हळदीघाटची लढाई

दिन विशेष लेख

‘हळदीघाटची लढाई ‘

शीर्षक पाहताच तुम्हाला वाटले असणार आता ही कुठली लढाई ? कोणत्या लढाई बद्दल सांगणार ही आपल्याला …तर ही आहे भारताच्या बौद्धिक संपत्तीच्या लढाईची गोष्ट. कारण आज आहे वैश्विक बौद्धिक ज्ञानसंपदा दिन(World Intellectual Property Day). आम्हाला काय करायचे IPR या कायद्याच्या गोष्टींशी .. खरंतर हा प्रत्येक माणसाच्या दैनंदिन व्यवहाराशी संबधित असा कायदा आहे.कोणताही कायदा मानवी घडामोडीतूनच अस्तित्वात आलेला असतो आणि प्रत्येक नवीन सुधारणा म्हणजे मानवी प्रगतीचा एक एक टप्पा असतो . कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर ए. के .खान लॉ कॉलेज,पुणे येथे मला माझा आवडता विषय IPR योगायोगाने शिकवायला मिळाला . ह्या विषयाच्या खोलात गेल्यावर हा विषय खूपच रंजक वाटू लागला. म्हणूनच आजच्या दिवसाच्या निमित्त्याने हा ऐतिहासिक वृत्तांत तुम्हाला सांगायचं ठरवलं .
इ.वि २००० पासून २६ एप्रिल हा दिवस सामान्य लोकांमध्ये बौद्धिक संपत्तीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. पण बौद्धिक संपदा म्हणजे काय ?तर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेने स्वत:च्या बौद्धिक श्रमातून उत्पन्न केलेली निर्मिती. उदा. संगीत,साहित्यिक कृती,शोध,चित्र, औद्योगिक आराखडा.
बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या बुद्धीचा वापर करून एखादी निर्मिती करते, तेव्हा त्या निर्मितीवर मर्यादित काळापुरती तिला प्राप्त झालेली मक्तेदारी!
ज्याप्रकारे कोणीही भौतिक मालमत्तेचा म्हणजे सोने -नाणे, घरदार, गाडी चा मालक असतो त्याच प्रकारे बौद्धिक संपदेचाहि मालक असू शकतो. हि एक न दिसणारी (Intangible) अशी मालमत्ता आहे. त्यासाठीच बौद्धिक संपदा अधिकार प्रदान केले जातात. बौद्धिक संपदा कायद्याचा मुख्य हेतू हा वेगवेगळ्या प्रकारच्या नवनिर्मितीस प्रोत्साहन देणे हा आहे. एखाद्या व्यक्तीची बौद्धिक संपदा हा तिच्या व्यक्तिमतत्वाचा भाग असल्याने त्यावर तिचा हक्क असतो असे काही तज्ञाचे म्हणणे आहे. तर नवनिर्मितीसाठी एखाद्या व्यक्तीने केलेल्या कष्टाचा मोबदला म्हणून त्यावर त्या व्यक्तीचा नैतिक व भौतिक अधिकार असला पाहिजे कारण आपल्या निर्मितीस योग्य मोबदला मिळतो याची खात्री असल्यावरच नवनिर्मतीस प्रोत्साहन मिळते व त्यातून सामाजिक व आर्थिक प्रगती शक्य होते.
बौद्धिक संपदा हक्क वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
कला क्षेत्रातल्या निर्मितीवर – साहित्य,चित्र, शिल्प, संगीत, नाट्य किंवा चलचित्र इ. – यावर त्यांच्या निर्मात्याला कॉपीराईट (स्वामित्व हक्क) मिळतो.उत्पादनाची ओळख पटवणारे चिन्ह असेल किंवा ब्रॅण्डनेम किंवा उत्पादनाची ओळख बनलेलं घोषवाक्य, यावर ट्रेडमार्क मिळतो.एखाद्या औद्योगिक उत्पादनाच्या सौंदर्यपूर्ण डिझाईनवर, कारचा किंवा मोबाईल फोनचा नाविन्यपूर्ण आकार, इ. वर इंडस्ट्रियल डिझाईन मिळते.एखादे भौगोलिक ठिकाण जेंव्हा त्या उत्पादनाची ओळख बनते, तेंव्हा त्यावर ‘जिओग्राफिकल इंडीकेशन’ (भौगोलिक निर्देशक) ही बौद्धिक संपदा मिळते.तर एखाद्या नाविन्यपूर्ण उत्पादनावर किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवर त्याच्या संशोधकाला मिळतं ते पेटंट (एकस्व) !
निर्मात्याने ही निर्मिती करण्यासाठी जे कष्ट, पैसा, वेळ घालवला त्याचा मोबदला म्हणून देशाचं सरकार त्याला ही मक्तेदारी बहाल करते. या कालावधीत तिच्या मालकाशिवाय दुसरे कुणीही ती गोष्ट बनवू शकत नाही. त्यामुळे त्या निर्मितीला बाजारात कुठलीही स्पर्धा नसते.
आता तुमची उत्सुकता फार न ताणता हि ‘हळदीघाटची लढाई’ किंवी ‘The Turmeric Battle ‘हे नेमके काय प्रकरण आहे ते सांगते. जखम झाल्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरल्या जातो तसेच हळदगुळ, हळद दूध हि देखील सर्दीवरची हमखास औषधे घराघरात घेतली जातात असे असताना एक दिवस सकाळी पेपर वाचत असताना, एका विचित्र बातमीकडे डॉ.रघूनाथ माशेलकरांचे लक्ष गेले, साल होते १९९७.अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते म्हणजेच अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते हि बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. तेव्हा त्यांच्या घरात काही वर्षांपूर्वी १९९३ च्या आसपास घडलेला एक प्रसंग आठवला, घरातील सर्व मंडळी संध्याकाळी गच्चीवर निवांत बसलेले असताना अचानक एक जखमी पक्षी येऊन पडतो .. तेव्हा त्यांची आई क्षणाचाही विलंब न करता घरात जाऊन हळद घेऊन येते आणि त्या जखमी पक्ष्याला लावते हा प्रसंग आठवताच अमेरिकेकडून हळदी चे पेटंट परत मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचे ठरवितात. भारतीयांकडे अनेक पिढ्या चालत आलेले हे ज्ञान कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजेरोसपणे दावा करत होते. तेव्हा यावर अमेरीकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क राखले पाहिजेत, असा पक्का इरादा करून डॉक्टर कामला लागले. हळदी चे पेटंट मिळवण्यासठी त्यांनी १४ महिने सातत्याने पाठपुरावा केला. हळदी चे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल असलेले संदर्भ अशी अनेक कागदपत्रे जमा करून व त्या सर्वांचा अभ्यास करून डॉ. माशेलकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिके विरुद्धची हळदी घाटाची ही लढाई जिंकली याचा सकारात्मक परीणाम म्हणजे भारतीयांचा हळदीच्या संशोधनावरील परंपरागत ज्ञानाचा हक्क आपल्याकडे राहिला आणि दुसरा फायदा म्हणजे साऱ्या जगाला आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत कळली. अमेरिकेसारख्या शक्तिशाली राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्व कळले आणि आपण दुसऱ्याच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. तर अशी आहे हि ‘हळदी घाटच्या लढाइची ‘रोचक कहाणी.

ज्ञानसंपादानाच्या हक्काविषयी (पेटंट धोरणांबाबत ) माशेलकर यांचे योगदान मोठे आहे. ‘Patent or perish’ असा इशाराच जणू त्यांनी भारतीयांना दिला होता. हळदी पाठोपाठ बासमती तांदूळ व कडुनिंब या वरील संशोधन आणि त्यावर भारतीयांचा असलेला परंपरागत हक्क अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुराव्यांसह मांडून हि दोन्ही पेटंट्स अमेरिकेच्या हातात जाऊ दिली नाही. ज्ञान हि संपत्ती आहे तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते, म्हणून आपल्या बौद्धिक संपदेचे रक्षण करणे हि काळाची गरज आहे तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून जग पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कारणाने Intellectual Property Rights विषयी जाणून घेणे आवश्यक आहे व त्याबद्दल सजग राहणे हे आपले नागरी कर्त्यव्यच आहे.
आताचेच उदाहरण घ्यायचे झाले तर भारताचे पहिले कोरोना टेस्ट किट मायलॅब डिस्कव्हरी या संस्थेने निर्माण केले ते कोरोनाच्या जगभरात हाहाकार माजविणाऱ्या परिस्थितीमुळे कारण नवनवीन प्रयोग व शोध फक्त वैज्ञानिकांच्या प्रयोग शाळेतच लागतात असे नाही तर आयुष्याच्या ही खऱ्याखुऱ्या प्रयोग शाळेतही लागतात तेव्हा बौद्धिक ज्ञान व संशोधन कायदेशीररित्या सुरक्षित ठेवणे हि काळाजी गरज आहे. बासमती आणि कडुनिंबाची पेटंट मिळवल्या नंतर २००१ सालीTKDL – Traditional Knowledge Digital Library भारतीय पारंपरिक औषधी ज्ञानाचे संरक्षण करणारी अग्रणी संस्था अस्तिस्त्वात आली आणि भारतीय पारंपारिक ज्ञानाचे महत्त्व वैश्विक पातळीवर आधोरेखित झाले . म्हणूनच ‘हळदीघाटची लढाई ‘ नवभारताला बौद्धिक संपदा हक्कांविषयी खडबडीत जागे करणारी ऐतिहासिक लढाई ठरली व पारंपारीक ज्ञानाचे जतन करण्यासाठी नवी दिशा देशाला मिळाली.

 

Comments (0)
Add Comment