डॉ. शुभा साठे यांच्या कर्तृत्वासाठी.

डॉ. शुभा साठे यांच्या कर्तृत्वासाठी.

आपल्याकडे अशी संकल्पना आहे की, जे काही जीवन आपण जगतो ते विधीलिखित असतं. परमेश्वराने ठरवलेले असते की प्रत्येकाने कसे आयुष्य जगायचे .ते मात्र प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याच्या वाट्याला त्याचे आयुष्य आहे. माझ्यासमोर असेच एक आयुष्य आहे .त्यांच्या सत्कर्मामुळे परमेश्वराने त्यांची निवड खूप चांगल्या कामासाठी केली आहे .त्यांचे पूर्व संचितही खूप चांगले आहे .त्यामुळे त्या एक वरदहस्त लेखिका आणि उत्कृष्ट वक्ता म्हणून नावारूपाला आलेल्या आहेत .अर्थात त्यासाठी त्यांनीही मनापासून केलेले प्रयत्न व योगदानही तितकेच महत्वाचे आहे. .सरस्वती देवीने आशीर्वाद दिलेली, आणि आपल्या प्रतिभा संपन्न दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारी लेखिका, म्हणजे डॉक्टर शुभा साठे. पूर्वाश्रमीच्या शुभा देशपांडे. आजच्या नवरात्रीचा शब्द जागर शुभाताईंच्या कर्तुत्वासाठी.

शुभाताईंचे “त्या तिघी “हे पुस्तक वाचले आणि मी खूप प्रभावित झाली. असे वाटले कधीतरी या लेखिकेला भेटण्याचा योग यावा. योगायोगाने शक्तीपीठातील समितीच्या वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमात आम्ही दोघी एका मंचावर परीक्षक होतो. त्यावेळी शुभाताईंच्या देवघरात शांतपणे तेवत राहणाऱ्या समई सारख्या ,मधुर आणि विनम्र व्यक्तित्वामुळे मी अधिकच प्रभावित झाली. त्यांच्या सहवासाचा तो डोर पकडून माझी मैत्रीण सीमा देशपांडे आणि स्मिताताई पत्तरकिने यांच्या सहकार्याने शुभाताईंपर्यंत पोहोचण्याचा योग आला. त्यांनी दिलखुला स्वागत केले. या शब्द जागर मध्ये पुन्हा तोच सकारात्मक अनुभव येतोय की , हे मोठे लोक खूप साधे आणि विनम्र असतात .अतिशय सुंदर वातावरणात आमची चर्चा झाली .

शुभाताई मुळ नाशिकच्या .वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्यांचा परिवार भुसावळ येथे स्थायिक झाला. शुभाताई बारावीत असताना त्यांची पहिली कथा किशोर मासिकात छापून आली .सोबत पाच रुपयांचा धनादेश देखील आला .त्यानंतर घरी मासिक आले. शुभाताईंचे लहानपणापासून वाचन खूप होते. वाचनाचा संस्कार घरी आई-वडिलांकडून मिळाला .वडील स्वयंसेवक आणि आई समितीची सेविका. त्यामुळे घरात संघाचे वातावरण. शुभाताई सांगतात, त्या काळात विवेकानंद, सावरकर, शिवाजी महाराज ,नेताजी सुभाष चंद्र बोस यासारख्या अनेक पुस्तकांचे वाचन झाले .तर आईमुळे रामायण, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, दासबोध, सतत कानावर पडत असे .तो फार मोठा संस्कार मनावर झाला. बारावीनंतर शुभा ताईंनी लेखन सुरू केले .

बीए प्रथम वर्षाला असताना त्यांचे लग्न झाले .लग्नानंतर नागपूर मधील वास्तव्य सुरू झाले .नागपूरला लोकमतने त्यावेळी विनोदी लेख स्पर्धा घेतली होती. त्यावेळी नुकतेच रंगीत टीव्ही बाजारात आले होते .तेंव्हा “मोठ्या हौसेने रंगीत टीव्ही घेतला” या त्यांच्या विनोदी लेखाला प्रथम पारितोषिक मिळाले .

लग्नानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना बी ए ला पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले . पुढे त्यांनी एम ए ,बी एड, व पीएचडी केले. त्यासाठी त्यांचा विषय होता सावरकर. आणि पू .भा. भावे यांच्या वैचारिक वाङ्मयाचा तुलनात्मक आणि चिकित्सक अभ्यास. दरम्यानच्या काळात त्या विदर्भ साहित्य संघाच्या संपर्कात आल्या .तिथे त्यांचे लेखन अभिवाचन आणि सूत्रसंचालन सुरू झाले.

पीएचडीनंतर शुभाताईंच्या व्याख्यानांना सुरुवात झाली .त्यानंतर त्यांनी नाट्यभिनय ही केला .त्यांचे पती वीज मंडळात नोकरीला असल्याकारणाने ,विज मंडळाच्या अनेक नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा ,यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या सकस अभिनयामुळे त्यांना अभिनयाचे अनेक पारितोषिके देखील मिळाले आहेत .

शुभाताई सांगतात, त्यांना पहिल्या व्याख्यानाचे निमंत्रण नागपूरच्या ज्येष्ठ नागरिक संघाकडून मिळाले .त्या संदर्भात नानासाहेब शेवळकरांनी मार्गदर्शन केले. नानासाहेब त्यांना आपली मुलगी मानायचे. त्यावेळी नानासाहेब प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत. ते म्हणाले की मी तुझे भाषण प्रत्यक्ष ऐकू शकणार नाही .त्यामुळे शुभाताईंनी त्यावेळी जेष्ठ नागरिक संघात झालेले भाषण ध्वनिमुद्रित करून शेवाळाकरांना ऐकवले. त्यावर शेवळकरांनी भविष्यवाणी केली की, हजारो प्रेक्षक बसलेले असतील ,आणि ते मंत्रमुग्ध होऊन शुभाताईंचे भाषण ऐकतील .शुभाताई सांगतात की त्यांचा आशीर्वाद आणि भविष्यवाणी प्रत्यक्षात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिक संघाने सलग दहा-बारा वर्षे शुभाताईंना विविध विषयांवर व्याख्यान देण्यासाठी बोलाविले .दरम्यान २००२ पासून एल ए डी कनिष्ठ महाविद्यालयात त्यांना नोकरी लागली. यासोबत शुभाताई धरमपेठ कॉलेजला एम ए चे वर्ग घ्यायला जायच्या .दीड वर्षापूर्वी त्या एलईडी मधून निवृत्त झालेल्या आहेत.

शुभाताईंचे पुस्तक रूपाने पहिले लिखाण प्रसिद्ध झाले ते म्हणजे दोन धुरंधर हिंदुत्वाचे.. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या आचार्य पदवीचा प्रबंध! नागपूरच्या लाखे प्रकाशनाने तो प्रदिद्ध केला. त्यांची लेखन शैली लाखे प्रकाशनाचे श्री चंद्रकांत लाखे यांना अतिशय आवडली. तेव्हा लाखे प्रकाशाने शुभाताईंना लहान मुलांसाठी थोर पुरुषांची चरित्रे लिहिण्यास सांगितले. तेव्हा शुभाताईंनी वंदनीय मावशी केळकर, परमपूज्य श्री गुरुजी, शंभुराजे, लहुजी बुवा ,वीरबंदा बैरागी ,बिरसा मुंडा ,आर्य चाणक्य, महाराणी पद्मिनी, पृथ्वीराज चव्हाण ,रमाबाई रानडे, मदनलाल धिंग्रा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, संत एकनाथ, साडेतीन शक्तीपीठे, माई सावरकर ,साडेतीन मुहूर्त, साडेतीन शहाणे, संत कान्होपात्रा ,संत कबीर, संत मीराबाई ,इत्यादी चरित्र पर छोटी पुस्तके लिहिलीत.

त्यानंतर शुभाताईंकडून लिहिण्यात आलेलं आणि अतिशय गाजलेलं मोठे पुस्तक म्हणजे , “त्या तिघी”. हे पुस्तक लिहिण्यामागचे कारण सांगताना शुभाताई म्हणाल्या की, स्वा .सावरकर स्मारक समिती नागपूर यांनी 2003 पासून तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार सुरू केला .शुभाताई या समितीच्या कार्यकारी सदस्य आहेत .तेव्हा लाखे म्हणालेत की सावरकरांच्या घराण्यातील महिलांनी काय भोगले याचा विचार केला का. शुभाताई सांगतात बाराव्या वर्गात असताना वडिलांनी सावरकर समजावून सांगितले होते .आठव्या वर्गात असतांना, माझी जन्मठे वाचण्यात आले होते. पुढे काळे पाणी कादंबरी वाचली .मात्र सावरकरांच्या घराण्यातील महिलांविषयी जास्त काही वाचण्यात आले नव्हते. तेव्हा असे मनापासून वाटले की शोध घ्यायला पाहिजे. या अवस्थेतूनच अभ्यास सुरू झाला. त्यासाठी प्रथम द.न .गोखले यांनी दोन खंडांमध्ये लिहिलेले बाबाराव सावरकरांचे चरित्र वाचले .राजाराम वाचनालयात दोन कादंबऱ्या मिळाल्या. तुळशीपत्र ही कादंबरी माई सावरकरांच्या जीवनावर होती ,तर सोबत वृंदावन ही कादंबरी येसू वहिनींच्या जीवनावर होती .शांताबाई सावरकरांनी लिहिलेले लाखे प्रकाशन चे हरिदिनी हे पुस्तक वाचलं .मात्र समाधान झाले नाही .त्यानंतर सावरकर घराण्यातील सर्वांच्या भेटी घेतल्या. विक्रम काका सावरकर, स्वामिनी काकू ,हिमानी काकू, यांच्याशी भरपूर चर्चा झाल्या. शुभाताई सांगतात स्वामिनी काकू सावरकर नागपूरला आल्यात की ,एक तर त्या शुभाताईंकडे मुक्कामी यायच्या. किंवा शुभाताई त्यांच्या भेटीसाठी जायच्या .दोन दोन दिवस सलग आठवणींची चर्चा चालायची. शुभाताईंनी सावरकर घराण्यातील नातवंडांशी, मुलींशी, संपर्क साधला .त्यासोबतच विश्वास सावरकरांची मुलगी म्हणजे, तात्यासाहेबांची नात विदुला गाडगीळ यांच्याशी हैदराबाद येथे जाऊन भेट घेतली. एक वर्षाच्या अथक अभ्यासानंतर “त्या तिघी” या पुस्तकाचे लिखाण झाले. ते सर्व दूर लोकप्रिय तर झालेच .मात्र त्या तिघी या पुस्तकाला चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत .त्या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद झाला. त्या तिघी या विषयावर आतापर्यंत शुभाताईंची 250 व्याख्याने झालेली आहेत .त्या तिघी पुस्तकाने रेकॉर्ड केला आहे .शुभाताई सांगतात त्या तिघी या पुस्तकाशी माझे नाते राष्ट्रभक्तीचे आहे .

महाराणी येसूबाई वर देखील शुभाताईंचे पुस्तक प्रकाशित झाले आहे .त्या म्हणतात की, येसूबाई खूप कर्तृत्ववान होत्या. मात्र इतिहासातील ते एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीस वर्षे औरंगजेबाच्या कैदेत राहून, छोट्या शाहू महाराजांना घेऊन ,अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या मनात हिंदू राष्ट्राचे संस्कार येसूबाईंनी रुजविले आहेत. त्या म्हणाल्या की, येसूबाईंवर पुस्तक लिहिण्यासाठी उपलब्ध साहित्य भरपूर होते .या पुस्तकाच्या लिखाणाबाबत बाबासाहेब पुरंदरेंचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. त्यांच्यासोबत तीन चार भेटी होऊन अतिशय चांगल्या प्रकारचा वार्तालाप झाला .या पुस्तकाला राज्यस्तरीय दोन पुरस्कार मिळालेत.

शुभाताईंचा लेखन प्रवास अव्याहत पणे सुरू आहे. त्याला लेखन यज्ञ असे देखील म्हणता येईल .आपल्या लेखनातून अतिशय दर्जेदार आणि राष्ट्रप्रेमी विचारांचे साहित्य शुभाताईंनी निर्माण केले आहे. महाराणी येसूबाई नंतर त्यांच्या 13 ते 14 पुस्तकांची निर्मिती झालेली आहे .आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा नुकतीच वार्ता त्यांना मिळाली होती की, त्यांनी लिहिलेल्या संत ज्ञानेश्वर चरित्रास पुरस्कार मिळालेला आहे. यासोबतच त्यांनी लहान मुलांसाठी सचित्र शिवचरित्र आणि सचित्र डॉक्टर हेडगेवार चरित्र लिहिले .सावरकरांवर “एकमेव अद्वितीय स्वातंत्र्यवीर सावरकर “हे पुस्तक लिहिले. जगाच्या इतिहासात केवळ त्यांच्याच आयुष्यात आगळ्यावेगळ्या घटना आहेत असे शुभाताई सांगतात. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद झालेला आहे .

नुकतेच रायगड या विषयावर त्यांनी श्रीक्षेत्र रायगड हे पुस्तक लिहिले .त्यासंदर्भात दोन वेळा त्या रायगडावर जाऊनही आल्यात. रायगड या विषयावर त्यांना व्याख्यानाचे निमंत्रण आलेले आहे .पसायदान या विषयावरही त्या व्याख्याने देतात .

लाखे प्रकाशनच्या आग्रहास्तव त्यांनी “कृतज्ञ मी कृतार्थ मी” हे आत्मचरित्र लिहिले. शुभाताई सांगतात की त्यांचा लेखन प्रवास केवळ दहा ते बारा वर्षांचा आहे . मला वाटते की , या कालावधीत अतिशय दर्जेदार पुस्तकांची निर्मिती व प्रभावी व्याख्याने झाल्यामुळे वयाच्या केवळ पन्नासाव्या वर्षीच आत्मचरित्र लिहिण्याचा योग त्यांना आला. त्या सांगतात त्यांचे पती ठामपणे त्यांच्या पाठीशी आहेत. लिखाणशी पूर्णपणे एकरूप राहून त्या लेखन करतात. त्यावेळी एक प्रकारचे झपाटलेपण त्या अनुभवतात. आणि विनम्रतेने सांगतात की, सरस्वतीने माझ्याकडून लिहून घेतले .कधी कधी लिहिताना पात्रांचा संवाद कानात घुमत राहतो .मग तो कागदावर उतरतो .आणि त्या संवादाशी एकरूप शुभा ताईंच्या भावना असतात. असे वाटते की परमेश्वराने शुभा ताईंच्या जगण्याचा हेतू लिखाणासाठीच ठरविला आहे .त्यासोबतच त्या प्रखर सावरकर भक्त आहेत.

शुभा ताईंनी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की ,पुण्याची 2020 ला सुरू झालेली सावरकर सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेच्या शुभाताई मार्गदर्शिका आहेत. श्रीनिवास कुलकर्णी हा या संस्थेचा तरुण अध्यक्ष आहे.या संस्थेचे सर्व उपक्रम तरुण मुले राबवितात. दरवर्षी सावरकरांना समर्पित दिनदर्शिका या संस्थेतर्फे काढली जाते.यासोबतच दरवर्षी 26 फेब्रुवारीला जो सावरकरांचा आत्मार्पण दिवस आहे ,त्या दिवशी संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर सावरकर प्रेमी पर्यटक पुण्याच्या समर्थ टूर्स बरोबर अंदमानला जातात. या संस्थेने अंदमान येथे 21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात प्रत्यक्ष जाऊन सावरकर सप्ताह साजरा करणे सुरू केले आहे .या उपक्रमात शुभाताईंचाही सक्रिय सहभाग असतो .संस्थेतर्फे अंदमानात 101 तुपाचे दिवे लावण्यात येतात .त्यावेळी सावरकरांचे अंदमनातील पहिले पाऊल या प्रसंगाचे वर्णन शुभाताई करतात .सात दिवस सावरकरांच्या जीवनावर व्याख्यानमाला चालते .26 तारखेचा कार्यक्रम सेल्युलर जेलमध्ये असतो. त्यावेळी पर्यटन मंत्री ,जेलचे अधिकारी, अंदमानातील गृहमंत्री, सच्चिदानंदजी शेवडे गुरुजी, यांचा या कार्यक्रमास सहभाग असतो .सच्चिदानंद जी सावरकर या विषयावर भाषण देतात, तर शुभाताई देखील “त्या तिघी” या विषयावर भाषण देतात .अंदमान येथे महाराष्ट्र मंडळ आहे .तिथे सावरकर समर्पित जीवन असा त्यांच्या जीवनावर मोठा कार्यक्रम होतो. शुभाताई फेब्रुवारीमध्ये आवर्जून या संस्थेच्या कार्यक्रमांसाठी अंदमानला जातात .सावरकर या विषयासाठी त्यांचे मन आणि लेखणी समर्पित आहे, हे त्यांच्या वाणीतूनच लक्षात येते. मुळात शुभाताई प्रखर राष्ट्रभक्त आहेत .त्यांच्या रक्ताचा रंग आणि श्वासाचा स्वर राष्ट्रभक्तीचा आहे.

त्या म्हणतात सावरकर ज्या कोठडीत राहिले ,ती कोठडी नाही तर तो “गाभारा” आहे. तिथे “तेज” वास्तव्याला होते .मात्र काही पर्यटकांच्या अनास्थेबाबत त्यांना अतिशय वेदना होतात. लोक चपला, जोडे घालून कोठडीत जातात. मात्र सावरकर सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सूचनाफलक लावणे सुरू केले आहे. त्यामुळे जोडे बाहेर काढूनच आता लोकं आत जातात.त्यांना अजून एक सल आहे की, नवविवाहित जोडपे जेव्हा हनिमून साठी अंदमानला येतात, तेंव्हा यांना, वावरायचे, कपड्यांचे भान नसते .ती आचारसंहिता लोकांनी जपली पाहिजे. कारण ती भूमी समर्पणाची पावन भूमी आहे. मुली शॉर्टस मध्ये व क्रॉप टॉप मध्ये तसेच मुले बर्मुडा मध्ये येऊन सावरकरांनी फिरवलेल्या कोलू सोबत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सेल्फी घेतात. तेंव्हा मनाला अतिशय यातना होतात. लोकांनी त्या जागेचे पावित्र्य राखले पाहिजे असे त्यांचे कळकळीचे मत आहे .याबाबत त्यांच्या संस्थेकडून आचारसंहिते बाबत आग्रह धरण्याचा पाठपुरावा होत आहे. शुभाताई म्हणतात ते एक मंदिरच आहे. “विनायक
तीर्थ “

सावरकर सामाजिक संस्था, पुणे तर्फे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील सावरकर राहत असलेल्या खोलीमध्ये, जिथे सावरकरांचा अर्ध पुतळा आहे ,तिथे सावरकरांनी शिवाजी महाराजांवर तयार केलेल्या आरती चा फलक लावला. त्या म्हणतात 124 वर्षांनी त्या खोलीत शिवाजी महाराजांची आरती झाली .पुण्यातील सार्वजनिक गणपती उत्सवात ,गणपती आरती सोबत सावरकरांनी रचलेली शिवाजी महाराजांची आरती व्हावी असा आग्रह त्यांच्या संस्थेने सुरू केला आहे. पुण्यातील काही गणेश मंडळांनी त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे .त्या म्हणतात या आरतीमुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्तीच्या संस्काराला खतपाणी मिळेल.

शुभाताईंना दोन गुणी मुली आहेत मोठी. मुलगी भागानगर( हैदराबाद) येथे इंटेरियर डिझायनर आहे, व जावई कॉग्नेझंट येथे सीनियर मॅनेजर आहेत. लहान मुलगी अमेरिकेत असते. तिने एरो स्पेस मध्ये एम एस केले आहे .ती कॅलिफोर्नियातील बोईंग कंपनीमध्ये प्रोजेक्ट इंजिनियर आहे, तर जावई अमेरिकन नेव्हीत आहे. लहान जावई अमेरिकन आहेत .

याशिवाय शुभाताईंना चित्रकला, पेंटिंग, पेन्सिल स्केच ,यांचा छंद आहे. त्यांच्या घरातील सुबक आणि सुंदर फ्रेम त्याची साक्ष देतात .शुभाताईंनी जे शिवचरित्र लिहिले ते पुस्तक इंग्रजीत अनुवादित झाले आहे .
शुभाताई नागपूर सावरकर स्मारक समितीच्या कार्यकारणी सदस्य आहेत .राजाराम सिताराम दीक्षित वाचनालयाच्या कार्यकारणी सदस्य आहेत. या सोबतच नागपूर येथील अभिव्यक्ती लेखिका संस्थेच्या त्या कार्यकारणी सदस्य आहेत.

मला असं वाटते की ,कमी वयात शुभाताईंच्या लेखनाच्या आणि वक्तृत्वाच्या यशाचा आलेख फार मोठा आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप अभिनंदन .आणि येणाऱ्या काळात त्यांच्याकडून अशा चांगल्या पुस्तकांचे लिखाण व्हावे आणि समाजाला त्यातून प्रेरणा मिळावी अशी त्यांना मनापासून शुभेच्छा….

ऍड मनिषा कुलकर्णी, नागपूर.
9823510335

एड. मनीषा कुलकर्णी

लेखिका प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असून, अनाथ बालक - बालिकांसाठी अनाथाश्रमाच्या माध्यमातून सेवा कार्य करतात. मोबाईल नं - 9823510335

Comments (0)
Add Comment