लडाखमधे काय कमावले काय गमावले ?

लडाखमधे काय कमावले काय गमावले ?

१४-१५,००० फूट समतल उंचीवर, १ ते ३,००० फुटांचे बर्फाच्छादित डोंगर  असलेला लडाखचा भूभाग,फसवा आणि मायावी आहे. लडाखमधील ८५७ किलोमीटर्स लांब सीमेतील ३६८ किलोमीटर्स आंतरराष्ट्रीय सीमा (इंटरनॅशनल बॉर्डर:आयबी) असून उर्वरित ४८९ किलोमीटर्स लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल (एलएसी) आहे.१९६२च्या युद्धात चीननी याच एलएसीपर्यंत मुसंडी मारली होती.तेथील भूभाग डावपेचात्मक हालचालींसाठी योग्य/सोयीस्कर नसल्यामुळे (टॅक्टिकली अनसुटेबल),लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी)/ लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर संरक्षण संरचना (डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर) उभारता येत नाही.त्यामुळे लडाखमधील संरक्षण संरचना एलएसीपासून आठ ते साठ किलोमीटर्स दूर,लडाख रेंज/ पॅनगॉन्ग रेंज/शियोक नदी आणि डेस्पान्ग खोऱ्यात उभारावी लागली.लडाखमधे चीनच्या मे,२०२०मधील घुसखोरीनंतर गुगल अर्थनी तेथील भूभागाचा नकाशा प्रसिद्ध केला तो पाहिल्यास या लेखाचा भावार्थ वाचकांच्या लक्षात येण्यास मदत होईल.

लेखकाच्या माहितीनुसार पॅनगॉन्ग क्षेत्रात, पॅनगॉन्ग सरोवराच्या उत्तरेकडील पर्वतराजीतून आठ फाटे (स्पर्स) सरोवराकडे झेपावतात.भारतीय सेनेनी त्यांना डावीकडून उजवीकडे जाणारे, फिंगर १ ते ८ क्रमांक दिले आहेत. १९६२मधे भारतानी सीरिजप हाईट्सवर आपले डिफेन्सेस अख्तियार केले होते. त्या युद्धाच्या वेळी, चीननी ह्या पोस्टसमेत, त्याच्या पूर्वेकडील सर्व भूभाग काबीज केला होता.त्या नंतर या क्षेत्रातील एलएसी, सीरिजपच्या पश्चिमेला, फिंगर ८ पासून अने लापर्यंत (ला म्हणजे खिंड/पास) मानल्या गेली.नवीनतम घूसखोरी आधी,चीन फिंगर ४ पर्यंत आणि भारत फिंगर ८ पर्यंत पेट्रोलींग करत असत. एप्रिल,२०२०च्या शेवटी/ मेच्या सुरवातीला, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनी  (पीएलए), फिंगर ४ व ८मधील अंदाजे चार किलोमीटर्स रुंदीच्या भूभागावर कबजा केला आणि त्या वरील सर्व हाईट्सवर पोस्ट्स  उभारून तेथे किमान दोन बटालियन्सची तैनाती केली आहे/असणार.

गलवान क्षेत्रात,चीननी गलवान नदीच्या उत्तर व दक्षिणेला असणाऱ्या पर्वत राजींवर आपल बस्तान मांडल.चीननी गलवान नदीच्या खोऱ्यातून किंवा उत्तरेतील पर्वतांवरून येत,ह्या हाईट्सवर कबजा केला असावा.या क्षेत्रात देखील चीनच्या दोन बटालियन्स तैनात आहेत/असाव्यात.हॉट स्प्रिंग/ गोग्रा क्षेत्रात चीननी इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसच्या (आयटीबीपी) ऍडव्हान्स पोस्टला,जवळपास एक बटालियनद्वारे विळखा घालून,कॉन्गका लाकडे (ला म्हणजे खिंड) जाणारा भारतीय मार्ग बंद केला.कॉन्गका ला जरी एलएसीवर असला तरी तेथे आपली तैनाती नसते/नाही. भारताच्या कॉन्गका लापर्यंत जाणाऱ्या रस्ते बांधणीवर (रोड कन्स्ट्रक्शन) आळा घालण्यासाठी चीननी ही कारवाई केली असावी.पॅनगॉन्ग सरोवर क्षेत्रातील फिंगर्समधील पोस्ट्स आणि काराकोरम खिंडीजवळील भारतीय पोस्ट्सशी संपर्क साधणाऱ्या, गलवान खोऱ्यातील दरबुक श्योक दौलतबेग ओल्डी ह्या २५५ किलोमीटर्स लांब भारतीय फीडर रोड्सना असलेल्या तीव्र पीएलए/चीनी आक्षेपामुळे,डोकलामनंतर अमलात आणलेल्या नवीन “चायनीज कॉम्बॅटिव्ह स्ट्रॅटेजी”च्या अनुरूप ही  कारवाई झाली असा संरक्षणतज्ञांचा कयास आहे.

ऑगस्ट,२०१९मधे भारत सरकारनी कलम ३७०/३५ ए मधे संशोधन करून जम्मू काश्मिर आणि लडाख युनियन टेरिटोरीजची स्थापना केल्यापासून चीनच पित्त खवळल आहे.उत्तराखण्डातील पिठोरागढहून नेपाळ सीमेवरील लीपूलेख पास रोड आणि लडाखमधील कॉन्गका लाकडे जाणाऱ्या फीडर रस्त्यांच्या बांधणीमुळे त्याच्या अस्वस्थतेत भरच पडली आहे.चीनच्या दृष्टिकोनातून,एलएसीवरील रस्ते बांधणीमुळे भारताच्या “स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी” हासील करण्याच्या सामरिक आकांक्षा उजागर होतात.याच्या जोडीला,राष्ट्रपती शी जीन पिंगच “चायना ड्रीम” धूसर होत चालल/झाल असून,चीनी प्रयोग शाळेतून सर्व जगात पसरलेल्या कोविद १९ कोरोना विषाणूंनी केलेल्या नरसंहारामुळे चीनवर सर्वीकडून दोषारोपण होत असल्यामुळे, मग्रूर चीननी भारत विरुद्ध संघर्षाचा पवित्रा घेतला असावा.पॅनगॉन्ग व गलवान क्षेत्रातील पीएलएच्या हालचाली डावपेचात्मक (टॅक्टिकल मुव्हमेंट्स) आहेत.ज्या वेळी जमिनीवरील रक्षित जागा खंडित असतात (लॉन्ग गॅप्स इन डिफेन्सेस), त्यावेळी तेथे बारा महिने तेरा काळ सापेक्ष शारीरिक टेहाळणी करण (फिजिकल सर्व्हेलन्स) शक्य नसल्यामुळे अशी डावपेचात्मक घूसखोरी (टॅक्टिकल इन्ट्रुजन) सहज शक्य असत. मात्र,एकाच वेळी  लडाख/सिक्किममधे झालेली चीनी घूसखोरी,उत्तर पश्चिम सीमेवर चीन समर्थित पाकिस्तानच्या सतत वृद्धिंगत होणाऱ्या आतंकवादी कारवाया आणि एकाएकी निर्माण झालेली नेपाळी राजकीय मुजोरी या सर्वांची अभद्र सांगड लक्षात घेतली तर  या वेळची चीनी घूसखोरी डावपेचात्मक (टॅक्टिकल) नसून सामरिक (स्ट्रॅटेजिक) होती हे उजागर होत.

आधी एलएसी पार करून छोट्या अंतराची घूसखोरी करायची आणि नंतर  ती जागा ताब्यात राखण्यासाठी लढा द्यायचा याला “ऑक्युपेशन बाय सलामी स्लाइसिंग” म्हणतात आणि पीएलएनी फिंगर ४ आणि ८मधली जागा (एरिया) त्याच धोरणांतर्गत व्यापली आहे.तीन दशकांतील स्पेशल रिप्रेझेंटेटिव्हजच्या २२ बैठकीं मधेही एलएसीच्या नकाशा/जमिनीवरील आखणी बद्दल भारत चीनमधे एकमत न झाल्यामुळे भारत चीन सीमा,सदैव  धुमसतीच असते. लडाखमधील नवीनतम चीनी आक्रमक कारवायांमागे, काराकोरम खिंड आणि पाकिस्ताननी त्याला आंदण दिलेल्या शक्सगाम खोऱ्यामधील भूभाग चीनला  हडप करायचा आहे असा निष्कर्ष काढता येतो.अस केल्यामुळे ) १९५३-५४मधे चीननी अवैध रित्या ताब्यात घेतलेल्या अक्साई  चीनची सामरिक सुरक्षा बळकट होते; ) तिबेट, शक्सगाम खोऱ्याशी संलग्न होतो आणि ) भारताच्या सियाचीन ग्लेशियरला,चीन पाकिस्तान द्वयींच्या सांगडीमुळे सामरिक धोका निर्माण होतो.म्हणूनच एलएसीची त्वरित आखणी न झाल्यास परत ही/अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते/होईल.

एलएसीवरील “मिलिटरी कॉन्फिडन्स बिल्डिंग मेझर्स” संबंधात,१९९३पासून भारत चीनमधे पाच करार झाले असले तरी,सीमेवरील चीनी आगळिकींची वाढती संख्या पाहता,त्यांच्या उपयुक्ततेबद्दल शंका निर्माण होते.या वक्तव्याच्या संदर्भात, चीनच्या ताज्या सामरिक कारवायांचा आढावा घेण क्रम प्राप्त आहे.चीनच अधिकारीक मुखपत्र असलेल्या,ग्लोबल टाईम्समधे आलेल्या बातमीनुसार ०६ जून,२०च्या वार्तालापापूर्वी; ७६ ग्रुप आर्मी पीएलए वेस्टर्न कमांडच्या टँक्स व आर्मर्ड व्हेइकल्सनी,तिबेट हाय अल्टिट्यूड रिजनमधील ४७००-५००० मीटर्स उंचीवर, गुप्तपणे शत्रूच्या मागे जाऊन आक्रमण करण्याचा (स्टेल्थ अटॅक बाय इंफिल्ट्रेशन बिहाइंड एनिमी लाईन्स) युद्धाभ्यास,१४-१५ मे,२०२०ला केला.दुसरीकडे;चीनी नॅशनल टीव्ही आणि वरील वृत्तपत्रानुसार,मध्य चीनमधील हुबेई स्थित एयर बॉर्न ब्रिगेडसच्या १०,००० पॅराट्रूपर्सनी आपले रणगाडे व इतर सामरिक साधन सामुग्रीसह,७०० किलोमीटर्स दूर,उत्तर पश्चिम तिबेटच्या पर्वतराजींवर, आक्रमक युद्धाभ्यास केला.०७ जून,२०ला झालेल्या,काही तासांच्या या युद्धाभ्यासात; आर्मी लॉजिस्टिकल ट्रान्सपोर्ट चॅनेल्स,रेल्वे व सिव्हिल एयरलाईन्सचा सहभाग होता.जर आपण आताच काही पाऊल उचलली नाहीत तर,या नंतरच्या चीनी घुसखोरी पश्चात भारताला,भारत पाक सीमे प्रमाणेच उत्तरी सीमेवर देखील,प्रचंड मोठ्या संख्येत,शाश्वत सैनिकी तैनाती (पर्मनन्ट मिलिटरी डिप्लॉयमेंट) करावी लागेल.

सीमा प्रश्नावर ०६ जून,२०ला झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच भारताकडून लेफ्टनन्ट जनरल पदावरील सेनाधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला. पहिल्या चीनी सैनिकाच्या लडाखमधील घूसखोरी नंतरच्या एक महिन्यात स्थानिक कमांडर्सच्या अकरा  आणि डिव्हिजनल कमांडर स्तराच्या तीन बैठकीं मधे यावर तोडगा न निघाल्यामुळे, हा गुंता सोडवण्यासाठी ०६ जून,२०ला सकाळी अकरा वाजता,चीनी हद्दीतील “माल्डो बॉर्डर पर्सनल मिटिंग पॉईंट”वर  कोअर कमांडर स्तरीय बैठक सुरु झाली. सामान्यतः अशा मिटिंग्जमधे कर्नल (कमांडिंग ऑफिसर),ब्रिगेडियर (ब्रिगेड कमांडर) जातात. २०१८मधे डोकलाम विवादाच्या वेळी पहिल्यांदा मेजर जनरल रँकच्या सेनाधिकाऱ्यानी वार्तालापात भाग घेतला होता. लडाखमधील “फायर अँड फ्यूरी” कोअर कमांडर,लेफ्टनन्ट जनरल हरिंदर सिंग हे या वेळी भारताचे  टीम लीडर होते.चीनतर्फे,पीएलएचा दक्षिण झिंगजियांग सैनिक क्षेत्र कमांडर, मेजर जनरल लिऊ लिन यांनी डेलिगेशनच नेतृत्व केल. दोन्ही बाजूचे दुभाषक (ट्रान्सलेटर्स) देखील या बैठकीत सामील होते.

बैठकीत,सीमा प्रश्नाच “लॉन्ग लास्टिंग सोल्युशन” काढण्यासाठी विस्तृत बोलणी झालीत,मात्र या नंतर लगेच “ट्रूप विड्रॉल” होणार नाही,त्याची कालमर्यादा आणि प्रक्रिया निश्चित करण्याकरता अजून बैठकींची आवश्यकता आहे यावर दोन्हीकडील सेनाधिकाऱ्यांच एकमत झाल आहे,प्रचलित राजनीतिक आणि सैनिकी वहिवाटीनुसार सीमेवरील तणाव कमी करण्याचे उपाय अमलात आणले जातील” अस भारता तर्फे सांगण्यात आल.पाश्चात्य वार्ताहारांनुसार,चीन पाकिस्तान घनिष्ठ मैत्री संबंधांच्या अनुषंगानी या बैठकीत; पीओकेतील चायनीज इंटरेस्ट/प्रेझेन्स,सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून सुरू झालेल भारत पाक जलयुद्ध आणि काश्मिरमधील भारतीय धरण बांधणी प्रकल्पांचाही ओझरता उल्लेख झाला.,या बातमीची पुष्ठी मात्र होऊ शकली नाही.या बैठकी आधी ०५ जून,२०ला,भारत चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधे सकारात्मक व्हिडियो कॉन्फरन्स होऊन,या आधी दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार वार्तालापाच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यात येईल अस प्रतिपादन करण्यात आल होत.त्यानुसारच या सहा तास चाललेल्या बैठकीची कारवाई आणि सांगता झाली अस म्हटल्यास ते वावग ठरणार नाही.

सरकारला या बैठकीतील निर्णयांबद्दल  अवगत केल्यानंतर,सेना मुख्यालयातील डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स,परराष्ट्र व इतर अनुबन्धित मंत्रालयांशी पुढील कारवाई करण्याच्या/पाऊल उचलण्यासाठी समन्वय साधतील.लडाखमधून चीनच्या सैन्य माघारीची प्रक्रिया अनेक दिवस चालणार आहे याची जाणीव,भारत व चीनला आहे. हे होत असतांना जमिनीवर तैनात दोन्ही देशांच्या सेनांनी संयम बाळगणं जरुरी आहे यावरही दोघांच एकमत झाल.लडाखमधील चीनच्या एप्रिल,२०मधील तैनातीच पृथ:करण करून त्यांनी कुठपर्यंत माघार घ्यायची आणि भारतीय पेट्रोल्स कुठपर्यंत येतील याची माहिती, या पुढे होणाऱ्या वार्तालापांमधे भारतीय सेना पीएलएला देईल. सैन्य माघारीच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी या पुढील “पॉईंट बाय पॉईंट डायलॉग्ज”; बटालियन/ब्रिगेड कमांडर्स स्तरावर करण्यालाही  दोघांनी मान्यता दिली.याच्या अन्वयार्थानुसार,सीमेवर एप्रिल,२०२०ची परिस्थिती निर्माण होण्यासाठी बराच/अनिश्चित काळ लागू शकतो.१० जून,२०-ला ही सर्व प्रक्रिया सुरु झाली आणि दोन्ही देशांनी दोन ते अडीच किलोमीटर्स मागे हटण्याला संमती दिली.

१५/१६ जूनच्या रात्री,गलवान क्षेत्रात, नदीच्या उत्तरी किनाऱ्यावरून चीनी सैनिक परत जात असतांना,त्या क्षेत्रातील भारतीय भूभागावर तैनात बिहार रेजिमेंटची एक बटालियन त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. बटालियनचे  कमांडिंग ऑफिसर आपल्या जेसीओ आणि रेडियो ऑपरेटरसह (सीओज पार्टी) चीनी माघारीची देखरेख करत असतांना,परत जाणाऱ्या एक दोन माथेफिरू चीनी सैनिकांनी  या पार्टीवर लोखंडी सळाखींनी जीवघेणा हल्ला केला. हल्ला इतका जलद व जबरदस्त होता की हे तीघेही गंभीर जखमी होऊन नदीच्या पात्रात पडले.सीओ पार्टी बरोबरच्या उर्वरित सैनिकांनी चवताळून,माघार घेणाऱ्या संपूर्ण चीनी सैनिकांना बदडून काढल. त्यांचा राग इतका तीव्र/भयंकर होता की यात पाच सहा चीनी सैनिक  मृत्युमुखी पडलेत. ही धुमश्चक्री/हातापाई पहाटे पर्यंत सुरु होती. त्या नंतर दोन्ही बाजूंना वेगानी चक्र फिरलीत;झटापटीचे,जीव हानी/जखमींचे रिपोर्ट्स सर्वदूर दिल्या गेलेत;ब्रिगेड/डिव्हिजन/कोअर स्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकी सुरु झाल्यात आणि सेना मुख्यालय,  संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयांपर्यंत माहिती दिल्या गेली.दोन्ही देशांच्या मुत्सद्द्यांनी संयम पाळण्याच आवाहन केल. भारताच्या संरक्षण  मंत्र्यांनी,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सीडीएस आणि तिन्ही सेना प्रमुखांशी सल्ला मसलत करुन पुढील कारवाईची व्युव्ह रचना केली आणि पंतप्रधानांना त्याबद्दल अवगत करवल. आधी जी  एकदम युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती ती १६ तारखेच्या संध्याकाळ पर्यंत निवळण सुरु झाल. मात्र या संबंधात.विरोधी पक्ष आणि  चलचित्र वाहिन्यांची भूमिका आगीत तेल ओतण्यागत होती. झालेल्या घटनेची कारणमिमांसा न करता बदला घेण/जशास तसे उत्तर/५६ इंच छाती/इंटका जबाब पत्थरसे/सरकारनी राजीनामा द्यावा/सरकारच्या गमजा पाकिस्तान समोर/सरकार चीन समोर शेपूट घालत/आरपारकी लढाई/एकदाचा काय तो निकाल लावा/खून का बदला खून अशा मुक्ताफळांनी तथाकथित संरक्षणतज्ञ/परराष्ट्र विश्लेषक/टीकाकार आणि अँकर्सचा धुमाकूळ सुरु होता.

१९६२ मधे;परमवीर चक्र विजेते,मेजर शैतान सिंग (रेझान्गला हिरो),मेजर धनसिंग थापा (सीरिजप हिरो) आणि ३२६८ सैनिकांनी लडाख चीनच्या हाती जाऊ नये या साठी लढत प्राणार्पण केल होत.”आकलन भिन्नता किंवा डिफरिंग पर्सेप्शन” या गोंडस नावाखाली,येथील भूमीचा अंशही चीनच्या पदरी पडू देणे,त्या परमोच्च सैनिकी शौर्याचा अनादर करण्यागत आहे.हे/अस होऊ नये म्हणून, निम्नलिखीत बाबींवर त्वरेनी अमल करण ही भारताची अपरिहार्यता असेल/आहे.

एक) संरक्षण मंत्रालयातील ऑफिस प्रोसिजर्सची आणि/किंवा होणाऱ्या/लागणाऱ्या खर्चाची पर्वा न करता लवकरात लवकर एलएसीवर,शेवटल्या सैनिकाशी संपर्क करू शकणारी आयएसआर प्रणाली,सुरक्षित उपग्रह दळणवळण प्रणाली आणि सुयोग्य डिजिटल लिंक्स लावणे/स्थापन करणे.

दोन) संरक्षण/नागरी  क्षेत्रातील सर्व (मल्टिफेरस) उद्योग/एजन्सींची मदत घेऊन, सीमेवर त्वरित संसाधन उभारणी करणे.

तीन)  लडाखमधे तीन ठिकाणी घूसखोरी करून चीननी तात्पुरत डावपेचात्मक/सामरिक वर्चस्व हासील करून वाटाघाटींमधे शिरजोरी केली. या पुढे अशा प्रकारची अडवणूक करून सामरिक फायदा घेऊन भारताला कोंडीत  पकडू नये या  उद्देशानी चीनकडे, सीमेवरील  “अन डिमार्केटेड एलएसी”च्या त्वरित आखणीचा आग्रह करणे.

चार) अशा प्रकारची/ही सीमा रेषा निश्चित झाल्यावर जमिनीवरील खुणांच्या संदर्भीय अनुपातानी नकाशांवर मार्क करून,अशा हस्तक्षरीत नकाशांच हस्तांतरण करणे.

पाच) सीमेवरील सैनिक/पोस्ट्स/कंपनीज/बटालियन्स/ब्रिगेड/डिव्हिजनला एकमेकांच्या संपर्कात ठेवण्यासाठी सेनेला आवश्यक असणाऱ्या “नेट सेंट्रिक ऑपरेशनल कॅपॅबिलिटीज” आणि “मॉडर्न डिजिटल नेटवर्क” यांची उभारणी/स्थापना लवकरात लवकर करणे.

सहा) या दोन्हीं बरोबरच सेनेला,“बॅटलफिल्ड मॅनेजमेंट सिस्टीम” देण्याची ही नितांत आवश्यकता आहे.या प्रकल्पाच्या प्रोटोटाइप निर्मितीची पायाभरणी,टाटा पावर (स्ट्रॅटेजिक इंजिनियरिंग डिव्हिजन)/लार्सन अँड टूर्बो  आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स/ रोलटा इंडियाच्या समन्वयानी झाली होती.मात्र एकाएकी याला खीळ बसली. सरकारनी मंजूर केलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प,संरक्षण मंत्रालयानी २०१७मधे थंड्या बस्त्यात का टाकला याची कारण अगम्य आहेत.मात्र सेनेला आगामी काळात नक्कीच, अशा/या प्रकल्पांची उणीव प्रकर्षानी भासेल. चीनी सैनिकांनी या वेळी देखील लडाखमधे भारताला नकळत मोठ्या संख्येत घूसखोरी केली.पण उशीरा माहिती मिल्ने आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे,भारतीय प्रत्युत्तराला बारा दिवस लागलेत.

सात) लडाखमधील एलएसीजवळ संसाधनीय बांधणी करण आणि गलवान नदीच खोर, पॅनगॉन्ग सरोवर, फिंगर ३ व ४ यांना जोडणाऱ्या फिडर रोड्सची निर्मिती ही काळाची गरज आहे. चीन त्यांच्या बाजूला संसाधन विकास करत्तो आहे पण भारतानी अस केल्यास  तो आक्षेप घेतो. भारत चीन सीमेवर सर्वीकडे हीच परिस्थिती आहे.आगामी काळात,योग्य वेळ येताच योग्य ठिकाणी कारवाई करण्यासाठी चीन, भारताच्या सर्व पेट्रोल मुव्हमेंट्स आणि संसाधन निर्मितीवर,अत्याधुनिक आयएसआर सिस्टीमच्या माध्यमातून नजर ठेवतो.भारताकडे याची वानवा असल्यामूळे आणि देशाची आर्थिक परिस्स्थिती पहाता ती लवकर पूर्ण होण्याच्या संभावना कमी असल्यामूळे,आता चीनला काही गोष्टी स्पष्ट करण्याची वेळ आली आहे.

आठ)  जर चीन सीमेवरून परत गेला नाही/जाण्यास अनाकनीय वेळ लावत असेल  तर त्याला; “आता बस्स झाल. आता स्वतःला आवर घाला. आमच्या सैनिकांना माराल/जखमी कराल,आमच्या भूमीवर पाय ठेवाल तर त्याची किंमत चुकवावी लागेल. तुम्हाला सैनिकी उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत,तेवढी आमच्यात ताकद आहे. पण त्याच बरोबर तुमच्यावर आर्थिक आणि व्यापारी धक्का देण्याच/हानी पोचवण्याचं सामर्थ्यही आमच्यात आहे.आणि ते तुमच्यासाठी अतिशय क्लेशकारक असेल/ठरेल. भारतातील १३५ कोटी लोकांची बाजरपेठ,चीनी कम्युनिस्ट पार्टीसाठी कायमची बंद करण्याची क्षमता आमच्यात आहे. जगातील २२२ देश तुमची जागा घेण्यासाठी सज्ज बसले आहेत” हे सांगण आवश्यक असेल/भाग पडेल.  

लडाखमधील ताज्या चीनी घूसखोरीमुळे भारतानी सामरिक दृष्ट्या,वेळ सोडता काहीच गमावले नाही.उलटपक्षी आता कमावण्याची वेळ आली आहे.चीन आपल्या सीमेच्या आत आला आहे खरा पण वेळ येताच तो नेहमी प्रमाणेच परतही जाईल. ही त्याच्या मनोवैज्ञानिक युद्धातील “प्रेशर टॅक्टिकस” आहे.उलटपक्षी या संधीचा फायदा घेत भारतानी,”डिलिनीलेशन ऑफ एलएसी/जमिनीवर व कागदोपत्री सीमेची आखणी”  करण्यासाठी चीनवर राजनितीक व आर्थिक दबाव आणला पाहिजे.आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन एकटा पडतो/पडला आहे. रसरशीत लोखंडावर घण मारायची आणि “दिखती हुई हार को जीतमें बदलनेका हौसला रखनेवालेको बाजीगर कहते है” या उक्तीनुसार पाऊल उचलण्याची हीच वेळ आहे. २५०० वर्षांपूर्वी चीनी सामरिक तज्ञ,सन त्झू  याच “फॉर टू विन वन हंड्रेड व्हीक्ट्रीज इन वन हंड्रेड बॅटल्स इज नॉट द ऍक्मे ऑफ स्किल. टू सबड्यू द एनिमी विदाउट फायरिंग ए शॉट इज  ऍक्मे ऑफ स्किल” ह्या वचनाला चीनवर ऊलटवण्याचा प्रण भारत/भारतीय सेना/भारतीय संरक्षणदलांनी उचलण क्रम प्राप्त आहे. (फोटो न्यूज भारती साभार )

कर्नल अभय पटवर्धन ( निवृत्त )

लेखक हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत, ऑपरेशन मिशन कारगील सारख्या अनेक महत्वाच्या मिशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. संरक्षण विषयात लिखाण आणि व्याख्यान, रेफरन्स बुक ऑन डिझायस्टर मनजमेंट, आपत्ति व्यवस्थापन, चीर विजयी भारतीय स्थल सेना, भारतीय परमवीर, सुवर्ण मदिरातील झंझावात, ऑपरेशन ब्लु स्टार, कारागील युद्ध आणि १९६५ चे भारत पाक युद्ध अशा पुस्तकांचे लेखन. मराठी, हिन्दी, इग्रजी वृत्तपत्रातून, मासिकातून ८०० चे वर लेख प्रसिद्ध आहेत. ईमेल - abmup54@gmail.com. मो.बा. ९४२२१४९८७६

Comments (0)
Add Comment