गुरुना समर्पित सण गुरुपौर्णिमा
मानव धर्मात तीन ऋण मानले जातात. मातृ-पितृ ऋण, देव ऋण व गुरु ऋण. मनुष्य आपल्या आई-वडिलाची सेवा निस्वार्थ मनाने करतो तेंव्हा तो मातृ-पितृ ऋणातून मुक्त होतो. त्याच प्रकारे विद्यार्थी / शिष्य ज्ञानार्जनानंतर गुरुने दाखविलेल्या सन्मार्गाने जाऊन समाजोपयोगी कार्य करतो तसेच तो आपल्या गुरूस सन्मान देतो तेंव्हा तो गुरु ऋणाचा उतराई होतो.
“ कर्ता करेन कर सके, गुरु करे सो होय| तीन लोक नोखड में, गुरुसे बडा न कोय|
जीवन जगत असताना सर्वांनाच योग्य मार्गदर्शकाची परम आवश्यकता असते. आपले पहिले गुरु आपले आई-वडील असतात. ज्यांच्या संस्कारांचा प्रभाव आपल्या संपूर्ण कृतीतून दिसुन येतो. भारतीय संस्कृतीत गुरुला फार महत्त्व असून ते सर्वोच्च स्थानावर आहेत. गुरुनी केलेल्या उपकाराची , त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे स्मरण नेहमी राहावे त्याचा आदरभाव राहावा, त्यांच्या करिता समर्पणाची भावना राहावी म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपल्या देशातील हा एक महत्त्वपूर्ण सण होय. आषाढ महिण्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा आषाढी पौर्णिमा म्हटले जाते. या दिवसाला भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे. या शुभदिनी गंगा , गोदावरी, नर्मदा सारख्या पवित्र नदीत स्नानाचे, तसेच गुरु मंत्र जपाचे महत्त्व आहे.
गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त – सुरुवात- शुक्रवार २३ जुलै २०२१ सकाळी १० वाजून ३४ मिनिटांनी.
समाप्ती – शनिवार २४ जुलै सकाळी ८ वाजून ६ मिनिटा पर्यंत
गुरुपौर्णिमा का साजरी करावी ? “ व्यासोच्छिष्टं जगत् त्रयम् ”। या उक्ति प्रमाणे त्रिभूवनात व्यासांचेच ज्ञान आहे. “नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे” व्यासांची बुद्धिमत्ता प्रगाढ आहे.
व्यासांची ग्रंथ रचना– व्यासांनी मानवांच्या कल्याणासाठी १८ पुराणांची रचना केली. तसेच वेदांचा विस्तारही त्यांनी केला. ब्रह्मसूत्र, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथाची त्यांनी रचाना केली. ज्ञानाच्या बाबतीत व्यासांनाच आदिगुरु , महर्षि म्हणून संबोधतात . ज्ञानियांचे राजा, योगिराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायात – “ व्यासांचा मागोवा घेतु ” या शब्दात ते व्यास महर्षि बद्दल आदर व्यक्त करतात. अशा ज्ञानदाता, व्यास महर्षिंचा आज जन्मदिवस म्हणून त्यांच्या स्मृतीत भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा अथवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरी करतात .
गुरु असती आपुला देव गडे | तयामुळेच आपुला देह घडे ||
घ्यावा आदर्श जपुनी | गुरुविना कुणीही नाही थोर ||
संसारात गुरुची आवश्यकता.
नावं तारी हे साचार । माजी बैसले थोर थोर ।
परी तारके वीण पर पार । समर्थ नर न पावती ।।
गुरु शब्दाचा अर्थ:- गुकारस्त्वन्धकारस्तु रुकारस्तेज उच्यते।
अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभिधीयते।।
अर्थ:- अंधकारचा निरोधक अर्थात अज्ञान अंधकार नाहिसा करतो तो गुरु होय.
आपण ईश्वराला प्रत्यक्षात पाहिले नाही. ईश्वराचे सगुण, साकार रुप म्हणजेच गुरू होय, आणि गुरूंचे निर्गुण, निराकार रूप म्हणजेच श्रीसदगुरू होय.. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गुरूला परमेश्वरचे स्थान दीले आहे. संत श्रेष्ठ कबीर आपल्या एका दोह्यात म्हणतात.
गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय | बलिहारी गुरु अपने , जीन गोविंद दियो बताय ||
गुरूला आपण ईश्वर म्हणून पुजतो. त्यांना सर्वशक्तिमान त्रिदेव ब्रम्हा, विष्णू, महेशा प्रमाणे मानतो.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
अर्थः- गरु हा ब्रह्मा (सृष्टिकर्ता) समान आहेत. गुरु हा विष्णु (सृष्टी संरक्षक) समान आहेत. गुरु हा महेश्वर (सृष्टी विनाशक) समान आहेत. गुरुच साक्षात परब्रह्म आहेत. एकमात्र ख-या गुरुला मी नमस्कार करतो.
गुरु कोण ? :- निवर्तयत्यन्यजनं प्रमादतः स्वयं च निष्पापपथे प्रवर्तते। गुणाति तत्त्वं हितमिच्छुरंगिनाम् ।।
अर्थः- जे दुसत्यांना वाईट मार्गापासून परावृत्त करतात, स्वतः निष्पाप रस्त्याने चालतात आणि नेहमी हित आणि कल्याणाची कामणा करतात त्यांना गुरु म्हणतात.
प्रेरकः सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा | शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः।।
म्हणजे प्रेरणा देणारे, सूचना देणारे, सत्य सांगणारे, मार्गदर्शन करणारे, शिक्षण देणारे आणि बोध करणारे हे सर्व गुरु समान आहेत.
विद्वत्त्वं दक्षता शीलं सङ्कान्तिरनुशीलनम्। शिक्षकस्य गुणाः सप्त सचेतस्त्वं प्रसन्नता।।
अर्थ:- ज्ञानवान, निपुणता, विनम्रता, पुण्यात्मा, मनन चिंतन नेहमी सचेत आणि पसन्न राहणे हे गुरुचे गुण आहेत.
ज्ञानदेव गुरु | ज्ञानदेव तारू | उतरील पैल पारू | ज्ञानदेव ||
ज्ञानदेव माता | ज्ञानदेव पिता | तोडील भवव्यथा | ज्ञानदेव ||
गुरु आपल्याला ज्ञान देतो, आयुष्यात महत्वाचे मार्गदर्शन करतो. आपले मातापिता हे गुरूच होय. त्यांच्या सेवेने भवसागराच्या प्रवाहातून पैल तीरावर जाण्यसाठी मदत होते. त्या प्रमाणेच गुरु असून तेच आपणाला जीवनामृत पाजून तृप्त करत असतात..
गुरुंची आवश्यकता आहे का ? दुग्धेन धेनुः कुसुमेन वल्ली शीलेन भार्या कमलेन तोयम्।
गुरुं विना भाति न चैव शिष्यः शमेन विद्या नगरी जनेन।।
अर्थ:- जसे दूधा शिवाय गाय, फुला शिवाय लता, चरित्रा शिवाय पत्नी, कमला शिवाय पाणी, शांति शिवाय विद्या आणि लोकां शिवाय नगराला शोभा येत नाही त्याच प्रमाणे गुरु शिवाय शिष्याला शोभा नाही.
धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायण: | तत्वेभ्य: सर्वशास्त्रार्थदेशको गुरुरुच्यते ||
अर्थ:- धर्माला जाणनारे, धर्मा प्रमाणे आचरण करणारे, धर्म परायण आणि सर्व शास्त्रांनुसार आदेश करणारे यास गुरु म्हटले जाते.
गुरु श्रद्धेशिवाय निजसुख नाही-
तैसे निजस्वरुप आईते। श्रद्धा सद्गुरूचेनि हाते।
खरे करुनिया ज्ञाते। समर्थ नर न पावती।।
गुरु सेवेचे फळ :- विनयं फल शुश्रूषा गुरुशुश्रूषा फलं श्रुत ज्ञानम्।
ज्ञानस्य फलं विरतिः विरतिफलं निरोधः।।
अर्थ:- विनयाचे फल सेवा आहे. गुरु सेवेचे फल ज्ञान प्राप्ति आहे, ज्ञानाचे फल अध्यात्म आहे आणि विरक्तिचे फल आश्रयनिरोध आहे.
श्री संत एकनाथ महाराज म्हणतात- जो जो जयाचा घेतला गुण । तो म्या गुरु केला जाण ।
गुरुशी आले अपार पण । जग संपूर्ण गुरु दिसे ।।
अशा आपणास जीवन मार्ग दाखविणाऱ्या , ज्ञानास समर्पित असणा-या गुरुना आजच्या गुरुपोर्णिमेच्या शुभ दिनी वंदन करतो.
डॉ. शांती लाहोटी, परळी वैजनाथ , भालचंद्र बन्सीधर रोडे. संस्कृत अध्यापक
एम. ए. योगशास्त्र प्रथम वर्ष एम. ए. बी.एड्. संस्कृत
सेवा निवृत्त प्राध्यापक परळी वैजनाथ एम. ए. योगशास्त्र प्रथम वर्ष,नांदेड
संपर्क …. ९४२१३७५२८५ संपर्क ९७६३७६३३४०.
फोटो – गुगल साभार.