मीराताई खडक्कार यांच्या कर्तृत्वा साठी.
घरामध्ये पिढीजात संस्काराची, सामाजिक जाणीवेची आणि न्यायाची जोपासना झाली असेल त्या घरातील मुलांमध्ये देखील ते संस्कार खोलवर झिरपत जातात. त्या झिरपण्यांमध्ये स्वाभाविकता आणि सहजता असते .पुढे त्या संस्कारांना परिश्रमाची आणि स्वकर्तुत्वाची जोड लावली तर सुंदरसे आणि आदर्श व्यक्तिमत्वच फुलत जाते. बघण्यासाठी ते एक आदर्श किंवा प्रेरणादायी व्यक्तिमत्व असते .अशा व्यक्तीच्या व्यवहारात अतिशय सहजता असते, साधेपणा असतो असेच एक बहुआयामी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे मीराताई खडक्कार .आजचा शब्द जागर मीराताईंच्या कर्तुत्वासाठी .
मी आणि जयश्री अलकरी आम्ही मीराताईंच्या बाल जगत मध्ये त्यांना भेटायला गेलो .तिथे आमच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या .आम्ही दोघीही वकील क्षेत्रात असल्यामुळे अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून मीराताईंशी परिचय होताच. परंतु भेटीच्या माध्यमातून आधीच प्रेरणादायी वाटणारे व्यक्तिमत्व अधिकच भावत गेले.
मीराताई सांगतात घरातील संस्कारांमुळे मी आयुष्यात पुढे जात गेले. त्यांच्या आई सुमतीबाई सुकळीकर या जनसंघाच्या फार मोठ्या कार्यकर्त्या आणि समाजसेविका होत्या. सुमती बाईंचे सामाजिक जाणीव ,नेतृत्व, न्यायप्रियता हे सर्व गुण निश्चितपणे मीराताईंना मिळाले आहेत.अर्थात त्या मध्ये मीरा ताईंचे स्वकर्तृत्व देखील फार मोठे आहे. त्या म्हणतात ,आम्ही काही वेगळे करतो आहोत तेव्हा असे आम्हाला तेव्हा देखील वाटत नव्हते आजही वाटत नाही .सामाजिक जाणीव याचा संस्कार हा त्यांचा स्वाभाविक संस्कार बनलेला आहे .याबाबत आठवण सांगताना त्या म्हणाल्या की ,संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस बिल्ले विकायला आम्ही लहानपणी ऑफिसेस मध्ये जायचो. हे आपसूकच होत गेले.
मीराताई सांगतात कॉलेजमध्ये असताना त्या द्विधा मनस्थितीत होत्या .जर्नालिझम करायचे करायची की एलएलबी. बीए फायनल ला असताना त्यांचे लग्न झाले. त्यावेळी मीराताई केवळ 19 वर्षांच्या होत्या .मात्र घरातील वातावरण शिक्षणाला अनुकूल होते .शिक्षणासाठी प्रोत्साहन होते .तेंव्हा आयुष्याला उपयोगी पडेल असा विचार करून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरविले. त्या म्हणतात की माझ्या सासरी जावांनी ,सुनांनी लग्नानंतरच आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
नंतर एलएलबी झाल्यावर वकिलीचा व्यवसाय सुरू झाला. दिवसभर कोर्ट ,ऑफिस एकत्रित कुटुंब ,त्यामुळे घरातील कामे…. त्या म्हणतात बाहेरून आले की मी घरात कामाला लागायचे आणि बाहेरून घरी येताना देखील कामे करत करतच घरी यायची घरी यायचे . एकंदरीत काय तर धावपळ सुरू होती.
मीरा ताईंनी वीस वर्षे वकिलीचा व्यवसाय केला. अमरावतीचे के .एच. देशपांडे त्यांचे सीनियर होते. वकिलीच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कोर्टाचे काम अतिशय नेटाने आणि शिस्तशिर केले. दहा ते सव्वाचार या कालावधीत त्या रोज कोर्टात असायच्या. रोज विविध प्रकारच्या केसेस चालवायच्या. त्यावेळी हायकोर्टातील सीनियर वकील प्रोत्साहित करायचे, हे देखील त्या आवर्जून सांगतात. त्यांच्याकडून खूप सहकार्य मिळाले. तसेच काही हायकोर्टाचे जजेस देखील समजावून घ्यायचे आणि प्रोत्साहन द्यायचे. त्यावेळी महिला वकील अतिशय कमी होत्या. घर सांभाळून एखाद्या स्त्रीने हा व्यवसाय करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे .याची जाणीव जजेस ना पण होती .मीराताई सांगतात सणावाराला कोर्टात जायला उशीर झाला तर मीराताईंची केस बाजूला ठेवून जजेस त्या येतील तेव्हा त्यांचे हिअरिंग घ्यायचे. त्या येतीलच असा जजेस ना देखील विश्वास होता.
त्या म्हणतात की व्यवसायाचे सात-आठ वर्षे पूर्ण झाल्यावर मुंबईमधील सिटी सिविल जज बाबत त्यांना विचारणा झाली. मात्र एकत्र कुटुंबात राहत असल्याकारणाने त्यांनी परिवार प्रथम असा विचार करून त्यावेळी सिटी होण्यासाठी नकार दिला.
मात्र जज होणे मीराताईंच्या नशिबातच होते. पुढे मुंबई येथे महाराष्ट्रातील कौटुंबिक न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्या सांगतात तो काळ कठीण होता .पेपरला त्या संदर्भात जाहीरात आली होती . त्यावेळेचे हायकोर्टाचे जज वल्लभदासजी मोहता यांनी मीराताईंना अर्ज देण्याकरता प्रोत्साहित केले .खर तर त्यावेळी मीराताईंची मुलगी बाळांतपणाला आली होती .कर्तुत्वान स्त्रीला नेहमी अष्टभुजाच व्हावे लागते हे अगदी खरे आहे. मीरा ताईंची नियुक्ती बांद्रा येथील फॅमिली कोर्टात झाली. सुरुवातीला चार वर्षे त्या मुंबईला होत्या .पुढे 14 वर्षे, म्हणजे 1996 ते 2014 या कालावधीत त्या नागपूरच्या कौटुंबिक न्यायालया न्यायाधीश होत्या.
कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांचा दृष्टिकोन नेहमी मानवतेचा ,समजावून घेण्याचा ,न्यायप्रिय, आणि सामाजिक जाणीव, याचा राहिलेला आहे. त्या विचार करायच्या की समोरची व्यक्ती पिडीत आहे .त्यामुळे इतरांसारखे त्यांच्याकडे बघायचे नाही .शक्यतोवर कुटुंब वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
त्या म्हणाल्या की, लैंगिक असमर्थ्यतेच्या केसेस जेव्हा त्यांच्यासमोर यायच्या त्यावेळी तज्ज्ञांचा सल्ला त्या मागवायच्या. तसेच त्या संदर्भातील उपचार पीडित व्यक्तीला करायला लावायच्या .कुणी रागीट असेल तर त्यावर मानसशास्त्रीय उपचार समुपदेशन असे प्रयोग केले गेले .त्यामुळे प्रश्नांची उकल सकारात्मक रित्या व्हायची. पक्षकारांना छोटे-मोठे आजार असतील तर वैवाहिक जीवन पुन्हा सुरू व्हायचे. त्यामुळे कमी नुकसान होऊन कमी वेळात मार्ग निघायचा.
मीराताई म्हणतात की ,निवृत्तीनंतर देखील त्यांच्याकडे समुपदेशनासाठी महिला यायच्या. त्यांना मीराताई प्रश्न सोडवतील असा विश्वासच होता.
बऱ्याच केसेस मध्ये नवऱ्याच्या दारूचा प्रश्न असायचा. यावेळी त्या व्यक्तीला रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये मीराताई पाठवायच्या. तसेच व्यसनमुक्तीच्या ऍक्टिव्हिटीज त्यांनी कोर्टात सुरू केल्या मुळे देखील महिला पक्षकारांना फार मोठा दिलासा मिळाला .
ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर पानगावकर यांचे अनेक सेशन यांनी कोर्टात आयोजित केले आहेत .महिला पक्षकारांबाबत देखील त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला आहे. त्या म्हणतात कौटुंबिक न्यायालयात येणारी स्त्री सहसा एकटीच, निराधार असायची. तारखेवर येताना मुलंबाळ सोबत असायची. ती स्त्री जर पुरावा देत असेल तर कधी कधी मुलांना बाहेर बघणारे कोणीच नसायचे. त्या बाईचा जीव मुलांमध्ये असायचा. कधी कधी पुरावा सुरू असताना बाहेरून मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू यायचा. पुरावा देणारी बाई विचलित व्हायची. कधी कधी गोंधळलेल्या अवस्थेत त्या बाईकडून चुकीचा पुरावा दिला जायचा. अशा घटना घडल्या मग पुरावा थांबून मीराताई त्या बाईला मुलाला घ्यायला सांगायच्या. मला असे वाटते की कोर्टाच्या डायस वर बसून एका जजने या संबंधी निर्णय घेणे म्हणजे खूप मोठा मानवतेचा दृष्टिकोन आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाय व्हावा म्हणून भारतीय स्त्रीशक्तीच्या सहकार्याने मीराताईंनी कोर्टात पाळणाघर सुरू केले .आज मुलांना या पाळणाघरात ठेवून बायका निश्चिंतपणे त्यांच्या केस मध्ये पुरावा देतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ,एखाद्या बाईचे तिच्या नवऱ्याने खावटीचे पैसे कोर्टात जमा केले तर ते पैसे काढण्यासाठी वकिलाकडून अर्ज करावा लागायचा. आणि त्यासाठी वकिलांना फी द्यावी लागायची. मीराताईंनी स्त्रीशक्तीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून निशुल्क स्वरूपात कोर्टातील रक्कम काढायचे अर्ज संबंधित महिलेच्या माध्यमातून कोर्टात स्वीकारणे सुरू केले. त्याचा परिणाम असा झाला की, पीडित महिलेच्या पैशात बचत व्हायला लागली. त्या म्हणतात त्यावेळी वकील लोक नाराज झाले. परंतु मीराताई पीडित महिलांच्या बाजूने ठाम होत्या.
परगावा वरून येणाऱ्या महिला पक्षकरांची राहण्याची व्यवस्था त्या श्रद्धानंद आश्रम अथवा मालवीय नगर मधील महिला केंद्रात करायच्या .एक दोन दिवस या निराधार महिला तिथे राहू शकायच्या. एका जजने पक्षकार महिलांचा एवढा विचार करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. महिलांशी एकरूप होऊन मीराताईंनी काम केले आहे. त्या म्हणतात आपण घडलोच असे की, त्यामध्ये विशेष काही करतो असे वाटत नाही .
त्यासोबतच त्या एक सतर्क न्यायाधीश होत्या .त्या एक घटना सांगतात की ,मुंबई कोर्टात एका केसचा पुरावा सुरू होता. त्यावेळी एक गर्भवती महिला छोट्या मुलाला घेऊन कोर्टासमोरून चकरा मारत होती .मीराताईंनी शिपायाला निरोप घेऊन तिला बोलावून घेतले .तेव्हा कळले की नवऱ्याने तिला घरातून बाहेर काढले आहे. मग नवऱ्याला बोलवून त्याचे समुपदेशन मीराताईंनी केले. नंतर नवऱ्याने बाईचे बाळंतपण सोबत राहून केले. त्यानंतर ती बाई पुन्हा तान्ह्या मुलासह कोर्टात आली. थोड्यावेळाने कळले की तिने मोठ्या मुलाला तिसऱ्या मजला वरून खाली फेकले आणि मुलगा मरण पावला.कारण काय तर नवरा मोठ्या मुलाचे लहान मुलापेक्षा जास्त लाड करायचा. यावेळी उद्भवलेली परिस्थिती अतिशय गंभीर होती. मात्र पहिल्या दिवसापासूनच मीराताईंनी तिची विचारपूस आणि काळजी घेतली होती. त्यामुळे या संदर्भात महिला संघटना अथवा मीडिया काहीही करू शकले नाही. त्या म्हणतात की कोर्टाच्या निगलीजन्स ची ती केस होऊ शकली नाही. पुढे असे झाले लक्षात आले की ,ती स्त्री मानसिक दृष्ट्या आजारी होती. मात्र सुरुवातीपासूनच मीराताईंनी तिची अतिशय माणूसकीने काळजी घेतली होती .
माझ्या दृष्टीने मीराताई सोबतची एक महत्त्वाची आठवण, 2016 मध्ये विदर्भाचे महिला अधिव्यक्त्यांच्या इतिहासात पाहिले, एडवोकेट पारिजातजी पांडे यांच्या संकल्पनेतून, आणि मीराताईंच्या अधिवक्ता परिषदेच्या विदर्भ अध्यक्ष असण्याच्या कारकिर्दीत, तीनशे महिला अधिवक्त्यांच्या उपस्थितीत मोठे अधिवेशन अकोला येथे आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनाला ऐतिहासिक घटना असेच म्हणता येईल. कारण विदर्भात कोर्ट सुरू झाल्यापासून महिला अधिवकत्यांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे पहिलेच अधिवेशन होते. योगायोगाने या अधिवेशनाची संयोजक म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. त्यामुळे मीराताईंच्या नेतृत्वात खूप चांगले काम करता आले आणि चांगली आठवण मनाशी आहे .
मीराताई सध्या अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. भारतीय स्त्री शक्तीच्या लॉ फोरमच्या त्या कन्व्हेनर आहेत, जम्मू कश्मीर अध्ययन केंद्र नागपूरच्या त्या अध्यक्ष आहेत. त्या म्हणतात संविधानातील कलम 35 अ चा अभ्यास अध्ययन केंद्रातील पाचशे वकिलांनी केला त्यामुळे 370 कलम हटविता आले. 370 कलम हटविण्यासाठी जम्मू कश्मीर अध्ययन केंद्राचा फार मोठा सहभाग आहे. हे अध्ययन केंद्र कश्मीर बाबत सकारात्मक बाजू लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करते. आपल्यासमोर मीडियाने तर कश्मीर म्हणजे आतंकवाद असाच भ्रम निर्माण केला आहे. अर्थात त्याला पुष्टी देखील तथाकथित बुद्धिवादी देतात. मात्र अध्ययन केंद्र कश्मीरची सकारात्मक बाजू लोकांसमोर आणते .तेथील संस्कृती, परंपरा, सण ,आर्थिक स्थैर्य. नुकतेच तिथे G-20 ची यशस्वी आंतरराष्ट्रीय परिषद झाली . ही देखील फार मोठी उपलब्ध आहे .यासोबतच मीराताई बाल जगतच्या अध्यक्षा आहेत. श्रद्धानंद अनाथाश्रम च्या उपाध्यक्ष आहेत .गृहिणी समाज रामदास पेठच्या देखील अध्यक्ष आहेत.
काम करत रहाणे हा मीराताईंच्या जीवनाचा मूलमंत्र आहे .त्या म्हणतात की त्यांच्या कार्याला त्यांचा मुलगा आणि सून यांचा भक्कम पाठिंबा आहे .त्यामुळेच त्या पूर्णपणे झोकून देऊन सामाजिक कार्य करू शकतात. मीराताईंच्या आजपर्यंतच्या कार्याला मनापासून अभिवादन, आणि भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा….
ऍड. मनिषा कुलकर्णी, नागपूर.
9823510335