नेहा गिरीश मुंजे च्या कर्तृत्वासाठी.

नवरात्र विशेष.

नेहा गिरीश मुंजे च्या कर्तृत्वासाठी.

काही व्यक्ती परमेश्वराकडून कलागुण घेऊनच आलेले असतात. अर्थात त्या कलेची अभिव्यक्ती समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे देखील अथक प्रयत्न असतात .परंतु कधी कधी जीवनाचा हेतू गवसायलाच वेळ लागतो. जे परमेश्वराने योजले असते ते घडतेच यावर आपलाही विश्वास आहे. यालाच डेस्टिनी म्हणजे गंतव्य स्थान असे देखील म्हणता येईल. अशीच कलेच्या क्षेत्रात रमणारी आणि नागपुरात नावारूपाला आलेली मैत्रीण म्हणजे, नेहा गिरीश मुंजे म्हणजे पूर्वाश्रमीची सरोज देशमुख .आजचा दुसऱ्या दिवशीचा शब्द जागर नेहाच्या कर्तुत्वासाठी.

नेहा मूळ वर्ध्याची. आनंदी आणि हसत खेळत राहणाऱ्या एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली. ती म्हणते कलेचं जे काही माझ्यात आलं ते माझ्या आईमुळे. आई उत्कृष्ट कलाकार होती. तिची सुबकता, नीटनेटकेपणा, कल्पकता ,अभिरुची, तिने दिलेले कलेचे संस्कार, अगदी साध्या रोजच्या रांगोळीतून देखील लक्षात यायचे. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यावर तिने म्हटलेले सुमधुर स्तोत्र, तिची सकारात्मक विचार करण्याची सवय, होळीच्या वेळी आम्हा भावंडांना सोबत घेऊन केलेली चकोल्यांची माळ, या सर्व गोष्टी अंतर्मनात आणि अंगात नकळतपणे झिरपत गेल्या. यालाच दुसऱ्या पिढीकडे गेलेले संस्कार असे म्हणता येईल.

आईकडे घरी एक लोखंडी ट्रंक होती. दरवर्षी दिवाळीच्या आवरा सावरीत आई ती साफ करायची .आईच्या आईने तिला ती दिली होती .त्यामध्ये आजीने आईसाठी शिवणकाम, विणकाम, पेंटिंग चे नमुने ठेवले होते .तिच्या सफाईच्यावेळी नेहा दरवेळी आईच्या बाजूला बसून कुतूहलाने त्या पेटी मधील कलाकुसर न्याहाळायची. कदाचित कलेच्या पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे जाण्याचा तो सुंदर प्रवास असावा. नेहा म्हणते की वस्तू निट रचून त्यामध्ये डांबराच्या गोळ्या घालून आई पेटी बंद करायची. संस्काराची जपणूक नेहाला आईकडून मिळाली. आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात ती झिरपत गेली.

शाळेमध्ये असताना देखील नेहाला रांगोळी पेंटिंग या कलेत बक्षीसे मिळाली. आईच्या ते लक्षात आले. मग आईने त्याही काळातील आर्थिक ओढाताणीच्या परिस्थितीत, नेहाला ड्रॉइंग चे क्लासेस लावले. नेहा म्हणते त्यावेळी वडील आईजवळ 25 रुपये खर्चासाठी द्यायचे. घरची शेती होती. त्यामुळे वांगे टमाटे घरच्या शेतावरचे असायचे. नेहाची आई आठवडाभर वांग्याची आणि टमाट्याची भाजी करायची .मात्र वडिलांनी दिलेल्या पंचवीस रुपयातून 5 रुपये नेहाच्या ड्रॉइंगच्या क्लासची फी भरायची. त्या आठवणीने आजही नेहाचे डोळे पाणावतात .

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर तिने पेंटिंग चे क्लासेस लावले. कोर्सेस केले .त्यावेळी नेहाचा संपर्क विद्यार्थी परिषदेची आला. नेहा मुळातच खूप डॅशिंग होती. तिने हिंगणघाट येथे जाऊन दोन महिने परिषदेची विस्तारक म्हणून काम केले आहे. दरम्यानच्या काळात ती तिच्या कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी आणि यु आर म्हणून निवडून आली .वर्ध्यात महाविद्यालयीन जीवनात तिने त्यावेळी राजदूत आणि जावा या गाड्या चालविल्या आहेत. नेहाच्या घरी शेती असल्याकारणाने वडील दर शनिवारी शेतावर जायचे. नेहा आठवण सांगते की, त्यावेळी म्हणजे आजपासून साधारणपणे 25 ते 30 वर्षांपूर्वी, घरात भावंडांमध्ये मोठी असल्याकारणाने नेहा वडिलांसोबत शेतावर जायची. त्यांचे शेत घरापासून दहा किलोमीटर उबाट सुकळी येथे होते. नेहा स्वतः राजदूत चालवत वडिलांना मागे बसवून दर आठवड्याला त्यांना शेतावर घेऊन जायची. मला तर नेहा मध्ये साक्षात दुर्गेचेच रूप दिसते.

विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ निघण्यापूर्वी मी देखील 1 महिना वर्ध्याला विस्तारक होती. तेंव्हा मुक्काम नेहकडे होता. त्या वेळी तिच्या राजदू वर बसून आम्ही खूप फिरलेलो आहे. तिच्या प्रेरणेनेच मी देखील राजदूत पासून सर्व गाड्या चालवायला शिकली. या माझ्यासाठी सुखद आठवणीच आहेत. तेंव्हा पासूनची आमची मैत्री आहे. आता नागपुरात आल्यावर पुन्हा भेटी सुरू झाल्या.

पुढे लग्नानंतर वरोरा चंद्रपूर येथील वास्तव्यानंतर नेहाचा परिवार नागपूरला स्थायिक झाला. नागपूरला थोडे स्थिर झाल्यानंतर नेहाने लग्नानंतर प्रथमच वीस वर्षांनी पेंटिंगचा ब्रश हातात घेतला. फाईन आर्ट करावे अशी त्यावेळी तिची इच्छा होती. मात्र मुलं लहानआणि पारिवारिक जबाबदाऱ्यांमुळे तो विचार नेहाने बाजूला ठेवला .त्यावेळी पेंटिंगचा एक क्लास लावला. त्यानंतर नऊ दहा सुंदरशा पेंटिंग्सच्या फ्रेम तयार केल्या. त्यावेळी त्या पेंटिंग्स चे दर्डा गॅलरीत प्रदर्शन लावले .त्या प्रदर्शनाला प्रतिसाद अतिशय चांगला मिळाला. त्यानंतर नेहाने मागे वळून बघितले नाही. या प्रदर्शनानंतर तिला क्लासेस घेण्यासंबंधी विचारणा होऊ लागली .आवड आणि आर्थिक स्वावलंबन या दुहेरी विचाराने नेहाने नागपूरला स्वतःचे पेंटिंग क्लासेस सुरू केले .

नेहाच्या पेंटिंग मध्ये मुख्यतः भारतीय कला हा तिचा आवडता विषय आहे. विशेषतः बिहार ,मध्य प्रदेश, राजस्थान येथील लोक कलांनी ती आणि तिचे पेंटिंग्स अतिशय प्रभावीत आहेत.

नागपूरच्या अनेक शाळा कॉलेजेस मध्ये तिने पेंटिंग्ज चे आतापर्यंत अनेक वर्कशॉप घेतले आहेत .हळूहळू नागपूरकरांना तिच्या पेंटिंग्स बद्दल माहिती होऊ लागली. पेंटिंग च्या माध्यमातून अर्थार्जनासोबत नेहाने सामाजिक आयामही जोपासलेला आहे. तिचे अनेक वर्कशॉप काही शाळांमध्ये व काही वस्त्यांमध्ये विनाशुल्क आयोजित झालेले आहेत .

नेहाने आजपर्यंत अनेक पेंटिंग प्रदर्शने आयोजित केलीत. ती सांगते की सुरुवातीला तिच्या प्रदर्शनांवर टीका झाली. कारण नागपुरात अशी पद्धत होती की ,विकत घेतलेले पेंटिंग्स चे प्रदर्शन लावल्या जायचे. मात्र टीकेकडे नेहाने दुर्लक्ष केले. आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले. तिच्या विद्यार्थ्यांचे काम प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले. त्यासाठी “आर्टिस्टिका कलेक्टिव्ह” या नावाने प्रदर्शन आयोजित केले. ते केवळ नवोदित विद्यार्थ्यांसाठी .नंतर लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत गेला. दरम्यानच्या काळात नेहाला कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. चार पाच महिन्यांचा तो कठीण काळ होता .परंतु त्यावर देखील मात करून नेहाने आपल्या पेंटिंगची घोडदौड सुरूच ठेवली .

कोरोना काळात नेहाने पेंटिंग चे विनामूल्य जवळपास वीस ऑनलाइन वर्कशॉप आयोजित केले. प्रयत्न हाच होता की नकारात्मक वातावरणात लोकांना कलेच्या माध्यमातून सकारात्मक दिलासा मिळावा. खरं म्हणजे त्यावेळी तिला ऑनलाइन वर्कशॉप चा गंधही नव्हता. परंतु सामाजिक जाणिवेमुळे याही वयात मुलांकडून सर्व तंत्रज्ञान शिकून ,नेहाने त्याचे ज्ञान मिळविले, आणि वीस यशस्वी ऑनलाइन पेंटिंग वर्कशॉप चे आयोजन केले .

नेहा कडून हिंदी सिनेतारका ,सुधाचंद्र यांनी पेंटिंग ची साडी बनवून घेतली आहे .तसेच मराठी सिनेतारका मधुराणी गोखले- प्रभुलकर आणि सुरेखा तळवलकर यांनीही साड्या बनवून घेतल्या आहेत. असे म्हणता येईल की, या सेलिब्रिटीज मुळे नेहाच्या यशात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे .

नागपूर येथे सहा ऑगस्ट रोजी झालेल्या दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी निमित्त, उद्घाटन पर कार्यक्रमात नेहाने दत्ताजींचे हुबेहूब कॉफी पेंटिंग चे स्केच तयार केले. त्या पेंटिंग मुळे कार्यक्रमातील मान्यवर, डिडोळकर परिवारातील सदस्य , सर्वच परिषद कार्यकर्ते, यांचे नेत्र सुखावले. माननीय नितीनजी गडकरी यांनी आपल्या भाषणात नेहाच्या कॉफी पेंटिंगचा उल्लेख देखील केला. या घटनेचा फार मोठा आनंद नेहाला झालेला आहे.

सध्या नेहाच्या क्लासमध्ये 12 विद्यार्थिनी आहेत. नेहा म्हणते की मुलींना तर ती शिकवतेच परंतु मुलींचे अर्थार्जन देखील होते. मुली आर्थिकरित्या काही प्रमाणात स्वावलंबी होतात .आर्थिक स्वावलंबनाची ही एक साखळीच आहे. त्याचा आधार आहे नेहा. दोन-तीन वर्षांपासून नेहाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि लोककला आम्ही लोकांच्या घराघरात पोहोचवितो याचे तिला फार मोठे समाधान आहे .

नेहाच्या पेंटिंग्स चा अनेक फॅशन शोमध्ये सहभाग राहिलेला आहे .कपड्यावर केलेले पेंटिंग दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे .त्याचे सर्वस्वी श्रेय नेहाला जाते.त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ती म्हणते फॅशन शो असला तरी पेंटिंगची साडी घालून माझी मॉडेल जेव्हा रॅम्पवर चालते ,तेव्हा लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो .लोकांच्या आवडी भारतीय संस्कृतीकडे वळत चालल्या आहेत ,ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे .साडी हे भारतीय संस्कृतीचे अतिशय सुंदर प्रतीक आहे. त्यातील सौंदर्य मनमोहून टाकते .

नेहाची तीव्र इच्छा आहे की, तिने पेंटिंग केलेली साडी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी घालावी .त्यांना एक साडी करून द्यावी असा तिचा मानस आहे .तो लवकरच पूर्ण व्हावा असे मला देखील वाटते .नेहाच्या आजपर्यंतच्या पेंटिंगच्या यशस्वी प्रयोगांसाठी आणि कार्यासाठी तिचे मनापासून अभिनंदन. आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा……

ऍड मनिषा कुलकर्णी
नागपूर
9823510335

एड. मनीषा कुलकर्णी

लेखिका प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असून, अनाथ बालक - बालिकांसाठी अनाथाश्रमाच्या माध्यमातून सेवा कार्य करतात. मोबाईल नं - 9823510335

Comments (0)
Add Comment