पाणी ,नाणी आणि वाणी जपून वापरा !!
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून “ पाणी,वाणी आणि नाणी जपून वापरा “ हा संदेश दिला आहे.म्हणूनच तर जलपूजन ,लक्ष्मीपूजन आणि सरस्वती पूजन आपल्या संस्कृतीत पूर्वापार आहे.वरील तिन्ही बाबी आपल्या जीवनात गरजेच्या आणि महत्वाच्या आहेत.पण नवीन पिढीला या तिन्ही बाबींचे महत्व अजूनही कळले नाही.खरं म्हणजे ही म्हण नसुन जगद्गुरू तुकोबांनी दिलेला हा दूरगामी विचार आहे.आनंदी जीवनाचा मंत्र आहे.निश्चिंतता देणारा मार्ग सोपान आहे.
“ पाणी जपून वापरा “ हा संदेश किती महत्वाचा हे आता आपल्याला थोडेफार कळू लागले आहे.पाण्याचे दुर्भिक्ष भविष्यात येणार आहे याची जाण जुन्या जाणत्या लोकांना त्या काळात होती ज्या काळात म्हणावी तितकी पाण्याची चणचण नव्हती.त्याकाळात दिलेली धोक्याची सूचना आज ती प्रत्यक्षात अनुभवाला येते आहे.पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.संपूर्ण देशात घरापर्यंत येणारे नळाचे पाणी सात सात दिवसानंतर येते.बऱ्याचदा दुषित पाणी येते.त्यामुळे स्वास्थ्याचे प्रश्न उत्पन्न होतात ती अजुन एक वेगळीच समस्या.
आपल्याला पाण्याचे दुर्भिक्ष कळते पण अजूनही ते वळत नाही हे आपले दुर्दैव.” पाणी जपून वापरा “ हा फक्त भिंतीवरचा सुविचार झाला.प्रत्यक्षात अंघोळीसाठी ,शौचालयात,धुण्याभांड्यासाठी पाण्याचा होणारा अपव्यय ही गंभीर आणि चिंताजनक समस्या बनली आहे.नळाला तोट्या नसणे,आपले पाणी भरुन झाल्यावर पाईप नालीत किंवा संडासात सोडणे सारेआम झाले.पाण्याचा अपव्यय करतांना कुठलीही लाजलज्जा किंवा भीती आपल्याला वाटत नाही.पुढील “ युध्द “ पाण्याचे हे तज्ञमंडळी आतापासून सांगत आहेत तरी देखिल “मन आणि बुद्धी “ बोथट झाल्यामुळे आपण पाण्याबाबत असंवेदन झालो आहोत.पाणी सहज आणि मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध होते म्हणून वापरा बेसुमार ही मानसिकता घातक आहे.
खरं म्हणजे हल्ली आपल्याला लिटर मागे २० रुपये मोजावे लागतात.आपल्याला दिवसाला किमान ५० लिटर पाणी प्रतिव्यक्ती लागते.म्हणजे प्रत्येक माणूस दिवसाला १००० /५०० रुपयाचे पाणी वापरतो.” पाणी का मोल पहचानीये “ , “ थेंब पाण्याचा ,लाख मोलाचा “ ही केवळ पोपटपंची ठरत आहे.त्यामुळे पाण्याचा अपव्यव टाळण्याचा संदेश या म्हणीतून दिला आहे.”जल है तो कल है “ हे आपण नेहमीच म्हणतो पण तरीही बेजवाबदार वागतो.लक्षात ठेवा ! पाण्याची जागा पेट्रोल किंवा रॉकेल घेवूच शकत नाही.तहान भागविण्यासाठी पाणीच पाहिजे गोडेतेल किंवा सुगंधी तेल काहीच उपयोगी नाही.म्हणूनच तर पाणी जपून वापरण्याचा सल्ला पूर्वजांनी दिला आहे.
यातील दुसरा मुद्दा म्हणजे नाणी जपून वापरण्याचा सल्ला पुर्वसूरींनी आपल्याला दिला. नाणी म्हणजे पैसा. पाण्याचा जसा अतोनात वापर आपण करतो त्याचप्रमाणे पैशाची उधळपट्टी हल्ली चालली आहे.भविष्याची चिंता तर नाहीच उलट “आमदनी अठ्ठनी आणि खर्चा रुपय्या “हेच घराघरात झाले आहे.पैसा जपून वापरणे अत्यंत गरजेचे आहे.खरं सांगू ! संचयी वृत्ती हा माणसाचा मुळ गुणधर्म आहे.पुर्वी “पै पै गोळा “ करण्याची आपली सवय होती पण कोणते संस्कार झाले नव्या पिढीवर समजत नाही . आता संचय,जमापुंजी तर सोडाच उलट बेसुमार खर्च करायचा त्यांचा रोजचा भाग झाला.घरी केलेला स्वयंपाक वाया घालायचा आणि पावभाजी , पिझ्झा ,पुलाव विकत आणून खायचा.
भविष्याचा विचारच नाही.” ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत् “ ही प्रवृत्ती बोकळली. कर्ज काढून चैन करायची परिणामी आपण जीवनातली सुख आणि शांती हरवून बसलो.
पैसा जपूनच वापरला पाहिजे. केंव्हा कोणता प्रसंग येईल हे सांगताच येत नाही.संकट,अचानक आजार अशावेळी पैसाच कामी येतो. सध्या तर “ पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी पण नाही ”.
प्रसंगी पैशाचे काम पैसाच करतो इतर बाबी उपयोगाच्या नाही. म्हणून थोडी पुंजी जवळ असलीच पाहिजे.
बहुतेक लोक “आणली पायली की केली वायली “ याच भूमिकेत असतात.इतकी उधारी करुन ठेवतात की पगार बँकेतून काढला की वाटत वाटतच घरी पोचतात.लक्ष्मीला घरापर्यंत देखिल नेत नाहीत.मग घरात राहते ती अलक्ष्मी म्हणजे अवकळा आणि आवदसा .पैसा बाळगून राहणे गरजेचे आहे.” मरावे परी कीर्ती रुपे उरावे “ ही म्हण आपण ऐकली आहे आता “ मरावे परी किती रुपये उरावे “झालंय .अर्थात पैशासाठी भ्रष्ट मार्ग नको.आलेला पैसा इष्टमार्गाने आलेला आणि घामाचा हवा हे महत्वाचं आहे.
म्हणून तर जुनी माणसे सांगायची “नाणी “ जपून वापरा.
पाणी आणि नाण्यापेक्षाही वाणी जपून वापरणे आवश्यक आहे.कठीण आहे पण अशक्य नाही.
वाणी म्हणजे आपले बोल,आपले शब्द जपून वापरणे आवश्यक आहे.”शब्द हे शस्र आहेत ते जपून वापरा “ अशी म्हणच आहे.शब्दाचा बाण एकदा सुटला की तो परत घेता येत नसतो.शस्त्राचे घाव भरतात पण शब्दांनी झालेले घाव कायम भळभळत असतात.विशेष म्हणजे आपण बोलू तसे उत्तर येते.”आरे ला कारे “ होतेच.तुम्ही गोड बोला समोरचाही गोडच बोलतो.शब्दांचा तीर मागे घेता येत नाही.अस म्हणतात “ अंधाचा पुत्र अंध “ या एका सहज शब्दाने महाभारत घडले.म्हणून वाणी जपून वापरली पाहिजे.
शब्दांनीच युध्द पेटतात आणि शब्दच समेट घडवतात.शब्दांनीच स्फुलिंग जागे होते आणि शब्दांनीच राखरांगोळीही.भारतीय तत्वज्ञान संवादावर आधारित आहे.भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या शब्दसंवादातून जगाचे तत्वज्ञान “ श्रीगीता “ उद्भवले .धनानंद आणि विष्णुगुप्त चाणक्य यांच्या वादसंवादातून राष्ट्रआराधन करणारी पिढी निर्माण झाली.राष्ट्रमाता जिजाऊ आउसाहेबांच्या शब्दांनी छत्रपती शिवराय निर्माण झाले.
वाणी जपून वापरली तर सत्यम् शिवम् सुंदरम् होते आणि वाणीच्या स्वैर वापराने घराणी उध्वस्त होऊन जीवन स्मशान आणि काळरात्र बनते.आनंद आणि आघात हे शब्दांचेच प्रादुर्भूत आहेत नव्हे ती शब्दोत्पत्तीच आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणूनच तर स्पष्ट सांगतात –
तात्पर्य वाणी,नाणी आणि वाणी अनमोल आहेत.त्यांचे मूल्य ओळखून जपून वापर करावा.
विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
९८२२२६२७३५