नेताजी ….

नेताजी ….

१९४२ च्या पूर्वसंध्येला लुई फिशर या अमेरिकन पत्रकारांशी संभाषण करतांना गांधींजीनी सुभाषचंद्र बोस यांना “देशभक्तांचे देशभक्त” असे संबोधले. त्यांचा या संबोधनात दडलेला होता नेताजींचा २६ वर्षाच्या अथक प्रयत्न ज्यातून देशाच्या स्वतंत्र लढ्याला गती मिळाली. आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनात याच “नेताजी” शब्दाची चांगलीच भीती बसलेली होती. जपान, जर्मनी, इटली या सारख्या दुसऱ्या महायुद्धात बलाढ्य राष्ट्रांच्या राष्ट्र अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून परिस्थितीचा आढावा घेऊन भारताच्या स्वतंत्र लढ्यात सामील होण्यास आणि मदत करण्याचे आवाहन एकमेव नेताजी यांनी केले. त्या काळातील सर्वात उत्कृष्ट सैन्य तुकडी पैकी आझाद हिंद सेनेतील “आझाद ब्रिगेड” हि तुकडी होती. ज्याची मदत खुद्द जपान ने दुसऱ्या महायुद्धसाठी नेताजी यांना मागितली. एवढ्या मोठ्या सेनेचे संघटन करणे, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्ष म्हणून कार्य पार पाडणे. “अर्जी हुकूमत ए आझाद हिंद” या नावाने स्वतंत्र भारताचे पहिले हंगामी सरकार स्थापन करणे. बर्लिन येथे फ्री इंडिया सेंटर ची स्थापना करणे,आझाद हिंद रेडिओ चालवणे तसेच “द इंडियन स्ट्रगल” या पुस्तकाचे लिखाण करणे. या नेताजींच्या सर्व कार्याची सुरुवात होते ….१९२० पासून

अत्यंत बुद्धिमान, बलदंड असलेले नेताजी यांचा नेतृत्व गुण कॉलेज काळातच उमजू लागला. १९२० मधे इंग्लंड मधील आपला अभ्यास पूर्ण करून अत्यंत कठीण अशी आयसीएस (ICS) परीक्षा उत्तीर्ण केली. त्या वर्षी पास झालेल्या ६ भारतीयांपैकी ४ था क्रमांक नेताजींचा होता.
गांधीच्या आग्रहामुळे १९३८ च्या हरिपूर अधिवेशनात नेताजींची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आली.. मात्र हे गांधींचे प्रेम सुभाष बाबू वर काही फार काळ टिकले नाही. कारण नेताजींची अतिजहाल पद्धत गांधींच्या अनुयायांना मान्य नव्हती. मात्र तरीही नेताजींनी महात्मा गांधींवरची श्रद्धा कुठेही कमी झाली नाही. काही काळातच नेताजींच्या “काँग्रेस हे संघराज्याच्या प्रश्नाबाबत ब्रिटिशांशी तडजोड करतेय” अश्या जहरी टिकेमुळे १२ सदस्यांनी राजीनामा दिला ..यात नेहरू सुद्धा नेतांजीवर नाराज होते मात्र त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस केले नाही आणि सार्वजनिकरित्या विरोधही केला नाही. मात्र गांधींना आता सुभाषबाबू नकोसे वाटत होते…. गांधी – बोस विवाद खरेतर राजकीय वस्तुस्थितीबाबतचे विभिन्न आकलन व चळवळ सुरू करण्यासाठी काँग्रेसच्या बळकट व कमजोर बाजूंच्या विभिन्न मूल्यमापनावर आधारलेला होता.
अनेक मतभेदांमुळे काँग्रेस मधे काम करणे नेताजींना कठीण होत होते शेवटी त्यांनी काँग्रेस अंतर्गत “फॉरवर्ड ब्लॉक” हा नवीन पक्ष स्थापन केला. मात्र या मध्ये सुद्धा त्यांना देशकार्य करणे सोपे नव्हते…शेवटी काँग्रेस ने त्यांना बंगाल प्रांत समितीच्या अध्यक्ष पदावरून हटविले आणि पुढील ३ वर्ष कुठलेही काँग्रेस चे पद धारण करण्यात प्रतिबंधित केले. आणि या सर्व घडामोडी मुळे नेताजींनी आपला देश स्वतंत्र करण्याचा मार्ग बदलला.
ब्रिटिशांनी नजरकैद केल्यावर १९३९ मधे पठाणचे वेश घालून ते बंगालच्या आपल्या घरातून पेशावर , काबूल, मॉस्को, रोम मार्गे जर्मनीत पोहोचले… आणि या प्रवासात त्यांनी कितीतरी वेश बदलले. अनेक भाषेचे ज्ञान त्यांना होते. याचा फायदा त्यांना त्यावेळी झाला

दुसऱ्या महायुद्धच्या पार्श्वभूमीवर हिटलर हा जगातील सर्वात क्रूर नेता म्हणून ख्याती प्राप्त होता… हिटलर ने स्वतःचे ४ हुबेहूब प्रतिकृती असलेले व्यक्ती तयार केले होते ..त्यामुळेच हिटलर चा सुगाव कुणालाच लागत नसे. आणि हिटलर समोर जाणे म्हणजे जीव मुठेत घेऊन जाण्यासारखे ..अश्या ह्या हिटलर ला भेटण्यासाठी नेताजी गेले. मात्र हिटलर फार कोणाशी भेटत नसे मात्र नेताजींना भेटण्याचा आग्रह त्याने सुद्धा केला आणि शेवटीं मे १९४२ मधे नेताजी आणि हिटलर यांची इतिहासिक भेट झाली. नेताजी अगदी गंभीर स्वरात आत्मविश्वासाने हिटलरला आपल्या भारत भूमिला इंग्रजापासून स्वतंत्र करण्यासाठीं मदत मागित होते. त्यांची देशाप्रती करुणा बघून हिटलर सुद्धा भावूक झाला…नेताजींनी “my motherland india” असा उल्लेख केल्यावर हिटलरने विचारले की तुम्ही motherland का म्हणताय तेव्हा नेताजींचे उत्तर ऐकण्यासारखे होते.. ते म्हणाले या संपूर्ण देशातील लोकांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा करण्याऱ्या आई ला मातृभूमी नाही म्हणायचे तर काय म्हणायचे ? त्यांचे उत्तर ऐकून हिटलरने सुद्धा “माझी मातृभूमी जर्मनी” असा उल्लेख केला होता…पुढे नेताजींनी सोव्हिएत रशिया मार्गे आझाद हिंद लिजनला अग्रभागी घेऊन नाझी लष्कराच्या सहाय्याने भारतावर हल्याची योजना आखली मात्र हिटलरने रशिया वरच हल्ला चढवला, आणि हा नेताजींचा इंग्रजां विरुद्ध बेत मुकला. आणि येथूनच रासबिहारी बोस यांनी नेताजींना जपान ला बोलावले.
हिटलरने आझाद हिंद सेनेला जी शस्त्रे दिली तीच शस्त्रे आझाद हिंद फौजेने वापरली आणि रंगून च्या युद्धात इंग्रजांना अक्षरशः हाकलून लावले, या लढाईत रंगूनमध्ये ५ हजारहून अधिक ब्रिटिश सैनिक मारले गेले होते. आणि त्यानंतरच इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला

१९४३ ला जपान चे पंतप्रधान तोजो हिदेकी यांची भेट नेताजींनी घेतली… जपान च्या पंतप्रधानांना आपल्या विचारात घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. इथे काही चर्चा करून पुढे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व सिंगापूर येथे नेताजींनी स्वीकारले . एवढ्या खडतर मार्गाने आणि स्वतःचा जीव मुठीत घेऊन हा नेता संपूर्ण जग भर फक्त देशाला स्वतंत्र देण्यासाठी दारो दारी मदतीसाठी फिरत होता… त्यांचा आत्मविश्वास हा खरोखर हिमालय सारखा प्रचंड होता.

प्रचंड संघटन कौशल्य, शिस्तबद्धता असलेले नेताजी जेव्हा खूप व्याकूळ झाले होते. तेव्हा भारतात असतांनी अनेक देशभक्तांच्या भेटी त्यांनी घेतल्या होत्या. मात्र त्यातील एक भेट हि खूप महत्त्वाची होती मात्र ती अपूर्ण ठरली याचे दुःख सागराच्या पाण्यात पडलेल्या त्या आकाशातील थेंबा प्रमाणे आहे. ती भेट म्हणजे आद्य सरसंघचालक प पू. डॉ हेडगेवार यांची होती …नेताजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिला अनुभव आला, ते ट्रेनमधून प्रवास करत होते. महाराष्ट्रातून जात असताना, त्यांनी ट्रेन च्या खिडकीतून स्वयंसेवकांना एकसमान परेडिंगमध्ये पाहिले. स्वयंसेवक ज्या संस्थेचे होते त्या संघटनेची चौकशी केल्यावर त्यांना कळले की ती संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होती आणि तिचे संस्थापक दुसरे कोणी नसून त्यांचे काँग्रेस पक्षातील सहकारी डॉ हेडगेवार होते. स्वयंसेवक ज्या शिस्तीने कूच करत होते ते पाहून ते भारावून गेले आणि त्यांना भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या फौजांसारखेच वाटले. त्यांनी डॉ हेडगेवारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि जून १९४० मध्ये नागपुरात त्यांची भेट घेतली. इतिहासकारांचा असा युक्तिवाद आहे की नेताजींना “राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर” भेटण्याची इच्छा होती. विद्वानांचा दुसरा गट असा युक्तिवाद करतो की नेताजी स्वातंत्र्यलढ्यातील संयुक्त प्रयत्नांसाठी INA आणि RSS यांची युती करण्याचा विचार करत होते. मात्र, डॉक्टर हेडगेवार गंभीर आजारी असल्याने ते बोलू शकले नाहीत. नेताजींनी त्यांना जास्त त्रास न देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी शब्दांची देवाणघेवाण न करता तेथून निघून जायचे ठरवले. दुर्दैवाने, ज्या आठवड्यात दोन महान नेते “राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यावर” बोलण्यासाठी भेटू शकले त्याच आठवड्यात डॉ हेडगेवार यांचे निधन झाले.
दिल्ली संघ कार्यालयात या बैठकीचे एक पेंटिंग आहे, जिथे दोघे एकत्र होते पण बोलू शकत नव्हते, आठवण म्हणून ती प्रतिमा भिंतीवर टांगले आहे.

एक प्रसंग असा येतो की १९५५ ला एका पत्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल प्रश्न विचारल्यावर आंबेडकर यांनी उत्तर दिले की इंग्रज हे फक्त नेताजींच्या आझाद हिंद सेनेमुळे आणि नेताजींमुळे आपला देश सोडून गेले… १९४२ “भारत छोडो आंदोलन” हळू हळू कमजोर होत चालले होते. इकडे दुसऱ्या महायुध्दात मित्र राष्ट्र जिंकत होते. आणि भारताची साधन संपत्तीची गरज इंग्रजांना युद्ध काळामुळे अत्यावश्यक होती. त्यामुळे भारताचे स्वतंत्र अजून १५ वर्ष दूर होते. इंग्लंड चे पंतप्रधान अँटली यांनी १९५० ला न्यायाधीश बी. बी चक्रवर्ती यांच्याशी चर्चा करतांनी “आम्हाला INA आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मुळे देश सोडावा लागला”… असे वक्तव्य केले होते.
त्यामुळेच १९४५ नंतर इंग्लंड च्या असेंबली मधे १९४८ च्या पूर्वीच कुठल्याही परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. ..त्याचे फलित म्हणजे आपला देश स्वतंत्र झाला. अश्या थोर नेताजींना मध्यकाळात अनेक राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी इतिहासातून मिटवण्याचे देशद्रोही कृत्य केले.

१८००० सैन्य असलेली आझाद हिंद सेना नेताजींच्या नेतृत्वात वाढतच होती. नेताजी यांनी ४ ब्रिगेड सुरू केल्या होत्या त्यापैकी गांधी ब्रिगेड , नेहरू ब्रिगेड ,आझाद ब्रिगेड आणि सुभाष ब्रिगेड ह्या होत्या..वरील गांधी-नेहरू ब्रिगेडच्या नावावरून आपल्याला लक्षात येईल की नेताजींचे नेहरू- गांधी वर प्रेम कायमच होते मात्र नेताजींना काँग्रेस मधून काढून टाकण्याची कारण आणि नेताजींचा एवढा विरोध का बरं होता ? याचे उत्तर इतिहासालाच माहिती… महिला साठी सुद्धा राणी लक्ष्मी बाई रेजिमेंट ची स्थापना नेताजींनी केली होती. या रेजिमेंट मधे अनेक भारतीय महिला सैनिक भरती झाल्या होत्या त्यापैकी लक्ष्मी सहगल यांनी कॅप्टन म्हणून कार्य केले होते.
२१ ऑक्टोंबर १९४३ रोजी सिंगापूर येथे “अर्जी हुकूमत- ए – आझाद हिंद” या नावाने स्वतंत्र भारताचे पहिले हंगामी सरकार स्थापन केले व आझाद हिंद सेनेला सरकारचे लष्कर म्हणून घोषित केले, जपान इटली, जर्मनी सोबत १३ राष्ट्रांनी या सरकारला मान्यता दिली …अश्या रीतीने नेताजी देशाचे पहिले पंतप्रधान झाले. मात्र त्या काळातील काँग्रेस या सरकारला मान्य केले नाही. सिंगापूर हे त्या काळात या सरकारची तात्पुरती राजधानी ठरली …ध्वज ठरला, राष्ट्रगान ठरले, चलन ठरले.
जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार हे बेट जिंकून घेतले आणि यावर आपल्या सरकारचा तिरंगा फडकवला . त्या अनुक्रमे या दोन्ही बेटाचे नाव शहीद व स्वराज ठेवण्यात आले. पुढे दिल्ली काबीज करून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचे धोरण ठरले आणि त्यावर कार्य सुद्धा सुरू झाले.
मणिपूर जवळील मोइंरंग मोवडोक हे इंग्रजांचे ठाणे काबीज केले पुढे कोहिमा मोहीम राबवली ती यशस्वी केली. इंफाल मोहीम चालवली अश्या अनेक मोहिमा पूर्ण करत आझाद सेना पुढे पुढे निघत होती आणि देशाला ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त करीत होते… शेवटी या मोहिमेला ग्रहण लागले.. १९४५ रोजी नेताजी एका लष्करी विमानाने सायगाव वरून टोकियो ला जात असताना विमान अपघात झाला ….त्यात त्यांचा मृत्यू झाला असे मानले जाते मात्र अजूनही त्यांच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे.

नेताजींचे मृत्यूचे कळताच २३०० आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर खुनाचा आणि देशद्रोहाचा गुन्हा ब्रिटिशांनी लावला आणि ही मोहीम खंडित केली….. खरोखरच त्या काळात थोडीशी मदत जर राष्ट्रीय नेतृत्वाने नेताजींच्या या सरकारला केली असती तर देश स्वबळावर स्वतंत्र झाला असता यात यत्किंचितही शंका नाही…

सुभाष बाबू आजही अनेक भारतीयांच्या मनात आपले घर करून आहेत… एवढ्या उच्चाकोटीचे व्यक्तिमत्त्व, देशभक्तांचे देशभक्त आणि देशभक्तांमधील राजपुत्र असे नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील …
सुभाष जी सुभाष जी …जान ए हिंद आप है
सुभाष जी सुभाष जी …शान ए हिंद आप है

भारत माता की जय …!

ॲड.संकेत राव

लेखक गौरवशाली इतिहास , इस्लाम धर्माचे तसेच कायद्याचे अभ्यासक आहेत.

Comments (0)
Add Comment