जलसंधारणाच्या उपाययोजना

जलसंधारणाच्या उपाययोजना

मृद्‍ व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर करताना पाऊसमान, जमिनीचा प्रकार, उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन या बाबी लक्षात घ्याव्यात. ज्या ठिकाणी कमी पाऊस, कमी उतार व कमी खोलीच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी जागच्या जागी पाणी मुरविण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस आणि जास्त उताराच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी मूलस्थानी जलसंधारणाबरोबर अभियांत्रिकी कामे करून मृद्‍ व जलसंधारणाचे उपाय करावेत.
– सुहास उपाध्ये, विजय स्थूल, दाजी भानवसे

जमिनीच्या उतारानुसार जमिनीचे निरनिराळे भाग करावेत. त्यानुसार बांध टाकावेत, बांधाच्या आतील भागाचे सपाटीकरण करावे. सध्याच्या काळात फुटलेले बांध दुरुस्त करावेत. योग्य ठिकाणी सांडवा ठेवावा. त्यामुळे जादा झालेले पाणी सुरक्षितरीत्या शेताबाहेर काढता येते. सांडव्यामधून माती वाहून जाऊ नये म्हणून त्यामध्ये दगडी बांध घालावेत. मातीचे बांध पुन्हा पावसाने फुटू नयेत यासाठी पावसाळ्यात त्यावर स्टायलो, मद्रास अंजन, खस, सुबाभूळ, ग्लिरिसिडियाची लागवड करावी.

१) जमिनीची प्राथमिक मशागत केल्यानंतर पाऊस जागच्या जागी मुरविण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
२) शेतामध्ये जादा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी योग्य ठिकाणी ढाळीचे बांध ठेवावेत. जादा झालेले पाणी हे पाणी वाहून नेणाऱ्या चरामध्ये सोडावे. हा चर गवताने आच्छादित करावा. चराच्या उताराबद्दल काळजी घ्यावी. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही.
३) शेतातील जादा झालेले पाणी हे योग्य त्या तांत्रिक गोष्टींचा अवलंब करून विहीर किंवा कूपनलिका पुनर्भरणासाठी वापरावे.
४) जादा झालेले पाणी वैयक्तिक किंवा सामूहिक स्तरावर शेततळे खोदून साठवावे. पाऊस, पाणलोट क्षेत्र, जमिनीचा प्रकार, उतार, पीक पद्धती इत्यादींचा विचार करून शेततळ्याचे आकारमान व ठिकाण ठरवावे.
५) पाझर तलाव, बंधारे इत्यादींची साठवणक्षमता अबाधित ठेवण्यासाठी त्यामधील गाळ काढावा, त्यांची दुरुस्ती करावी.

मृद्‍ व जलसंधारणाच्या पद्धती

मृद्‍ व जलसंधारणाच्या पद्धतींचा वापर हा पाऊसमान, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार, जमिनीची खोली आणि जमिनीवरील आच्छादन इत्यादी बाबी लक्षात घेऊन करावा. ज्या ठिकाणी कमी पाऊस, कमी उतार व कमी खोलीच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी जागच्या जागी पाणी मुरविण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी जास्त पाऊस आणि जास्त उताराच्या जमिनी आहेत, अशा ठिकाणी मूलस्थानी जलसंधारणाबरोबर अभियांत्रिकी कामे करून मृद्‍ व जलसंधारणाचे उपाय करावेत. या पद्धती अत्यंत परिणामकारक आणि कमी खर्चाच्या आहेत. या पद्धतीमध्ये जागच्या जागी जमिनीत पाणी मुरविले जात असल्यामुळे अभियांत्रिकी मृद्‍ व जलसंधारण पद्धतीपेक्षा बाष्पीभवन कमी होते.

भौतिक पद्धती

अवर्षणप्रवण विभागात ८० टक्के क्षेत्र रब्बी पिकाखाली असते. या प्रचलित रब्बी पीकपद्धतीमध्ये पावसाळ्यात म्हणजे खरीप हंगामात बहुधा पीक घेतले जात नाही. त्यामुळे खरीप हंगामात जमिनीस पिकाचे पांघरुण मिळत नाही. रब्बी हंगाम हा पिकांचा दुसरा हंगाम पावसाळ्याच्या शेवटी सुरू होतो. या हंगामात पिकांना प्रत्यक्ष पावसाचे पाणी फारसे मिळत नाही. खरीप हंगामात पडलेले पावसाचे पाणी भारी खोल जमिनीत खरीप पिके न घेता मुरविले जाते आणि जमिनीतील ओलावा वाढविला जातो. अशा जमिनीत रब्बी हंगामातील पिके चांगली येतात.

सपाट वाफे

कोरडवाहू शेतीमध्ये जेथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे आणि जमिनीला फारसा उतार नाही, अशा ठिकाणी उताराला आडवे वाफे तयार करावेत. वाफे तयार करताना प्रथम कुळवाची पाळी द्यावी. त्यानंतर बळिराम नांगराने उभे-आडवे ६ मीटर x ६ मीटर अंतरावर उतारास आडवे सपाट वाफे तयार करावेत. वरंब्याची उंची साधारणपणे २० ते ३० सें.मी. ठेवावी. असे वाफे जागोजागी पाणी मुरविण्यास मदत करतात. त्यामुळे जमिनीमध्ये नेहमीपेक्षा ५० टक्के जास्त ओल साठविली जाते.

सरी वरंबे

मध्यम ते भारी जमिनीत बळिराम नांगराने उतारास आडवे तास घालावे. त्यामुळे सऱ्या तयार होतात आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्यांमधून जमिनीत मुरते. या पद्धतीत ८० टक्क्यांपर्यंत पाणी जमिनीत मुरते. जमिनीतून माती वाहून जात नाही. सऱ्यांची लांबी साधारणतः ९० मीटरपर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ दिसून येते.

बंदिस्त सरी वरंबे

या पद्धतीत मुख्य वरंबे उताराला आडवे ठेवावेत, तर बंदिस्त वरंबे उताराच्या दिशेने ठेवावेत. अशा रीतीने उताराला आडवे बंदिस्त सरी वरंबे तयार होतात. मुख्य वरंब्याची उंची ६ मीटर व उंची ३० सें.मी. ठेवावी, तर बंदिस्त वरंब्याची उंची २० सें.मी. व दोन वरंब्यांतील अंतर ३ मीटर ठेवावे. या पद्धतीत जास्त पाऊस पडला तरी बंदिस्त वरंबे फुटून संथ गतीने पाणी शेतातून बाहेर जाते. ही पद्धत कोरडवाहू भागात चोपण व क्षारयुक्त जमिनीत पाणी मुरविण्यासाठी उपयुक्त असून, त्यामुळे जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

मृद्‍ व जलसंधारणाची अभियांत्रिकी कामे

मूलस्थानी जलसंधारणाच्या कामांबरोबरच मृद्‍ व जलसंधारणाचे अभियांत्रिकी उपचार पाणलोट क्षेत्र विकासाच्या माथा ते पायथा या सूत्रानुसार करावेत.

सलग समतल चर व तुटक समतल चर

१) पाणलोट क्षेत्राच्या माथ्यावरील पडीक जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी सलग समतल चराचा वापर करतात. यासाठी समपातळी रेषेवर ३० सें.मी. खोल व ६० सें.मी. रुंद असे सलग चर खोदावेत. या चरातून निघणारी माती चराच्या खालच्या बाजूस लावावी. त्यामुळे दोन चरांमधील पट्ट्यामध्ये ओलावा दीर्घ काळ राहतो.
२) या ओलाव्याचा फायदा गवताची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास होते. शिवाय जमिनीवरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह थांबविला जातो.
३) चराच्या खालच्या बाजूस जो बांध तयार होतो, त्यावर झाडे लावता येतात. तुटक समतल चर हा सलग समतल चरासारखाच असून, यामध्ये समतल चर हा सलग नसून, तुटक स्वरूपात असतो.

शेततळे

१) पावसाचे वाहून जाणारे पाणी जमा करण्यासाठी आणि त्याचा पुन्हा वापर करण्यासाठी पाणलोट क्षेत्रात योग्य ठिकाणी शेततळे खोदावे.
२) जमिनीवरून वाहून जाणारे पाणी शेततळ्याकडे वळविण्यासाठी योग्य ठिकाणी गवत लागवड केलेली चारी तयार करावी. शेततळ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते.
३) शेततळ्यास योग्य पद्धतीचे अस्तरीकरण केल्यास त्यामध्ये पाणी जास्त काळ साठविता येते. हे साठविलेले पाणी पिकास आणि फळबागेस निकडीच्या अवस्थेत संरक्षित पाणी म्हणून वापरावे.

सिमेंट नालाबांध

१) सिमेंट नालाबांधामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा अडवून जवळपासच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढते. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याची गती कमी करून थांबविणे, बांधाच्या प्रभाव क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे आणि त्याद्वारा सिंचन क्षेत्रात वाढ करणे, हे सिमेंट नालाबांधाचे उद्देश आहेत.
२) सिमेंट नालाबांधासाठी जागेची निवड करताना नाल्याची रुंदी ५ ते ३० मी.पर्यंत असावी, तसेच नाल्याचे पाणलोट क्षेत्र ४० हेक्टरपासून १०० हेक्टरपर्यंत असावे.
३) नाल्याच्या दोन्ही बाजूंस स्थिर काठ असावेत. नाल्याच्या तळाचा उतार तीन टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. नाला काठापासून नाल्याच्या तळापर्यंत कमीत कमी दोन मीटर खोली असावी.
४) नालाबांधाच्या क्षेत्रातील जमिनीचा सामू ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा, जेणेकरून बांधाशेजारची जमीन चिबडयुक्त होणार नाही.
५) नाल्याच्या दोन्ही बाजूंस म्हणजेच बांधाच्या वरील व खालील बाजूस ३० मी. अंतरावर कोठेही वळण किंवा अडथळा नसावा.
६) सिमेंट नालाबांध गाळाने भरू नये म्हणून पाणलोट क्षेत्रात गाळप्रतिबंधक कामे पूर्ण झालेली असावीत. सिमेंट नाला बंधाऱ्याची साठवणक्षमता अबाधित राखण्यासाठी दर पाच वर्षांनी गाळ काढावा

स्त्रोत – विकासपीडिया.

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment