पांघरूया थंडी गुलाबी. 

पांघरूया थंडी गुलाबी. 
           लपेटून थंडीची शाल
           नटली सजलीय धरा
           खाऊ गरम पक्वान्नं
           मिळवू पोटास उबारा
         
शरदाची चाहूल लागताच साऱ्या चराचराला आनंद होतो. थंडीचा महिना आला म्हणजे “आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा” या  लावणीची हमखास आठवण येते. आमच्या बालपणी मुले-मुली सकाळी उठले की सारे जमून अंगणात शेकोटी पेटवत असायचो. आजूबाजूला पडलेले कागद, पालापाचोळा गोळा करून त्यात टाकत असू. त्याला “म्हातारी” म्हणायचो. प्रत्येकाने थोडी थोडी म्हातारी आणून टाकल्याने शेकोटी चांगलीच पेटायची. मग अंगाला उबारा देत गप्पांची मैफल जमायची. काहीवेळा गाण्याच्या भेंड्या खेळल्या जात. आम्ही साखर कारखान्याच्या परिसरात राहत होतो. त्यामुळे ऊस खाऊन टाकलेल्या चुयट्या दिवसभराच्या उन्हाने वाळत. मग आम्ही त्या गोळा करून ठेवत असायचो. शेकोटीत म्हातारी म्हणून टाकल्या जात. शेकोटीत बराच वेळ त्याची धग राहायची. अंगात बऱ्यापैकी उब आली की आम्ही स्नानादि  काम उरकत असू. आईच्या तोंडाचा पट्टा हाका मारण्यासाठी अधून मधून  सुरूच असायचा. कितीही वेळ शेकोटी घेतली  तरीही अंघोळ करताना कपडे काढले की थंडीने अंगावर शहारा यायचा. मग आई, आजी गरम गरम पाण्याने आम्हाला आंघोळ घालत. शरीराची हालचाल सुरू झाली की थंडी आपोआप पळून जायची मग उन्हाची कोवळी किरणे पडू लागली की आजोबा-आजी उन्हाला बसत. सोबत लहान बाळांना कोवळी उन्हं मिळण्यासाठी घेऊन बसत.
              पांघरूया थंडी गुलाबी
               मदमस्त असा गारवा
               घेऊया शाल लपेटूनी
               सुटताच थंडगार हवा
                   शाळा दुपारची असल्यामुळे आम्ही देखील निवांत असायचो. मग आम्ही त्यांच्याजवळ गुळ शेंगदाणे खात अंगावर उन्हं झेलत बसायचो. त्यावेळी जीवनसत्वांचे आपोआपच पोषण होत असे. त्यामुळे विटामिनच्या गोळ्या खाण्याची आमच्यावर कधीच पाळी आली नाही. हाडांमध्ये जीवनसत्त्वाचा योग्य पुरवठा झाल्याने किती वेळा पडलो, झडलो तरीही कधी हाड मोडल्याचे आठवत नाही. हल्ली शहरात गगनचुंबी इमारतीमुळे सकाळचे दहा वाजले तरी सूर्य किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच शहरात अंगण हा प्रकार नसल्याने मुलांना ड जीवनसत्व जे हाडांच्या वाढीसाठी उपयुक्त असते ते पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे जरा पडले झडले तरी हाड मोडण्यासारखे प्रकार वरचेवर पाहायला मिळतात. ड जीवनसत्व हे सूर्याच्या कोवळ्या किरणांपासून सहज उपलब्ध असतात.
        घेऊया अंगावर सूर्यदेवाचे
        कोवळे जीवनसत्वाचे ऊन
        बनतील सारी हाडे मजबूत
        सजती पाने दवबिंदू पिऊन
                हल्ली धकाधकीच्या जीवनात मोफत मिळणारी सूर्यकिरणे अंगावर झेलायलाही उसंत नसते. त्यामुळे हाडे ठिसूळ होताना दिसतात. थंडीच्या दिवसात शिवार हिरवाईने फुललेले दिसून येते. ताजा कोवळा भाजीपाला, वाटाणा, पावटा, चवळीच्या शेंगा यांना बहर आलेला दिसतो. बाजारातही या भाज्या पाहायला मिळतात. थंडीच्या दिवसात भूकही खूप छान लागते. त्या त्या ऋतूमधील हिरव्या भाज्या अजूनच पौष्टिक असतात. पौष्टिक आणि सकस आहार खाल्ल्यानंतर शरिराला रोग शिवतदेखील नाही. म्हणूनच रात्रंदिवस शेतात कष्ट केलेला शेतकरी वृद्ध झाला तरी धडधाकट असतो.
             खाऊया भाजून शेतातला
             पौष्टिक स्वादिष्ट तो हूरडा
             आला सुगीचा हा मोसम
             भाकरीसंगे मिरचीचा खरडा
               शहरातील चाकरमानी मंडळी पंचविशीतच गळ्याठल्यासारखे वाटतात. कारण ऊर फाटेस्तोवर त्यांना नोकरीच्या मागे पळावे लागते. शिवाय हल्ली इंजेक्शन देऊन हायब्रीड धान्य, कडधान्य, भाज्या, फळे खावी लागत असल्यामुळे कस असलेले भोजन त्यांना मिळणे दुरापास्तच!अधूनिक जमाना आला. सर्व सोयीसुविधा झाल्यामुळे अंगमेहनत देखील होत नसते. त्यामुळे शरीराला हालचाल कमी आणि एका जागेवर बसून फक्त खाल्ल्यामुळे शरीराचे वजन वाढत राहते. या जीवनशैलीमूळे निरनिराळ्या रोगांना आमंत्रण दिले जाते. असे असहाय झालेले आपण डॉक्टरच्या दारात चकरा मारत बसतो आणि शरीराला टिकवण्याचा प्रयत्न करत असतो.
         थंडीच्या मोसमात वृक्षांची पानगळ  सुरू होते. तरूतळाशी पडलेली वाळलेली पाने हवेच्या झोतासंगे इकडे तिकडे पळतात तेव्हा खुळखुळ्यासारखा आवाज येत असतो. दुरून येणाऱ्या वावटळीने धुळीचे कण हवेत उडतात आणि लहान मुले त्या वावटळीत खेळायला पळतात. आयाबाया त्यांचे वाळवण झाकून ठेवायच्या मागे लागतात. धुळीचे कण घरात शिरून मातीचे थर निर्माण होतात. शेतकरी गुरांना गोठ्यात नीट कोंडून ठेवतात आणि हिरवा चारा त्यांच्या पुढे टाकतात. कधी कधी पावसाच्या धारा देखील कोसळू लागतात आणि थंडीचा कडाका जास्तच वाढू लागतो. मुले बाळे गारठून बिछान्यात गुडूप झोपून जातात. थंडीत अंगाला घाम सुटत नसल्यामुळे आणि आल्हाददायक वातावरणामुळे व्यायाम करायला जास्त मजा येते. थंडीत भूकही चांगली लागते. सकाळच्या शाळेत मुले स्वेटर, मोजे आणि मफलर किंवा कानटोपी घालून शाळेत जातात. या आल्हाददायक ऋतूमध्ये कंटाळा येत नाही. काम करण्यासाठी, खेळण्यासाठी विशेष आनंद वाटतो, जोश असतो. हिवाळ्यात सर्वत्र फुटबॉल, हॉलीबॉल, क्रिकेटचे सामने चालू असतात, क्रीडांगण मुलांनी भरून गेलेले दिसते, सकाळी धुक्यामुळे रस्ते झाकले जातात, धुके जणू काही डोंगराला टेकले आहे असे सुंदर मनोहरी दृश्य दिसत असते. सूर्याचे दर्शनही होत नाही. पहाटेला पानांवर फुलांवर पडलेले दहिवर मोत्यांप्रमाणे दिसते. सूर्याचे कवडसे पडून ते चकाकते. थंडीत सर्दी खोकल्याचा त्रास होतो म्हणून शरीराला गरम वाटणारे पदार्थ, मिठाया खाल्ले जातात. गरम कॉफी, चहा पिली जाते. दिवाळी, नाताळ, मकर संक्रांती, होळी असे बरेचसे सण थंडीत असल्यामुळे अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करतात. ऐन थंडीत आपला दिवाळी सण येतो. पावसाळा संपून नवीन पिके हाताशी आलेली असल्यामुळे धनधान्याने कोठारे भरले असतात. त्यामुळे शेतकरी खुश असतो. शरद पौर्णिमेच्या चांदण्यात कोजागिरी साजरी करताना गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. दिवाळीत लाडू, चिवडा, चकली, कडबोळी, करंज्या असा फराळांचा मेवा खायला मिळतो. पहाटे लवकर उठून अंगाला चंदन उटणे लावून गरमागरम पाण्याने अभ्यंगस्नान करणे, नवीन कपडे घालून फटाके फोडणे याची मजा काही औरच! सभोवार फुलांना बहर आलेला असतो. त्यामुळे दिवाळीत घरांदारांना फुलांची तोरणे अडकवली जातात. देवळांना फुलांसोबत विद्युत रोषणाई केली जाते. देवांना सुगंधी फुलांच्या माळा घालून सजवले जाते. सर्वत्र पवित्र वातावरण असते. दारात  रांगोळ्या काढून पणत्या, आकाशदिवे लावले जातात. विविध देवदेवतांच्या पूजाअर्चा केल्या जातात. सायंकाळी आरत्या म्हणून सणांचे पावित्र्य जपले जाते. मुले मातीचा किल्ला तयार करून त्यावर मातीची खेळणी ठेवतात. त्यावर धान्य पेरतात. काही दिवसांनी त्या किल्ल्यावर अंकुर उगवले की हिरवागार दिसू लागतो. दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणी एकमेकांकडे जाऊन नात्यांचे रेशमी बंध जपतात. एकमेकाला शुभेच्छा आणि फराळ देऊन एकोपा टिकवून ठेवतात. थंडीत सहल, पिकनिक काढल्यामुळे पर्यटनाला खूप जोर आलेल्या दिसतो. थोडक्यात ‘खाओ, पिओ, ऐश करो’ असा हा थंडीचा महिना लहान थोर सर्वांनाच फार आवडतो. थंडीत दम्याच्या लोकांना मात्र विशेष काळजी घ्यावी लागते.
            दिवाळीच्या सुट्टीत शाळांना सुट्ट्या असल्यामुळे मुले उशिरा उठतात. थंडीच्या काळात मैदानावर खेळायला बहर आलेला असतो. मुले निरनिराळे खेळ खेळून शरीराचे आरोग्य राखतात. खेळून भूक चांगली लागते त्यामुळे जेवणही भरपूर खाल्ले जाते. 
          आवडतो सर्वांना हवासा
           थंडीचा मस्त हा ऋतुमास
           बदाम काजूपिस्त्यांचा मेवा
           बनवू आरोग्यासाठी खास

 

– सौ.भारती सावंत, खारघर, नवी मुंबई.
9653445835

सौ.भारती सावंत

सौ.भारती सावंत, खारघर, नवी मुंबई. मोबा - 9653445835. लेखीका ह्या ललित साहित्याच्या अभ्यासक आहेत.

थंडीललित लेखहिवाळा
Comments (0)
Add Comment