माझं गावच मंदिर शोभलं – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
भारत ही अध्यात्मिक भूमी आहे. ही देवभूमी आहे. संतांची भूमी आहे. ही वीरभूमी आहे. ही क्रांतीकारकांची भूमी आहे. अशा या पवित्र भूमीत राष्ट्रसंत सुद्धा आहेत. आधुनिक काळातील विश्व बंधुत्वाचा संदेश देणारे महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
ग्रामोन्नती आणि ग्रामविकास हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू. म्हणूनच त्यांची “ग्रामगीता” हे महान काव्य आज पथदर्शक ठरती आहे. संत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्याचं मूळ नाव माणिक बंडूजी इंगळे. श्री अडकोजी महाराज हे त्यांचे अध्यात्मिक गुरु. अगदी बालपणापासूनच त्यांना काव्य लेखनाची आवड होती. अशातच सद्गुरूंचा सहवास त्यांना लाभला. “गुरूचे चिंतन नित्य चिरंतन । त्यांतचि तन्मय मन हे”| तसेच, “रमलें मन श्रीगुरुचरणी । मज नेऊं नका येथोनी हो” असं काव्य म्हणूनच त्यांना स्फुरलं.
त्यांची लेखणी बहरत गेली. “मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे” अशी आपल्या आराध्याला, सद्गुरुना आळवणी करणारे माणिक “कशी जाईन मी रे घरी, आवरी अपुली बासरी” असं नटखट काव्य सुद्धा करू लागले. अशा सर्वांगानी बहरलेल्या प्रतिभेला सद्गुरुनी “तुकड्या” असं नाव दिलं आणि “माणिक”चे ते “तुकडोजी” झालेत. . ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. पुढे “तुकड्यादास” या नावाने ते लेखन करू लागले. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहे.
त्या काळच्या परिस्थिती बरहुकूम, हळूहळू ते समाजकारणा कडे वळू लागले. भारताच्या पराधीनतेचे दु:ख राष्ट्रसंतांना बोचत होते. राष्ट्रकार्या करिता त्यांनी आपल जीवन समर्पित केलं. स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्याचं योगदान हे अवर्णनीय आहे. भारत छोडो आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. जनमानसात जावून त्यांच्या बोलीत, काव्य, भजन, कीर्तन यांच्या माध्यमातून, आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी तयार केली. जनसामान्यांच्या मनात देशप्रेम जागृत करून इंग्रजाविरूद्ध बंड पुकारले. त्यांच्या वाणीत परिवर्तनाची ताकद होती. इंग्रजांविरुद्धचा असंतोष सत्याग्रह रुपाने चळवळीद्वारे, उपोषणाद्वारे आणि क्रांतीद्वारे अशा विविध आंदोलनांनी व्यक्त होत होता. सर्व धर्माचे लोक, जातिपंथांचे लोक, आपसातील मतभेद विसरून एक झाले होते. “पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, झाड झडूले शस्त्र बनेगे, भक्त बनेंगी सेना” या सारख्या गीतांमधून स्वातंत्र्याची ज्योत त्यांनी तेवती ठेवली. इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवून समाजाला जागे करणे हे त्यांचे ध्येय. “उठो जवानो करके बताओ, कहने के दिन गये| हे स्वातंत्र्य समर गीत खूप गाजले. १९४२मध्ये चिमूर तीन दिवसांसाठी पहिल्यांदा स्वतंत्र झाले होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते. चिमूरची ही ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्यलढ्याचा देदिप्यमान इतिहासाची साक्ष देते. “आते है नाथ हमारे” हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना उद्देशून म्हटलेलं गीत.
युवकांप्रमाणेच महाराजांनी, साधुसंताना संघटीत करून स्वातंत्र्य संग्रामात सहभागी करून घेतले.
स्वातंत्र्य प्राप्ती नंतर स्वत: राजकारणापासून दूर राहून तुकडोजी महाराजांनी अनेक समस्या सोडविण्यात राज्यकर्त्यांना मदत केली. गांधीजींच्या स्वप्नातील भारताची संकल्पना जनसाम्यान्यात रुजविण्यासाठी त्यांनी कृतीशील कार्य केले.
प्रत्येक गाव हे सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, उद्योग संपन्न व्हावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. अंधश्रद्धा, देवभोळेपणा दूर व्हावा यासाठी त्यांनी जनजागृती केली. सामुदायिक प्रार्थना म्हणून त्यांनी लोकांना एकत्र करून गावाच महत्व आणि शेतकऱ्यांचे महत्व हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. “मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे| देव बाजारचा भाजीपाला नाही रे| |असं म्हणत, उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालीत असत.
“खंजिरी” हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक आवडतं वाद्य. गीत, भजन स्वत: लिहून ते कणखर आवाजात गायचे. त्याला स्वत:च खन्जीरीची साथ द्यायची. “खंजिरीवाले महाराज” म्हणूनही ते ख्यात होते. खंजिरी भजन हा प्रकार त्यांनी रुढ केला.
“गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गाव ची भगता, अवदशा येईल देशा|”. स्वच्छतेची शिकवण देऊन बंधुत्वाचा वारसा जोपासणारे तुकडोजी महाराज, ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामोन्नती चा परिपाठ देणारे तुकडोजी महाराज, “या भारतात बंधुभाव नित्य वसु दे” अशी कळकळीची प्रार्थना करतात. आत्म संयमाचा, देशभक्तीचा, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
तुकडोजी महाराजांनी हिंदी मराठी या दोन्ही भाषांमधून विपुल लेखन केलं. त्यांची भजन-कीर्तन आणि लेख हे प्रसिद्ध आहेत. शांती आणि क्रांती चे उपासक असंही त्यांना संबोधले जात. अध्यात्म आणि राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरून असणारे व्यक्तिमत्व म्हणजे तुकडोजी महाराज. सर्वसामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिम्बवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणारा, सर्व धर्माकडे सारखाच नजरेने पहा असं सांगणारा संदेश देणाऱ्या, तुकडोजी महाराजांचे “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” हे गीत आजही कालोचीत ठरणारे आहे. युवकांनी बलवान व्हावे, नीतिमान व बुद्धिमान व्हावे, जीवन देश कारणी लावावे असा त्यांचा आग्रह. “बसला कशाला, आळशी बनायला, चाल पुढ देशाच काम करायला” असं म्हणून तरुणांना प्रोत्साहीत केलं. तरुणांनी आपल्या गावाला समृद्ध करण्यासाठी झटावं असा आशावाद त्यांनी मांडला. गावाच्या विकासातून देश सेवेकरिता तरुण तयार व्हावा असं त्यांना वाटायचं. “आधी देश, मग धर्म” अशी शिकवण त्यांनी दिली.
ग्रामीण विकास हे त्यांचे मुख्य केंद्र होतं. जीवन विकासाचे शिक्षण| गावीच असावे सर्वसंपन्न| आपुल्याची ग्राम रचनेचे आयोजन| शोभवाया शिकवावे| भारत हा खेड्यांचा देश आहे. राष्ट्रीय विकासात, खेड्यांच्या विकासाचा मोलाचा वाटा आहे. “या झोपडीत माझ्या किती वाटतो आनंद”, हा भाव त्यांनी आपल्या काव्यातून जनतेसमोर मांडला.
गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे त्यांच्या आयुष्यातील जसं लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणं ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांची वाङमयीन पूर्तीच होय. ग्रामोद्योग संपन्न व्हावं, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावं, प्रचारकांच्या रूपानं गावाला नेतृत्व मिळावं, अशीही त्यांची निष्ठा होती.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे। हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे| उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे। दे वरचि असा दे|” प्रत्येकाच्या अंतर्मनावर ठसलेली ही प्रार्थना.
एकीकृत ग्रामीण विकासासाठी अनेक कार्यक्रम विकसित केले. तुकडोजी महाराजांची क्रियाशिलता आणि वैचारिकता एवढी प्रभावशाली होती की, त्यावेळेचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ या उपाधीने सन्मानित केले. तुकडोजी महाराज विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते.
आज साठ वर्षानंतरही आपल्या देशाची प्रगती अपेक्षे प्रमाणे झाली नाही हे एक कटू सत्य आहे. खरा भारत खेड्यात राहतो हे एक “वचन” होवून राहीलं आहे. ग्रामीण शेतकऱ्यांची अवस्था मात्र तशीच आहे. म्हणूनच शहराकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढला. खेडी ओस पडू लागलीत. मात्र गेल्या काही वर्षात “शेतकरी, शेतमजूर” यांच्या उन्नतीसाठी उपाययोजना होताना दिसताहेत. नुकतेच पारित झालेले कृषी विधेयक “शेतकरीभिमुख” असल्याचेच दिसते. काही प्रमाणात राजकीय मतभेद सोडता, निश्चितच या विधेयकाच स्वागतच होताना दिसत. त्याची नाळ ही राष्ट्र संतांच्या कल्पनेशी सुसंगत अशीच आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक शेती तंत्र विकसित करणे, गावातच रोजगाराच्या संधी निर्माण करणे, जोड धंद्यासाठी सहयोग, यामुळे निश्चितच ग्रामीण भारताची उन्नती ही होणारच. “ग्रामायण” सारख्या स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्ष कार्य करतात. त्याची फळे आता हळू हळू दिसायला लागली आहेत.
२६ सप्टेंबर १९६५ ला “नेपानगर” येथे केलेल्या आपल्या उद्बोधनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “संकटातून सावधपणा : आपल्यावर झालेले कालचे चीनचे आणि आजचे पाकिस्तानचे ही दोन्ही आक्रमणे आपण वरदानरूप मानली पाहिजेत. तसे झाले नसते तर आपण अत्यत असंघटित आणि गैरसावध राहिलो असतो. या आक्रमणांचा उपयोग आपण आपल्या अंतर्शुद्धीसाठी करून घेत आहोत, यातच आपला जय आहे. आता आपला जवान असावध राहणार नाही. आता आपला शेतकरी आळशी बनून कमी पीक काढणार नाही. आता या देशातले कामगार संप करणार नाहीत. सर्व बाजूंनी हा देश सावध आणि धडपडत राहील. आपल्या गरजा तो आपल्या पुरुषार्थातून, पराक्रमातून, कष्टातून भागवील आणि भारत हे। एक सुखी, समृद्ध आणि पराक्रमी राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहील. माझे भारताबद्दलचे स्वप्न असे आहे.”
आज प्रत्यक्ष युद्ध जरी झालेलं नसलं तरी, युद्धजन्य परिस्थिती मात्र आहे. कोरोना महामारीने सर्वांचे जीवन अस्तव्यस्त करून टाकले आहे. अशावेळी यातून उभारी घेण्यासाठी समृद्ध भारताच्या निर्माण कार्यासाठी राष्ट्रसंताचे वरील विचार अगदी योग्य वाटतात.
जिवाभावानं जव मी पाहिलं । माझं गावच मंदिर शोभलं ।।धृ।। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९४५ साली बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावातील कीर्तनात म्हटलेलं हे गीत. राष्ट्र संतांच्या कल्पनेतल अशी मंदिर गावोगावी व्हावित असा संकल्प म्हणजे ११ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रसंताना वाहिलेली श्रद्धांजली ठरावी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना शत शत नमन.