श्री.मनोज जरांगे यांचे युध्दभुमीतून पलायन !
मराठा आरक्षणासाठी श्री.मनोज जरांगे यांचे निघालेले जहाज कधी मुस्लिम आरक्षण तर कधी याला गाडतो तर कधी त्याला गाडतो,कधी फडणविसांची आईबहीण तर कधी निवडणुका लढवितो .हा सर्व तमाशा पाहता जहाज किती भरकटले हे महाराष्ट्र बघत असतांनाच त्यांचे निवडणुकीच्या युध्दभूमीतून पलायन याबाबत मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. ज्याप्रमाणे आदरणीय अण्णा हजारेंनी आंदोलन उभे केले.अख्ख्या भारताने ते डोक्यावर घेतले.प्रत्येक जण “मी अण्णा “ म्हणू लागले. मिळालेले यश पाहून आंदोलकांच्या डोक्यात हवा गेली आणि काळाच्या ओघात अण्णा गडपही झाले.तेच जरांगेंच्या बाबतीत घडतांना दिसतंय.जरांगेंनी वेळीच सावध व्हायला हवे होते.त्यांचा अण्णा होणार हे माझे विनम्र मत एका लेखातुन मांडले होते. जरांगे भाऊ लक्षात ठेवा ! लवकर वाढणारे झाड लवकर मरत असते.
श्री.मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलन सुरु केले.मराठा समाजाने त्यांना पाठिंबाही दिला.हा लढा वाढता वाढता शून्यमंडल भेदण्याइतपत गेला.कोणत्याही राजकीय पक्षाची विरोध करण्याची हिंमत नव्हती. त्यामुळे
आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला.सरकारही घाबरुन त्यांच्या दारात जाऊन त्यांच्याशी चर्चा करू लागले. त्यांच्या मुळ मागणीला महाराष्ट्रातील सर्वांनी समर्थनही दिले.जनसमर्थनाचा आलेखही उंचावू लागला.सर्व पक्ष , सर्व जाती आणि धर्म त्यांना अंतर्मनाने असो किंवा बहिर्भावाने असो पण समर्थन देवू लागले.सभा इतक्या प्रचंड झाल्या की यापूर्वी झालेल्या सर्व सभांचे रेकॉर्ड मोडल्या गेले.सामाजिक मानसशास्त्रानुसार कुणी चित्रपट काढायला लागले, कुणी मेणाचे पुतळे करू लागले.क्रेनच्या साह्याने प्रचंड हार तुरे,जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव थोडक्यात काय तर लोकांचे नितांत प्रेम मिळू लागले. हीच जवाबदारीने वागण्याची वेळ होती.चित्त स्थिर आणि विवेकाची अत्यंत गरज होती पण दुर्दैव !
जसा जसा समर्थनाचा प्रवाह वाढू लागला तशी तशी श्री.जरांगेंच्या डोक्यात हवा जावू लागली.आंदोलन संपविण्यापेक्षा ते चिघळत ठेवण्याची त्यांची मानसिकता महाराष्ट्राला कळू लागली. ही हवा इतकी गेली की जणू आपणच महाराष्ट्राचे धुरकरी आहोत.याला संपवीन,त्याला उध्वस्त करीन,दाखवतो एकेकाला,गाठ माझ्याशी आहे.अर्वाच्य शिव्या,अनर्गल भाषा त्यांच्या तोंडुन येवू लागली.आणि इथेच मार्ग भरकटला.
सरकारने पुर्ण सकारात्मक होऊन अगदी गठित समितीत असलेले निवृत्त न्यायाधीश प्रघात मोडून श्री.जरांगे यांच्याकडे भेटीसाठी गेले.सर ,साहेब करत त्यांनी श्री.जरांगेना आरक्षणाबाबत अवगत केले.त्यातील कायदेशीर बाबी आणि अडचणी सांगितल्या पण भेटणाऱ्या शिष्टमंडळाला घरगडी असल्यागत वात्रट बोलणे ,हाडतुड करणे महाराष्ट्राला पटत नव्हते.
बर ! सरकारने एक मागणी पुर्ण केली की यांनी त्याला अधिकचे शेपूट लावून पुन्हा नवी मागणी पुढे करायची.
ही सर्व कापूसकोंड्याची गोष्ट कुणीतरी घडवून आणत असल्याचा वास येत असल्याचे सर्वांचे मत झाले होते ते आता सत्यात उतरले. सरकार एकेक मागण्या मान्य करीत असले तरी आंदोलन चालूच ठेवण्याचा त्यांना कुणीतरी सल्ला देत आहे हे स्पष्ट वाटत होते.कारण मुंबई कडे आंदोलन कुच करीत असतांना दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी येवून मागण्या मान्य केल्या.फटाके फुटले ,पेढे वाटले आणि सर्व महाराष्ट्राने मोकळा श्वास घेतला.आता प्रश्न मिटला वाटत असतांना पुन्हा आंदोलन सुरु.म्हणून वाटते कुणीतरी बोलाविता धनी वेगळाच होता. यापुर्वी मराठा क्रांती मोर्च्याचे एव्हढे प्रचंड मोर्चे झालेत पण शिस्तबद्ध.पण जरांगेंच्या मोर्चाने जाळपोळ,तोडफोड,गावबंदी यामुळे जनमत विरुध्द गेले. शासन तर मोठ्या ताकदीने कामाला लागले होते.कुणबी नोंदी बाबत दिवसरात्र सरकार काम करत होते.प्रश्न सुटतो आता अशी स्थिती निर्माण झाली असतांनाच सगेसोयऱ्याचा मुद्दा पुन्हा चिघळवून आंदोलन चिघळत ठेवले. लोकसभेच्या निवडणुका लागल्या.आम्ही आमचे उमेदवार उभे करणार असल्याचे सुरुवातीला घोषित केले. मग म्हणाले आम्ही पाडापाडी करणार खरं सांगायच तर आंदोलन वेगळी बाब अन् निवडणूक वेगळी बाब. मराठवाड्यात काहीसा म्हणजे एकदोन जागेवर परिणाम झाला असेल कदाचित पण लोकसभा निवडणुकीवर जरांगेंचे लक्षणीय अस काही दिसले नाही. मग त्यांनी पुन्हा उपोषण धरले अन् उपोषण सोडले .उपोषण धरणे आणि सोडणे यामुळे ते उपोषणवीर ठरु लागले. नंतर तर त्यांच्या डोक्यात अति हवा गेल्याचे स्पष्ट होते.पुढे तर त्यांनी सरसकट मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या.ही मागणी म्हणजे आगावूपणा वाटतो.हा आगावूपणा कुणाच्या तरी सांगण्याने करताहेत हे ठाम मत झाले आहे.मुस्लिम आरक्षणासाठी त्यांचा “बघतोच कसा देत नाही “ चा एल्गार म्हणजे डोक्यातली हवा उतरण्याची वेळ आलेली झाली होती.मुस्लिम नेत्यांसोबत बैठका, जवळीक वाढणे या त्यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीने फार मोठा समाज दूर गेला. बर ! महाराष्ट्रात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला फडणवीसच जवाबदारचा हास्यास्पद तर्क .काहीही झालं तरी देवेंद्र फडणविसांना शेलक्या आणि शिवराळ भाषेत बोलणे . आरे कारेची भाषा,पाडतोच त्याला,सरकार उलथवतो हे म्हणजे “ बेंडकीने बैल“ झाल्याचा गोड गैरसमज बाळगणे होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागल्या की श्री.जरांगे यांनी वल्गना केली की २८८ जागा लढविणार.सरकार गाडणार. दसरा मेळाव्यात मात्र याबद्दल शब्दही नाही.जरांगे साहेब ! निवडणुका पोरखेळ नाही.” बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता ……फाटे.”
आता सरकारने ठरवले पाहिजे.मराठा आरक्षण नक्की द्या पण अशी जरांगे नावाची अव्यवस्थित चित्ताच्ची माणसे जरा बाजुला ठेवली पाहिजे. आता पर्यंत खुप संयम पाळला आता निवडणुका लागल्यावर सर्वच राजकीय पक्षांनी उघड नाही पण त्यांचे आव्हान स्विकारलेले दिसले. पाडा म्हणा कुणकुणाला पाडता.निवडणुकात कुणाचीच मक्तेदारी नसते,दादागिरी तर अजिबात नसते . जनता जनार्दन आहे कुण्या एकाची हिटलरशाही चालत नसते. आता हे आंदोलन भरकटले हे सर्वच राजकीय पक्षांना कळले .जरांगे यांचा उद्देश मराठा आरक्षण मुद्दा संपुष्टात आणणे राहिला नसुन सरकार विरोधात वल्गना करणे,सरकार पक्षाचे उमेदवार पाडणे आणि त्यांचे बोलविते धनी निवडून आणणे हा उद्देश होता.पण त्यांनीही यांना सोडले.ना घरचे न घाटावरचे अशी स्थिती त्यांनी ओढवून घेतली. लक्षात ठेवा “ तरोट्याच “ रोपटे वेगाने वाढते अन् तितक्याच वेगाने संपतेही. या आंदोलनापेक्षाही श्री.अण्णा हजारेंचे आंदोलन देशानी डोक्यावर घेतले होते.संसदेत अण्णांच्या मागण्यावर चर्चा झाली .सरकार असेच सकारात्मक होते तरीही त्यांच्या आंदोलनस्थळी गेल्यावर लोकप्रतिनिधींना हाकलने,पिटाळणे.जणू हा देश अण्णा म्हणतील तसाच चालेल हा उन्माद निर्माण झाला होता.एव्हढे प्रचंड आंदोलन अहंकार आणि आरेरावीमुळे भस्मसात झाले.आज अण्णांची स्थिती जग पाहते आहे. श्री.मनोज जरांगेची अवस्था त्याहून वेगळी नाही.त्यांच्या बोलण्यातला उन्माद,आईबहिणीवरून शिव्या, जातीविशेष असलेल्या नेत्यांना वात्रट भाषेत बोलणे ,मागण्यावर मागण्या लांबवत जाणे आणि आता तर सरसकट मुस्लिमांना ओबीसी मध्ये घ्या, मी म्हणेन ती पूर्वदिशा.माझ्या मनासारखे केले नाही तर संपवतो.पण एक दिवस भ्रमाचा भोपळा फुटला. आपल्याला सरकार योग्य तो मानसन्मान देत होते.आपल्या संवैधानिक सर्व मागण्या मान्य केल्या.हत्ती गेला पण शेपटासाठी उगाच तुमचे वेठीस धरणे सुरु होते.
स्वतःचा मान जपला पाहिजे होता. राजकिय नुकसान टाळावे म्हणून सर्वजण आपल्याकडे झुकत होते.शेवटी ते ही माणसेच आहेत.एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते अपमान सहन करतील पण स्वाभिमान गहाण ठेऊन कुणीच सहन करणार नाही.हार जित असतेच राजकारणात.काय होईल जास्तीत जास्त ? सरकार पुन्हा येणार नाही.पण ज्यांच्यासाठी आपण धडपडत आहात ते विरोधी पक्ष समजा चुकून सत्तेत आले ते सुद्धा हेच करतील कारण असंवैधानिक मागण्या कुणीच पुर्ण करू शकणार नाहीत.
आपल्या विधायक मागणीला कुणाचाच विरोध नाही.पण अतिसमर्थनामुळे आपल्याला ग ची बाधा झाली असून तुटेल इतकं ताणलय आपण.मागणी मराठा आंदोलनाची आहे त्यावर लक्ष केंद्रित असू द्या.मुस्लिम किंवा इतरांमध्ये नंतर लक्ष घाला.कुठे थांबायच हे ज्या नेत्याला समजत नाही ते लोकनिंदेस पात्र ठरतात.भारतीय मतदार सुज्ञ आहे हे लोकसभेच्या निवडणुकातून कळले आहेच.मतदारांनी पाशवी बहुमत कुणालाच दिले नाही. आता तर निवडणुकीचा दिवस उजाडला .२८८ जागा लढतो म्हणणारे तुम्ही युद्धभूमीतून पलायन केले.
प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५