हिंदू जागरणाच्या श्रीरामक्रांतीचा सरसेनानी मोरोपंत पिंगळे

हिंदू जागरणाच्या श्रीरामक्रांतीचा सरसेनानी मोरोपंत पिंगळे.

भारतीय इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रीयतेचे प्रख्यात विचारवंत व कुशल संघटक मोरेश्वर  निळकंठ उपाख्य मोरोपंत  पिंगळे  यांचा जन्म जबलपुर येथे ३० ऑक्टोबर १९१९ रोजी एका सामान्य कुटुंबात झाला.  त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांचा सहवास लाभला. नागपुरातील तत्कालीन मॉरिस कॉलेज येथून इंग्रजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर १९४१ मध्ये मोरोपंतांनी आपल्या प्रचारक जीवनाची सुरूवात केली. सुरुवातीला ते खंडवा येथे सहविभाग प्रचारक झाले. नंतर, त्यांनी मध्य भारत प्रांत प्रचारक म्हणून काम केले आणि १९४६ मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी महाराष्ट्र प्रांताचे सहप्रचारक झाले. मोरोपंत , पश्चिम विभागाचे क्षेत्र-प्रचारक, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख, अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अखिल भारतीय प्रचार प्रमुख , अखिल भारतीय प्रचारक प्रमुख आणि सहसरकार्यवाह होते. अशाप्रकारे आयुष्यातील ६५ वर्षे ते प्रचारक जीवनात होते. आयुष्याच्या शेवटच्या काळात संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे ते आमंत्रित सदस्य होते. २१ सप्टेंबर २००३ रोजी नागपूर येथे मोरोपंतांना देवाज्ञा झाली. 
 
प्रकल्पपुरुष मोरोपंत
१९७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ३०० व्या राज्याभिषेकानिमित्त मोरोपंतजींनी रायगडमध्ये भव्य कार्यक्रमाची योजना केली. आंध्र प्रदेशातील डॉ. हेडगेवार यांचे मूळगाव कंदकुर्ती इथे सेवा प्रकल्पासह सदन उभारले.  नागपुरात ‘स्मृती मंदिर’ निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता. पारडी  गुजरातचे प्रख्यात वैदिक अभ्यासक श्रीपाद दामोदर सातवलेकर यांच्या ‘स्वाध्याय मंडळा’चे कार्य त्यांनी पुनरुज्ज्वीत केले. महाराष्ट्राच्या वनवासी भागात ‘देवबोध’ ठाण्याचे सेवा प्रकल्प, कळव्यातील कुष्ठरोग निर्मूलन-प्रकल्प इत्यादी विविध सेवा उपक्रम सुरू केले.  मोरोपंत ‘साप्ताहिक विवेक’ विस्तार योजनेचे जनक होते. त्यांनी ‘नारायण हरि पालकर -स्मृती समिती’ रुग्णसेवा-प्रकल्प, मुंबई यांना सदैव प्रेरित केले. गायीचे संरक्षण, गौ-संशोधन आणि वैदिक गणिताबद्दल ते सतत आग्रही असत आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी मोरोपंतांनी अनेकांना अक्षरश झोकून कामाला लावले. लघुउद्योग भारती’ची स्थापना मोरोपंतांचीच प्रेरणा.  १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात मोरोपंत १९ महीने भूमिगत होते आणि अशातच विविध योजनांच्या माध्यमातून चळवळ बळकट करीत राहीले. भूमिगत असताना ते संघाच्या अघोषित सरसंघचालकांपैकी एक होते. १९८३ ते १९८५  पर्यंत मोरोपंतांनीलुप्त झालेल्या  वैदिक सरस्वती नदीच्या संशोधनासाठी मोहीम सुरू केली. त्यांनी हरियाणामधील सरस्वती नदीच्या उत्पत्तीपासून राजस्थान, बहावलपूर आणि गुजरातच्या कच्छ खाडीपर्यंत अभ्यासकांच्या ,पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकारांच्या पथकासह प्रदीर्घ संशोधन केले. या संशोधन मोहिमेने हे सिद्ध केले की सरस्वती नदी, सरस्वती संस्कृतीचा आधार आहे. संशोधनात सरस्वती संस्कृतीचे प्राचीन अवशेष सापडले. त्यानंतर, या योजनेने मोरोपंतजींच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती प्रकल्पाची स्थापना केली आणि भारतीय-इतिहासाला एक नवीन आयाम दिला. १९७३ मध्ये स्थापित बाबासाहेब आपटे स्मारक समिती अंतर्गत इतिहास संशोधन आणि संस्कृत भाषा प्रचार प्रसारात त्यांची महत्वाची भूमिका होती. 
 
अलौकिक नोहावे लोकांप्रती 
मोरोपंतांना पाहीलेल्या , त्यांच्या सहवासात राहीलेल्या  अनेकांना हा अनुभव  आहे की मोरोपंत अगदी मोकळे आणि सहज राहात होते. थट्टामस्करी तर प्रत्येक शब्दात आणि वाक्यात असे पण त्यांच्या मनाचा थांग  आणि विचारांची  श्रेष्ठता याचे दडपण कधीही त्यांनी सहकाऱ्यांवर येऊ दिले नाही. माननीय दत्तोपंत ठेंगडी मोरोपंतांविषयी म्हणतात की आम्ही जरी कॉलेजजीवनापासून मित्र होतो, परंतु कोणत्याही विषयाचा ताणतणाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर कधीही जाणवत नसे. सगळ्यात राहून निर्लेपवृत्ती ठेवणे  हा मोरोपंती बाणा  त्यांनी अखेरपर्यंत जपला. याबाब मोरोपंतांविषयी बोलताना  दत्तोपंत श्रीमदभगवदगीतेच्या अकराव्या अध्यायातील विश्वरूप दर्शन झाल्यानंतर अर्जुनाने भगवंताला जे म्हटले तोच दाखला देतात 
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि।।
 
हिंदुत्वजागरण
आजच्या नवीन पिढीला विश्व हिंदू परिषद हे नाव माहिती आहे परंतु विश्व हिंदू परिषदचे संघटन म्हणजे माननीय मोरोपंतांच्या  कार्यकर्तृत्वाचा आविष्कार हे नव्या पिढीला सांगावे लागेल. पूजनीय व्दितीय सरसंघचालक माधव सदशिवराव गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात १९६४ रोजी प्रारंभ झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे सगळ्या प्रांतात प्रवास करून तपश्चर्येने विस्तारित करण्याचे भगीरथकार्य ज्यांनी  केले ते म्हणजे श्रद्धेय मोरोपंत पिंगळे. श्रद्धेय मोरोपंतांच्या व्यक्तिमत्वाला आणखीही एक पैलू आहे तो म्हणजे हिंदुत्व जागरण ! मोरोपंत आपल्या अनेक बौद्धिकात एक उदाहरण नेहमी देत असत , ते म्हणजे आखाड्यात उतरलेल्या पैलवानाला जोपर्यंत समोरचा दुसरा पैलवान उत्तर देत नाही , त्याच्या लंगोटाला हात घालून धोबीपछाड पेच टाकत नाही तोवर कुस्तीला रंग चढत नाही. मात्र एकदा का हात घातला गेला की एव्हाना सुस्त किंवा आत्मविस्मृत पडलेला त्याच्यातील पुरुषार्थ जागा होतो आणि अंतिम विजयाच्या दिशेने अग्रेसर होतो. १९८१ साली मीनाक्षीपुरममध्ये जे सामूहिक धर्मांतर झाले त्याने हिंदू समाजाच्या अस्मितेवर घाला घातला गेला. हिंदू समाजात तीव्र असंतोषाची लाट उसळली. पण असंघटित असंतोषाला संघटित स्वरुप देऊन विधायक अश्या हिंदुत्वजागरणाच्या रूपात साकार करण्याचे कसब मोरोपंताचेच ! नवनवीन, एकाहून एक आणि भन्नाट अश्या यादीत मोडल्या जाणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात यशस्वीपणे साकार करण्याचे कार्य लोकशक्तीच्या भरवश्यावर मोरोपंत करू शकले. गंगामातापूजनापासून चढत्या आलेखाप्रमाणे हे जागरणपर्व १९९२ पर्यंत सुरूच राहीले. गंगेच्या पाण्याच्या बाटल्या विकून कुठे आंदोलन होते काय ? अशी टीकाही झेलावी लागली. मानापमान , उपहास आणि अवहेलना या तर हिंदुत्वाच्या पाचवीलाच पुजल्या आहेत पण त्यांची फारशी चिंता न करता हिंदुमानसाचा प्रतिसाद याकडेच मोरोपंतांचे लक्ष असे. 
 
यात्रा आणि पूजन
मला गाढव म्हणा पण हिंदू नका असे कोणे एकेकाळी स्वतःबाबत म्हणणारा हिंदू गर्व से कहो हम हिंदू है अशी सिंहगर्जना  गर्जना करू लागला. आत्मविस्मृत झालेल्या समाजाला संघटित करण्यासाठी जशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली व गणेश या देवतेचा आधार घेतला , अगदी  त्याचप्रमाणे आत्मविस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या हिंदू समाजाला जागे करण्यासाठी मोरोपंतांनी मर्यादापुरुषोत्तमाला साकडे घातले. हिंदू समाजाला संघटनेच्या मागे उभे करण्याच्या महाभियानाचे प्रेरणा केंद्र मोरोपंत पिंगळे होते. मोरोपंतांबद्दल बोलताना श्रद्धेय अशोकजी म्हणत,पूर्वजन्मांचे पुण्य घेऊन संघाच्या  भागीरथी गंगेच्या पुण्यप्रवाहाला वेग आणि दिशा देऊन आजवर या अवस्थेत आणण्याचे कार्य  ज्यांच्यामुळे शक्यप्राय झाले ते म्हणजे ईश्वराने पाठविलेला भगीरथ मोरोपंत पिंगळे. असे म्हणतात की श्रीराम जन्मभूमीमुक्ती आंदोलनाची कमीतकमी ५ ते जास्तीत जास्त  २५ वर्षांची ब्लु प्रिंट मोरोपंतांच्या डोक्यात पक्की होती. गंगाजलाच्या कावडी घेऊन शतकानुशतके लाखो हिंदू लोकं शिवशंकराचा  अभिषेक करतात, याचा आधार  घेऊन मोरोपंतांनी देशभरात गंगापुजनाचा संकल्प केला. देशभरात गंगामाता, भारतमाता पूजन आणि विशाल हिंदू संमेलन याचे जागोजोगी  कार्यक्रम सुरु झाले. कार्यक्रम देखील कसे? तर कल्पनेच्या पलीकडले ! तत्कालीन दिल्ली राज्यपाल जगमोहनजी  यांना अशोकजी सिंघल  एकात्मता यात्रेचे स्वरूप सांगायला गेले तेव्हा मोरोपंतांनी स्वतः एका कापडावर काढलेला यात्रेचा नकाशा पाहून ते भारावून गेले. प्रस्तावित यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम ऐकून तर ते अवाक झाले. संपूर्ण भारताला जोडणारी २५ -२५ किलोमीटरच्या टप्प्याने जोडून तीन मोठ्या  आणि शेकडो छोट्या यात्रा हे अभिनव आणि अकल्पनीय होते. प्रत्येक २५ किमी नंतर एक धर्मजागरण  सत्संग  असा आखीव आणि रेखीव कार्यक्रम देशभरात चालला. तीन मोठ्या यात्रेच्या रथांचा एकाचवेळी नागपूरात संगम हे तर विलोभनीय दृश्य होते. यामागे मोरोपंतांचे संघटन कौशल्य आणि संघाची बारा तपाची तपश्चर्या होती हे सांगणे नलगे. पावणे सात कोटी भारतीयांनी या अभिनव यात्रेत प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि हिंदू जनमानस विश्व हिंदू परिषेदेच्या वैचारिक भूमिकेचा स्वीकार करू लागला. 
 
श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ 
गंगापूजन , भारतमातापूजन अश्या रथयात्रेनंतरच्या अभूतपूर्व यशाने विश्व हिंदू परिषदेला एका टप्प्यावर आणून सोडले होते आता महत्वपूर्ण टप्पा होतो तो म्हणजे  – श्रीरामजन्मभूमी मुक्ती यज्ञ ! ६ मार्च १९८३ मध्ये मुजफ्फरनगर ( लक्ष्मीनगर ) येथील विराट हिंदू संमेलनाचे अध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा आणि प्रमुख अतिथी होते प्रा राजेंद्रसिंह उपाख्य रज्जूभय्या. याच हिंदू संमेलनात दाऊदयाळ खन्ना यांनी ठेवलेल्या  एका साधारण प्रस्तावाने  पुढे भारताचे मानसपटल आणि कालचक्र असे काही फिरवले त्याचीच फलश्रुती म्हणजे ५ ऑगस्ट २०२० चा भाग्याचा क्षण होय. प्रथम धर्मसंसदेतील निर्णयानुसार १९८४ मध्ये अयोध्येहून निघालेल्या रामजानकी रथाचे चक्र हे देशाची आगामी दिशा निश्चित करणारे होते. रामजन्मभूमी मुक्ती यज्ञाचा संग्राम इथून निश्चित झाला. १९८५ च्या उडुपी येथील धर्मसंसदेत कुलूपबंद असलेल्या रामजन्मभूमीचे टाळे उघडून हिंदूंना पूजा अर्चना करु देण्यात यावी असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९८५ मधे रामजन्मभूमी आंदोलनाला गती मिळावी यासाठी श्रीरामजन्मभूमी मुक्ती न्यास स्थापन करण्यात आला. जगद्गुरू रामानंदाचार्य शिवरामाचार्यजी महाराज यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या न्यासात वरिष्ठ शंकराचार्य ज्योतिषपीठाधिपती जगद्गुरु शांतानंद (प्रयाग) महाराज, महंत अवैद्यनाथ महाराज, परमहंस रामचंद्रदास महाराज, महंत नृत्य गोपालदास महाराज आणि महंत रामसेवकदास महाराज, प्रभुदत्त ब्रम्हचारी महाराज यांचेसोबत दाउदयाल खन्ना, विष्णू हरी डालमिया आणि अशोकजी सिंघल सदस्य म्हणून होते. अशातच १९८६ मध्ये फैजाबाद न्यायालयाने रामलला चे कुलुप उघडण्याचा आदेश दिला. तेव्हा या मुक्ती यज्ञाचे स्वरूप उत्तरप्रदेशपर्यतच मर्यादित होते. 
१९८९ मध्ये महाकुंभाच्यावेळी विहिंपने अखिल भारतीय संत संमेलन आयोजित केले. तिसरी धर्मसंसद आणि त्यानंतर १ फेब्रुवारी १९८९ रोजी जयेंद्र सरस्वती यांच्या नेतृत्वात संपन्न संत महासंमेलनात देवराहा बाबा यांच्या उपस्थितीत  शिलापूजन आणि शिलान्यास कार्यक्रम निश्चित झाला. मोरोपंतांच्या मार्गदर्शनात श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाने आता अखिल भारतीय स्वरूप धारण केले होते. भारताच्या प्रत्येक गावात शिलापूजनाचे कार्यक्रम झाले. सव्वा सव्वा रुपये प्रत्येक नागरिकाने दक्षिणा देऊन एक लाख लोकसंख्येच्या बस्तीत एक रामयज्ञ असा कार्यक्रम निश्चित झाला. प्रत्यक्ष शिलान्यासाच्या आधी कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्हातील शिला अयोध्येतील येतील हे दिवसागणिक निश्चित होते. शिलापूजनाला देशभरातून कोण मान्यवर कधी येणार याचे अचूक मार्गदर्शन मोरोपंत करीत होते. अयोध्या आंदोलन ज्याप्रमाणे नियंत्रित होत होते त्याचे प्रमाण म्हणजे त्यामागील सुस्पष्ठ नेतृत्व होते. विश्व हिंदू परिषदेने  १९८९ मध्ये ३ लाख ग्रामात शिलापूजन कसे काय घडवले ? यावर अशोकजी सिंघल म्हणत , मोरोपंतांनी आमच्यासमोर  ६५०० प्रखंडात ( १ लाखाची बस्ती म्हणजे एक प्रखंड) संघटना पोहोचविणे हे ध्येय ठेऊन कार्य केले , प्रचंड प्रवास , कार्यकर्त्यांना दिलेला विश्वास आणि वेळ देण्याचा आग्रह यामुळेच हे शक्य झाले. माननीय मोरोपंत रचनात्मक कार्याचे आणि कार्यक्रमांचे पुरस्कर्ते होते. आंदोलनाचा वेग हा चढता, मात्र नियंत्रणात असावा हे त्यांचे सूत्र असे. शिलान्यासानंतर  जनजागरण आणि मंदीराचे भव्य निर्माण हे ध्येय होते. आगामी दीपावलीत देशभरातील मंदीरात आणि घराघरात रामलला येथे प्रज्वलित श्रीरामज्योती पोहिचविण्याचा आणखी एक अभिनव कार्यक्रम आखला गेला. दस्तुरखुद्द मोरोपंत यजमान झाले आणि त्यांच्याच हस्ते अरणी मंथन करून प्रज्वलित झालेल्या  श्रीरामज्योतीने  लाखो रामभक्तांच्या हृदयातील दावानल प्रज्वलित केला.  त्यावर्षी भारतातील दीपावलीचे दीप याच रामज्योतीने उजळले गेले. महाजनजागरण आणि रामजन्मभूमी निर्माणाबाबत रामभक्तांची प्रतिबद्धता या आंदोलनाने पुष्ट केली. 
३० ऑक्टोबर १९९० च्या कारसेवेला अत्याचार आणि आणीबाणीची परिस्थिति निर्माण करून तत्कालीन मुलायम सरकारने दमनचक्र प्रारंभ केले.  अत्याचार होणार हे गृहीत धरूनच माननीय मोरोपंत क्षणक्षणाला मार्गदर्शन करीत होते. मनुष्य जेव्हा अथक प्रयत्न करतो तेव्हा परमेश्वर साहाय्यभूत होतो ही आपली मान्यता खरी ठरली आणि ३० तारखेला झाले ते नवलच ! याच कारसेवेत २ नोव्हेंबर रोजी तीनही घुमटावर भगवे फडकवले गेले. या घटनेनंतर दोन दिवसांनी मोरोपंत अयोध्येत पोहोचले. सरकारने मोरोपंतांशी चर्चा केली आणि मंदीराचे दरवाजे दर्शनासाठी खुले केले गेले. याचकाळात विश्वनाथप्रतापसिँह सरकार पडले आणि चंद्रशेखर पंतप्रधान झाले. चंद्रशेखर यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या पहिल्याच दिवशीच मोरोपंतांना ,अशोकजींना राजमाता शिंदेच्या निवासस्थानी बोलावले. मोरोपंतांनी स्पष्ट केले की जन्मभूमीवर मंदीर होते याचे प्रमाण आहे आणि मुस्लिम पक्ष म्हणतोय कि जर आधी मंदीर आहे हे सिद्ध झाले  तर ते स्वतः  ढाचा पाडायला तयार आहेत. चंद्रशेखर यांनी दोन्ही पक्षांना प्रमाण घेऊन बोलावले. मोरोपंत प्रत्येक बैठकीला न चुकता जात , मात्र बाबरी समितीने पूढे काढता पाय घेतला. 
 
हिंदु जागृतीचा विस्फोट
पुढे केंद्रात नरसिंहराव आणि उत्तरप्रदेशात कल्याणसिह सरकार आले. ६ डिसेंबर १९९२ गीता जयंती दिनी लाखो रामसेवक कारसेवेकरीता अयोध्येत दाखल झाले. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था असूनही होई है सोइ जो राम रची राखा या वचनावर विश्वास ठेवून ठरल्याप्रमाणे कारसेवेला प्रारंभ झाला. शरयू तीरावरील एक मूठभर रेती आणि ओंजळीभर पाणी शिलान्यासस्थळी टाकण्याचा साधा कार्यक्रम ठरला होता, मात्र जमलेल्या लाखो रामसेवकांच्या डोळ्यात हिंदू समाजावर बाबराने केलेला अनन्वित अत्याचार आणि त्या क्रूरकरम्याचे प्रतीक असलेला तो ढाचा सलत होता. कारसेवक नियंत्रणतात होते मात्र उत्तेजित होते. माननीय मोरोपंत संतांच्या बैठकी घेत होते. प्रत्येक कारसेवकाची तपासणी होत होती कोणाजवळ अस्त्र-शस्त्र नव्हते. पण सामान्य घरातून  पोहोचलेली रामभक्त वीर वानरसेना राममय झाली होती. पाचव्या धर्मसंसदेत ठरलेल्या तिथीस म्हणजे ६ डिसेंबर १९९२ ला संतांच्या शांततेच्या आवाहनानंतरही हजारो वर्षांचा अपमानास्पद डाग पुसून काढण्यासाठी जनतेचा रेटा ढाच्याजवळ गेला आणि भारतमातेच्या मानचित्रावर लागलेला कंलक पुसला गेला. हिंदू अस्मितेच्या मानबिंदूवरील बाबराच्या सेनापती मीर बाकी ने घातलेल्या घाल्याचे परिमार्जन गीता जयंतीस झाले. सदैव रचनात्मक आंदोलनाचे प्रणेते राहीलेले मोरोपंत श्रीहनुमंताच्या रूपात प्रगट झालेल्या कारसेवकांच्या त्या रुद्ररूपाचे  ईश्वरीय इच्छा म्हणत दर्शन घेत होते. या घटनेचे वर्णन  करताना श्रद्धेय अशोकजी म्हणत की  मोरोपंतांचा विश्वास होता 
WHEN DIVINITY ASSERTS, IT IS INCARNATION
माननीय मोरोपंताच्या योजनेतूनच अयोध्या समन्वयाच्या अनेक योजना ठरल्या. रामसेवकपूरम कार्यशाळा ही मोरोपंताचीच योजना. कारसेवकपुरम  येथे वर्षभर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण व्यवस्था , हुतात्मा साधू संत आणि कारसेवकांचे स्मारक आणि अयोध्येतील जीर्ण मंदीरांचा जीर्णोद्धार अनेक योजना मोरोपंतांनी साकारल्या. या सर्व अभियानात तत्कालीन सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस यांची प्रेरणा आणि ऊर्जा मोरोपंतांना प्राप्त होत होती. सोबतच उत्तरप्रदेशमधील अशोकजी सिंघल, आचार्य गिरीराज किशोर, ,ओंकारजी भावे, चंपतरायजी , महेशजी ,विनय कटियार यांची प्रबळ साथ मोरोपंतांना लाभली. 
राममंदीर ते राष्ट्रमंदीर पुरातत्व सर्वेक्षण, उत्खनन, आध्यात्मिक पुरावे आणि परंपरा या योगे श्रीरामजन्मभूमीचे स्थान आणि त्याखाली पुरातन हिंदू मंदिराचे अवशेष ही बाब ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आणि ९ नोव्हेंबर २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एकमताने दिलेल्या निर्णयात सिद्ध झाली  आहे. श्रीराम जन्मभूमीवर भव्य राम मंदीराचे  स्वप्न प्रत्यक्षात याची देही याची डोळा याच जन्मात अनुभवण्यासाठी समस्त रामभक्तांचे डोळे आता ५ ऑगस्टकडे लागले आहेत. समस्त संत महंत आणि भारताच्या पंतप्रधानांच्या शुभहस्ते श्रीराम मंदीर पायाभरणी समारंभ मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न होणार आहे. मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असे एकेकाळी म्हणणारा आत्मविस्मृतीत हिंदू समाज, १९२५ पासून केशवीय कंटकाकीर्ण  मार्गावर चरैवेती चरैवेती मार्गक्रमण करीत आज गर्व से कहो हम हिंदू है असे म्हणून अखिल विश्वात आध्यात्मिक शिखरावर विराजमान होऊ पाहतोय. सर्वात जास्त युवा लोकसंख्या असलेला भारत आता विश्वगुरुपदी पुनःप्रतिष्ठित होण्यास सज्ज झाला आहे, श्रीरामलला विराजमान यांची भव्य राष्ट्रमंदीरात पुनः प्रतिष्ठापना हीच भारत भाग्योदयाची नांदी असणार आहे आणि या नांदीचे स्वस्तिवाचन ज्यांनी केले त्या हिंदूजागरणाच्या श्रीरामक्रांतीचा  सरसेनानी असलेल्या मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभी  हे घडणे हा नियतीचा शुभसंकेत म्हणावा लागेल.
जय श्रीराम !!!

डॉ. भालचंद्र हरदास

*प्रा.डॉ. भालचंद्र माधव हरदास*, नागपूर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये आचार्य. ?राष्ट्रीय वाचनालय सांस्कृतिक मंडळ सदस्य ?विश्वमांगल्य सभा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ?नवयुग आणि पंडित बच्छराज व्यास शाळेचे संचालन करणाऱ्या भारतीय शिक्षण मंडळाचे सहकार्यवाह. ?आजपर्यंत १८० हुन अधिक हिंदी- मराठी-संस्कृत रचना केल्या आहेत ?विविध वृत्तपत्र आणि नियतकालिके यातून स्तंभलेखन सुरू आहे ?तरुण भारत रविवार आसमंत पुरवणीत *उत्तरायण* स्तंभलेखन. ? दैनिक हिंदुस्थान अमरावती मध्ये *चिंतन* साप्ताहिक सदर. ?राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.

Comments (0)
Add Comment