कोरोनाच्या निमित्ताने जगणं सुंदर करणाऱ्या टीप्स..
माणसाला संवादाची गरज असते….! का…? कशासाठी…? समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे. तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. तर काय होईल…? कुकरचा स्फोट होईल. समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे. आत येणारा झरा नाही. बाहेर जाणारा मार्ग नाही. तर काय होईल. आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल. वास येऊ लागेल. दुर्गंधी येऊ लागेल.
मनाचंही असंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही. भावनांना वाट मिळाली नाही. की मनात विकृती निर्माण होते. अन यासाठी गरज असते संवादाची! अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतील तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे.
संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. एकाच घरात रहाणारे भाऊबहीण, पतीपत्नी, पितापुत्र यांच्यात संवाद नसतो. आपली सुखदु:ख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो. काय गंमत आहे बघा, संवादाच्या खिडक्या बंद करुन माणसं ‘सहजीवन’ जगत असतात. मग काय होतं, मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळविक्राळ रुप धारण करतो. संवादच संपला की उरतो तो वाद…
संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो. आपल्या स्रुजनशीलतेला नवे पैलू पडतात. आपल्या द्न्यानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सुद्र्ढ रहातं. थॊडक्यात काय तर संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे.
तेव्हा बोलू लागा… ऐकू लागा… समजू लागा… संवाद साधू लागा…! कोरोनाच्या निमित्ताने माणसांमाणसांमधला कुंठित झालेला संवाद जर पुन्हा सुरू झाला, गैरसमज दूर झाले, नाती जोडली गेली, असलेली नाती वृद्धिंगत झाली तर जगावर आलेल्या काळ्या सावटाची ती रुपेरी किनार ठरू शकेल. चला, नात्यांमधला संवाद पुन्हा सुरू करूया.
(Photo Google and pngwave वरुण साभार )
- प्रसाद कुलकर्णी, मुंबई