वेळेचा सदुपयोग ध्यान साधनेने करूयात, चला काही वेळ स्वतःसोबत घालवूया.. !

लेख
वेळेचा सदुपयोग ध्यान साधनेने करूयात, चला काही वेळ स्वतःसोबत घालवूया.. !
आज मनुष्याच्या जिवनात सर्व सुख-सोयी, गाडी-बंगला, बँक बॅलन्स सर्व काही असतांना सर्वांची एक सारखीच तक्रार असते ती म्हणजे “वेळ”. वेळेअभावी आज आपण परिवाराकडेच काय तर स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा आवश्यक तेवढे लक्ष देऊ शकत नाही. एकवेळ शारीरिक आरोग्यासाठी तरी काही वेळ काढू पण मानसिक आरोग्याच काय? भय,चिंता,राग, चिडचिड, अनिद्रा ह्यासारख्या मानसिक व्याधी पुढे वेगवेगळ्या आजारास जन्म देतात व आपल्या पारिवारिक, व्यावसायिक, सामाजिक सोबतच आर्थिक जीवनावर परिणाम करतात. 
आज कोरोना विषाणूमुळे का होईना पण ना भूतो ना भविष्यती असा मोठा ब्रेक ह्या धकाधकीच्या जीवनात लोकांना मिळाला. गेले दहा दिवस आपण आपला संपूर्ण वेळ हा आपापल्या परिवारा सोबत, TV पाहण्यात तसेच सोशल मीडिया वर तर काही लोक आपला आवडता छंद जोपासण्यात खर्च करत आहेत. ह्याच दिवसांमधून काही दिवस किंबहुना काही तास आपण आपल्या स्वतःसोबत आणि फक्त स्वतःसोबत घालवलेत तर, आणि ते स्वतःवर घालवायचे तर नेमकं करायचं तरी काय हा मोठा प्रश्न. तर अर्थातच ह्याच उत्तर असेल “ध्यान साधना” सोप्या भाषेत ध्यान लावण्याचा सराव करायचा.
ध्यान (Meditation) चा अर्थ म्हणजे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करणे असा काही अंशी बरोबर असला तरी तो पूर्ण नाही. ध्यानाची व्याख्या आणि अर्थ वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या अनुभवानूरुप केले आहेत. ध्यान म्हणजे स्वतःशी एकरूप होणे, ध्यान हे मानवी शरीर आणि त्याचे चंचल मन ह्यांच्यात सुबध्दता (Alignment) करणे होय. ध्यान हे मनुष्याने स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःला दिलेले अमूल्य बक्षीस आहे.
आजच्या ह्या आधुनिक युगात जिथे शारीरिक स्वास्थ( Physical Fitness) व मानसिक स्वास्थ्य ( Mental Fitness) चे क्रेझ आहे तिथे योग आणि ध्यान ( Yoga & Meditation) ह्याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. आज योग आणि ध्यान ह्याला  ग्लोबल मार्केट मिळालं आहे ह्यांचा व्यवसाय आज करोडो डॉलर वर पोचला आहे, पाश्चात्य लोक आज योग आणि ध्यान ह्याला त्यांच्या दैनंदिन जीवनशैली चा भाग बनवत असतांना ज्या भूमीतुन हि देन जगाला मिळाली तेथील लोकांमध्ये मात्र योग आणि ध्यान ह्याबद्दल उदासीनता दिसून येते. 
भारतीय सनातन संस्कृती मध्ये कित्येक धर्मग्रंथात ध्यानाचे महत्व विशद केले आहे. श्रीमद भगवत गीता मध्ये भगवान श्रीकृष्ण ध्यानयोग चा उल्लेख करतात. स्वामी विवेकानंद ह्यांनी सुद्धा त्यांच्या “राजयोग” ह्या पुस्तकामध्ये ध्यानाचे महत्त्व व पद्धती खूप विस्तीर्ण स्वरूपात मांडली आहे. भगवान बुद्धानी दिलेली “विपश्यना” असो की जैन मुनींनी दिलेली “प्रेक्षाध्यान” असो, ओशो रजनीश ह्यांनी सांगितलेली “सक्रिय ध्यान” असो की परमहंस योगानंद ह्यांनी जगात प्रसार केलेली क्रिया योग असो. तसेच आजच्या काळातील श्री. श्री. ह्यांनी पुरस्कृत केलेली “सुदर्शन क्रिया” असो जग्गी वासुदेव ह्यांची “ईशा क्रिया” तसेच ब्रह्मकुमारी पुरस्कृत “राजयोग” असोत की निर्मला देवी ह्यांची सहजयोग पद्धती असो ह्या सर्व ध्यान योगा च्या पद्धती ह्या सर्व आध्यात्मिक लोकांनी अभ्यासून पुरस्कृत केलेल्या आहेत. 
ध्यान केल्याचे भरपूर फायदे सांगितल्या जातात जसे की नियमित ध्यान सराव करणाऱ्याचे मन आनंदी राहते, नियमित ध्यान मूळे कार्यक्षता वाढण्यास मदत होते, विचार शक्ती तसेच स्मरण शक्ती वाढते, एकाग्रता वाढवून आत्मविश्वास वाढतो इत्यादी एक अनेक फायदे ध्यान सरावाने होतात असे सांगण्यात येते.
ध्यान करतांना हे त्यांतील जाणत्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात करायला पाहिजे म्हणजे पद्धती सोबत कोणती सावधगिरी घ्यायला पाहिजे हे सुद्धा कळेल. आजच्या ह्या इंटरनेट च्या आणि स्मार्ट फोन च्या युगात सर्व माहिती मार्गदर्शन हे विडिओ च्या स्वरूपात आपल्या मोबाईल वरच मिळते. असे असंख्य विडीओ You Tube वर उपलब्ध आहेत त्यातील एखादी सरळ सोपी पद्धत आपल्या आवडीनुसार आपण निवडून त्याचा सराव घर बसल्या कुठेही न जाता कोणतीही शुल्क न देता करू शकतो. लक्षात ठेवा ध्यानाचे फायदे फक्त आणि फक्त नित्य सरावानेच आणि योग्य पद्धतीने केले तरच मिळू शकता पण एकदा का तुम्ही त्या अवस्थेपर्यंत पोचले की तुमच्या जीवनात खूप सकारात्मक परिणाम होतात असे अनेक महापुरुष्याचे अनुभव आहेत.
चला तर मग कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊन चा उपयोग ह्या अस्थिर मनाला लॉक करून त्याची चावी आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करूयात, रोग, भय, चिंता ह्यांपासून मुक्त होऊन आनंदी होण्याचा प्रयत्न करूया, चला ध्यान साधनेचा सराव करूया.
(photo – google)
– सचिन शेगोकार 

सचिन शेगोकर

सचिन शेगोकर, अकोला. महाराष्ट्र. pharmaceutical company मध्ये नोकरी. सामाजिक व राजकीय विषयाचे अभ्यासक आहेत.

Comments (2)
Add Comment
  • चैताली देशमुख

    अगदी बरोबर आहे सर
    जो करेन रोज योग
    पळून जातील हजारो रोग….

  • विवेक अलई

    अतिशय सुंदर पोस्ट आहे,
    जी आजचा धकाधकीच जीवनात स्वता चा आरोग्यास योग्य काळजी घेण्यास शिकवते……