माझे पक्षी अभयारण्य

लेख क्र. १

माझे पक्षी अभयारण्य..

पक्षी अभयारण्य म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती गर्द हिरवी वनराई, एखादा विस्तीर्ण तलाव अथवा जलाशय, कित्येक किलो मिटर मध्ये पसरलेले क्षेत्रफळ व विविध प्रजातीच्यां पक्ष्यांचे आवाज… पण ‘माझे पक्षी अभयारण्य’, आहे झपाटय़ाने क्रॉंक्रीटच्या जंगलात रूपांतरित झालेल्या अकोला शहरात.

 आजुबाजुला क्रॉंक्रीटचे जंगल बहरत असतांना आमच्या सावंत कुटूंबियांनी निसर्गाशी नाळ तोडली नाही, कारण हि नाळ जुळली होती थेट कोकणातल्या निसर्गरम्य व डोंगरदऱ्यात वसलेल्या तिवरे प्रचितगड गावाशी. आमचे हे गांव तालुका संगमेश्वर, जि. रत्नागिरी मध्ये आहे . अाजोबा अकोल्यात आले व येथलेच झाले, फक्त सणासुदीला गावी जाणे इतकाच संबंध गावाशी उरला आहे. त्यामुळे आमच्या गर्जे पुरते घर बांधुन बाकीच्या प्लॉट मध्ये बगिच्या केला, सर्व सावंत बंधुना झाडांची आवड असल्याने विविध गुलाब, मोगरा यासारखी फुलांची झाडं तसेच कॅक्टस च्या विविध जाती आमच्या अंगणात दिसून येत. आमच्या अंगणात जवळपास ६० वर्षे जुने कडुलिंब, जांभुळ, भेळ व निलगिरीच्या झाडांनी सावलीची आच्छादन केले आहे, सोबतच नंतरच्या काळात लावलेले बदाम, चिकु, आंबा लिंबु व रामफळ हे झाडं पण या सावलीत आपले योगदान देतात. बाकी हंगामी भाजी पाला व फुलांच्या झाडांनी आमचा बगिचा बहरत असतो….
साधारण ११ वर्षांपूर्वी म्हणजे २००८ ते २००९ साली अकोल्यात दुष्काळ पडला होता. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे महान धरण कोरडे पडले होते, लोकं त्यात शेती करीत होते, त्यामुळे अकोला शहरात अभुतपुर्व पाण्याची टंचाई होती. १५ दिवसांनी नळ किंवा टँकर यायचा. अपार्टमेंट मध्ये राहण्याऱ्यांनी तर पाण्याच्या ड्रमला कुलूप लावले होते. त्यात प्रचंड उन्हाळ्या. याच वेळी एकदा भर दुपारी रणरणत्या उन्हात टँकर आला व आम्ही बरीच धावपळ करून सर्व पाणी भरले. अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या, म्हणून थोडा वेळ कडुलिंबाच्या गर्द सावलीत बसलो असतांना मनात विचार आला की, आपल्याला पाण्यासाठी इतकं झगडावं लागते आहे तर पक्ष्यांचे काय होत असेल त्यांना कुठे स्वच्छ पाणी मिळत असेल? या प्रश्नाने मला बचैने केले होते, तेव्हढ्यात अडगळीत पडलेले सुगडे दिसले. संक्रातीला पुजेसाठी आणलेला छोटा माठ, त्याचे वरील कडे तुटले होते पण खालील भाग शाबुत होता. मी ते मडके घेतले व आरी ने वरील अर्धा भाग कापून काढला व त्यात पाणी भरले व अंगणात आमच्या कडे पुर्वी विद्येचे झाड होते ते जळून गेले होतो पण त्याचे खोड शिल्लक होते. मी त्या खोडावर एक फल्टीचा तुकडा खिळ्याने ठोकून पक्का बसविला व त्यावर ते पाण्याने भरलेले मडके ठेवले, व ऑफीस मध्ये काम करीत बसलो. माझ्या घरीच मी माझे डिझाईनचे ऑफीस बनविले होते. दुपारी ३च्या सुमारास पंखांचा उघडझाप करण्याचा आवाज आला. मी लगेच त्या पाण्याच्या मडक्याकडे पाहिले तर शिक्रा पक्षी त्या मडक्यातील पाणी पितांना दिसला. मी लगेच ऑफीसच्या कपाटातील कॅमेरा काढला व त्याचा फोटो काढला. तेव्हा असे लक्षात आले की तो त्या भांड्यातील पाण्यात बसण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने दोन्ही पाय त्या मडक्यात टाकले व आपला पोटाकडील भाग भिजवून घेतला व उडून निलगिरीच्या झाडावर जावून बसला. त्यावेळेस मला खुप आनंद झाला मी लगेच सर्व कामं बाजूला ठेवली व अजून घरात मडके आहे आहे का याचा शोध घ्यायला लागलो. मडके भेटले नाही पण ज्या मध्ये फुलांचा बुके देतात ती छोटी कुंडी मिळाली. ती कुंडी मी साफसूफ करून तगरीच्या झाडावर अडकून ठेवले. या भांड्यावर दुसऱ्या दिवशी कोकीळा पाणी पितांना दिसली. येथुन सुरवात झाली ‘माझ्या पक्षी अभयारण्याची’. एक दोन सतत निरीक्षण करतांना शिक्रा पक्ष्याला पाण्यात पंख भिजवायला पाहीजे हे माझ्या लक्ष्यात आले, म्हणून मी प्लास्टीकचा ट्रे घेतला व तो त्याच विद्येच्या झाडाच्या खोडाखाली जमिनीत गड्डा करून गाडला व त्यात पाणी भरले, मग हे शिक्रा महाशय मस्तपैकी त्यात आपले पंख भिजवून घेत व वरती घरट्यात जावून बसत होता…. पक्षी संवर्धनासाठी घेतलेले हे परिश्रम मनाला व घरच्यांना पण आनंद देणारे होते. दररोज वेगवेगळे स्थानिक पक्षी या पाणवठ्यावर आपली हजेरी लावत होते. आता मी त्या छोट्या भांड्यात सोबत एक नविन पसरट भांडे पण आणून ठेवले होते… या भांड्यावर कोण कोण पक्षी यायचे हे जाणून घेऊया पुढच्या लेखात….
???
प्रतिक्रिया अपेक्षित…. अमोल सावंत

Comments (1)
Add Comment