महिलांमध्ये असलेल्या समस्या आणि त्यांचे निवारण.!
महिला ही जगातील सर्वात उंच शिखर आहे. ती कलागुणांची खाण आहे, सारं विश्व तिच्यात सामावलेले आहे म्हणूनच तिच्या चरणी नतमस्तक होताना बघायला मिळत असते. ही तिच्यात असलेली खरी श्रेष्ठता आहे म्हणून होऊन गेलेल्या नारीशक्ती विषयी सदैव आदर वाटतो. तसेच या समाजात ज्या काही नारीशक्ती समाजासाठी नि:स्वार्थ भावनेने मोलाचे योगदान देताना दिसतात त्यांच्याविषयी सुद्धा अभिमान वाटतो. आणि कायमच वाटत राहील पण, आजही या समाजात राहणाऱ्या अशा काही महिला आहेत की, त्यांच्या अनेक समस्या, अडचणी, वेदना आणि दु:खांनी त्या भरलेल्या दिसून येत आहेत . पण, त्यांच्या समस्यांचे निवारण करणारे मात्र बोटावर मोजण्याएवढेच दिसत आहेत. काही महिलांच्या विषयी बोलताना माणुसकीची जाणीव नसल्यासारखे बोलतात तेव्हा , मात्र नेमकं माणूस तरी कोणाला म्हणावे हा एक भारी मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो.
जसे की, महिला जातीला मासिक पाळी म्हणून लाभलेली विशेष देण आहे या देणच्या विषयी खरंच सर्वांना आदर आहे का..? जर त्या दिवसात त्या महिलेविषयी आदर दिसले असते तर तिला विटाळलेली म्हणून हिनावून बोलले गेले नसते किंवा तिच्यासोबत भेदभाव होताना बघायला मिळाले नसते.ह्या तीन दिवसात तिच्यासोबत ज्या प्रकारची वागणूक काही भागात राहणाऱ्या लोकांमध्ये दिसून येते त्यावेळी मात्र माणसातील, माणुसकी पूर्णपणे संपलेली दिसून येत असते. त्यावेळी नेमकं माणूस तरी कोणाला म्हणावे…? नंतर चवथ्या दिवसापासून मात्र तिच्यासोबत आपुलकीची भावना ठेवून दिखावूपणाची वागणूक दाखवताना दिसतात त्यावेळी मात्र विचार करायला लावणारे प्रश्न डोळ्यासमोर येऊन उभे राहतात. मासिक पाळीच्या दिवसात काही महिलांना, मुलींना एवढा त्रास सहन करावा लागतो की,त्यांना होणाऱ्या वेदना बघवत नाही अशा वेळी सर्वात जास्त उपाय असेल तो म्हणजेच घरातील सदस्यांकडून मिळणारे आपुलकीचे दोन शब्द व खऱ्या अर्थाने असलेली तीच साथ असते अशा प्रकारच्या आधाराने त्या महिलेवर किंवा मुलींवर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार होऊ शकतो व तिला होणाऱ्या वेदनांचे योग्य पद्धतीने निवारण होऊ शकते. पण,कोण सांगे कोणाला आजकाल महिलाच महिलेची वैरीण बनून पाठीमागे उभी राहताना दिसत आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
त्याच प्रमाणे आजकाल अनेक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींसाठी सुद्धा उपक्रम राबविले जाते जनजागृती केली जाते, त्याचे मनोबल वाढविले जाते असे उपक्रम योग्य आहेत आणि त्यात बहुसंख्येने किशोरवयीन मुलींनी सहभागी होणे काळाची गरज आहे कारण त्या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक समस्यांचे निवारण फुकटात होत असतात. आणि अनेक समस्या सुध्दा सुटू शकतात असेच जर झाले तर किशोरवयीन मुलींना सुद्धा मासिक पाळी विषयी संपूर्ण माहिती मिळेल सोबतच त्या जागृत सुद्धा होतील व समाजातील इतर महिलांना या विषयी बिनधास्तपणे सांगून समाज जागृती करतील त्यासाठी त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. सोबतच याच समाजात राहणाऱ्या अशा काही महिला आहेत की, त्या होऊन गेलेल्या महाविभूतींच्या तसेच भारत मातेच्या लेकी आहेत. आजही त्यांचे संसार उघड्यावर थाटलेले दिसून येतात आजकाल त्या भटक्या जमातीकडे बघून व त्यांच्या राहणीमानाकडे बघून पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जातात हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. परिस्थितीमुळे भलेही त्या दृष्टीत पडत नसतील तरी त्यांच्याही अनेक समस्या असतात पण,त्या समस्यांचे निवारण होत नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्यांचा विकास होत नाही. म्हणून परिस्थिती बघून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये तर त्यांच्यात असलेल्या समस्यांचे निवारण कशाप्रकारे केले जाईल याविषयावर भर देऊन जनजागृती करणे आवश्यक आहे .कारण त्यांना सुद्धा इतर मुलीं प्रमाणे शिक्षण घेण्याचा तसेच आकाशी झेप घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तो, अधिकार त्यांना मिळणे आवश्यक आहे. महिला ही, जगातील सर्वात उंच शिखर असतांना सुद्धा कुठेतरी स्वतःला कमी लेखत असल्यामुळे तिचा गैरफायदा सुद्धा घेतला जातो म्हणून महिलांनी सर्व प्रथम जागे होणे काळाची गरज आहे. आजही काही महिलांच्या अशा विचारसरणीमुळे इतरांना संधी मिळत असते आणि नंतर नको ते व्हायचे झालेले बघायला मिळत असते.
व त्याचे होणारे परिणाम महिलांना भोगावे लागते अशी वेळ आपल्यावर येणार नाही याची काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजेच सर्वात प्रथम महिलांनी व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अनेक समस्या सुटू शकतील व जगण्याला नवी दिशा मिळेल कारण महिलांचे जीवन जेवढे चांगले आहे त्यापेक्षा खडतर सुद्धा तेवढेच आहे, त्या खडतर जीवनातून कशाप्रकारे बाहेर पडता येईल यासाठी महिलांना स्वतः मध्ये हिंमत ठेवून पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा व होऊन गेलेल्या त्या नारीशक्तींना तसेच होऊन गेलेल्या महापुरूषांचे विचार आत्मसात करुन जगण्याचा प्रयत्न करावा. महिला ही कशातच कमी नसते आणि कमी राहणार नाही म्हणून स्वतः मध्ये एकदा शोधून बघावा त्यामुळे समस्यांचे निवारण तर होईलच सोबतच अनेकांना त्यातून जगण्याला दिशा मिळेल. त्यासाठी महिलांनी, महिलांसाठी एक पाऊल पुढे टाकून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पुढाकार घ्यावा आजच्या घडिला अत्यंत काळाची गरज आहे.
सौ.संगीता संतोष ठलाल.
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
७८२१८१६४८५