धर्मांतरण : वाचा आणि शांत बसा !

 

धर्मांतरण : वाचा आणि शांत बसा !

“धर्मांतरण” हा भारतातील हिंदूंसमोरील सगळ्यात मोठे संकट आहे. विशेषतः ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयांकडून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीने धर्मांतरण केल्या जात असल्याचा आरोप नवीन नाही. कधी तरी फसवणुकीने किंवा आमिषे दाखवत धर्मांतर करणारी टोळी पकडल्या गेल्याची बातमी येते, मग त्याचा पोलीस तपास वगैरे नाटके होतात, धार्मिक नेत्यांचे त्यावर समर्थन आणि विरोधात वक्तव्य येतात आणि त्याला राजकीय रंग पण चढतो. मात्र पुढे काय? ती बातमी हळूच मागे पडते आणि विस्मृतीत ढकलल्या जाते.

 

गेल्या वर्षी जुलै २०२१ मध्ये असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये समोर आले होते. उमर गौतम आणि मुफ्ती काजी जहागीर कासमी यांच्या नेतृत्वात असेच एक धर्मांतर घडवून आणणारी टोळी पकडल्या गेली होती. यात अत्यंत काळजीची गोष्ट अशी की ही टोळी मुख्यतः मूक बधिर विद्यार्थ्यांना हेरून त्यांचा बुद्धिभ्रम करत आपले इस्पित साध्य करत होते. या प्रकरणा नंतर मोठा धार्मिक आणि राजकीय वाद, दावे – प्रतिदावे केल्या गेले. तसेच तपास यंत्रणांनी पण या आरोपींना विदेशातून मिळणाऱ्या पैशाच्या मदतीचे दावे केले होते. मात्र पुढे या सगळ्या बातम्या मागे पडल्या. आता ना तेव्हा आरोपींची बाजू घेणारे धार्मिक व्यक्ती या बद्दल काही बोलत आहे, ना तेव्हा या सगळ्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप करणारे राजकीय नेते, ना तपास यंत्रणा !

 

या धर्मांतराच्या खेळा मधील सगळ्यात मोठा खेळाडू म्हणजे चर्च ! ख्रिश्चन मिशनरी वेगवेगळ्या प्रकारे आदिवासी आणि इतर गरीब, रुग्ण यांची सेवा करण्याच्या बहाण्याने, त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने आणि विशेष म्हणजे उत्तम शिक्षण देण्याच्या बहाण्याने धर्मांतर करण्यात अतिशय पटाईत आहेत. या करता साम-दाम-दंड-भेद सगळ्या पद्धती अवलंबल्या जात असल्याचा आरोप वेळोवेळी चर्चवर झाला आहे. ओरिसात ऑस्ट्रेलियन पाद्री ग्राहम स्टेंस यांची हत्या १९९९ साली झाली होती. या घटनेचा आधार घेत भारताची आणि हिंदू धर्माचीही येथेच्छ कुप्रसिद्धी करण्यात आली होती आणि आजही करण्यात येते. मात्र त्याच ओरिसा राज्यात ऑगस्ट २००८ साली विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्या विरोधात काम करणारे, “घर वापसी” वर काम करणारे नेते स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती आणि त्यांच्या चार शिष्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येच्या एक आठवडा आधी त्यांना जीवे मारण्याची धमकी पण देण्यात आली होती. ही हत्या ख्रिश्चन मिशनरीचे काम करणाऱ्यांकडून करण्यात आली होती, तसेच यात काँग्रेस आणि माओवादी पक्षांचे स्थानीय नेते गुंतले असल्याचे पुरावे पण समोर आलेत आणि अटक पण झाली. मात्र या हत्येला ना आंतराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली, ना ही हत्या कोणी लक्षात ठेवली ! अगदी हिंदूंना पण ही हत्या माहीत आहे का ? हा प्रश्नच आहे.

तसेही भारतातील चर्च नुसते धर्मांतराच्या आरोपात लिप्त नाहीयेत, तर असे धर्मांतरण करता येण्यासाठी वेळप्रसंगी भारतातील फुटीरतावादी समूहांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष मदत पण करण्यात गुंतलेले आहेत, अर्थात या सगळ्याला आपल्या कथित मानवतावादी बुरख्याआड लपवण्यात त्यांना आज पर्यंत यश मिळत आहे. काही वर्षांपूर्वी झारखंड येथील अश्याच “पत्थरगढी चळवळीला” मदतीत चर्च लिप्त असल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन काळात पाच आदिवासी मुलींवर या चळवळीतील लोकांनी केलेला बलात्कार, त्यात स्थानीय पादरींनी घेतलेली भूमिका आणि अकारण हिंदुत्ववादी संघटनांची केलेली बदनामी असे अनेक पदर उलगडल्या गेले होते.

आताची ताजी घटना म्हणजे नागपुरात जबलपूर येथील चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे मॉडरेटर आणि ख्रिश्चन धर्मगुरु अर्थात पाद्री पी.सी. सिंग यांना झालेली अटक बरेच काही उघड करणारी आहे. मिशनरी शाळेच्या माध्यमांतून आर्थिक घोटाळा करण्याचा यांच्यावर आरोप आहे. याच्या घरी टाकलेल्या धाडीत दोन करोड रुपये बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. या पाद्रीचे संबंध तर थेट दाऊद इब्राहिम टोळी सोबत असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. अश्या प्रकारे काम करणारी मिशनरी संस्था कोणत्या पद्धतीने आपले धर्मांतर करण्याचे लक्ष गाठत असेल याचा विचार आपण केला पाहिजे.

 

सध्या असाच एक वाद तामिळनाडू राज्यात सुरू आहे. तामिळनाडू राज्यात मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्मीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणाव शिक्षण संस्था चालविल्या जातात. भारतातील कोणत्याही राज्यात अश्या ख्रिश्चन संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या शाळा – महाविद्यालयांपेक्षा तामिळनाडूत अश्या शिक्षण संस्था चालवण्यात येण्याचे प्रमाण अधिक आहेत. अर्थात यातील अनेक शिक्षण संस्था अतिशय नावाजलेल्या पण आहेत. अशीच एक संस्था आहे “चर्च ऑफ साऊथ इंडिया” ! या संस्थेच्या राजधानी चेन्नई येथील एका विद्यार्थी वसतीगृहात एन सी पी सी आर (नॅशनल प्रोटेकशन ऑफ चाईल्ड राईट्स) च्या चमूने भेट दिली. या भेटी दरम्यान तेथे राहात असलेल्या अन्य धर्मीय विद्यार्थिनींनी या वसतिगृहाच्या व्यवस्थापनावर जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप केला. या धर्मांतरणाला आम्ही विरोध केला तर आमचा छळ केला जातो असा गंभीर आरोप पण केला गेला. अर्थात असा आरोप गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडू मध्ये गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. याच आरोपांची शहानिशा करायला केंद्रीय सरकार कडून ही एन सी पी सी आर ची चमू या वसतिगृहा पर्यंत पोहचली होती. तेव्हा तेथे राहत असलेल्या पोरींकडून आम्हाला जबरदस्ती बायबल वाचायला लावतात, उशीखाली येशूची तसबीर ठेवायला लावतात पासून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो पर्यंतचा आरोप केला गेले.

 

मात्र या आरोपांचे मूळ आणि एन सी पी सी आर ची चमू तामिळनाडूत येण्याचे कारण सहा महिन्यापूर्वी तामिळनाडू येथील तंजावुर येथील घटनेत आहे. होय, तेच तंजावुर जिथे महाराष्ट्राचे बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राज्य करीत होते. आजही तेथे मराठी छाप कायम आहे. तर या तंजावून येथे सहा महिन्यांपूर्वी लावण्या नामक मुलीने विष प्राशन करत आत्महत्या केली. ही आत्महत्या करतांना तिने आपल्या समाज माध्यमाच्या खात्यावर एक चलचित्र प्रसारित केले, ज्यात तिने आपण हिंदू असून आपण ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून आपण राहात असलेल्या आपल्या मिशनरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांकडून आपला मानसिक छळ होत असल्याची तक्रार करत, आपला हा होणारा छळ आता सहन करण्याची आपली ताकद नसून आपल्या समोर हिंदू धर्म सोडण्यापेक्षा मरण पत्करणे हाच मार्ग असल्याचे निवेदन दिले होते. तत्कालीन काळात ही आत्महत्या आणि तिचे चलचित्र असलेले निवेदन बरेच गाजले होते.

मात्र या प्रकरणात तामिळनाडूत सत्तेवर असलेल्या डी एम के पक्षाच्या स्टालिन सरकारची भूमिका मात्र एकदम वेगळी आहे. स्टालिन सरकार मात्र लावण्याची आत्महत्या घरगुती कलहातून झाल्याचे म्हणत आहे. मृत लावण्या करत असलेला आरोप आणि तिचे आई वडील करत असलेली तक्रार ही खोटी आणि तथ्यहीन असल्याचे सांगत आहे. इतकेच नाही तर या आत्महत्येला जवाबदार असल्याचा आरोप असलेल्या वसतिगृहातील कर्मचारी, नन म्हणजेच महिला धार्मगुरूला अटक झाली होती. तिला जामीनावर सोडल्यावर तिचे स्वागत करायला डी एम के चे एक आमदार जातीने कारागृहा बाहेर उभे होते.

याच सगळ्या आरोपांची शहानिशा करायला एन सी पी सी आर ची चमू चेन्नई येथे गेली हे वर सांगितले आहेच. तेथील आरोप आणि तथ्य समोर आल्यावर या विरुद्ध राज्य सरकारने कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन पण राज्य सरकारकडे देण्यात आले. ज्यात चेन्नई मधील चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या वसतीगृहातून या पोरींना त्वरित बाहेर काढावे, या पोरींनी आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या आरोपांची त्वरित दखल घ्यावी आणि योग्य तपास करावा, या संस्थे विरोधात गुन्हा नोंदवावा आणि संस्थेच्या या कारवाईत लिप्त अश्या आरोपात कर्मचाऱ्यांना त्वरित अटक करावी अश्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. मात्र स्टालिन सरकारने अशी कोणतीही कारवाई करण्याचे स्पष्टपणे नाकारले आहे, तसेच राज्यात असे कुठेही धर्मांतर होत नसून हे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत आहे.

मात्र तंजावुरच्या लावण्या आत्महत्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने मात्र राज्य सरकारचे कान उपटले आहेत. तंजावुर प्रकरणात मृत व्यक्तीचा जवाब उपलब्ध असतांना, तसे पुरावे असतांना पण राज्य सरकार या आत्महत्येला घरगुती वाद असल्याचे कसे जाहीर करत आहे असे म्हणत धारेवर धरले आहे. तरी राज्य सरकार आपला हेका सोडायला आणि हा सगळा प्रकार राजकीय आहे या वक्तव्यावर कायम आहे.

तिकडे तामिळनाडूत हा प्रकार होत असतांना मात्र कर्नाटकात राज्य सरकारने या बळजबरी धर्मांतरणाच्या विरोधात एक कडक कायदा आपल्या विधानसभेत पारित करून घेतला आहे. ज्याचा विरोध अल्पसंख्यांक धार्मिक नेते आणि धर्मगुरू तर करत आहेतच, पण काँग्रेस सारखे पक्ष पण करत आहेत. काँग्रेस आता या कायद्याच्या विरोधात न्यायालयीन पायरी चढण्याच्या तयारीत आहे.

तर ही आहे संपूर्ण भारतातील धर्मांतर करणाऱ्या टोळीची कहाणी. बाकी आपण काय करायचे ? तर वाचायचे आणि विसरायचे..! महत्वाचे म्हणजे “प्रार्थना पद्धत कोणतीही असो, मात्र हिंदू संस्कृती महत्वाची” असली वाक्य फेकत सांस्कृतिक हिंदुत्वाचे खोटे ढोल वाजवायचे.

फोटो – गुगल साभार .

 

महेश वैद्य

लेखक हे सामाजिक, राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत. मोबा- 808724185 https://lavleledive.blogspot.com/?m=1

Comments (0)
Add Comment