मृणाल देवेंद्र दस्तुरे च्या कर्तृत्वासाठी.
नागपूरला स्थायिक झाल्यावर सर्व जुन्या भेटीगाठी सुरू झाल्या. सीमा आपटे- गोगायन च्या माध्यमातून रत्ना वेरुळकर – कुलकर्णीची भेट झाली. तेव्हा एक मनात विचार आला की, आपण दुर्गा वाहिनीच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण घेऊन जेवणाचा कार्यक्रम ठरवावा. म्हणजे सर्वांच्या छान पैकी भेटी होतील. मुख्य प्रश्न होता जागेचा. ४०-५० जणी आम्ही कुठे एकत्र भेटू यावर सीमा आणि रत्ना सोबत चर्चा सुरू होती. नागपूरला काही अकोल्यासारखे मोठे घर नव्हते. त्यामुळे जागेबाबत विचार सुरू असताना ,रत्नाने सांगितले की, मृणालची शाळा आहे साउथ पब्लिक स्कूल. तिथे आपल्याला आपल्याला एकत्रीकरण घेता येईल. ऐकून आश्चर्य वाटले आणि आणि आनंद झाला . मग मृणालशी संपर्क साधून आम्ही शाळा बघायला गेलो. नागपूर सारख्या ठिकाणी एक एकराच्या परिसरात मृणाल ने फुलविलेले विद्या मंदिर तिच्या कर्तुत्वाची नीटनेटकेपणाची आणि परिश्रमाची साक्ष देत होते. ते सर्व बघून अभिमान वाटला की, आपल्या दुर्गा वाहिनीच्या साक्षात दुर्गेने आपल्या स्वकर्तृत्वावर नागपूर सारख्या शहरात प्रतिथ यश शाळा नावारुपाला आणली. नवरात्राचा आजच्या पहिल्या दिवसाचा शब्द जागर मृणाल गर्गे- दस्तुरे च्या कर्तुत्वासाठी .
मृणालचा परिवार तसा मूळ नागपूरचा. लोकांच्या शाळेत तिचे शिक्षण झाले .अकरावी बारावी हिस्लोप कॉलेजमध्ये तर, पदवीधर शिक्षणाचे वेळी तिच्या वडिलांची बदली गोंदियाला झाली आणि मृणाल चा परिवार गोंदियाला तात्पुरता स्थायिक झाला .
मृणाल मध्ये सुरुवातीपासूनच एक सळसळते चैतन्य होते. ते चैतन्य शाळेतील शिक्षकांनी ओळखले. त्यामुळे पहिल्या वर्गापासूनच मृणालचा कथाकथन वक्तृत्व नाटक यामध्ये सहभाग होता .शाळेत असताना ती स्कूल कॅप्टन देखील राहिलेली आहे. सुरुवातीपासूनच तिच्यातील गुण शिक्षकांनी पारखले. संधी मिळत गेल्या तसतसे तिचे व्यक्तिमत्व फुलत गेले. मृणालला अजून एक चांगली सवय होती की, राग आला की तो शांत होईपर्यंत ही अभ्यास करायची. म्हणजे सकारात्मक गोष्टीतून मार्ग काढायची सवय तिने लहानपणापासूनच लावून घेतली. याचेच रूपांतर मोठी झाल्यावर स्वरूप बदलले .राग आला की शांत होईपर्यंत ती वाचन करते. या कारणास्तवही मृणालचे वाचन अफाट आहे. याचा अर्थ मृणाल ला खूप राग येतो असा नाही. हा गमतीचा भाग जरी सोडला तरी, मृणाल चे वाचन अफाट आहे. वाचनाचे सर्वश्री श्रेय ती शाळेला देते.
गोंदियाला असताना मृणाल चा संबंध दुर्गा वाहिनीशी आला. एका मोठ्या सामाजिक क्षेत्राशी संबंध आल्यामुळे आयुष्य आत्मविश्वासाने बदलत गेले .दुर्गा वाहिनीचे फिजिकल ट्रेनिंग कॅम्प व्हायचे. यामध्ये मृणालने रायफल मध्ये आपली चुणूक दाखविली. स्थिर मन, एकाग्रता, आत्मविश्वास, अचूक अंदाज, या गुणांमुळे पहिल्या वर्षीच रायफल मध्ये मृणाल चमकून गेली. त्यामुळे दुसऱ्या वर्षी होणाऱ्या शिबिरात आम्ही तिची नियुक्ती रायफल प्रशिक्षक म्हणून केली. ती देखील मृणालने सार्थ निभाविली .
दरम्यानच्या काळात मृणाल चे लग्न नागपूरच्या देवेंद्र दस्तुरे यांच्याशी झाले .देवेंद्रजींनी लग्न पत्रिकेचा मजेशीर किस्सा सांगितला की, मृणाल चा लग्नाचा बायोडाटा ज्यावेळी त्यांचाकडे गेला त्यावेळी रायफल प्रशिक्षक असे देखील त्यामध्ये लिहिले होते .त्यामुळे देवेंद्रजी म्हणाले की मी खूप मोठे डेरिंग केले आहे .यातील गमतीचा भाग सोडला तरी, हे महत्त्वाचे आहे की, तिच्या सासऱ्यांनी रायफलच्या मुद्द्याचे देखील कौतुकच केले.
लग्नापूर्वी मृणालचे एमएससी फिजिक्स पर्यंत शिक्षण झाले होते. लग्नानंतर मृणालने बीएड केले. मुळात लग्नानंतर शिक्षण घेणे कुठल्याही स्त्रीला कठीण जाते .परंतु मृणाल बीएडमध्ये विद्यापीठात तिसरी मेरिट आली. त्यानंतर मृणाल ने फिजिक्स मध्ये पीएचडी करायचे ठरविले.पीएचडी च्या कामासाठी तिला आयआयटी चेन्नई, फ्रान्समधील पॅरिसच्या विद्यापीठात जावे लागले. त्या काळात मृणालच्या सासरच्या मंडळींनी मृणालला खूप सहकार्य केले असे ती आवर्जून सांगते.
मृणालच्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी काही कंदमुळे तिच्या खाण्यात आले. त्यातून तिला इन्फेक्शन झाले. त्यामुळे जवळपास नऊ महिने मृणाल दवाखान्यात ऍडमिट होती. प्रत्येकाच्या आयुष्यात चढा उतार असतातच. त्यावेळी इन्फेक्शन मुळे मृणालच्या मेंदूत गाठ झाली. त्याचा परिणाम म्हणून मृणाल सिव्हीअर डिप्रेशन मध्ये गेली. मला तर कल्पना करवत नाही की, नऊ महिने प्रेग्नेंसी चे सुरू असताना मेंदूत गाठ, नऊ महिने दवाखान्यात ऍडमिट, सिव्हीअर डिप्रेशन ,त्याच्या गोळ्या, कसे काय सहन केले असेल मृणालनी. परंतु परिस्थिती समोर हार मानेल ती मृणाल कसली. डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी आवडीचे काम म्हणून, तिने पीएचडी केले. मृणाल सांगते की पीएचडी रजिस्ट्रेशन ते प्रत्यक्ष पीएचडी हा काळ अतिशय कठीण गेला .बाळंतपण, मुलगा लहान, आयआयटी चेन्नई चा अभ्यास ,फ्रान्समध्ये जावे लागले, मात्र या सर्व परिस्थितीवर मात करून मृणाल ने 2006 मध्ये तिची एचडी पूर्ण केली. त्यावेळी पॅरिसच्या विद्यापीठाने तिला ऑफर दिली की तिने पॅरिस सोडून जाऊ नये ,तर तिथेच राहावे. अथवा जाऊन परत यावे कारण त्यांना मृणालचे काम खूप आवडले होते .
मृणाल ने लग्नाच्या आधीपासूनच तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा सुरू केली होती. एव्हाना त्या शाळेला मूर्त रूप आले होते. पॅरिसमधील संधीमुळे मृणाल च्या मनात द्विधा विचार येऊ लागले येऊ लागले .पॅरिसमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट की, शाळा .मात्र ती सांगते की ,यावेळी आयआयटी चेन्नई चे एचओडी बी एस मूर्ती यांनी चर्चेतून तिला चांगले मार्गदर्शन केले. सध्या मूर्ती सर आयआयटी हैदराबाद येथे डायरेक्टर आहेत. ते म्हणाले की ,पॅरिसला जाऊन रिसर्च केला तर एकच रिसर्च होईल. मात्र शाळेतील मुलांमध्ये रिसर्च स्पिरिट निर्माण केले तर, मुलांना चांगली प्रेरणा मिळेल. त्यावेळी मृणालच्या मनातील द्विधा अवस्था दूर होऊन पुढे शाळाच नियमित करायचे असे तिने ठरवले.
मूर्ती सरांच्या प्रेरणेने तिने नागपूरला इंटरनॅशनल प्रिन्सिपल एज्युकेशनल कॉन्फरन्स सुरू केली .आज पावतो या सात कॉन्फरन्सचे यशस्वी आयोजन मृणाल ने केले आहे. या कॉन्फरन्स मध्ये आज पर्यंत भारताचे पूर्व राष्ट्रपती माननीय एपीजे अब्दुल कलाम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक माननीय मोहनजी भागवत , सुपर थर्टी चे आनंदकुमार, हिमाचल प्रदेशचे सोनम वांगचुक ज्यांच्या व्यक्तिमत्वाने ,थ्री इडियट या सिनेमात फुलसुख वांगडू या नावाने आमिर खानने रोल निभावला होता, इत्यादी महान हस्तींचा सहभाग होता. येणाऱ्या 30 नोव्हेंबर व एक-दोन डिसेंबर रोजी आयोजित होणाऱ्या कॉन्फरन्स मध्ये विशेष अतिथी म्हणून, दिल्ली येथील सुप्रीम कोर्टातील नामांकित वकील बासुरी स्वराज ,ज्या सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत, यांचा प्रमुख अतिथी म्हणून सहभाग राहणार आहे.
मृणाल सांगते की 56 मुलांपासून सुरू झालेल्या शाळेतील मुलांची संख्या आज 2500 पेक्षा जास्त आहे. अर्थात हा चमत्कार काही एका रात्रीतून घडला नाही. तर त्यामागे मृणालने तिच्या टीमने केलेले निरंतर अथक प्रयत्न त्याची साक्ष देतात. मात्र पालकांचा मिळणारा विश्वास समाधान देणारा आहे. मृणालच्या शाळेत सगळ्या प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल आहे. शाळेला भेट दिल्यावर विविध क्षेत्रातील बक्षिसांची संख्या बघून आपले डोळे दिपून जातात. दोन वर्षांपूर्वी माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते दैनिक सकाळ द्वारा हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात, मृणालला बेस्ट प्रिन्सिपल चा अवॉर्ड मिळाला.
दैनिक भास्कर तर्फे तिला वुमन ऑफ द इयर चा अवॉर्ड मिळालेला आहे.
रोटरी क्लब नागपूरचे वतीने दिला जाणारा अतिशय महत्त्वाचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड मृणालला मिळालेला आहे.
लखनऊ येथील सिटी मॉन्टेसरी तर्फे दिल्या जाणाऱ्या एज्युकेशन इनोवेशन अवॉर्ड ची मानकरी मृणाल सलग दोन वर्षे ठरली आहे.
याव्यतिरिक्त व्यक्तीगत उपलब्ध म्हणजे मृणालचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन पुस्तके प्रकाशित झाले आहेत. त्याचा आधार मृणालची फिजिक्स मधली पीएचडी आहे. प्रिन्सिपल व शिक्षकांसाठी मोटिवेशनल मॉड्युल्स ती स्वतः घेते .आतापर्यंत 50 नामांकित शाळांमध्ये तिने हे मॉड्युल्स फ्रेम केले व त्याची अंमलबजावणी केली.
केंद्र शासनाने जी नवीन शिक्षण प्रणाली लागू केली ,त्यावर त्या प्रणालीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विविध 15 महत्त्वाच्या ठिकाणी मृणालची अभ्यासपूर्ण भाषणे झालीत.
शाळा हा मृणालच्या जीवनातील महत्त्वपूर्ण भाग आहे. दरवर्षी तिच्या शाळेतील एक तृतीयांश विद्यार्थी मेरिटमध्ये येतात .तसेच गेल्या 25 वर्षात शाळेचा शंभर टक्के निकाल लागला. ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे असे मृणाल सांगते.
शाळेच्या पूर्व विद्यार्थ्यांच्या संदर्भात बोलताना तिने माहिती दिली की, आज पर्यंत तिच्या शाळेतील मुले इस्रो ,नासा ,येथे गेली आहेत .आयएएस आईईएस झाली व अतिशय मोठ्या पदावर काम करतात. याचा तिला अतिशय अभिमान आहे .
शाळेतील शिक्षक व अन्य स्टाफ यांच्याशी मृणालचे अतिशय मधुर आणि विश्वासाचे संबंध आहेत. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून विश्वासाचा मजबूत पूल त्यांच्यामध्ये काम करतो . ती सांगते की, आमच्या शाळेतील स्टाफ “माझी शाळा” या आपलेपणाच्या भावनेने काम करतो. त्यामुळे आज यश दिसत आहे. शेवटी हे टीम वर्क आहे .तिने घेतलेला ध्यास खूप महत्त्वाचा आहे.
या सर्व गोष्टींमध्ये मृणालला तिच्या पतीची म्हणजे श्री देवेंद्रजी दस्तुरे यांची भक्कम साथ आहे. मृणाल सांगते की, ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत.मृणाल ला बेस्ट प्लॅनर प्रिन्सिपल त्यांनीच बनविले आहे .देवेंद्रजी शाळेचे अध्यक्ष आहेत. मृणालला दोन मुलं आहेत. लहान व्हीआयटी वेल्लोर ला इंजीनियरिंग करतो, तर मोठा इंजिनियर झाला आहे. सध्या तो दिल्लीला असतो. तिचे सासरे अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यांनी देखील भक्कम सहकार्य आज पर्यंतच्या प्रवासात केले आहे.
यासोबतच मृणाल संस्कार भारती नागपूर महानगराची उपाध्यक्ष आहे. तसेच तिने अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन व निवेदन केले. त्यातून मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी दान केली. मात्र या शाळेच्या वाढत्या व्यापामुळे निवेदन करणे तिला शक्य होत नाही ,असे ती सांगते.
साऊथ पब्लिक स्कूल आज ज्या यशाच्या शिखरावर आहे ते यश सातत्याने राखून ठेवणे ही देखील खूप मोठी जबाबदारी आहे असे ती मानते. शाळेचे मुख्य काम विद्यादाना सोबत मुलांचे उज्वल भविष्य घडविणे तसेच शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सेवा करता यावी यासाठी ती सतत प्रयत्नशील आहे. मला असे वाटते की ,शिक्षणाचा ध्यास घेऊन समर्थपणे प्रयत्नशील राहणाऱ्या मृणालचे व तिच्या टीमचे मनापासून अभिनंदन . तसेच भविष्यातील यशस्वी वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा!
– एड. मनिषा कुलकर्णी
नागपूर.
9823510335