाराजांनी देह ठेवला. अधिकारी ग्रंथांना महाराजांच्या जीवनात असे अढळ स्थान होते.

१०)गिरनार पर्वतावरील साधू भोजन-

एकदा महाराज नगरमध्ये होते.त्यांच्या मनात आले की गिरनारला जावे!एका भक्ताच्या घरून त्याच्या दहा वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आणि काही भक्तमंडळींना सोबत घेऊन गिरनार पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले.रात्र झाली होती तेव्हा सकाळी जाऊ असा मंडळीनी विचार केला. मात्र महाराजांनी त्या लहान मुलाला पाठीवर घेतले आणि चपळाईने गिरनार पर्वत चढून गेले. सर्वांनी महाराजांच्या अष्टावक्र स्वरूपातील त्या शरीराला अवघ्या अर्ध्या तासात शिखरावर जाताना पाहिले आणि त्यांच्यातील अद्भुत सामर्थ्याचा त्यांना प्रत्यय आला. हळूहळू बाकीची मंडळीही वर आली. सर्वांनी काही दिवस तेथे मुक्काम केला.एके दिवशी महाराजांनी ‘अलख’ असा पुकारा करुन पर्वतावरील साधूंना बोलावले.तेथे मोठया संख्येने साधू उपस्थित झाले. अचानक एवढे साधू कुठून आले, असे लोकांना वाटू लागले. या साधूंना महाराजांनी भोजनप्रसाद देण्याचे ठरवले. त्यासाठी मंदिरासमोरच थोड्याच वेळात सर्व व्यवस्थाही उभी केली. चूली पेटवण्यात आल्या. कणकेचे मोठमोठे गोळे (बाटी सारखे )भाजण्यात आले.महाराजांचा आवडता पदार्थ म्हणजे भजी, तेही करण्यात आले.एक एक साधू भरपूर जेवत होता! मोठमोठे कणकेचे भाजलेले गोळे ते भरपूर प्रमाणात खात होते. तेथे एवढ्या चुली,स्वयंपाकी, भांडीकुंडी ,पत्रावळी हे सर्व कसे उपलब्ध झाले, याचे कोडे भक्तांना उलगडत नव्हते! मात्र काही साधूंनी असे सांगितले की जेथे अवधूत असतो तेथेच केवळ आम्ही जेवण करतो. बाकीच्या वेळी आम्ही फक्त वायुभक्षण करूनच राहतो. आले तसे ते साधू व सर्व साहित्य अदृश्य झाले !मात्र हा प्रसंग बघितलेले लोक त्यानंतर कित्येक दिवस इतरांना याविषयी सांगत होते. या घटनेमुळे महाराज अवधूत आहेत याची सर्वांना खात्री पटली.
(क्रमशः)
रमा दत्तात्रय गर्गे.

डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.

लेखिका ह्या वैचारिक,साहित्य ,तत्वज्ञान, इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या विविध विशेषांकात लेखन केले आहे. कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्रच्या समन्वयक आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या सदस्या आहेत.

Comments (0)
Add Comment