गोकुळाष्टमी – ऋणनिर्देश गुराख्यांचे ..
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, भारतातील अनेकांचे मनोहृदय व्यापून टाकणारे लोभस व्यक्तिमत्व. पौराणिक संदर्भाने पहिले तर यदूवंशाच्या गोधनाचा पालनकर्ता… आद्य गुराखीच म्हणावं लागेल.
माणूस केवळ शेतीच्या भरवशयावर नसून पशुपालनासह स्थिरावला गेला आहे, हे सांगणारे त्याचे रूप म्हणजे गोपाल कृष्ण. श्रीकृष्णाच्या अनेक रूपांपैकी (बाळकृष्ण, गोपाल कृष्ण, गोपी कृष्ण, राधा कृष्ण, योगी कृष्ण) मला पशुवैद्यक म्हणून अधिक निकटचे आणि कालसापेक्ष आणि संयुक्तिक वाटते. त्याकाळी असलेल्या विराट अशा गोधनाला म्हणजेच पशूधनालासंगोपित करण्याचे काम कृष्णाने केलेले आहे. पशु-धन हा शब्दच मुळी पाळीव पशूंचे तत्कालीन व्यवहार मूल्य निर्देशक आहे. आज आपण चलन किंवा करन्सी म्हणतोय, ती म्हणजे गोधन. यावरून गुराखी या पदाचा महिमा आपण लक्षात घ्यायला हवा.
शुभ्र धवल गायींच्या कळपात बासरी वाजवणारा मुरलीधर म्हणजे माझे आवडते चित्र. आज देखील भारतात नंद, गवळी, यादव, लभाणी, मालधारी अशा अनेक पशुपालक जमाती गोधन संगोपन करण्याचे काम पिढ्यानपिढ्या पासून करीत आहेत, जणू कृष्णाचाच वारसा पुढे नेत आहेत. महाराष्ट्रात विविध भागात देशी पशुधंनाच्या अभ्यासासाठी जेव्हा जेव्हा मी फिरतो तेव्हा आवर्जून त्या त्या भागातील गुराखी किंवा गायकी (चरवाह) यांना भेटतो आणि संवाद साधतो.
स्थानिक (साधारण अशिक्षित किंवा अल्प शिक्षित) तरुण घरोघरचे गायींना बाजारतळावर किंवा गावाबाहेरील पाणवठयाजवळ सकाळी 9-10 च्या सुमारास गोळा करून गावाजवळच्या रानमाळावर चराई साठी नेतो आणि सायंकाळी माघारी आणण्याचे काम किरकोळ शुल्क आकारून करतो . आता गायरान जमिनी नाममात्र शिल्लक राहिल्याने गावपासुन दूरवर न्यावे लागते. आखरीतील शेणखत गोळा करीत, आपल्या पाच पन्नास गायींचा कळप घेऊन रोज 8-10 किलोमीटरची पायपीट गायकी करतो. पाण्याच्या शोधात कधीकधी हा पल्ला अधिक दूरवर मारावा लागतो. कळप घेऊन जाताना रस्त्याने वाहतूक कोंडी किंवा अपघात; नको असलेल्या वळूने होणारे नैसर्गिक रेतन, पाण्याचे दुर्भिक्ष्य, वन्य प्राण्याकडून होणारे हल्ले, रसायनिक विषबाधा, आकसत जाणारे चराई क्षेत्र आणि या सार्याच्या बदल्यात तुटपुंजा मोबदला म्हणून महिन्यावारी मिळणारे कमी मेहनताना यावरून गुरख्याच्या आव्हानात्मक कामाची आपल्याला कल्पना येईल. काही ठिकाणी वर्षाकाठी दसरा, दिवाळ सणाला एकरकमी पैसे किंवा डाळदाण्याची अदायगी होते. पण असं असले तरी ही परिस्थिति नक्कीच आशादायी नाही.
मराठवाड्यात काही गुराखी जर गाय वासरांचे नीट संगोपन न केल्याने जनावर दगावले तर प्रायश्चित्त म्हणून काही महीने घरी फिरकत नाहीत. खरं म्हणजे गुराखी हा गावपातळीवर पशुधन संवर्धनाचे महत्वपूर्ण काम करीत असतो पण आपले कुणाचेही फारसे त्याकडे लक्ष नसते. कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत / योजना / पाठबळ वेगळ्याने मिळत नसून देखील गुराखी बांधवांनी आपल्या पारंपरिक पशुधनाला पुढे नेण्याचे काम वर्षानुवर्षे सुरू ठेवले आहे. आज जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांच्याप्रति शब्दाच्या रूपाने ऋणनिर्देश करावे वाटले. गोप्रेमींनी स्थानिक गुराख्याला / गायकीला शक्य ती मदत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने केली तर किती बरे होईल.
भेटीदरम्यानचा एक प्रसंग मला आठवतोय. एकदा मी पाहिले की, कमरेला शिदोरी फडक्यात बांधून आपल्या शाळकरी लहानग्या मुलीला “गायकी” ढोरं हाकत लगबगीने जात होता. त्याची मुलगी काही कारणाने रुसली असावी किंवा शाळेत जायची इच्छा तिची नसावी. तो गायकी एका बाजूला मोठयाने आरोळ्या ठोकत आपल्या गायींच्या कळपाला सांभाळत होता आणि दुसर्या बाजूला रूसलेल्या पोरीला गोड आवाजात शाळेत पाठवणी करण्याचा आग्रह धरत होता. मी तो प्रसंग क्षणबद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला देखील. त्याची गोवत्सल आणि कुटुंब वत्सल रुपे पाहून मला कृष्णाचेच दर्शन झाले.
डॉ. प्रवीण बनकर,
अकोला