डिंकाचे लाडू ते डिंक कपल.

डिंकाचे लाडू ते डिंक कपल.

“काय बाई! हे कसलं खुळ शिरलंय कार्टीच्या डोक्यात कुणाच ठाऊक? तो जावई ही तसलाच. काय म्हणे तर डिंक कपल व्हायचंय यांना. अरे असे डिंकाचे लाडू खायच्या वयात कसले डिंक होताय म्हणावं. दोघेही नवरा बायको मिळून काय घोळ घालून ठेवताय कुणास ठाऊक!” उषाताई तणतणातच म्हणाल्या. “ताई आधी शांत हो. आणि मग सांग बरं काय झालं ते?” रेखा त्यांना शांत करत म्हणाली. अर्थात उषाताईंची तणतण स्वाभाविकच होती. अनघा त्यांची सुकन्या आणि जावई मंदार यांचे लग्न होऊन चांगली पाच-सहा वर्ष होत आली होती. पण पाळणा हलण्याची लक्षणे काही दिसत नव्हती. सुरुवातीला त्यांनी आडून आडून सुचवून पाहिलं की एखाद्या डॉक्टरला दाखवूया. पण कार्टी ताकास तूर लागू देईना. शेवटी त्यांनी स्पष्टच बोलायचे ठरविले. त्यावर अनघाने जे काही उत्तर दिले ते ऐकून उषाताई पूर्णपणे हादरल्याच. अनघा आणि मंदार दोघांनाही मूल नकोच होते. कारण काय तर म्हणे वेळ नाही. दोघेही कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर. खोऱ्याने पैसा कमावणारे. त्यांना डिंक कपल म्हणून जगायचे होते. डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड.

“अग ताई ,हे नव्या पिढीचा आणखीन एक नवं खूळ बघ. नवरा बायको दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमावत असतात. पैसा खोऱ्याने असतो पण एकमेकांसाठीच जिथे वेळ देता येत नाही तिथे अपत्याची जबाबदारी घ्यायला दोघेही तयार नसतात. खरंतर करिअरच्या स्पर्धेत दोघेही इतके पुढे गेलेले असतात की एक पाऊल मागे घ्यायची एकाचीही तयारी नसते. आजकाल ट्रेण्ड येण्याचाही एक ट्रेण्ड आलेला आहे. एखादी नवी कल्पना किंवा विचार पुढे आला की सारासार विचार न करता आंधळेपणाने त्याला स्वीकारणे ही नव्या पिढीची सवय बनत चालली आहे. काही दशकांपूर्वी फेमनिझम अर्थात स्त्रीवादाने जोर धरलेला होता. युगानुयुगे जिच्यावर सतत अन्याय झाला आहे अशा स्त्रीने या अन्यायाविरुद्ध केलेला एल्गार म्हणजे फेमिनिझम ची चळवळ. साऱ्या जगाने हा विचार उचलून धरला. कारण जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्यांच्या मौलिक हक्कांपासून वंचित ठेवणे हे पूर्णपणे अयोग्यच आहे. पण अति तिथे माती म्हणतात ना! या फेमिनिझम चे एक अत्यंत वाईट टोक म्हणजे डिंक हा विचार होय. अगं ताई, केवळ आपल्याच देशात नाही तर संपूर्ण जगात या डिंक विचाराने कहर केलेला आहे. चीन, जपान, कोरिया या देशांमधील स्त्रियांनी तर लग्न करणे अथवा मूले जन्माला घालणे अक्षरशः बँन केले आहे. चित्र एवढे भयंकर आहे की तेथील सरकारही धास्तावले आहे. देशाच्या लोकसंख्येत लक्षणीयरीत्या घट झाली आहे. कधीकाळी मुलांनी फुलून गेलेल्या शाळा ओस पडल्या आहेत. आता सरकारच या स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात पाऊले उचलण्याची तयारी करत आहे. “बापरे! सांगतेस काय?” उषाताई मध्येच म्हणाल्या. “बरं त्या चिनी जापान्यांचं राहू दे. आधी आपल्या घराचं बघ. खरंय तुझं म्हणणं ताई जगाला वाट दाखवायची असेल तर पहिला दिवा आपल्याच घरी लावायला हवा.”

“कसले दिवे लावत आहेस मावशी?” अनघा दारातून आत येत बोलली. सोबत मंदारही होताच. “अग आईने तू आल्याचे कळवले आणि तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं सांगून मला ताबडतोब बोलावून घेतले. अर्थात विषय मला माहीतच आहे. घरीदारी आता तोच एकच विषय उरला आहे. माझी आई म्हण की मंदारची आई म्हण, या दोघींनीही या प्रश्नाला अगदी रशिया युक्रेन प्रश्नासारखं सार्वजनिक करून टाकलं आहे. आता फक्त आमच्यातील हा पर्सनल मुद्दा न्यूज चैनल वर दाखवण्याचा बाकी राहिला आहे.”

“अने! अशी डोक्यात राख घालून घेऊ नकोस. अगं तिचं वय आणि तिची भूमिका समजून घे. मंदार तू ही शांतपणे विचार कर. आपण पडलो भारतीय माणसे. कुटुंब व्यवस्था हा आपल्या संस्कृतीचा मुलाधार. कुटुंब म्हटलं की एकमेकांशी प्रेमाने बांधले जाणे, एकमेकांच्या जगण्यावर हक्क दाखवणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हे ओघाने आलेच. तेव्हा स्वाभाविकच आहे की आजी आजोबा होण्याकरिता आसुसलेली हे मंडळी प्रश्न तर विचारणारच. तूच विचार कर. एकमेकांना वेळ देणे जगभर फिरणे मजा करणे हे सर्व चांगलेच आहे, पण किती काळ? काही काळ तुम्हाला हेच फार छान वाटेल. पण त्यानंतर अति सहवासाचाही कंटाळा येतो बघ. प्रेमात वाटेकरी हवाच. त्यानेच तर प्रेमाची गंमत वाढते. अगं ऑफिस सुटल्यानंतर घरी दारात बसून वाट बघणारी लेकरं असतील तर घराची ओढ लागते माणसाला. पिलांच्या चिवचिवाटा शिवाय घरटही सून असतं बघ. उगाच नाही लाखो रुपये खर्च करून माणसं स्त्रीरोग तज्ञांचे उंबरठे झिजवतात. नवससायास करतात. आणि जबाबदारी घेण्याचे म्हणशील तर पाण्यात पडलं की पोहता येतच आपोआप. बाईची एकदा आई झाली किती स्वतःच घडत जाते. हे आई पणच तिला पैलू पाडत असतं. आणि ही भावना तर नैसर्गिकच आहे याला तू काय किंवा मी काय अपवाद कसे असणार? निसर्गानेच तर स्त्रीला हा बहुमान दिलेला आहे. शेवटी प्रत्येक सजीवाचे जीवन ध्येय असतं आपल्यापेक्षा उत्तम सजीव निर्माण करणे. मग या निसर्गदत्त देणगीचा अव्हेर करणे हा निसर्गाचा अपमान नाही का?”

“पण मावशी इतके टेन्शनस् असतात या कॉर्पोरेट जॉब मध्ये. टार्गेट्स, डेडलाईन्स यांचे टेन्शन वेगळं .त्यात मग मुलांचं टेन्शन कसं काय घ्यायचं? आणि इतकं करूनही मुलं म्हातारपणी सांभाळतीलच हे कशावरून?”अनघा आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ म्हणाली.
“अगं आपण अपेक्षाच कशाला करायची की मुलं सांभाळतील? ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिला तो सांभाळतो आहेच की. आता तुझेच बघ. ताईला जरा बरं नसलं की तुझा जीव कासावीस होतो. मग तुझ्यासाठी जीव कासावीस होईल असं कुणीतरी हवंच ना ग! आणि हे छोटे छोटे टेन्शन्स तर जगण्याचं कारण असतात. त्याशिवाय आयुष्य किती बेचव होऊन जाईल. मुलांच्या शाळेचा पहिला दिवस, त्यांच्या वेळा सांभाळणे, त्यांचे स्नेहसंमेलन, त्यांची ट्रीप, त्यांच्याकरिता केलेली खरेदी, त्यांच्या अभ्यास, पुस्तके, परीक्षा या सर्व गोष्टी किती आनंद देतात ते मायबाप झाल्याशिवाय नाही कळत बघ. जो निसर्ग आपल्याला जन्माला घालतो त्या निसर्गाचेही आपण देणे लागतो. हे ऋण चुकवायचं असतं ते आपल्यापेक्षा अधिक सहृदय, जबाबदार सर्वच बाबतीत आपल्यापेक्षा सरस असलेला दुसरा सजीव निर्माण करून. ही जीवनसाखळी चालवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तुमच्यासारख्या जबाबदार कर्तव्यदक्ष मुलांच्या डोक्यात हे कसलं खूळ शिरलं आहे. जे उद्याचं सुंदर जग घडवू शकतात त्या झाडांनी फुलायचंच नाही आणि दुसरीकडे बिनखतांनी वाढलेलं हिरवं तण जर जमिनीच्या जमिनी व्यापत राहिलं तर लोकसंख्येचा असमतोल नाही का निर्माण होणार?

“मावशी पटतंय तुझं म्हणणं आम्हाला. पण तुझ्या म्हणण्यावर आम्ही आणखी विचार करू आणि पूर्ण विचारांतीच मग निर्णय घेऊ.”
“लेकरांनो तुम्ही सुज्ञ आहात. पश्चिमेकडून असे कित्येक प्रवाह आलेत आणि येत राहतील त्या प्रवाहात वाहून जायचं की भक्कमपणे पाय रोवून उभे राहायचं हे तुमचं तुम्ही ठरवायला हवं. ते देखील पूर्ण विचार करून.”
अनघा आणि मंदार दोघांच्याही चेहऱ्यावर दिसणारं आश्वासक स्मित पाहून उषाताई समाधानांननं हसल्या.

निकिता गजानन गावंडे
न्यू सुभेदार लेआउट, नागपूर.
9970663813

निकिता गजानन गावंडे, नागपुर.

लेखिका सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये नियमित स्तंभलेखन, विविध सामाजिक विषयांवर कविता, विशेषत्वाने हास्य कवितांचे लेखन करतात. मोबा - 9970663813.

डिंक कपल.
Comments (0)
Add Comment