नम्रता तुषार तेलंग यांच्या कर्तृत्वा साठी.
आयुष्यात काही लोक असे भेटतात की त्यांच्याशी
पहिल्या भेटीपासूनच आपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जातो. त्या व्यक्तीमत्वाला समजावून घेण्यासाठी खूप भेटींची आवश्यकता नसते. थोड्या काळातच ऋणानुबंध तयार होतात .त्याला आपण वेव्हलेंथ जुळते असे देखील म्हणू शकतो. त्या व्यक्ती मधली पारदर्शकता आपल्या लक्षात येते आणि त्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या पारदर्शकता ,सचोटी, आत्मविश्वास, या गुणांमुळे ओढ वाटू लागते. असेच माझ्या सहवासात आलेले अतिशय गुणी व्यक्तिमत्व म्हणजे, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या पांडे लेआउट शाखेच्या शाखाधिकारी नम्रता तुषार तेलंग. आजचा शब्द जागर नम्रता मॅडमच्या कर्तुत्वासाठी.
मॅडमचे पूर्वाश्रमीचे नाव नम्रता रमेश मानकर. मध्यमवर्गीय परिस्थितीत सुरुवातीपासून त्यांचे आयुष्य गेले. घरात मॅडम सह एकूण तीन भावंड. मॅडमची सुरुवातीचे शिक्षण कॉन्व्हेंट मध्ये झाले. त्यामुळे शिक्षणाचा पाया पक्का झाला असे त्यांचे मत आहे .इतर दोन भावंडांच्या तुलनेत त्यांच्याजवळ जबरदस्त आत्मविश्वास आहे .त्यानंतरचे शिक्षण सोमलवार शाळेत झाले. त्या म्हणतात सोमलवार शाळेमुळे माझ्यावर भाषा आणि संस्कृती याचे मूलभूत संस्कार झाले. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता जीवन अनुभवानी समृद्ध होत गेले .शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला .नृत्य ,क्रीडा, वादविवाद स्पर्धा इत्यादी .
वादविवाद स्पर्धेमुळे लक्षात आले की, नाण्याला दोन बाजू असतात त्या दृष्टीने विचार केल्यामुळे त्यांची वैचारिक प्रगल्भता वाढत गेली असे त्यांचे मत आहे .त्या म्हणतात मी केवळ ब्लॅक अँड व्हाईट वर विश्वास ठेवत नाही. ग्रे कलर देखील असतो हे मला डिबेट ने शिकविले. त्यामुळे जजमेंटल न राहता आपल्यासमोरील परिस्थितीचा दोन्ही बाजूने सारासार विचार करण्याची सवय लागली. त्याचा फायदा बँकिंग क्षेत्रात आणि एकंदरीतच आयुष्यात मोठ्या प्रमाणावर झाला .
पुढे अकरावी बारावीचे शिक्षण नागपूर येथील दीनानाथ स्कूलमध्ये झाले .तेथे बंगाली वातावरण होते. तिथे देवीची पूजा व्हायची .त्यामुळे स्त्रीला किती महत्त्व आहे हे लक्षात आले. त्या शाळेत स्त्रियांना आदराने वागवताना बघितले .त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम मानसिकतेवर होऊन आत्मविश्वास वाढला .
बारावीत प्रवेश झाला असताना त्याच महिन्यात वडिलांचे दुःखद निधन झाले. तोच आयुष्यात आयुष्यातील मोठा टर्निंग पॉईंट ठरला. त्या वातावरणात परिस्थितीतून सावरायला शाळेने खूप मदत केली. शाळेतील स्टाफने खूप समजावून घेतले .लोकांसाठी बारावीही बोर्डाची परीक्षा असते .मात्र मॅडम साठी बारावी म्हणजे आयुष्याचे बोर्ड ठरले. वडिलांच्या मृत्यूनंतर घरी आर्थिक ओढाताण सुरू झाली .कारण उत्पन्नाचा मुख्य स्रोत बंद झाला होता .भावंड शिकणारी ,आई हाऊस वाइफ. त्या काळात मॅडमचा इमोशनल ब्रेक डाऊन झाला .सर्व विस्कळीत झाले होते. मात्र मॅडमनी या वातावरणात स्वतःला तीन महिन्यापेक्षा जास्त राहू दिले नाही. स्वतःला सावरले .त्यामागे आईची ओढ होती .आईला ही शिक्षणाचे महत्त्व माहित होते. त्यामुळे त्यांच्या आईने वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवसापासूनच मुलांना शाळेत पाठवणे सुरू केले होते .त्या कोवळ्या वयात मॅडमनी विचार केला की, मला खंबीर राहून खूप मोठे बनायचे आहे. आईला भावनिक दृष्ट्या आर्थिक ,दृष्ट्या, पारिवारिकदृष्ट्या ,आधार द्यायचा असा त्यांनी निश्चय केला. त्यांचा निश्चय प्रत्यक्ष पुरविण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग होता असे त्या मानतात .
खरं म्हणजे मॅडमचे एमबीबीएस होण्याचे स्वप्न होते .मात्र परिस्थितीमुळे ते शक्य वाटत नव्हते. मग पर्याय होता की ,कमी पैशात प्रोडक्टिव्ह शिक्षण घेणे .त्यानंतर पुढचे सर्व शिक्षण मॅडमने स्कॉलरशिप मिळवून स्वतःच्या पायावर केले. त्यांनी बीएससी नंतर एमएससी मायक्रो बायोलॉजी व बायोकेमिस्ट्री या दोन विषयात केले. त्यानंतर बोस्टन येथील विद्यापीठातून क्लिनिकल रिसर्च हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. त्यावेळी असलेल्या प्रचंड ओढ ताणीमुळे करिअर पेक्षा आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे होते.
त्यानंतर त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेची ऑफिसर ग्रेड ची परीक्षा दिली. ती परीक्षा त्या पहिल्याच प्रयत्नात पास झाल्या. त्यानंतर मात्र मॅडमनी मागे वळून पाहिले नाही. त्यांचे पहिले पोस्टिंग नागपूरलाच होते. त्यानंतर बेंगलोरला प्रोबेशनल ऑफिसर म्हणून बदली झाली. मात्र पुढे गोंदिया बुटीबोरी भद्रावती भोपाळ नागपूर या ठिकाणी त्यांची शाखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नागपूरला काही दिवस त्या व्हिजिलन्स ऑफिसर म्हणून रिजनल ऑफिसला देखील त्यांचे पोस्टिंग होते .सध्या नागपूरच्या पांडे ले आऊट शाखेच्या या सीनियर मॅनेजर फर्स्ट लाईन म्हणून कार्यरत आहे .
मॅडमना सध्या 50 लाखाच्या पर्यंतच्या कर्ज वितरणाचे अधिकार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मी त्यांच्या संपर्कात आहे. एखादे लोन प्रपोजल हाताळताना त्यांचा आत्मविश्वास मला नेहमी भावून जातो. त्या म्हणतात माझ्या नोकरीत मी आनंदी आहे .माझ्यामुळे एखाद्याच्या घराचे गृह कर्जाच्या रूपात स्वप्न पूर्ण होते, एखादा ग्राहक गाडी घेऊ ,शकतो संपत्ती निर्माण करू शकतो, त्या गोष्टी मनाला आनंद देतात .त्यामुळे त्यांना समाधान मिळते .त्या म्हणतात शाखाधिकारी या पदाच्या खुर्चीवर बसून अनुभवाचा आणि संपर्काचा दायरा वाढत जातो. जसा काळ पुढे जात गेला, मी ओपन होत गेले, सहज होत गेले. नोकरीत अतिशय आनंदी आहे .ही सहजता एकाच गोष्टीमुळे आहे की, या खुर्चीवर बसून मला माणसं ओळखता येतात .त्या म्हणतात ज्ञान, कठोर परिश्रम, सचोटी, कर्तव्य तत्परता, सकारात्मक विचार ,याचे मिश्रण मी माझ्या व्यक्तिमत्त्वात जोपासल्यामुळे गोष्टी सहज वाटतात .कोणत्याही गोष्टीचा ताण येत नाही. बँक इज नथिंग ब.ट सिस्टीम जे तुम्ही कराल तेच तुमच्या पुढ्यात येणार आहे .पे अँड बॅक .बट इफ यू विल नॉट डू एनी रॉंग बँक इस ऑलवेज विथ यु
.मॅडम कर्मावर विश्वास ठेवतात .
त्या म्हणतात मी स्वतःला अशा पद्धतीने घडविले आहे की ,आमच्या परिवारात कुणाला काही प्रश्न पडला तर सर्वप्रथम ते माझ्याशी संपर्क करतात .
मॅडमच्या यजमानांचे सध्या भुसावळला पोस्टिंग आहे . त्यांच्या मिस्टरांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे .त्या म्हणतात माझी मिस्टरांशी पेरेंटिंग या विषयावर आपसात खूप सकारात्मक चर्चा होत राहते .दोघांमध्ये खूप चांगले बॉंडेज आहे. त्या म्हणतात मिस्टरांमध्ये इंटलेक्ट आहे तर माझ्यामध्ये स्मार्टनेस या दोन सुंदर गुणांचा मिलाफ यांच्या वैवाहिक जीवनात आहे . दोघेही एकमेकांना पूरक आहेत. मॅडम नागपुरात दोन मुलांना घेऊन राहतात. एका मोठ्या शाखेच्या यशस्वी शाखाधिकारी म्हणून भूमिका निभवणे सोपे नाही. त्या म्हणतात माझी मुले माझे कर्तव्य व स्ट्रेंथ आहे. संध्याकाळी घरी जाताना मी एकच विचार करते की, मुलांना आई फ्रेश हवी असते .त्यामुळे एक समर्पित आई म्हणून जगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करते.
त्यांचे म्हणणे आहे की, स्त्री खऱ्या अर्थाने अष्टभुजा आहे .त्या बहुआयामी आघाड्यांवर एकाच वेळी काम करू शकतात .जर महिलांनी आपल्या अष्टभुजा खरोखरच एक्सप्लोर केल्या तर जगात किमया होईल .मॅडमचा महिलांच्या कर्तुत्वावर अतिशय विश्वास आहे .स्वतःच्या आयुष्यात वैचारिक ,बैठक ठेवणाऱ्या आणि सचोटीने कार्य करणाऱ्या मॅडमच्या आतापर्यंतच्या कार्य काळासाठी हार्दिक अभिनंदन. पुढच्या समृद्ध वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…..
ऍड. मनिषा कुलकर्णी
नागपूर.
9823510335