इलेक्टिव्ह मेरिट इतकेच इफेक्टिव्ह मेरिट देखील तेवढेच महत्वाचे !

इलेक्टिव्ह मेरिट इतकेच इफेक्टिव्ह मेरिट देखील तेवढेच महत्वाचे !

सर्वच राजकीय पक्ष कोणत्याही निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या संबंधाने त्या व्यक्तीच्या पात्रतेचे मुल्यमापन करताना साधारणतः त्याचे इलेक्टिव्ह मेरिट विचारात घेवूनच त्याला उमेदवारी देण्याचा विचार करतात . elective Merit म्हणजे त्याची निवडून येण्याची क्षमता . असा त्याचा ढोबळ मानाने अर्थ निघतो .अशा अंगाने त्याकडे आवर्जून बघीतले जात असल्याने त्याची एकमेव कसोटी आर्थिक ऐपतीचे गणित असाच त्यातून सूप्त संदेश ध्वनीत होतो . बाकी इतर बाबी दुय्यम म्हणूनच निष्पन्न होतात . एखाद्याची आर्थिक ऐपत चांगली असेल तरच तो त्या बळावर पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी खर्चाचा भार उचलण्यास सक्षम समजण्यात येत असतो . तसेच याच आर्थिक गणिताच्या बळावर तो आपल्या मतदारसंघात स्वत:ची प्रतिमा उभी करण्यासाठी कार्यकर्त्यांना खुष ठेवण्यापाई त्यांचे जमतील तसे लाड पुरवत याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे होर्डिंग्ज लावून आपली छबी तयार करण्यातही यशस्वी होतो . यात वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस किंवा नियुक्त्या – निवड प्रक्रियेच्या अभिनंदनपर जाहिराती , फलके , सत्कार समारंभाचे आयोजन व पक्षश्रेष्ठीच्या नजरेत भरेल असे काहीतरी भव्यदिव्य या संबंधाने भरपूर खर्च करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो . यातून पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वापर्यंत त्याच्या नावाची एक चांगली ओळख निर्माण होते . हा चेहरा वरपासून खालपर्यंत सर्वांच्या परिचयाचा होतो . हेच त्याचे इलेक्टिव्ह मेरिट म्हणून सर्वमान्य ठरते . परंतु केवळ एकाच ( विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघापुरती ) त्याची ताकद बनते . फक्त एवढेच त्याचे प्रभाव क्षेत्र मर्यादित स्वरूपात तयार झालेले असताना त्याच्या मक्तेदारी समोर पक्षाला सुध्दा नमते घेणं भाग पडते . ही बाब कुणीही गंभीरपणे लक्षात घेत
नाही . हा पायंडा सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळून येतो . हे इलेक्टिव्ह मेरिट हल्लीच्या काळात सर्वपक्षीयांसाठी चलनी नाणं म्हणून मान्यताप्राप्त झालेलं आहे . हे नाकरण्याचं धाडस कोणताही राजकीय पक्ष करताना दिसत नाही हे उघड गुपित वास्तव आहे .
इफेक्टिव्ह मेरिट
———————
याउलट कर्तबगार माणूस कुणाची हाजीहाजी करणे नापसंत करत असतो . नेत्यांच्या पुढेपुढे करण्याची प्रवृत्ती त्याला आवडत नाही . प्रचलित पद्धतीपेक्षा चौकटी बाहेर ( out of the box ) जाऊन केले जाणाऱ्या कामाकडे त्यांचा विशेष कल असतो .
निवडून येण्याची क्षमता जेवढी महत्वाची असते . तेवढीच निवडून आणण्याची क्षमता देखील खूप मोलाची ठरते . नव्हे ती पण एक राजकीय गरज बनते . ही बाब दुर्लक्षित करता येणे कदापी परवडणारे नाही . पक्षाच्या विचारधारेशी सदैव एकनिष्ठ व प्रामाणिक असणाऱ्या काही व्यक्ती अशा असतात की , त्या आर्थिकदृष्ट्या कफलक जरी असल्या तरी कर्तृत्वाच्या बाबतीत खूपच बलवान , प्रभावशाली ठरतात . त्यांनी आजवर प्राप्त केलेल्या ज्ञानाचा . कमावलेल्या अनुभवाचा व सतत जागृत आणि चिकित्सक ठेवलेल्या जिज्ञासेचा वापर करून त्याव्दारे पक्षहित साधण्यासाठी एखाद्या ‘ 1- THT स्ट्रक्चर थिअरी ‘ च्या माध्यमातून विधानसभेच्या दहा मतदार संघात दहा हजार मतसंख्यीय पेढीव्दारे विजय हमीत्व बहाल करणारी विशिष्ट पध्दतीची कोणतीतरी एखादी आनोखी शोधककृती त्याने विकसित केली असेल तरीही काय त्याच्या असल्या शोधककृतीला पण तुम्ही इफेक्टिव्ह मेरिट म्हणून मान्यता देणार नाही ? धोरण आखण्याची कल्पक पुंजी अशा व्यक्तींकडे मुबलक असते आणि तिच्या जोरावरच ते एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये पक्षाला लाभ मिळवून देण्यासाठी ते अधिक उपयुक्त ठरणारे असतात .
ही सत्यता थेट परिणाम घडून गेल्यानंतरच कळून चुकते . आपल्याकडील vision नामक वकूब हेच त्यांचे सर्वात मोठे बलस्थान असल्याने त्यांना कोणत्याही सत्ता लाभाच्या पदासाठी अगतिक होणं गरजेचं वाटत नाही . हीच त्यांच्यातील करारी बाणेदारपणाची वृत्ती त्यांचेसाठी कधीकधी वरदान कमी आणि शापच अधिक ठरते . आणि म्हणूनच अशा
व्यक्ती पैशाअभावी निवडणूकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरून लोकप्रतिनिधी बनू शकत नाहीत . तरीही त्याची थोडीही त्यांना पर्वा उरलेली नसते . चालून आलेली पण , आपल्या गुणवत्तेला साजेशी नसणारी सत्तेच्या लाभप्राप्तीची देऊ केलेली बिदागी स्वीकारण्यास म्हणूनच त्यांचा नम्रपणे नकार दिसून येतो . हे त्यांच्या उद्दामपणाचं लक्षण नसून स्वाभिमान जपण्यासाठी वाटेल ती किंमत चुकवण्याची दाखवलेली ती स्वयंस्फूर्त तयारी असते . प्रतिभावान पदरी न बाळगणे हा काही त्यांचा दोष नसून संबंधित राजकीय पक्षांनी प्रतिभावान व्यक्तींप्रती दाखवलेली ती अघोषित अनास्थाच असते . ही अवहेलना सहन करूनही ते विनातक्रार आपल्या भूमिकेवर ठाम असतात . याचं एकमेव कारण म्हणजे स्वीकारलेल्या विचारधारेशी घट्ट बनलेली अतुट निष्ठा .
अशा गुणीजनांच्या कल्पकतेला दुर्लक्षित करण्याचा फटका त्या त्या राजकीय पक्षाला वेळोवेळी बसूनही ते त्यातून कोणताच धडा घेत नसतील तर हा दोष या प्रतिभावान व्यक्तींच्या मस्तकी थोडाच मारता येणार आहे ? म्हणूनच effective merit देखील तितकेच महत्त्वाचे आहे . या इफेक्टिव्ह मेरिटमुळे पक्षाचे दुरगामी हित साधले जाण्याला भरपूर वाव असतो . केवळ उपद्रवमूल्य ध्यानात घेणारे राजकीय पक्ष उपयुक्ततामूल्य दृष्टीआड करणार असतील तर ते एकप्रकारे आपल्या राजकीय आत्मघाताला आमंत्रण देण्याची जय्यत तयारी करत आहेत असे म्हणण्यावाचून गत्यंतर नाही . तसेच सुमार कर्तृत्व असणारी मंडळी आणि उत्तम योग्यतेचे धनी या दोहोंचेही एकाच फुटपट्टीने मोजमाप केल्या जात असेल तर त्याला न्यायसंगत तरी कसे समजायचे ?

गंगाधर कांबळे
( मंगरूळनाथ जि. वाशिम )
९५०३८५७९९८

गंगाधर कांबळे

लेखक इतिहास व समाज शास्त्राचे अभ्यासक आहेत. मो.नं. ९५०३८५७९९८

Comments (0)
Add Comment