नागपूर-ढाका-नागपूर-भाग : ३

बांगलादेशची साहसी सायकल यात्रा - भाग : ३

नागपूर-ढाका-नागपूर
बांगलादेशची साहसी सायकल यात्रा
भाग : ३

मिशन पासपोर्ट/परमिट
कलकत्ता महानगरात पत्ता शोधत शोधत आम्ही २६, बिधान सारणी या संघ कार्यालयाच्या पत्त्यावर पोहचलो. संघ कार्यालय तिसर्या मजल्यावर होतं, आणि त्यावेळेला बंगालची स्थिती अशी होती की लोक रोज आपली सायकल 3 मजले वरती चढवायचे आणि उतरवायचे. एवढी चोरांची भीती होती. नागपूरचे स्वयंसेवक म्हणून आमचं कलकत्यात छान स्वागत झालं. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना आमचा उद्देश काय हे आम्ही सांगितलं. आम्हाला बांगलादेश मध्ये जायचं होतं आणि तेव्हाच ती परवानगी मिळणे बंद झालं होतं. संघाचे एक प्रचारक, ज्यांच्याकडे सर्वहारा सेवा समितीचे काम होते. बांगलादेश मधून निर्वासित होऊन आलेल्या हिन्दू लोकांची काळजी घेण्याचं, मदत करण्याचं काम ही समिती करायची.

तसेच परत जाणार नाही
जेवणाच्या वेळी त्यांनी सांगितले, “बांगलादेशमध्ये जाण्याची आम्हाला कोणाला परवानगी मिळत नाहीये? तुम्ही कसे जाणार?” आम्ही सांगून दिलं, “काही झालं तरी जाणारच. परमिशन नाही मिळाली तर बेकायदा घुसू पण आम्ही बांगलादेशला जाणारच! नागपूरचे स्वयंसेवक आहोत तसे वापस येणार नाही.” ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे प्रेमाने चेष्टा करायचे. पाहुया किती दम आहे तुमच्यात, असं म्हणायचे! तेव्हा पासपोर्ट सुरू व्हायचा होता पण एक प्रवेशपत्र परवाना द्यायचे. ते परमिट देण्याच्या ऑफिसचा पत्ता शोधून आम्ही त्या कार्यालयात पोचलो. तेथे रांग लागते त्या रांगेत लागलो आणि करता करता त्या बाबुला भेटलो. तो बाबू म्हणाला, “तुम्ही परत जा, परमिशन मिळणार नाही.” त्याचं आमचं चांगलंच भांडण झालं. त्याला सांगितलं, “कशी परवानगी मिळत नाही पाहतो? आम्ही तुला परमिशन घेऊनच दाखवू.” असे त्याला मोठं टेसात सांगितले आणि बाहेर पडलो.
दुसर्या दिवशी आम्ही ठरवलं की सचिवालयात जाऊन मंत्र्यांना भेटून आपण काम करून घेऊ. तेव्हा तिथे युवक काँग्रेसचे मंत्रिमंडळ होतं. सुब्रतो मुखर्जी तरुण कार्यकर्ता गृहमंत्री होता तर सिद्धार्थ शंकर रे मुख्यमंत्री. सचिवालयात जाऊन दिवसभर आम्ही एका बेंचवर बसलो होतो, कोणी सांगायचे मंत्री येतील तेव्हा तुम्ही त्यांना भेटा. मंत्री आले की सरळ आपल्या कक्षात जात, बाहेर पडतानाही हीच स्थिती, आत कोणी सोडेना. असेच आमचे दोन दिवस वाया गेले, रोज संध्याकाळी निराश मनाने आम्ही कार्यालयात परत येत असू. आम्ही म्हटलं की आपण काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. युवक काँग्रेसचे खूप कार्यकर्ते सचिवालयमध्ये नोकरीला लावून घेतले होते.

गृहमंत्र्यांशी भेट
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा सचिवालयात गेलो. तेथे एका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला म्हटलं, आम्ही नागपूरचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत आणि येथे कोणी आम्हाला विचारत नाही. युवक काँग्रेसची मिनिस्ट्री आहे, असं वाटत नाही. त्यावर त्याने आमची आस्थेने चौकशी केली. जेवायला चला म्हणाला. खरं, म्हणजे आम्ही जेवण करून आलो होतो पण त्याच्यासाठी आम्ही पुन्हा जेवायला गेलो. त्याच्या सोबत जेवलो. तो म्हणाला, इथे तर तुम्हाला भेटता येणार नाही. उद्या सकाळी गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर तुम्ही या, तिथे त्यांची मी भेट करून देतो आणि पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलो. हा कार्यकर्ता शब्द दिल्याप्रमाणे तिथे होता. पंधरा-वीस मिनिटात सुब्रोतो मुखर्जी आंघोळ करून टॉवेल गुंडाळूनच आमच्यासमोर बाहेर आले, या कार्यकर्त्यांने आमची ओळख करून दिली तर गृहमंत्री म्हणाले, “बढीया, बढीया तुमचं काम होऊन जाईल.” आम्ही म्हटलं, “तसे आम्ही नाही जाणार. तुम्ही आत्ताच्या आत्ता पासपोर्ट मंत्र्याला फोन आमच्या समोर करा. तरच आम्ही समजू.” त्यांनी आमच्या म्हणण्यावर पासपोर्ट मंत्र्याला फोन लावला आणि सांगितले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आहेत, त्यांना मी पाठवतो त्यांना पासपोर्ट किंवा परवानगीचे पत्र द्या.

अखेर परमिट मिळाले
तिथून निघालो आणि पासपोर्ट मिनिस्टरला भेटलो, तो म्हणाला, “ठीक आहे तुमचे दोन फोटो द्या आणि हा फॉर्म भरा.” पासपोर्टसाठी फोटो लागतो, हे तेव्हा आम्हाला माहीत नव्हत. त्यामुळे आमच्या जवळ फोटो नव्हतेच मग त्यांना म्हटले की, आम्ही फोटो काढून आणतो. आपल्या महाराजबाग रोडवर जसे रस्त्यावर फोटो काढणारे होते त्याप्रमाणे तिथल्या जवळच्या रस्त्यावरच्या फोटो काढणार्या कडून आम्ही फोटो काढून घेतले. त्या फोटोत माझा घामाने ओला झालेला शर्ट अंगाला चिटकला आहे ते सुद्धा दिसत आहे. ते फोटो घेऊन आम्ही पुन्हा त्यांच्याकडे आलो. त्यांनी अधिकार्यांना सांगितलं, आपली सही केली. आणि सांगितले की, “आता तुम्ही प्रोसेस पूर्ण करा आणि परमिट घेऊन जा.”

शब्द खरा केला!
त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ऑफिस मधली सगळी प्रोसेस पूर्ण केली आणि आऊटवर्ड ला आलो तर तोच बाबू होता, ज्याच्याशी आमचं भांडण झालं. त्यालाही मोठा धक्का बसला की, ही मुले खरोखरच परवानगी घेऊन आपल्याकडे आले. त्याला सांगितले तुला म्हटलं होतं की आम्ही परवानगी घेऊनच येऊ याप्रमाणे घेऊन आलो. मोठ्या आनंदाने आम्ही संघ कार्यालयात परत आलो. आम्हाला एक प्रकारे अर्धे जग जिंकल्याचा आनंद झाला होता. कार्यालयात सगळ्या प्रचारकांना मोठा धक्का बसला. आमचं काम कसे झाले? पण सर्वांनी आमचं मोठ्या मनाने कौतुक केलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी कलकत्ता सोडायचं ठरवलं. या पासपोर्टच्या चक्कर मध्ये आम्ही आठ दिवस कलकत्त्याला राहूनही फारसे काही पाहू शकलो नाही. फक्त येथील प्रसिद्ध कालीमाता मंदिर, बेलूर मठ, दक्षिणेश्वर आणि हावडा ब्रिज एवढेच पाहणे झाले. पण त्यामुळे आमचं मिशन पासपोर्ट यशस्वी झालं आणि दुसर्या दिवशी आम्हाला तेथील नगर कार्यवाह विश्वास दास म्हणाले की, मी तुम्हाला कलकत्त्याच्या बाहेर काढून देतो, नाहीतर तुमचा खूप वेळ जाईल. त्याप्रमाणे ते आम्हाला कलकत्त्याचे सीमेवर सोडायला आले. त्यांचा निरोप घेऊन १७ मे ला आम्ही तिथून मग बांगलादेशच्या बॉर्डरच्या दिशेने प्रवास सुरू केला.

क्रमशः

अनिल सांबरे

सदर लेखक समाजसेवक असून इतिहासाचे अभ्यासक आहेत. मोबाइल नंबर - ९२२५२१०१३०

Comments (0)
Add Comment