जीवन जगण्याची कला शिकायची असेल तर श्रीकृष्णासारखा गुरू नाही.

कृष्ण सांगितला पाहिजे, कृष्ण उलगडला पाहिजे, कृष्ण समजून घेतला पाहिजे.

जीवन जगण्याची कला शिकायची असेल तर श्रीकृष्णासारखा गुरू नाही.

जीवनातील आनंद, सुख – दु:ख, संघर्ष इत्यादि सर्व कर्माच्या अधीन आहेत. जीवन प्रवासातील आनंद, धैर्य, शांति , सुख – दुख:,  इत्यादि समजून घ्यायच्या असतील तर कृष्णाला समजून घेतलं पाहिजे.

कृष्णाचे आयुष्य हे सुखी होते असे अजिबात नाही पण कृष्णाच्या जगण्यावर त्या दुःखाचा काळोख कधी आला नाही.

जन्मत:च वाट्याला आलेला संघर्ष, सतत जीवाचा धोका आणि धोक्याच्या सावलीत गेलेले बालपण, जरासंधासारख्या, कंसासारख्या मोठ्या शत्रूंचे आव्हान. ते आव्हान पेलत जगलेलं  तारुण्य. सगळे मित्र, स्वकीय,आप्त यांचा संघर्ष. सगळ्या जंबूद्वीपाचा पट मांडून लढले गेलेले महाभारताचे युद्ध. त्यामध्ये होणारे दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान आणि त्यातून सर्वांना सावरत, सांभाळत, धर्माच्या आधारावर मार्ग दाखवत केलेली वाटचाल. हे सगळं सोप नव्हत . हा कंटकाकीर्ण मार्ग होता.     शेवटी स्वतःच्याच कुळाचा नाश घडवणारी यादवी. हे सगळच अनाकलनीय होत. श्रीकृष्णाच्या आयुष्यात सुखाचा, विसाव्याचा,  विलासाचा काळ शोधुन सापडणार नाही.

पण कृष्णाच्या मनात त्या कोणत्याही गोष्टीचा आकस नव्हता,  ना कृष्णाच्या मनात सूड भावना नव्हती की, द्वेष नव्हता. त्याच्या आयुष्याला त्याने भोगलेल्या दुःखाची विशारी किनार नाही.

कुरुक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात युद्ध होते,  मृतदेहांचे खच होते, रक्ताची पाट होते त्या ठिकाणी देखील, कृष्ण पार्थाला कर्म कर असे म्हणतो. सूड घे असे म्हणत नाही. अर्जुनावर झालेल्या अन्यायाची आठवण कृष्ण अर्जुनाला करून देत नाही. तर त्याला त्याच्या धर्माची, नीतीची आणि त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या कर्माची आठवण करून देतो.

अवीट अशा आनंदाचा मार्ग कृष्ण अर्जुनाला दाखवतो. धर्माने जगण्याचा, धर्माने कार्य करण्याचा मार्ग कृष्ण अर्जुनाला दाखवतो. तोच हा कर्मयोग. त्यालाच आज आपण सारे आणि सर्व जग कर्मयोग म्हणतो.

कृष्ण कळला की, आयुष्यात दुख: भोगून संपते.

कृष्ण कळला की, आनंद आयुष्यात अविरत नांदतो.

कृष्ण कळला की, कर्माचा आध्यात्मिक सिद्धांत कळतो.

कृष्ण उलगडला पाहिजे. कृष्ण सांगितला पाहिजे, कृष्ण समजून घेतला पाहिजे.

– नितिन राजवैद्य.

फोटो गुगल साभार.

नितीन राजवैद्य

नितीन राजवैद्य, मुख्य संपादक लोकसंवाद डॉट कॉम

Comments (0)
Add Comment