जोडताना….
“खूप जुन्या काळी एक शेतकरी आपल्या बायकोसोबत एका छोट्याश्या गावात अगदी सुखासमाधानाने राहत होता. शेतकऱ्याकडे अगदी रेखीव आणि सुरेख असे चिनी मातीचे छोटे छोटे दोन घडे होते आणि ते घडे त्याला त्याच्या प्राणांहून प्रिय होते कारण ते खूप जुने आणि मौल्यवान होते. एक दिवस ते घडे त्याच्याच हातून फुटले आणि बिचारा शेतकरी खूप दुःखी झाला. त्याची अशी ही निराशा त्याच्या बायकोला पहावली नाही आणि ती त्या फुटलेल्या घड्यांचे तुकडे घेऊन सोनारकडे गेली आणि सोन्याचांदीने ते घडे परत जोडून आणले. ते घडे आधीपेक्षा अजूनच सुंदर आणि मौल्यवान दिसायला लागले हे पाहून शेतकरी खूष होतो आणि आपल्या बायकोचे आभार मानतो!”
काही दिवसांपूर्वी ही लोककथा मी वाचली आणि मनात विचार आला की खरच आपला दृष्टिकोन, विचार, समाधान आणि आपला आनंद ह्या गोष्टी किती एकमेकांवर अवलंबून आहेत! एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून आपण तिचा जीवापाड सांभाळ करतो आणि तीच गोष्ट खराब झाली की त्याचा त्रास आपल्याला होतो. ही बाब फक्त वस्तूंवरच नाही तर माणसांवर देखील लागू होते.
एखादी गोष्ट बिघडली की त्याला सांधण्याचा प्रयत्न करणे ही साधारण मानवी प्रकृती आहे. कधी कधी जोडताना ती आधीपेक्षा मजबूत होते तर कधी अजूनच तकलादू होते! पण प्रयत्न करणे मात्र अनिवर्यच!
पण वरील कथेत शेतकऱ्याची बायको त्याला सांधायला मदत करते पण खऱ्या जगात कोणी येईल मदत करेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच त्यावर उपाय योजण्याची तयारी असावी लागते. पण ह्या कथेने मला एक गोष्ट शिकवलीये की एखादी आपली प्रिय गोष्ट जो पर्यंत खराब होत नाही तोपर्यंत आपल्याला तीच महत्व कळत नाही आणि ती खराब जरी झाली तरी त्यावर उपायही असू शकतात ह्याचा विचार देखील मनात स्पर्शून गेला !
~डॉ. अपूर्वा डाफणे,
Blog link- http://apurvadafne13.blogspot.com/2020/04/blog-post.html
#लेख #बोधकथा #thoughts