२२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेला पहलगाम हल्ला हा जिहादी आतंकवादी रणनीतीतील लक्षणीय बदल अधोरेखित करतो. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ने या हल्ल्याची कथित जबाबदारी स्वीकारली असली, तरी ती फक्त धूळफेक आहे. यामुळे लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि पाकिस्तान आपले हात झटकू शकतात. संरक्षणतज्ज्ञांच्या मते, काश्मीरमधील निशस्त्र पर्यटकांवर केलेला हा हल्ला म्हणजे पाकिस्तानचा काश्मीर खोऱ्यातील कायदा, सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा हताश प्रयत्न आहे.
टीआरएफ ही स्थानिक संघटना असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचेल अशा प्रकारचे हल्ले ते करणार नाहीत. त्यामुळे, हा हल्ला पाकिस्तानी आतंक्यांचाच आहे, हे उघड आहे. यापूर्वी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला धार्मिक हेतूने होता, परंतु हा हल्ला आर्थिक अस्थैर्य निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांचे बुकिंग रद्द होतील, हॉटेल्स रिकामी राहतील, स्थानिक व्यवसाय ठप्प होतील, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल – जे पाकिस्तानला अपेक्षित आहे.
हल्ला सुरू असतानाच उरीमधील सरजीवन नाल्यात घुसखोरी झाली, ज्यात दोन आतंकवादी ठार झाले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला. त्याचवेळी ताडडी पोस्टसमोरील घुसखोरांवर भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत १२ पाक सैनिक ठार केले आणि चार तोफा व सहा बंकर्स उद्ध्वस्त केले. एकीकडे आतंकवादी हल्ला आणि दुसरीकडे पाक आर्मीच्या छत्रछायेखाली घुसखोरी – हे फक्त योगायोग नसून ही एक समन्वयित योजना होती, हे स्पष्ट होते.
पहलगाम हे अनंतनागच्या पूर्वेला ३० किमीवर वसलेले पर्यटनस्थळ आहे. त्यातील बैसरन कुरण शांत, निसर्गरम्य आणि चित्रपटसृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांचा धर्म तपासून हिंदूंवरच गोळीबार केला. एका महिलेनुसार, तिच्या पतीला ठार मारून तिला “मोदींना हे सांग” असे म्हणत जिवंत सोडण्यात आले. टीव्ही फुटेजमध्ये मृतदेह, रडणाऱ्या महिला आणि धावपळ दिसून येते.
हल्ल्यानंतर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहिम सुरू केली. परंतु हल्ल्याच्या वेळी तिथे पोलिस बंदोबस्त नव्हता. स्थानिक गाईड, पोनी राईडवाले, अन्नविक्रेते हेच पर्यटकांची माहिती आतंक्यांपर्यंत पोचवत असावेत, अशी शंका आहे. त्यामुळे स्थानिकांची कसून चौकशी होणे आवश्यक आहे.
हा हल्ला फक्त लष्करी नव्हे, तर वैचारिक युद्धाचा भाग आहे. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर पाकिस्तानने अनेक आघाड्यांवर भारताविरोधात प्रयत्न केले, परंतु काश्मीरमधील शांतता, पर्यटनवाढ आणि निवडणुकांमुळे तो चवताळला आहे. अशा वेळी भारतात हल्ला करून त्याचे लक्ष विचलित करणे हे पाकिस्तानचे उद्दिष्ट असू शकते.
या हल्ल्यामागील संभाव्य कारणे खालीलप्रमाणे:
१. सुधारित कलम ३७० नंतर जिहादी हालचालींचा उधळपट्टा झाल्याने खोऱ्यातील शांतता भंग करण्यासाठी हल्ला झाला. २. पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या विधानाचा प्रभाव दाखवण्यासाठी आयएसआयचा सहभाग. ३. अमेरिकन उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांच्या भारत भेटीदरम्यान अशा हल्ल्यांची परंपरा. ४. सौदी अरेबियाशी संबंध दृढ करण्यासाठी इस्लामी झुकाव दाखवण्याचा प्रयत्न. ५. तहव्वूर राणावर चालू असलेल्या चौकशीवर दबाव.
या वेळी विशेष बाब म्हणजे धर्माच्या आधारावर “सॅग्रिगेटेड अटॅक” झाला. ही गोष्ट आधी केवळ एकदाच – २००० मध्ये छत्तीसिंगपुर येथे ४० शीखांच्या संहाराच्या वेळी – घडली होती.
आंतरराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून भारत सरकारने कठोर प्रतिसादाची तयारी केली आहे. यामध्ये मुत्सद्दी, आर्थिक, सामाजिक आणि लष्करी उपायांचा समावेश आहे, जसे की:
-
पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडणे.
-
हाय कमिशनरची हकालपट्टी.
-
इंडस वॉटर ट्रीटी रद्द करणे.
-
पाकिस्तानमधील नागरिकांसाठी व्हिसा बंद करणे.
-
करतारपूर कॉरिडॉर व अन्य सीमावर्ती सेरेमनी बंद करणे.
-
पाकिस्तानी वस्तूंवर व्यापार बंदी.
-
भारतीय हवाई हद्द पाकिस्तानसाठी बंद करणे.
लष्करी कारवाईबाबत कोणतीही माहिती उघड केली गेलेली नाही, कारण हे निर्णय वेळ, जागा व हेतूनुसार गोपनीय ठेवले जातात. “नी-जर्क रिअॅक्शन” न करता, धैर्याने व शहाणपणाने पावले उचलणं गरजेचं आहे. वॉर ऑन टेरर मध्ये “बदला” थंड डोक्यानेच घेतला जातो.