धोक्याची घंटा.
२१ व्या शतकात माणसाने प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे व यशाचे उंच शिखर गाठले आहे. अंतराळात रॉकेट पाठवण्यापासून तर गावातील शेती पर्यंत यांत्रिक उपकरणाची भर घातली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानान सर्वसामान्य लोकांच सुद्धा आयुष्य विविध साधनांनी व्यापून टाकले आहे. असेच काहीसे उपकरण (गॅझेट) आपण आपल्या अवतिभोवती रोज वापरत असतो. त्यातील एक उपकरण (गॅझेट) म्हणजे मोबाईल. मोबाईल शिवाय काही तास सुद्धा वेगळे राहू शकत नाही, इतके आपण त्यावर निर्भर झालेलो आहोत. कॉल, नेट बँकिंग, चॅटिंग, शॉपिंग, मुव्ही, एंटरटेनमेंट, ऑफिस वर्क, स्कूल वर्क, सिर्फींग, सरचिंग इ. इतकेच नाही तर टीव्ही, ए सी, लाईट सुरु बंद करण्याचे काम देखील मोबाईल वरच होते. असे एक ना अनेक कामं आपण फक्त एका मोबाईल करू शकतो. इतके सगळे फायदे या एका उपकरणा मुळे होतात. पण ही झाली नाण्याची एक बाजू आता आपण त्याची दुसरी बाजू बघणार आहोत जी पलकांना धोक्याची घंटा देत आहे. कोरोना काळापासून मुलांचा स्क्रीनिंग टाईम वाढल्याच्या सर्वात जास्त तक्रारी आल्या आहेत. असे लहान मुलांमधील स्क्रीन एक्सपोजर ट्रेंडच्या अभ्यासात दिसून आले आहे. २ वर्षाखालील मुलांच्या स्क्रीन टाइममध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. यामुळे मुलांच्या शारिरीक हालचालींमध्ये घट झाली आहे. त्याशिवाय पालकांच्या कामाच्या व्यस्त वेळा, कामातील वाढलेली स्पर्धा, आर्थिक चंचन इ. कारणाने पालक मुलांकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी मुलं स्वतःला मोबाईलच्या स्वाधीन करतात. त्यामुळे मुलांचा स्क्रीनिंग टाईम वाढला आहे. स्क्रिनिंग टाईम म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्ही वापरण्याचा व बघण्यचा वेळ वाढणे.
भारतामध्ये कोरोनाच्या आधी स्क्रीनिंग टाइममध्ये ४.९ तास इतकी नोंद झालेली होती मात्र कोरोना काळामध्ये त्यात तब्बल २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजेच सध्याच्या काळात ६.९ तास इतके नोंदवण्यात आले आहेत. (एन सी पी सी आर) नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अभ्यासानुसार सध्याच्या घडीला फक्त १० टक्के मुलं स्मार्टफोनचा वापर अभ्यास आणि शाळेसाठी करत आहेत तर तब्बल ५३ टक्के मुलं चॅटिंग आणि समाज माध्यमांवर वेळ घालवत आहेत. वाढता स्क्रिनिंग टाइम फक्त लहान मुलांमध्येच नव्हे तर किशोरवयीन मुलांमध्येही एक मोठे चिंतेचे कारण आहे. किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यासाठी मोबाईल, टी व्ही, इंटरनेट मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. इथे हेच नमूद करायचे आहे की मोबाईलचा वाढता वापर हा कोरोनापूर्व पासूनच झालेला आहे आणि आता त्यात आणखीन भर पडली आहे. याला जबाबदर कोण? परिस्थिती की पालकवर्ग, ज्या वयात मुलांना मोबाईल म्हणजे काय हेच कळत नाही त्या वयात त्यांच्या हातात आपणच मोबाईल देतो. आणि मुलं त्याच्या आहारी गेले की आपणच त्यांच्या नावाने बोंब ठोकतो माझा मुलगा ऐकतच नाही, त्याचं मोबाईल शिवाय पानच हलत नाही. एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवायचे असेल तर शंभर वेळा नफ्या तोट्याचा विचार करता. पण मोबाईल मुलांच्या हातात द्यायच्या आधी त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल पालकांना एकदाही विचार करावासा वाटत नाही का? पालकांच्या लाड आणि प्रेमापोटी मुलांचे नुकसान होत आहे हे नक्की.
इवलेसे बोट कसे मोबाईल चालवते म्हणून गोड कौतुक आपणच करतो. आई काम करत असताना मुलांनी एकाजागेवर बसून राहावं म्हणून टीव्ही किंवा मोबाईल दाखवतो. मुलं जेव्हा खायला लागतात तेव्हा त्यांना कुठे तरी गुंतवून ठेवावं लागतं त्यावेळी आपणच खेळणी, पुस्तकं न देता टीव्ही, मोबाईल वरील गाण्याची मदत घेतो. यामूळे पालकांच काम सोप होतं पण मुलांना त्याची सवय लागत जाते. बाहेर हट्ट करू नये म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. हे बरेचदा नकळत केल्या जातं. मोबाईल, टीव्ही मधील आवाज, चलचित्र, भडक रंग, हे मुलांना जास्त आकर्षित करतात. आणि म्हणून मुलं तासन तास या साधनांसोबत खिळून बसलेली असतात. शिवाय मुलं हे अनुकरण प्रिय असतात त्यामुळे ते ७० टक्के आई- वडील, इतर सदस्य यांचे अनुकरण करीत असतात. ते घरच्या सदस्यांना कायम मोबाईल, लॅपटॉप सोबत बघत असतात त्यामुळे त्यांना सुद्धा तसेच अनुकरण करायचे असते. तसे बऱ्याच पालकांचे कामं या साधनांशिवाय शक्य होत नाही. अशावेळी काय करायचं? तर मुलांना कायम सांगत राहायचं आम्ही आमच्या कामासाठी याचा वापर करत असतो ही वस्तू सध्या तुझ्या कामाची नाही. लहान पणापासून मुलांना या साधनांपासून दूर ठेवले तर त्याचा इतका त्रास होणार नाही हे नक्की. एक उदा. घायचं झालच तर ज्या प्रमाणे आपण १८ वर्ष वय झाल्याशिवाय मुलांना गाडी ची चावी देत नाही त्याच प्रमाणे ५ वर्षापर्यंत मुलांना मोबाईल सुद्धा हातात देऊ नये जिथे ऑनलाईन शिक्षण असेल तिथे पर्याय नसतोच मग त्यांना फक्त त्या वेळेपूर्तच मोबाईल द्यावा त्यानंतर नाही. गाडीने होणारे अपघात शरीर पंगू करते तर मोबाईल ने होणारे अपघात मन व बुद्धीला पंगू करते. मोबाईलला पर्याय नसला तरी तो कोणत्या वयात आणि किती वेळ हातात द्यावा हे पर्याय नक्कीच पालकांच्या हातात आहे. त्यामुळे पालकांनी आपली स्वतःची काही मार्गदर्शक तत्व तयार करावी आणि त्याचे काटेकोर पालन करावे. घरातील सर्वांनी मिळून मुलांना या साधनांपासून दूर ठेवावे आणि त्यात सातत्य असावे आज मोबाईल वापरायला नाही बोलले तर उद्या हो बोलले असं करू नये. हा काटेकोर पणा असेल तरच मुलांना आपण सुरक्षित जिवन आणि उत्तम आरोग्य देऊ शकतो.
जन्मा नंतर मुलांचा सर्वांगीण विकास बऱ्याच काळा पर्यंत चालूच असतो. शरीराची संपूर्ण वाढ, बौद्धिक व मानसिक विकास होण्यासाठी मुलांना सकस व अनुकुल वातावरणाची गरज असते. मात्र आपण कुठलाच विचार न करता जन्मा नंतर काही महिन्यातच त्यांच्या कोवळ्या वयात मोबाईल हातात देतो. ज्याचे खुप वाईट परिणाम मुलांवर होताना दिसत आहे. मोबाइलच्या माध्यमातून उत्सर्जक किरणे म्हणजे रेडिएशनचा मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ शारीरिक होणारी झीज यावर अभ्यास करीत आहेत. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो. रेडिएशन अॅंड न्यूक्लियर सेफ्टी अथोरिटी, फिनलॅंड यांच्या अहवालानुसार मानवी शरीरातील पेशी सुकण्यास सुरुवात झाली आहे. त्या आकुंचन पावत आहेत. संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे की हे पेशीमधील प्रोटीन वाढवते आणि हेच पेशी खराब होण्याचे एक लक्षण आहे. मोबाइल फोन कानाला लावल्याने किंवा आपल्या शरीराजवळ खुप वेळ ठेवल्याने त्यातून निघणार्या रेडिओ लहरी डोक्यात व शरीराच्या इतर भागात शिरतात. त्यामुळे त्याभागातील उष्ण तापमान वाढून लोकल ब्लडफ्लो वाढतो. व अॅल्बुनिन रक्तवाहिनीतून निघून मेंदू पेशीत व पेशीजलात येतो जे फार धोक्याचे आहे. मुलं रोज किती किती तास मोबाईल मध्ये डोक घालून बसलेले असतात त्यामुळे त्यांना उठण्या- बसण्याचं, खाण्याचं, कसलंच भान राहत नाही. सतत चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने हात,पाठ,बोटे, मानेत खूप वेदना होतात. मुलांना वेळीच आवर घातला नाही तर टीन टेंडोनाइटिस विकार होण्याची दाट शक्यता असते. त्याशिवाय किशोरवयीन मुलांमध्ये एकटेपणा, नैराश्य येण्याचे धोके मोबाईल मुळे वाढत चालले आहे. अपुरी झोप आणि जेवणाकडे दुर्लक्ष यामुळे मुलांच्या प्रकृती बिघडत आहे. बऱ्याच मुलांना लवकर चष्मा लागणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळे कोरडे पडणे, तसेच मानसिक आजार होत आहे. लहान मुलं चिडचिडी व हट्टी होत आहे. सतत मोबाईल, टीव्ही बघणाऱ्या मुलानचा जास्त संवाद होत नसल्याने ते उशिरा बोलायला शिकत आहे.
ह्या सर्व समस्या आपल्या मुलांमध्ये होऊ नये म्हणून होणाऱ्या पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देऊच नये. आणि ज्यांची मुल पूर्णपणे या साधनांच्या आहारी गेली आहे त्यांनी तातडीने त्यावर उपाय करावे. मुलांना मोबाईल, टीव्ही ची सवय लागू नये म्हणून काय काय करता येईल. तर लहान पणापासूनच मुलाना कटाक्षाने या साधनांपासून दूर ठेवावे. मोबाईल मोठ्याच्या कामाची वस्तू आहे लहान मुलांच्या नाही असे सांगावे. ज्या पालकांना असे वाटते की मोबाईल वापरून आपली मुलं खुप हुशार होणार आहे त्यांनी हा गैरसमज दूर करावा उलट मोबाईल न वापरणाऱ्या मुलांची एकाग्रता खुप चांगली असते ते कमी चंचल व खुप हुशार होतात. लहानपणापासूनच मुलांना पुस्तकांची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न करा. वाचनाची आवड लावा. पालकांनी मुलांसोबतचा संवादाचा वेळ वाढवावा. ० ते ३ वर्षांपर्यंतच्या मुलांना पुस्तकं, खेळणी, बौद्धिक खेळांमध्ये गुंतवून ठेवता येते. व त्यावरील मुलांना खेळायला बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जसे की मैदानी खेळ, घरातील खेळ, पालकांनी मुलांना सृजनात्मक कामं करायला सांगावे ज्यामुळे मुलं त्यात गुंतून राहतात व त्यांच्या सुप्त गुणांना वावं मिळतो. इथे प्रश्न पडतो की रोज रोज मुलांना नवीन काय द्याव कारण लहान मुलं लवकर कंटाळून जातात. अशावेळी पालकांनी खेळांची, वस्तूंची, गोष्टींची एक लिस्ट करून घ्यावी ज्यामुळे आज काय सांगाव हा प्रश्न पालकांना पडणार नाही. धोक्याची तिसरी घंटा वाजायच्या आधी मुलांसाठी काय चांगलं काय वाईट हे पालक म्हणून आपल्याला नक्कीच कळायला पाहिजे. त्यामुळे वेळीच सावध व्हा उगाच विषाची परीक्षा घेऊ नका.
फोटो गुगल साभार..
– पल्लवी चिकारे – पळसकर