नागपूर-ढाका-नागपूर – भाग : ८

नागपूर-ढाका-नागपूर
बांगलादेशची साहसी सायकल यात्रा
भाग : ८

परतीचा प्रवास
बांगला देशात येऊन आम्हाला साधारणत दोन महिने झाले होते. सर्व पाहणे, सर्वांना भेटणं झाले होते. बांगला देशाचे राष्ट्रपती सोडले तर सर्वांच्या आमच्या भेटी झाल्या होत्या. सचिवालय, तिथल्या नद्या, तिथली माणसं, समाजकारण चळवळी, रेडिओ स्टेशन, बँका, स्वातंत्र्याचे युद्ध, त्यात सहभागी होणारे, घरचे वातावरण हे सगळे पाहून आता ठरवलं की, आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो पाहिजे आणि म्हणून दिनाजपूरहून जवळच्या रस्त्याने भारतात प्रवेश करायचं ठरवलं. बांगलादेशातून भारतात प्रवेश करताना एका गावी आम्ही एका लॉजमध्ये आम्ही उतरलो होतो. एक व्यापारी पण तिथे होता. त्याच्याशी गप्पा गोष्टी करताना त्यांने सांगितलं की, तिथून जवळच नेपाळची बिराटनगर बॉर्डर आहे. तो म्हणाला की मी या मार्गावर तस्करी करतो. ऐकून आम्हाला वेगळाच थरार वाटला. तस्कर प्रत्यक्षात पाहण्याची आमची अशी पहिलीच वेळ होती.
या प्रवासाची एक अशी अविस्मरणीय आठवण आहे की, जवळचे मोठे गाव म्हणजे कटिहार. बिहार मधील पूर्णिया जिल्ह्यात कटिहार तालुका होता. आता जिल्हा झालेला आहे. या कटिहारला पोहोचण्याचे अंतर १५६ किलोमीटर. कुठे ही चांगले रस्ते नाही. कधी शेतातून, कधी नदी, नाल्यावरील रेल्वेच्या रूळावरून असे होते. सायकल रुळावर ठेवायची आणि मध्ये असलेल्या फळ्यावर पाय देत पुढे जायचे. सायकल पण रूळावरून खाली घसरायला नको अन् पायही फळ्यांवरून घसरू नये अशी सर्कस करीत पूल पार करून आम्ही बांगलादेशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला आणि २६ जुलैला कटिहारला आलो. दिनाजपूर कटिहार- हा सीमेवरील १९२ किमीचा प्रवास आम्ही एकाच दमात पूर्ण केला. संपूर्ण सायकल यात्रेतला हा आमचा एका दिवसात सर्वात प्रदीर्घ प्रवास होता.

कटिहार स्वयंसेवकांचे अपार प्रेम
कटिहार तालुक्याचे गाव. तिथल्या संघ कार्यालयाचा पत्ता शोधला आणि आम्ही तेथे मुक्काम केला. छोटेसे कार्यालय होते. चंद्रशेखर झा नावाचा नगर कार्यवाह होता. बीएससी फायनलचा विद्यार्थी आणि बाकी सोबत सगळे बालस्वयंसेवक. कोणी आठवी, कोणी नववीत, कोणी दहावीत. विश्वासला खूप थकवा असल्यामुळे आम्ही थोडा थकवा जाईपर्यंत तेथे थांबायचं ठरवलं. मी पण येथे एनफ्लूएन्झा ने आजारी पडलो. ३-४ दिवसात ठीक झालो पण थकवा होताच. संघाच्या पद्धतीने त्यांनी रोज एका स्वयंसेवकाकडे, आमची जेवायची व्यवस्था केली. सकाळी एकाकडे, संध्याकाळी दुसर्याकडे. जेवण्याचे वैशिष्ट्य ओसरीमध्ये जेवायला बसायचं. घरचा माणूस आणि आम्ही दोघं. ताटातला ७५ टक्के भाग भाताने भरलेला. एक वरणाची वाटी, एक भाजीची वाटी. तो भात पाहूनच छाती दडपयची. पहिल्यांदा आमच्या लक्षात नाही आलं पण तो भात संपविता-संपविता पुरेवाट झाली. दुसर्या दिवसापासून ताट भरून आणले की त्यांना सांगायचं की कमी करून आणा. एवढा भात खाऊ शकत नाही. त्यांची तर अपेक्षा असायची की आम्ही दुसर्यांदा भात घ्यावा. इतक्या ठिकाणी लोकांकडे जेवायला गेलो सगळ्यांकडेच परवलाची भाजी. कधी साधे परवल, कधी मसाला परवल. पण परवलच! आयुष्यात जेवढी परवलाची भाजी खाल्ली नसेल तेवढे परवल त्या कटिहार मध्ये आम्ही खाल्ले.
त्यावेळी हे केवळ संघ स्वयंसेवक आहेत, या भावनेने त्यांनी आमच्यावर अतोनात प्रेम केलं. आमची खूप काळजी केली. आम्हाला एकटे वाटू दिले नाही. त्यांचा अकृत्रिम स्नेह आम्हाला आजही विसरता येत नाही. खरं म्हणजे सगळे जण खूप सर्वसाधारण परिवारातले होते. निम्न मध्यमवर्गीय होते. पण कुठेही त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्यांनी काही कमी जाणवू दिले नाही. त्यांनी आमची पूर्ण काळजी घेतली. संघ स्वयंसेवक म्हणून विशेषतः नागपूरचे म्हणून त्यांना आमच्याबद्दल अधिकच आपुलकी वाटत होती. नंतर त्यांची पुन्हा भेट नाही झाली हे आयुष्याचे दुःख आहे. जयप्रकाश इतका समजदार तरुण कार्यकर्ता होता. कॉलेजचा विद्यार्थी, पण ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं नीट मॅनेज केलं. याचं मला आजही कौतुक वाटते. एक दिवस त्याचे घरी पण आम्ही जेवायला गेलो.

दोन घटना
विशेषत्वाने सांगण्यासारख्या अशा दोन घटना आहे संघ स्वयंसेवकांनी कार्यालय असलेल्या आपल्या वस्तीचं नाव भैय्याजी दाणी नगर ठेवलं होतं आणि सगळ्यांनी पत्ते लिहून अधिकृत रित्या भैय्याजी दाणी नगर असा पोस्टाचा पत्ता तयार झाला. कुठे नागपूर आणि कुठे कटिहार? शेवटचा टोकाचा तालुका. पण संघाचे स्वयंसेवक सरकार्यवाह यांच्या नावाने एक नगर तयार करतात. त्यांच्या संघ प्रेमाने माझं मन भरून आलं.
दुसरी एक दुर्दैवी घटना घडली. आम्ही सकाळी एका शाखेत गेलो. तेथे कबड्डीची मॅच सुरू असतानाच ज्यांच्याकडे आमचे जेवण ठरलं होतं तो स्वयंसेवकही खेळत होता. कबड्डी खेळतांना स्वयंसेवकांनी त्याला पकडलं रेषेला पाय लावला असता त्याला रोखण्यात कोणाची तरी त्याच्यावर उडी पडली तर त्याचा हा पाय गुडघ्याच्या खाली मुळा मधून तुटवा तसा तो तुटला. नंतर खूप धावपळ अन् दवाखाना.

परतीचे वेध
आम्हाला आता परतीचे वेध लागले होते. घरच्यांची आम्हाला पत्रे यायचे की पुरे झाले आता परत या. ३ ऑगस्टला आम्ही कटीहार सोडले. प्रवास करत करत आम्ही तिथून पाटण्याला आलो. पाटण्याच्या गुरुद्वाराचे दर्शन, पाटण्याच्या जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. त्या वेळेला स्थिती अशी होती की बिहारमध्ये हॉटेलच्या बाहेर सगळ्या ठिकाणी बोर्ड होते की आपल्या सायकलची सुरक्षा आपण करा. आम्ही तुमच्या सायकल ची जबाबदारी घेत नाही. बिहारमध्ये कधी अतिवृष्टीमुळे नुकसान तर कधी दुष्काळामुळे नुकसान. विद्वान, विचारवंत श्री गोविंदाचार्य यांची पाहिली भेट झाली. त्यावेळी ते तिथे विभाग प्रचारक होते. पाटना-बिहार आटपून आम्ही बनारस किंवा काशीला आलो. बनारसला घटाटे राम मंदिर आहे, नागपूरचे घटाटे यांनी ते बांधलेले आहे तिथेच वर संघाचे कार्यालय आहे. तिथे आम्ही होतो. तिथे बनारसचे सगळे घाट मंदिर दर्शन केले. बनारस हिंदू विश्वविद्यालय पाहिले. बनारसला असताना बनारस विश्वविद्यालयात आणि नंतर संघाचे विश्व विभागाचे काम पाहणारे, तत्ववादी शंकर राव प्राध्यापक होते. त्यांची आमची पहिली भेट तिथेच झाली. (पाटण्यामध्ये आम्ही तेव्हा गोल बाजार नावाच्या शाखेत नंतर विद्यार्थी परिषदमध्ये पण आम्ही सोबत काम केलं, तेव्हा ते क्षेत्र संघटन मंत्री होते.)

मिर्झापूर : विध्यांचलचे टोक
बिहार आणि आणि प्रयागराज (अलाहाबाद) याच्यामध्ये मिर्झापूर नावाचा जिल्हा आहे. याच्यावर आता सिनेमा निघालेला आहे. मिर्झापूर गावच्या वेगळ्या दोन आठवणी आहेत. मिर्झापूर ला विध्यांचल पर्वताचे टोक आहे गावाला लागूनच पर्वतावर विंध्येश्वरी देवीचे मंदिर आहे. या गावाचे वैशिष्ट्य हे की, पूर्ण गावांमध्ये जवळजवळ सगळी घरं आणि रस्ते मोठ्या दगडांनी बनले होते. त्यामुळे गावात फिरताना वेगळेच वाटायचं. या मिर्झापूरमध्ये दर रविवारी मोठ्या संख्येने लोक पर्वतावरील देवीमंदिरात जाऊन स्वयंपाक करून भोजन करायचे. वेगवेगळ्या ठिकाणी लोक गटागटाने स्वयंपाक करत आहे आणि जेवत आहे, असं ते दृश्य होतं. तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की दर शनिवार-रविवार लोक येथे आपल्या सोयीने जेवायला जातात.

शहीद उद्यान
विंध्येश्वरी करून मिर्झापूर आटोपून आम्ही प्रयागराजला आलो. ज्या पार्कमध्ये चंद्रशेखर आजाद यांना गोळ्या घालण्यात आल्या तो अल्फेड पार्क पहिला. गंगास्नान केले. एका देशभक्ताने जवळच एक शहीद उद्यान उभारले आहे.

हे क्रांतिकारक म्हणजे शहीद भगतसिंग यांचे सहकारी. पुढच्या पिढीला सगळ्या शहिदांची माहिती झाली पाहिजे म्हणून त्यांने एक उद्यान निर्माण करण्याचं ठरवलं आणि क्रांतिकारकांवर पुस्तके प्रकाशित करायचे ठरविले. त्याने त्या उद्यानात क्रांतिकारकाचा पुतळा, त्याची माहिती आणि त्याच्यावरचे पुस्तक अशा प्रकारे २०-२५ क्रांतिकारकांची माहिती देणारे असे आगळेवेगळे शहीद उद्यान मोठ्या मेहनतीने तयार केले. ते पण पाहायला आम्ही जाऊन आलो. त्या क्रांतिकारकाची पण भेट झाली. त्यांनी पुस्तक संच आम्हाला भेट दिला. आम्ही पण क्रांतिकारकांच्या विचारांनी भारलेले होतो. त्याच्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं.
प्रयागराज आटोपून आम्ही जबलपूरला पोहोचलो. जबलपूरला तेव्हा महापौर असणारे जनसंघाचे बाबुराव परांजपे यांच्या घरी आम्ही मुक्कामाला होतो. राइट टाउन मधील त्यांच्याघरी मुक्काम करून दुसर्या दिवशी आम्ही जबलपूर सोडलं. आमचे मुख्य काम आटोपले होते आणि परतण्याची घाई झाली होती त्यामुळे आम्ही न थांबता पुढे-पुढे जात होतो.

नागपूरला प्रेमळ स्वागत
९ सप्टेंबर सायंकाळी ४ च्या सुमारास व्हेरायटी चौकात आम्ही येऊन पोहचणार असे आधी कळविले होते. त्यामुळे स्वागताला मित्रपरिवार आणि घरचे सगळे आले होते. घरून निघाल्यावर ४ महिने १६ दिवसांनी जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करून, ठरविले ते पूर्ण करून नागपूरला यशस्वीरीत्या आणि सुखरूप आम्ही पोहचलो. आई, भाऊ, बहिणी यांनी काळजीने काढलेले दिवस त्यांच्या चेहर्यावर आणि डोळ्यांमध्ये दिसत होते आणि ज्या सायकलने गेलो होतो त्याच सायकलने आम्ही घरी परत आलो.

जाण्याच्या आणि येण्याच्या बातम्या फोटोसकट सर्वत्र आल्या. आपण एखाद्या गोष्टीचा निर्धार करावा आणि तो यशस्वी रित्या पार पडावा. व्यक्तिगत शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक अशा सगळ्या अडथळ्यांना अडचणींना बाजूला सारून आपण यशस्वी व्हावं, याच्यासारखा आनंद आणि समाधान मला वाटतं दुसऱ्या कशातच नाही.

आल्यानंतर कितीतरी दिवस आम्ही सायकल वीर होतो. त्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला बोलावले त्यांना प्रवास वर्णन सांगणे आणि ते ऐकून लोकांनी भारावून जाणे, याचा क्रम चालू होता. शेवटी काही दिवसांनी आम्ही लोकांना हा विषय सांगणे बंद केले. आजही तो विषय निघाला की लोकांना त्याच्याबद्दलचे अपार कुतूहल आणि उत्सुकता असते. 50 वर्षात बांगलादेश किती बदलला हे पुन्हा एकदा जाऊन पाहण्याची इच्छा आहे. अखंड भारताचा पूर्व भाग तर पाहणे झाला. पण अखंड भारताचा पश्चिम भाग विद्यमान पाकिस्तानमध्ये जाऊन हिंदूकुश पर्वतापर्यंत जाऊन तोही भाग पाहण्याची खूप इच्छा आहे. अटकेपार जाण्याची इच्छा आहे. पाहू या केव्हा तो योग येतो. उत्साह तर आजही म्हणजे पूर्वी होता तसा अठरा वर्षाच्या मुलाप्रमाणे आहे. बांगलादेशची सायकल यात्रा हे आमचे उमलत्या वयात पाहिलेले व प्रत्यक्षात आलेले स्वप्न आहे, या स्वप्नांची सोबत आजही आहे.

अनिल सांबरे

सदर लेखक समाजसेवक असून इतिहासाचे अभ्यासक आहेत. मोबाइल नंबर - ९२२५२१०१३०

Comments (0)
Add Comment