मक्रणपूर परिषद
निजामाच्या राज्यात भाषण स्वातंत्र्याला बंदी होती त्यामुळे डॉ.आंबेडकरांना सुद्धा भाषण करण्यास बंदी असल्याने हैद्राबाद राज्याच्या सरहद्दीलगत या सभा होत असत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील दलित, वंचित घटकाला स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा देणारी व निजामविरोधी पहिली जाहीर परिषद दि.३० डिसेंबर १९३८ या दिवशी मक्रणपूर (डांगरा), ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे झाली. ही परिषद म्हणजे हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक क्षण होता. या परिषदेत स्वातंत्र्यसेनानी व शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नेते भाऊसाहेब तथा बी. एस. मोरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाच्या अगोदर जय भीम या घोषवाक्याचा नारा दिला. हेच घोषवाक्य पुढे अभिवादानाचे, संघर्षाचे प्रेरणादायी प्रतिक बनले. या सभेत डॉ आंबेडकरांनी संस्थानातील शैक्षणिक सोयीचा अभाव, सामाजिक गुलामगिरी, वेठबिगारी व आर्थिक दुबळेपणा याचा आढावा घेतला. डॉ आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, “१९३४ साली मी दौलताबादचा किल्ला पाहण्यास गेलो असता, तेथील किल्ल्याजवळील हौदातील पाण्याने माझ्या सहकार्यांनी हातपाय धुतले तेंव्हा हौद बाटला म्हणून तेथील लहानथोर मुसलमान लोकांनी व दहा-बारा वर्षे वयाच्या एका मुस्लीम मुलीने आम्हाला एक तास शिव्या देऊन आमच्या आयाबहिणींचा उद्धार केला.” निजामाच्या काळात मुस्लीमांकडून अस्पृश्यता पाळली जात असल्याचा अनुभव खुद्द डॉ. आंबेडकर व त्यांच्या सहकार्यांनी घेतल्याचे लक्षात येते.
बाबासाहेब त्यांच्या भाषणात पुढे म्हणतात, “दुसरे म्हणजे मी मुंबई व सी.पी. भागात अडचणीच्या वेळी मुसलमानांना मदत करतो, तेव्हा निजाम सरकारने व मुसलमानांनी आम्हाला मदत करावयास पाहिजे पण असे होत नाही;उलट त्यांनी आम्हाला सभाबंदी घालावी हे लाजिरवाणे आहे. या संस्थानात अस्पृश्यांसाठी शाळा नसाव्यात ही आश्चर्याची गोष्ट आहे. संस्थानात एकच असपृश्य मुलगा बी.ए. झाला आहे. पण सर अकबर हैदरी यांना शिफारस पत्र देऊनही व त्यांची स्वतः भेट घेऊनही त्यास नोकरी मिळाली नाही. निजाम सरकारची शिष्यवृत्ती घेऊन या संस्थानातील अनेक विद्यार्थी लंडनला शिक्षणासाठी गेले. पण त्यामध्ये केवळ एकच अस्पृश्य विद्यार्थी होता. कोल्हापूर व बडोदा संस्थानांप्रमाणेच हे संस्थान अस्पृश्यांना शिष्यवृत्ती देऊन लंडनला शिक्षणासाठी पाठवतील ही माझी आशा फोल ठरली. दलितांना उद्देशून बाबासाहेब पुढे म्हणाले, “तुमच्यावर अनंत बंधने आहेत. तुम्हाला भाषणस्वातंत्र्य व मिरवणूक स्वातंत्र्य नाही. तेव्हा मी तुमचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करेन. येथील राज्य करण्याची पध्दत सदोष असल्यामुळे तुम्ही आतून काही करु शकत नाही पण मी बाहेरुन जरूर करीन, या परिषदेत पास झालेले सर्व ठराव सर अकबर हैदरी यांच्याकडे पाठवीन.”
मक्रणपूर परिषदेनंतर २३ फेब्रुवारी १९४१ रोजी मराठवाड्यातील महार मांग वतनदारांची परिषद धाराशिव जवळील व सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील “तडवळा ढोकी” येथे आयोजित करण्यात आली. भालेराव गुरुजी हे या परिषदेचे संयोजक होते. तडवळा ढोकीचे दीवचंद कदम हे अध्यक्ष होते, तर बाबुराव बनसोडे हे स्वागताध्यक्ष होते. ही शैक्षणिक परिषद होती. या परिषदेत बाबासाहेबांनी दलितांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेऊन दलितांना मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले, “हैदराबाद संस्थान देशात श्रीमंत व मोठे संस्थान असूनही येथे अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय नाही. या ठिकाणी लाखो एकर जमिनी पडीत असूनही निजामाने त्या दलितांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दलितांचे कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. आपले प्रश्न सरकारच्या कानावर घालण्यासाठी तुम्ही संघटीत झाले पाहिजे, बावन हक्क, गावकीची कामे व वेठबिगारी करणे बंद करा, मृत मांस खाऊ नका, आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवा.” निजामाच्या राज्यात दलितांची काय स्थिती होती हे बाबासाहेबांच्या तत्कालीन भाषणांच्यामधून लक्षात येते. हैद्राबाद संस्थानात ‘हैद्राबाद शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ ही संघटना कार्यरत होती. या संघटनेचे नेते होते जे.एच.सुबैय्या ही संघटना डॉ.आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने सक्रीय होती. संस्थानांतील दलित वर्गाच्या समस्यांविषयी संघटना कार्यरत होती. हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन व्हावे ही मागणी या संघटनेने शेवटपर्यंत लावून धरलेली होती.
दलित वर्गास बाबासाहेबांचे आवाहन
पाकिस्तान आणि हैद्राबाद संस्थानातील दलितांच्या स्थितीबद्दल आणि मुस्लिमांकडून होत असलेल्या छळ आणि धर्मांतराबाबत डॉ. आंबेडकर अतिशय जागृत आणि चिंतीत होते. याविषयी धनंजय कीर ‘डॉ बाबसाहेब आंबेडकर’ या चरित्र ग्रंथात पुढील प्रमाणे माहिती देतात…..
मुसलमानांची संख्या वाढावी म्हणून निजामच्या हैद्राबाद संस्थानमध्येदेखील दलित समाजातील लोकांना मुसलमान धर्माची दीक्षा दिली जात आहे असेही त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले. त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या लोकांना असा उपदेश केला की, ‘पाकिस्तानमध्ये पेचात सापडलेल्या दलित समाजाने सापडेल त्या मार्गाने व साधनाने हिंदुस्थानात यावे, असे मी सांगू इच्छितो. दुसरी एक गोष्ट मला सांगायाची आहे ती अशी की, पाकिस्तान किंवा निजामचे हैद्राबाद संस्थान यांतील मुसलमानांवर किंवा मुस्लीम लीगवर विश्वास ठेवण्याने दलित समाजाचा घात होईल. दलित वर्ग हिंदू समाजाचा तिरस्कार करतो म्हणून मुसलमान आपले मित्र आहेत असे मानण्याची वाईट खोड त्यांना जडली आहे.
ती अत्यंत चुकीची आहे.’ पाकिस्तान आणि हैद्राबादमधल्या दलित समाजाला इस्लाम धर्माच्या दीक्षेला त्यांनी केवळ जीव वाचविण्याच्या हेतूने बळी पडू नये, असा आंबेडकरांनी सल्ला दिला. ज्यांना बळजबरीने पाकिस्तानात किंवा हैद्राबादमध्ये इस्लाम धर्माची दीक्षा दिली होती, त्या दलित लोकांना त्यांनी असे आश्वासन दिले की, त्यांचे धर्मांतर होण्यापूर्वी त्यांना जसे वागविण्यात येई तशीच त्यांना इथे आल्यावर पुन्हा स्वीकृत करून घेऊन बंधुभावाची वागणूक मिळेल. हिंदूंनी त्यांचा कितीही छळ केला तरी त्यांनी आपले मन कलुषित करून घेऊ नये. हैद्राबादमधील दलित वर्गांनी निजामाची – जो उघडउघड हिंदुस्थानचा शत्रू आहे – त्याची बाजू घेऊन आपल्या समाजाच्या तोंडाला काळिमा लावू नये.’ असा त्यांनी अस्पृश्य वर्गास इशारा दिला. पाकिस्तानमधील दलितवर्गीय लोकांना हिंदुस्थानात आणण्याची भारत सरकारने त्वरीत व्यवस्था करावी, अशी त्यांनी भारताचे पंतप्रधान नेहरू यांचेकडे मागणी केली. निजामच्या हैद्राबाद संस्थानविरुद्ध भारतीय सरकारने जेव्हा दोन वर्षानंतर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकरांनी त्या कारवाईचे प्रमुख गृहमंत्री सरदार पटेल यांना मोठ्या नेटाचा पाठिंबा दिला.” ( संदर्भ – धनंजय कीर लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चरित्र, पॉप्युलर प्रकाशन, पृ. क्र. ४४३)
हैद्राबाद संस्थानांत धर्मांतराची मोहीम
हैद्राबाद संस्थानांत धर्मांतराची मोहीमच सुरु होती. लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांच्या ‘कर्मयोगी संन्यासी’ स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील लिहिलेल्या ग्रंथात याबाबत माहिती दिली आहे. बहादूरखान याने १९२७ मध्ये हैदराबादेत ‘तबलीग’ म्हणजेच शुद्धीकरणाची मोहीम सुरु केली. शुद्धीकरणाचा सरळ अर्थ इतर धर्मियांना मुस्लीम करणे असा होता. या बहादूरखानला निजाम उस्मानअलीने ‘नवाब बहादूरयारजंग’ असा खिताब दिला व जहागीरही दिली. बहादूरखानने धर्मांतराची मोहीम जोरकसपणे चालविली आणि निजाम नोकरदारांनी त्याला त्यासाठी मदत केली. शेकडो पगारी धर्मप्रचारकांची नेमणूकसुद्धा करण्यात आली होती. ब्रिटीश रेसिडेंटने १ सप्टेंबर १९३६ रोजीच्या त्यांच्या पाक्षिक अहवालात लिहिले आहे कि, गेल्या दशकात २०,००० हून अधिक दलितांना मुस्लीम धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. १९३६ साली धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या एकाच दौऱ्यात बहादूरयारजंग याने ५५० दलितांना मुस्लीम बनवले होते. ही आकडेवारी पाहता धर्मांतराची चळवळ किती व्यवस्थित सुरु होती हे लक्षात येते. ही धर्मांतर चळवळ धार्मिक, राजकीय हेतूने सुरु होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी –
प्रचंड अभ्यास आणि दूरदृष्टी असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित वर्गाला स्पष्ट आवाहन करताना दिसतात कारण मुळात इस्लामचा आणि इस्लामी राजवटींचा बाबासाहेबांचा सखोल अभ्यास होता. इस्लामिक पाकीस्तान किंवा निजामी हैद्राबादमध्ये दलितांचे तसेच गैर मुस्लिमांचे कल्याण होऊ शकणार नाही हे स्पष्टच होते. इस्लाम च्या संदर्भात बाबासाहेबांनी “Pakistan or the Partition Of India” या ग्रंथात विस्तुत आणि तथ्यपूर्ण लिखाण केलेलं आहे व DR. BABASAHEB AMBEDKAR WRITINGS AND SPEECHES” या प्रकल्पाच्या अंतर्गत जे विविध खंड आहेत, त्यातील “Volume No. : 8” म्हणजेच आठव्या खंडात या मुद्द्याचा समावेश केला आहे. इस्लामिक आक्रमणांच्या हेतूबद्दल बाबासाहेब लिहितात, “ही मुस्लीम आक्रमणे केवळ लूट किंवा विजयाच्या लालसेपोटी केलेली नव्हती. त्यांच्यामागे आणखी एक हेतू होता… हिंदूंच्या मूर्तिपूजा व अनेकेश्वरवादावर प्रहार करणे आणि भारतात इस्लामची स्थापना करणे हे देखील या मोहिमेचे एक उद्दिष्ट होते याबद्दल मुळीच शंका नाही. ” (संदर्भ खंड ८, पृ.क्र ५५ ) इस्लामचे तत्व व त्यानुसार मुस्लिमांच्या निष्ठांच्याबाबत बाबासाहेब लिहितात, “इस्लाम हा मानवांमध्ये अगदी कठोर विभागणी करतो. इस्लाम हे एक बंदिस्त मंडळ आहे आणि मुस्लीम व गैर-मुस्लीम यांच्यात तो जो फरक करतो तो एक अतिशय वास्तविक व पराकोटीचा फरक आहे. इस्लामचे बंधुत्व हे मानवतेचे वैश्विक बंधुत्व नाही. ते केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व आहे. त्यात बंधुत्व आहे पण त्याचा फायदा हा इस्लामिक मंडळातील लोकांपर्यंत मर्यादित आहे. जे लोक या मंडळाच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी अवहेलना व शत्रुत्वाशिवाय काहीही नाही. इस्लामचा दुसरा दोष असा आहे की ती एक सामाजिक स्वयंशासनाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था स्थानिक भूमीतील शासनसंस्थेशी सुसंगत नाही, कारण मुस्लिमाची निष्ठा ही त्याच्या निवासी देशावर नाही, तर त्याच्या धर्मावर असते. मुस्लिमांसाठी “पोषण करणारी भूमी हाच माझा देश” हा विचार अकल्पनीय आहे. त्यांच्यासाठी जिथे इस्लामची राजवट आहे तो त्यांचा देश आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, इस्लाम खऱ्या मुस्लिमाला भारताला आपली मातृभूमी म्हणून स्वीकारण्याची आणि हिंदूला आपले भाऊबंध मानण्याची परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळेच बहुधा एक महान भारतीय पण सच्चा मुस्लीम असलेल्या मौलाना मोहंमद अली यांनी स्वतःला भारतात दफन करण्याऐवजी जेरुसलेममध्ये दफन करणे पसंत केले असावे.” ( संदर्भ खंड ८, पृ.क्र. ३३१)
पोलीस ॲक्शन आणि डॉ. आंबेडकर
हैदराबाद संस्थानावर भारत सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सरदार पटेल यांनी तत्कालीन कायदामंत्री असलेले डॉ. आंबेडकरांशी सविस्तर चर्चा केली होती. डॉ. आंबेडकरांचे मत असे होते कि, आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची युनोमध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैद्राबाद संस्थानावर आक्रमण केले असे अनेक अर्थ निघू शकतील. डॉ. आंबेडकरांनी सूचना केली की आपण सैन्य पाठवू, पण या कारवाईला ‘पोलिस ॲक्शन’ असे नाव देवू. डॉ. बाबासाहेबांच्या सूचनेचा सरदार पटेल यांनी स्वीकार केला. त्याअगोदर आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैदराबाद संस्थानाची बाजू मांडावी, म्हणून निजामाने डॉ. आंबेडकरांना विनंती केली होती. मात्र निजामाची विनंती धुडकावून लावत निजामाला युनोमध्ये प्रतिवाद करण्यासाठी यत्किंचितही जागा राहणार नाही, अशा रीतीने आंतरराष्ट्रीय कायद्याचा मागोवा घेत कायदेशीर बाजू सांभाळण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले. सप्टेंबर महिन्यात भारताने सैन्य पाठवले, त्यापुढे निजामाचा टिकाव लागला नाही आणि निजाम शरण आला. १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हैद्राबाद संस्थान निजामाच्या जुलमी वर्चस्वातून मुक्त झाले.
समारोप
निजामची राजवट संपली असली तरी त्या धर्मांध मानसिकतेच्या फुटीरशक्ती आजही टिकून आहेत व सक्रीय सुद्धा आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकार ने नुकतीच बंदी घातली. या संघटनेच्या अनेक म्होरक्यांना मराठवाड्यातून अटक झाली आहे. अनेक दंगली, हिंसक घटना व देशविघातक कारवायांमध्ये या संघटनेचे लोक कार्यरत आहेत. AIMIM हा पक्ष आणि त्यांचे नेते मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे टाळतात. १७ सप्टेंबरला दरवर्षी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम होत असतो. छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम पक्षाचे नेते व माजीं खासदार इम्तियाज जलील हे लोकप्रतिनिधी असूनही ते या कार्यक्रमाला गैरहजर राहताना दिसतात. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देताना दिसत नाहीत. डॉ.आंबेडकरांचा वारसा सांगणारे प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत AIMIM सोबत युती केल्याने इम्तियाज जलील खासदार झाले. परंतु प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातून उभे राहिलेले असताना दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्वाचे विधान केले कि, “मुस्लीम मतं न मिळाल्यानेच आमचा पराभव” त्यानंतर त्यांनी युती तोडली. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी अत्याचारी औरंगजेबच्या कबरीवर जावून फुले वाहिली व एका अर्थाने औरंगजेबचे उदात्तीकरण केले. यामुळे हैद्राबाद मुक्ती संग्रामात डॉ बाबसाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती हे समजून घेणे आजही तितकेच महत्वाचे आहे.
भारतरत्न डॉ.आंबेडकरांनी धर्मांध निजामाला तसेच दलित, वंचित समाजाच्या होत असलेल्या इस्लाम धर्मांतराला विरोध केला. मराठवाड्यातील दलितांची स्थिती बिकट होती. निजामाकडून होत असलेले जुलूम, पिळवणूक, तसेच गरिबी, शिक्षणाचा प्रचंड अभाव आणि जातीय विषमता, भेदभाव अशी ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षण संस्था सुरु केली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षात अनेक स्वातंत्र्यसेनानिंनी प्राणांची आहुती दिली. डॉ.बाबासाहेबांच्या निजामविरोधी स्पष्ट भूमिकेमुळे अनेक दलित बांधवानी या मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सहभाग नोंदवला. स्वामी रामानंद तीर्थ, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे धर्मांध निजामाच्या तावडीतून मराठवाडा स्वतंत्र झाला. भारत एक राहिला व येथील जनतेसाठी विकासाची दारे खुली झाली.