नाविन्यपूर्ण कल्पना येणार कश्या ?
जगात विज्ञानाच्या जगात काय सुरू आहे हे माहीत नसले की मग एखाद्याने सांगितलेली नाविन्यपूर्ण कल्पना पण हास्यास्पद वाटायला लागते. आता मी तुम्हाला सांगितले की तुमची इमारत बांधतांना जे काँक्रिट लागते आणि नंतर इमारती करता जे रंग लागतात त्यातून इमारती करता लागणारी ऊर्जा (इलेक्ट्रिसिटी) तुम्हाला मिळेल तर तुम्ही मला वेड्यात काढाल की नाही?
मुळातच मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिसिटी आपली दैनंदिन गरज बनली आहे. प्रदूषण विरहित ऊर्जा तयार करणे हा आपल्या करता आव्हान आहे आणि यावर मात करण्यासाठी जगात वेगवेगळे उपाय आणि संशोधन सुरू आहेत. पवनऊर्जा निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जा निर्मिती ही आपल्याला दिसत आहे. मात्र या करता मोठ्या प्रमाणावर जागा लागते, पण ज्या प्रमाणे वनस्पती सुर्यप्रकाशापासून फोटोसिंथ्यासिसच्या माध्यमातून आपले अन्न तयार करते त्याच धर्तीवर समजा इमारती आपल्याला आवश्यक ती ऊर्जा निर्माण करू शकल्या तर कसे? या कल्पनेतुन या संशोधनाचा जन्म झाला. आता भारतात अशी काही कल्पना कोणी बोलून दाखवली असती, त्यावर संशोधन करतो म्हंटले असते तर आपल्या येथील झापडबंद तथाकथित विज्ञानवादिंनी त्याला हास्यास्पद ठरवले असते.
मात्र ही कल्पना आली ती जर्मनी मधील एकाच्या मनात ! मग जर्मनीतील कासल विश्वविद्यालयात यावर काही संशोधक कामाला लागले. आता या संशोधक समूहा मध्ये सगळेच काही विज्ञानाचे शिक्षण घेतलेले नाहीत बरे का ! या संशोधक समूहात आहे कलाकार, डिझाईनर, आर्टिटेक आणि संशोधक हे सगळे मिळून यावर काम करत आहेत. यांचा प्रयत्न असा पदार्थ बनवायचा की जो सूर्य प्रकाशा पासून ऊर्जा निर्मिती करेल जशी आपल्याला माहीत असलेल्या सोलार सेल मधून केल्या जाते. या पदार्थाचा आधार आपले साधे काँक्रिट आहे जे आपण आपल्या इमारती बांधायला वापरतो, या काँक्रिटला चांगला विद्युत धारक बनविण्यासाठी त्यात ग्रेफाईटचे मिश्रण केले जाते. या मुळे हे काँक्रिट आपल्या हाताच्या संपर्कात आल्यावर पण ऊर्जा उत्पन्न करण्यास सक्षम होते. त्या सोबतच यावर एक विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या रंगाची लेयर चढवली जाते, हा रंग सुर्याची उष्णता काँक्रिट पर्यंत नेते आणि काँक्रिट त्याचे ऊर्जेत रूपांतर करते. या रंगला म्हणतात डाय सेन्सेटाईज रंग, या वर सूर्य प्रकाश पडल्यावर यातील इलेट्रॉन काम करायला सुरुवात करतात आणि त्या प्रकाशाला इलेट्रिसिटीत बदलवतात आणि काँक्रिट त्याचे वहन करते. अर्थात अजून यातुन मिळणारी ऊर्जा सध्या खूप कमी आहे, या वर अजून यावर विस्तृत प्रयोग सुरू आहेत आणि त्याची ऊर्जा निर्मिती वाढवायच्या प्रयोगाला सतत सफलता पण मिळत आहे. लक्षात घ्या समजा हे संशोधन ठरलेल्या मानकानुसार सफल झाले तर सौर ऊर्जा प्रकल्पाचा चेहरामोहरा बदलून जाईल, सौर ऊर्जा प्रकल्पाकरता जी प्रचंड जागा लागते ती लागणार नाही. तसेच ज्या देशात सूर्य प्रकाश तितका तीव्र नसतो ज्याने ऊर्जा निर्मिती शक्य होत नाही, तिथे पण हे संशोधन उपयोगी पडेल.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील काही कंपन्या आता असे जनरेटर विकण्याच्या तयारीत आहे जे विना प्रदूषण तुम्हला ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटी निर्माण करून देईल. या जनरेटर मधून ऊर्जा मिळवायला डिझेल, पेट्रोल, गॅस अश्या कशाचीही गरज लागणार नाही, आता याची गरज नाही म्हणजे प्रदूषण पण नाहीच. मग हे जनरेटर ऊर्जा नक्की कशी तयार करणार?
आता आपल्यापैकी अनेक जण यु ट्यूब वरीन अनेक व्हिडीओ बघतो, त्यात अनेकांनी लोहचुंबकाच्या मदतीने डी. सी. मोटर चालवत एल ए डी दिवे लावण्याचा प्रयोग बघितला असेल. नसेल बघितला तर हा प्रयोग नक्की बघा. बस या प्रयोगावर आधारीतच हे संशोधन आहे. मात्र वीज जनित्र चालवायला लागणारे मोठे चुंबक आणि त्या मुळे आजूबाजूच्या भागावर पडणारा चुंबकीय परिणाम यावर या प्रयोगात मात केल्या गेली. अर्थात अजून काही समस्या या प्रयोगाला सफलते कडे न्यायला नक्कीच आल्या असतील पण त्या वर काही प्रमाणात विजय नक्कीच मिळवला आहे. मुख्य म्हणजे हे उत्पादन आता विक्री करता उपलब्ध आहे.
विचार करा की ज्या दुर्गम भागात वीज पोहचली नाहीये आणि रोज पेट्रोल, डिझेल किंवा गॅस द्वारे वीज निर्मिती खर्च परवडणारा नाहीये अश्या ठिकाणी अशी जनरेटर्स किती उपयोगाची पडतील !
मात्र आपल्यापैकी अनेकांना जुगाड करणे म्हणजेच संशोधन वाटत असते किंवा ज्यांना आपण विज्ञानवादी असल्याचा खोटा अहंकार आहे त्यांना असल्या प्रयोगांचे महत्व नक्कीच कळणार नाही. म्हणूनच मग गटाराच्या पाण्यातून गॅस तयार करणार म्हंटले की त्याची निंदा करायची हुक्की येते किंवा विंड टर्बाईन व्दारे आद्र्ता शोषून घेत त्यातुन पाणी मिळवण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद वाटते, जेव्हा की जगभरत असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
बाकी भारतात असे झापडबंद तथाकथित विज्ञानवादी जो पर्यंत आहेत तो पर्यंत तरी भारतात संशोधन वृत्तीला खतपाणी कितीपत मिळेल, सोबतचही नाविन्यपूर्ण कल्पना किती जण मांडू शकतील ही शंकाच आहे