इस्रायलचा गनिमी हल्ला:ऑपरेशन मेनी वेज.
०८सप्टेंबर, २०२४ला, युनिट ६६९च्या १२० इस्रायली हवाई कमांडो, शालदाग, यांनी इराणच्या,सीरियामधील भूमिगत क्षेपणास्त्र व रॉकेट निर्मिती कारखान्यावर (मिसाईल अँड रॉकेट फॅक्टरी) गनिमी हल्ला केला. हे ऑपरेशन, “ऑपरेशन मेनी वेज”, उत्कृष्ट रित्या यशस्वी झाल. यात सहभाग घेतलेले सर्व कमांडो,लाँग रेंज पेनिट्रेशन कॉम्बॅट सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन्समधे तरबेज/तज्ञ असल्यामुळे, शत्रू प्रदेशात छापा मारून,कुठल्याही प्रकारची जीव किंवा संसाधन हानी न होता,एकसंध परत आलेत. इराणचा हा क्षेपणास्त्र व रॉकेट बनवण्याचा कारखाना,डीप लेयर,लेबनॉनची हिजबुल्ला आणि सीरियातील असद फोर्सेसला, अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि लांब पल्ल्याच्या रॉकेटस् पुरवत/निर्यात करत असे. इस्रायलनुसार, या ऑपरेशनसाठी काही दिवस आधी पासूनच; व्यापक पाळत ठेवण (एक्स्टेंसिव्ह सर्व्हेलंस),गुप्तचर माहिती गोळा करण (डिटेल्ड इंटलिजंस) आणि साइट नष्ट करण्यासाठी तपशीलवार नियोजन (परफेक्ट डिस्ट्रक्शन प्लॅनिंग) केल गेल.या इराणी कारखान्याच भूमिगत बांधकाम, जमीनीच्या ३५०-४०० फूट खाली केल्या गेल होत. हा कारखाना; इस्रायल सीरिया सीमेच्या उत्तरेत १९८ किलोमीटर आत आणि समुद्री किनाऱ्यापासून (कोस्ट लाइन) ४५ किलोमिटर आत,सीरियामधील हमा शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या मस्याफ येथील पर्वतराजीत होता.जमीनीच्या आत, खूप खोलवर असल्यामुळे या कारखान्यावर, कुठल्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यांचा (एयर स्ट्राईक्स) परिणाम होण शक्य नव्हत. जमीनीच्या आत,केवळ सुरुंग मार्गेच जाण शक्य (फिजिबल) असल्यामुळे यावर,गनिमी हल्ला (कमांडो अटॅक) करण हे देखील एक कठीण काम होत. कारखान्याची रचना; घोड्याच्या नालेसारखी (हॉर्स शू शेप) होती. क्षेपणास्त्र/ रॉकेटस् निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल पाठवण्यासाठी एक प्रवेश द्वार (एन्ट्री पॉइंट) आणि तयार क्षेपणास्त्र/रॉकेटस् बाहेर पाठवण्यासाठी एक निर्गम द्वार (एक्झिट पॉइंट),पर्वताच्या पायथ्यात (माउंटन साइड) होते. कारखान्यातील कर्मचारी आणि रोज मर्याच्या सामानाच्या आवागमनासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार होत. क्षेपणास्त्र व रॉकेटस् निर्मिती (वेपन असेंब्ली),प्रत्येकी १६ मोठ मोठ्या दालनांमधे होत असे.कारखान्याच बांधकाम २०१७ मधे सुरू झाल आणि ३०० क्षेपणास्त्र/वर्ष लक्ष्य असलेली क्षेपणास्त्र निर्मिती नुकतीच सुरू झाली असली तरी, रॉकेट इंजिन उत्पादन मात्र जोरात सुरू होत.
दोन एएच ६४ अटॅक हेलिकॉप्टर्सच्या नजदिकी संरक्षणात (क्लोज एस्कॉर्ट सपोर्ट), चार सीएच ५३ डी, यासूर, हेलिकॉप्टर्सद्वारे, १०० शालदाग आणि युनिट ६६९च्या २० कमांडोसह सहा लष्करी कुत्र्यांना सीरियामधील हल्ल्यात नेण्या आणण्यात आल.२१ इस्रायली लढाऊ विमान (फायटर्स), १४ टेहाळणी विमान (रेकोनिसन्स एअरक्राफ्ट्स) आणि पाच ड्रोन्सनी, या कमांडो काफिल्याला; बाह्य रक्षण (आऊटरडिफेन्स),हवाई मार्गांची टेहाळणी (रूट रिकॉनिसंस) आणि हल्ल्या दरम्यानच संरक्षण (ऑन साईट प्रोटेक्षन) दिल होत.इस्रायली नौदल जहाजांनी सागरी मार्गांनी येऊ शकणाऱ्या संकटांचा सामना केला. या व्यतिरिक्त इस्रायलमधे, ३० लढाऊ विमान,कुठल्याही अत्यावश्यक ऑपरेशनल परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी पर्यायी (स्टँड बाय) स्थितीत तयार होती.
सीरियन रडार्सना चकवत, तीच्या एअर डिफेन्स सिस्टीमपासून स्व बचाव करत, त्या सहाही इस्रायली हेलिकॉप्टर्सनी,जवळजवळ पाण्याला स्पर्श करणार उड्डाण करून, जमीनी व सागरी क्षेत्र पार केल. इस्रायलमधून निघाल्यावर,लेबनॉनच्या किनाऱ्यापासून खूप दूर, भूमध्य समुद्रापार जाऊन हा सर्व काफिला, किनारपट्टीला लांघून सीरियात गेला. राजधानी दमास्कस व कारखान्याच्या भोवती या आधी,दाट (डेंस) सीरियन एअर डिफेन्स सिस्टीम असली तरी, डिसेंबर, २०२४ मधे इस्रायलनी इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे झालेल्या विध्वंसात ती बरीच विरळ झाली होती. या गनिमी हल्ल्यातील इस्रायली हेलिकॉप्टर फोर्स, सीरियन किनारपट्टी ओलांडल्यानंतर, १८ मिनिटांत,कोणाच्याही नजरेस न येता/ पडता,सफलतापूर्वक, कारखाना असलेल्या जागी पोचला. हेलिकॉप्टर फोर्सच आगमन होत असतांना इस्त्रायली लढाऊ विमान आणि नौदल तोफा, कारखाना साईटला जाणारे मार्ग व विविध सीरियन लक्ष्यांवर गोळीबार करत होते. सीरियाची एडी सिस्टीम,विमान व सेनेची दिशाभूल करण्यासाठी (डिकॉय अँड डिसेप्शनमेझर्स) आणि कोणत्याही कुमकीला लक्ष्य क्षेत्रापर्यंत पोहोचण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून ही कारवाई करण्यात आली.
पहिली दोन इस्रायली हेलिकॉप्टर्स, एंट्री एक्झिट गेट्सजवळ उतरली आणि दोन त्यांना लागून थोडच मागे उतरली. त्यातील १०० एअर कमांडो त्वरीत बाहेर पडून कारखान्याकडे जाणाऱ्या बोगद्याकडे (टनेल्स) गेले. युनिट ६६९ चे वीस कमांडो,या चार वाट पाहणाऱ्या (वेटींग) हेलिकॉप्टर्स व लँडिंग साईटच्या सुरक्षेसाठी तेथेच थांबलेत.पहिल्या हेलिकॉप्टरच्या कमांडोंनी सर्व परिसर सुरक्षित केला, दुसऱ्या हेलिकॉप्टरमधील कमांडोंनी,एंट्री पॉईंटचा अजस्त्र व भक्कम दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तिसऱ्या हेलिकॉप्टरमधील कमांडोंनी जवळच्या टेकडीवर पोझिशन घेऊन, कारखाना साईट परिसर सुरक्षित करण्यासाठी आणि त्या बाजूकडे येणाऱ्या कुमकीचा विध्वंस करण्यासाठी,सशस्त्र ड्रोन उडवलेत/ लाँच केले.चौथ्या हेलिकॉप्टरमधे, दोन क्वाड बाईक्स,जड दरवाजे फोडण्यासाठी लागणारी स्फोटक आणि या संसाधनांचा तसच फोर्कलिफ्ट वाहनांचा वापर करणारे प्रशिक्षित कमांडो होते.या हेलिकॉटरमधील कमांडोंनी बोगद्याच्या दाराजवळ आणि आत स्फोटक आणण्या नेण्यासाठी/ हलवण्यासाठी, सोबत आणलेल्या क्वाड बाईक्स आणि साइटच्या आत उपलब्ध असलेल्या फोर्क लिफ्ट वाहनांचा वापर केला.
इस्रायल संरक्षणदलांच्या ऑपरेशननंतर झालेल्या ब्रीफिंगनुसार; “५० कमांडोंनी स्फोटक उपकरण पेरलीत आणि उर्वरित ५० कमांडो पाळत ठेऊन कव्हर/सपोर्ट फायर देत होते. एस्कॉर्ट फायटर एअरक्राफ्ट्स व नेव्हल गन्स,कारखान्या जवळील लक्ष्यांवर मारा करत होते. कारखान्याच्या आतील धाड संपल्यानंतर, एंट्री पॉईंटवर डिटोनेटर्स व टायमर असलेली, ६६० पौंडांची आयईडी/ रिग्ड एक्सप्लोझिव्ह ठेवण्यात आली. सर्व कमांडो,मूळ लँडिंग साइटवर जाऊन प्रतीक्षारत हेलिकॉप्टर्समधे चढल्यानंतर लगेचच, रिमोट कंट्रोलद्वारे स्फोटक उडवण्यात आली.झालेल्या भडक्यात,संपूर्ण कारखाना उध्वस्त झाला.हा काफला सीरियात शिरल्यानंतर कमांडो कारखाना ध्वस्त करून बाहेर पडण आणि सर्व हेलिकॉपटर्सच सुखरूप उड्डाण याला,सुमारे दोन तास लागले.सीरियन कारखान्यातील इराण निर्मित भेदक क्षेपणास्त्र/रॉकेटस् आणि इतर विविध शस्त्र तयार करण्यासाठी उभारण्यात/लावण्यात आलेली,अत्याधुनिक किचकट यंत्रणा नष्ट झाली आणि मोठ्या प्रमाणात अफाट बुद्धिमत्कामत दस्तऐवज मिळालेत/उचलले जे नंतर; इस्रायली गुप्तचर तपास यंत्रणेकडे, विश्लेषण आणि अनुमानासाठी हस्तांतरित करण्यात आलेत. सर्व इस्रायली कमांडो,विमान, ड्रोन्स आणि संसाधन सुखरूप व प्रदेशात सुरक्षित परत आलेत”.
इस्रायलनुसार, ऑपरेशनमधे ६५ गार्डस्/सीरियन सैनिक मारले गेले. परंतु सीरियन मीडियानुसार, १४ ठार आणि ४३ जखमी झाले. हर्षोल्हासित पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खालील शब्दात कमांडोंच अभिनंदन केल: “सीरियामधे खूप आत जाऊन केलेल्या धाडसी आणि यशस्वी ऑपरेशनसाठी मी आमच्या वीर सैनिकांना सलाम करतो. आपल्यावर हल्ला करण्याच्या इराणच्या सैतानी अक्षाविरुद्ध (ॲक्सिस ऑफ एव्हिल) आम्ही केलेली ही सर्वात महत्त्वाची व मोठी प्रतिबंधात्मक कारवाई होती; ही कारवाई; असीम धैर्य आणि स्वतःच्या बचावासाठी, कुठेही, कधीही, केंव्हाही आणि कोणतीही कारवाई करण्याच्या इस्रायली निर्धाराची साक्ष आहे.”
सीरियात बशर अल-असद सुप्रीमो असताना इस्रायलनी “ऑपरेशन मेनी वेज” राबवल होत. असद पदच्युत होऊन रशियाला पळून गेल्यानंतर समयोचित वेळी ही कारवाई सार्वजनिक केल्या गेली. या कारवाईच्या माध्यमातून;इराण आणि या क्षेत्रातील तीची पिल्लावळ (प्रॉक्सी मेंबर्स) यांची इस्रायलविरोधी आसन्न/संभाव्य ऑपरेशन्स आणि अशा कारवायांना नेस्तनाबूत करतांना शत्रूंच्या;अत्यंत संरक्षित, जमीनीत खोलवर असलेल्या साइट्स/ बांधकाम/पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी असे गनिमी छापे टाकण्याचा; इस्रायली संकल्प अधोरेखित झाला आहे. जरूर पडल्यास;इराणमधील भूमिगत लक्ष्यांविरूद्ध असच इस्रायली ऑपरेशन कदाचित जटिल आणि धोकादायक असेलही; पण तरीही; शत्रूंपासून होऊ घातलेल्या धोक्यांपासून बचाव करण्याची इस्रायली क्षमता आणि दृढनिश्चय, सफलतापूर्वक अशी कारवाई करेल यात शंकाच नाही. “ऑपरेशन मेनी वेज” डिब्रीफिंग दरम्यान, इस्रायली संरक्षण दल प्रवक्त्यानी याचा पुनरुच्चार केला; “इस्रायलच्या नागरिकांना निर्देशित केलेल्या धमक्या दूर करण्यासाठी इस्रायल अशाच धोरणात्मक आणि व्यावसायिक कारवाया करत राहील”.
भारत आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारची परिस्थिती/सामरिक तणावाखाली आहे. नजदीकी भूतकाळात तीनी; बालाकोट आणि गलवानमध्ये आपला काट करण्याचा यशस्वी निर्धार उजागर केला आहे. चुकार आणि पुंड शेजाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी, गरज भासल्यास आपल्या सीमेपलीकडे जाऊन; पश्चिमेला कहुता, कामरा, चकलाला, सरगोधा आणि उत्तरेला चेंगडू व किनलिंगमधे, अशाच प्रकारची कारवाई करण हे भारतासाठी दूरच स्वप्न आहे का असा प्रश्न उद्भवल्यास,”अजिबात नाही”, हेच लष्कराच निःसंशय उत्तर असेल यात आम्हा निवृत्त सैनिकांना शंकाच नाही. आगे आगे देखो, होता है क्या. (फोटो भास्कर साभार )
०६/१/२५:१६, भगवाघर कॉलनी, धरमपेठ, नागपूर,१०:९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com.