डॉ. माधवराव चितळे.

मराठी शास्त्रज्ञ लेखमाला - ४

डॉ. माधवराव चितळे.

पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी जगात असलेला नोबेल पुरस्कारसमकक्ष  स्टॉकहोम  पुरस्कार मिळवणारे माधवराव चितळे यांचा जन्म ८ ऑगस्ट, १९३४ रोजी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट  विद्यालयात झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात होते. महाविद्यालयाच्या परीक्षेत ते विद्यापीठात पहिले आले होते. त्यावेळी उत्तम गुण मिळवणारी मुले अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाकडे जात असत, परंतु माधवरावांचे वडील त्यांना म्हणाले, देश नुकताच स्वतंत्र झाला आहे आणि देश उभारणीसाठी अनेक कामे करायची आहेत, तेव्हा तू स्थापत्य अभियांत्रिकीला जा आणि माधवराव तिकडे गेले. अभियंता झाल्यावर काय करायचे यासाठी ते कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री. चाफेकर यांना भेटायला गेले व त्यांचा सल्ला घेतला. चाफेकरांनी, ‘भविष्यात आपल्याला खूप पाणी लागणार तेव्हा तू पाणी खात्यात काम कर’ असा सल्ला दिला. माधवरावांनी यूनियन पब्लिक सर्विस कमिशनची  परीक्षा दिली. माधवरावांना नोकरी लागली तरी त्यांची शिकण्याची आवड संपली नव्हती.  १९७४-७५ साली पर्विन  फेलो म्हणून ते अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठात गेले व एक वर्षांचा अभ्यासक्रम पुरा करून तेथेही पहिला क्रमांक मिळवून ते परत आले. माधवरावांच्या कामाची सुरुवात १९६० सालापासून महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम खात्यापासून झाली. पहिली दोन वर्षे रस्ते, पूल, इमारती या विभागात काम केल्यावर माधवरावांची नंतर पाटबंधारे विभागात बदली झाली. हेच खाते त्यांना हवे होते आणि तेथे त्याची अनायासे बदली झाली होती. त्यावेळी दुस-या पंचवार्षिक योजनेच्या कामाची आखणी चालू होती आणि त्यात महाराष्ट्रात बरीच धरणे बांधायची होती. त्यासाठी,मध्यवर्ती संकल्पना चित्र संघटना स्थापन केली व तेथे काम करण्याची संधी माधवरावांना मिळाली. या अगोदर त्यांनी धुळे जिल्ह्यातील सारंगखेडा पुलावर काम करत असताना प्री स्ट्रेस्ड काँक्रीटचे तंत्रज्ञान शिकून घेतले होते. त्याचा उपयोग आता त्यांना होत होता. १९६१ साली पुण्याजवळील पानशेतचे मातीचे धरण फुटले.ते धरण फुटल्यानंतर खडकवासल्याहून निघणा-या कालव्यातून पुणे शहराला जो पाणी पुरवठा होत होता तो बंद पडला. त्यामुळे पुढील तीन महिन्यात मुळा नदीतून नळ टाकून पाण्याची व्यवस्था करण्याचे काम माधवरावांवर सोपवले गेले व अनेक अडचणींना तोंड देत देत ते काम त्यांनी वेळेत पुरे केले. त्या धरणाच्या रचनेत काही उणीवा राहिल्या होत्या. त्या कशा दुरुस्त करता येतील यासाठी १९६२ साली एक अभ्यास समिती नेमली. त्यात एक सदस्य म्हणून माधवरावांची नेमणूक झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील (पूर्वीचा अहमदनगर जिल्हा) मुळा नदीच्या आजूबाजूचा प्रदेश अवर्षणग्रस्त असल्याने तेथे मातीचे धरण बांधायचे ठरले.तेथील जमिन गाळाची होती आणि त्या खाली जाऊन जेथे दगड लागेल तेथे धरणाचा पाया घ्यायचे ठरले. हा प्रकल्प ब्रिटिशांच्या काळात होणार होता पण या गाळाच्या जमिनीमुळे तो लांबला.  फ्रेंच तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम व्हायचे होते, पण त्यांना यश न आल्याने माधवरांची तेथे नेमणूक झाली. पण अगोदर अपयश आल्याने कामगारांत एक पराभूत मनोवृत्ती निर्माण झाली होती, ती काढून माधवरावांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी महाविद्यालयात विज्ञान घेऊन अकरावीत शिकणा-या मुलांना घेऊन गाळाच्या चिकण  मातीवर प्रयोग केले. धरणाखाली वाळूच्या थरातून खोलवरच्या खडकापर्यंत पाण्याला अभेद्य असा पडदा उभा करण्याचे प्रयोग त्यांनी केले. अशासाठी की चिकण माती व काँक्रीटच्या मिश्रणात पडद्याचे काम केल्यावर त्या काँक्रीटच्या कामाला तडे जाऊ नयेत. हे काम यशस्वी तर झालेच पण त्यामुळे हे नवीन तंत्रज्ञान उदयास आले. नंतर माधवरावांची बदली भातसा धरणाच्या बांधकामावर झाली. त्यांनी मंत्रालयात न बसता धरणाच्या बांधकामावर जाऊन राहायचे ठरवले. हे काम जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने व्हायचे होते. माधवराव म्हणाले,या धरणाचे पाणी सरळ पाइपमधून मुंबईला आणत असताना वाटेतील सर्व गावांना आपण पाणी देऊ, कारण त्यांचे पाणी आपण मुंबईला आणत आहोत.  हे जागतिक बँकेला पटेना. तेव्हा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मदतीने, मग आम्हाला तुमची मदत नको असे खडसावून सांगितल्यावर त्यांनी माधवरावांची ही सूचना मान्य केली.  माधवरावांचा काम करताना जो मजुरांशी संबंध येई त्यातून त्यांचे प्रश्न समजावून घेणे व त्यांना स्वस्थ जीवन जगता येणे यावर ते चिंतन करीत असत. कारण मजूर जर स्वस्थ राहिले तर ते उत्तम काम करतील हे त्यांना जाणवले. त्यासाठी त्यांनी बरेच काम केले. १९७८ साली महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकरीतील स्थापत्य अभियंत्यांसाठी त्यांनी एक वेगळे प्रशिक्षण केंद्र औरंगाबादला उघडले. अभियांत्रिकीसाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्यातील विषय पुढील कामाबद्दल असावेत या दृष्टीने त्यांनी त्याची रचना करून दिली. १९५६ ते १९८४ अशी २८ वर्षे माधवराव महाराष्ट्र शासनाच्या सेवेत होते. त्यातील शेवटची तीन वर्षे ते पाटबंधारे खात्याचे सचिव होते. सचिवपद  हे आयएएस अधिकारी आपले राखीव क्षेत्र मानतात, पण ही कोंडी माधवरावांनी १९८१ साली फोडली. १९८४ साली त्यांना दिल्लीला नदीखोरे आयुक्तम्हणून बोलावले गेले. त्यांच्या कार्यक्षेत्रात फराक्का, तुंगभद्रा (आन्ध्र  प्रदेश व कर्नाटकाचा संयुक्त प्रकल्प), बेटवा प्रकल्प (मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प),बाणसागर प्रकल्प (मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तरप्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प) हे होते. या सगळ्यांचे नियोजन व बांधकामाचा पाठपुरावा त्यांच्याकडे होता. १९८५ ते १९८९ ते केंद्रिय जल आयोगाचे  अध्यक्ष होते. या अन्वये देशभरच्या पाण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. १९८९ मध्ये ते केन्द्रीय मंत्रालयात प्रशासकीय सचिव म्हणून गेले. त्यामुळे भारताच्या शेजारील नेपाळ, भूतान, पाकिस्तान, बांगला देश यांच्या बरोबर त्यांना पाण्यासंबंधी सामंजस्य करार करावे लागत. निवृत्त झाल्यावरही जागतिक जल सहभागिता मंचाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले, तेव्हा मात्र त्यांनी औरंगाबादला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला असल्याने त्याचे कार्यालय औरंगाबादला आले. माधवरावांना आयुष्यात अनेक सन्मान मिळाले. त्यातील सर्वोच्च म्हणजे १९९२ साली मिळालेला नोबेल समकक्ष स्टॉकहोम  पुरस्कार. त्याशिवाय इतर जे पुरस्कार मिळाले, त्यात चिन्मुळगुंद पुरस्कार, मराठी विज्ञान परिषदेच्या १९९० सालच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद, मराठी विज्ञान परिषदेचे १० वर्षे विश्वस्तपद, हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मानद डॉक्टरेट,  महाराष्ट्र टिळक विद्यापीठाची डी.लिट वगैरे अनेक आहेत. २००५ साली आंतरराष्ट्रीय सरोवर पर्यावरण न्यासाच्या वैज्ञानिक कार्यक्रम समितीचे त्यांना सदस्य म्हणून नेमण्यात आले. १९९८ साली  अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी  इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. मराठी विज्ञान परिषदेने त्यांना सन्माननीय सभासदत्त्व दिले. ते २००५ ते २००८ या काळासाठी मराठी अर्थशास्त्र परिषदेचे विश्वस्त होते. भारतीय जलसंस्कृती मंडळाचे ते मार्गदर्शक होते. महाराष्ट्र सिंचन सहयोगाच्या मार्गदर्शक मंडळाचे ते अध्यक्ष होते. जलसंवाद या मासिकाचे ते मार्गदर्शक होते. इंडियन  इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे ते आजीव सभासद होते. त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत. त्यांची नावे १) धरण सुरक्षेवर मार्गदर्शक पुस्तिका  २) प्रॉडक्टिव्हिटी ऑफ  वॉटर अँड लँड  ३) वॉटर सेव्ह -वर्ल्ड रिव्ह्यू ४) ब्ल्यू रेव्होल्यूशन अशी आहेत. १९८६ सालापासून त्यांनी भारतभर जलदिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाने २१ मार्च, १९९३ पासून जागतिक जलदिन साजरा करायला सुरुवात केली. १९८७ पासून राष्ट्रीय जलसंमेलन भरवण्याची पद्धत त्यांनी सुरु केली. १९९५ मध्ये आंतरराष्ट्रीय सिंचन व नि:सारण आयोगात असताना युवा मंचाची स्थापना करून नवीन पिढीला सिंचनाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर प्रवेश मिळवून दिला. १९८८ मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी पाणी या विषयावर दिल्लीत भव्य प्रदर्शन भरवले. त्याचा लाभ ८०,००० विद्यार्थ्यांनी घेतला.  धरण अभियांत्रिकी, नदी खोरे व्यवस्थापन, बांधकाम व्यवस्थापन व्यवस्थापकीय संघटनात्मक कार्यपद्धती, नियोजन व प्रबंधन अशा विषयांवर त्यांनी अनेक जाहीर
भाषणे दिली आणि लेख व शोध निबंध लिहीले. माधवराव आज वयाच्या ९०व्या वर्षी मध्यप्रदेशातील इंदूर येथे स्थायिक आहेत.

 

  • अ.पां.देशपांडे

अ.पां. देशपांडे

लेखक हे जेष्ठ साहित्यिक असून त्यांनी जवळपास २००० लेख लिहिले असून त्यांची ८५ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विज्ञान परिषद चे कार्यवाह आहेत. मराठी विज्ञान परिषद (मविप) ही संस्था समाजात विज्ञान प्रसार आणि प्रचाराचे कार्य करते. मोबाइल नंबर - ९९६७८४१२९६.

डॉ. माधवराव चितळे.मराठी विज्ञान परिषदमराठी शास्त्रज्ञस्टॉकहोम  पुरस्कार
Comments (0)
Add Comment