कर्नाटक बिटंबना प्रकरण.
अखिल हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपति शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेची कर्नाटकमध्ये विटंबना करण्यात आली.हा अत्यंत निषेधार्ह प्रकार आहे. ज्या महापुरुषाच्या अस्तित्वामुळे हिंदुस्थानचे हिंदुत्व शिल्लक राहिले,त्या महापुरुषाचा अवमान हा निश्चितच संतापजनक आहे,अशी विकृती करणारा जातीधर्माने कोणीही ,अगदी हिंदु जरी असला तरी राष्ट्रद्रोही आहे. त्याला कठोर शासन व्हायलाच हवे.
कर्नाटक घटनेवरुन समस्त कन्नड बांधवांना दोष देणेही चुकीचे आहे. कर्नाटकात शिवछत्रपतिंचे शेकडो पुतळे आहेत. कर्नाटकात शिवभक्तांची संख्याही लक्षणीय आहे. शिवछत्रपतिंचा अपमान करणारे कधीही कन्नड संस्कृतीचे भाग असू शकत नाही.त्याला हिंदुत्वाचा आणि देशाचा शत्रु याच नजरेने पाहिले पाहिजे. या घटनेआडुन कर्नाटक-महाराष्ट्र अथवा कन्नड-मराठी असा वाद निर्माण होऊन अराष्ट्रीय प्रवृत्तींना डोके वर काढायला संधी मिळणार नाही याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेतली पाहिजे.
छत्रपति शिवाजीमहाराज म्हणजे आमच्या स्वातंत्र्यलढ्याचेही प्रेरणास्त्रोत आहेत. स्वामी विवेकानंद तर शिवाजीमहाराजांचे मुक्तकंठाने गुणगान करत. रवींद्रनाथ टागोरांनी बंगालमध्ये श्रीशिवजयंतीत दीर्घकाव्य रचले होते. भगतसिंह,राजगुरु आणि सुखदेव फासावर गेले तेव्हा त्यांनी शिवछत्रपतींचे स्मरण केले होते. सुभाषचंद्र बोस म्हणत की जर हिंदुस्थानला मुक्त व्हायचे असेल तर एकच मंत्र ह्रदयात ठेवा – “शिवाजी,शिवाजी आणि थोर शिवाजी”…….लाला लजपतराय यांनी पंजाबमध्ये शिवचरित्र लिहीले होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही प्रत्यक्ष इंग्रजांच्या राजधानीत लंडनमध्ये शिवजयंती साजरी केली होती. शिवाजीमहाराज हे भाषा,प्रांताच्या सीमा ओलांडुन केव्हाच गेलेले आहेत…..दुर्देवाने स्वार्थी राजकारण आणि प्रादेशिक अस्मितांसाठी त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न होत आहे.
1925 साली जेव्हा डाॅ.हेडगेवार यांनी रा.स्व.संघाची स्थापना केली,तेव्हा छत्रपति शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेकदिन देशभर साजरा करण्याची परंपरा त्यांनी सुरु केली. प्रत्येकवर्षी देशभरातील सगळ्या प्रातांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. डाॅ.हेडगेवार म्हणत की, “छत्रपति शिवाजीमहाराज” हेच आमचे तत्वज्ञान आहे” यापेक्षा आमचे वेगळे तत्वज्ञान नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संघाच्या शाखेवर 365 दिवस दररोज छत्रपति शिवाजीमहाराजांच्या नावाने जयजयकार केला जातो.
अमराठी प्रांतांमध्ये मराठेशाहीच्या इतिहासाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ते गैरसमज इंग्रज आणि कम्युनिस्ट इतिहासकारांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेले आहेत.आजही इरफान हबीब याच्या पुस्तकात शिवछत्रपतिंची बदनामी केलेली आहे. विनोद अनाव्रत नावाच्या हरामखोराने “शिवाजीचे उदात्तीकरण नावाचे पुस्तक लिहून महाराजांची खालच्या पातळीवर बदनामी केली. हे पुस्तक पुण्याच्या एल्गार परिषदेत वाटप करण्यात आले होते.
मराठेशाहीच्या संघर्षामुळेच आज भारताचे भारत अथवा हिंदु म्हणून अस्तित्व आहे.जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या,पण हिंदु संस्कृती अजूनही आहे.याचे कारण मराठ्यांनी केलेला संघर्ष आहे. कर्नाटकातील कोप्पळच्या जनतेची हाक ऐकून शिवाजीमहाराज एखाद्या आईने काळजी करावी तशा काळजीने कर्नाटकच्या रक्षणासाठी धावून गेले होते. महाराष्ट्राच्या नागोजी जेधे नावाच्या कोवळ्या पोराने कर्नाटकवासीयांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले होते. शिवछत्रपतिंची विटंबना करणार्या राष्ट्रद्रोह्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे.
श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने दरवर्षी शिवचरित्र स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी पहिले पुस्तक डाॅ.केदारजी फाळके यांनी लिहीले आहे. महाराजांचा आणि मराठ्यांचा गौरवशाली आणि राष्ट्ररक्षणाचा इतिहास सगळ्या देशाला समजावा,यासाठी देशभर या स्पर्धेचे नियोजन केले जात आहे.
अनेक प्रादेशिक भाषांमध्ये या पुस्तकांचा अनुवाद सुरु आहे. हे काम अतिशय गतीने होण्याची गरज आहे,त्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. विविध भाषांमध्ये मराठ्यांचा इतिहास प्रकाशित झाला पाहिजे. याविषयात खूप काम करण्याची गरज आहे.
शिवचरित्रात संजीवनीमंत्राचे सामर्थ्य आहे…..वेळोवेळी याच संजीवनीमंत्राने मृतप्राय झालेला हा देश पुन्हा जागृत झाला आहे. हा संजीवनीमंत्र साधनेने सिध्द करायचा असतो,त्यासाठी परिश्रम,त्याग आणि समर्पणाची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे.
कर्नाटक सरकारने शिवछत्रपतिंची विटंबना करणार्या राष्ट्रद्रोही प्रवृतीवर कठोर कारवाई केली पाहिजे. भविष्यात पुन्हा आपल्या राष्ट्रीय मानबिंदुची उपेक्षा आणि अवमान होणार याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रातही शिवचरित्राचे विकृतीकरण करणार्या ब्रिगेड,बामसेफ आणि विनोद अनाव्रतसारख्या विकृतींचा वैचारिक आणि संवैधानिक मार्गाने प्रतिकार करण्याची गरज आहे.
– रवींद्र सासमकर