पूर आला अन् निघून गेला आणि वनप्राण्यांचा वाढता जोर..!

पूर आला अन् निघून गेला आणि वनप्राण्यांचा वाढता जोर..!

संकटावर संकट येती
अन् बळीराजा जगत आहे
बघती त्याच्याकडे सर्वजण
तो मात्र चिंतेत पडला आहे

बळीराजा हे जरी नाव मुखात आले तरी क्षणभर माणसाला त्याच्याविषयी मनात आदर निर्माण होतो, त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते एवढेच नाही तर त्याचे संपूर्ण जीवन चरित्र डोळ्यासमोर उभे राहतो. जगाला पोसणारा तो महापुरुष पोशिंदा आहे म्हणून १ जुलै शेतकरी दिनाच्या निमित्ताने तसेच बैलपोळा सणाच्या निमित्त त्याचा गुणगौरव केला जातो. त्याला मानसन्मान दिल्या जाते कारण त्याचे अफाट कष्टाची सर्वांना जाणीव होते.पण,जेव्हा मात्र तो संकटात असते तेव्हा मात्र त्याचे कष्ट, त्याची चिंता, त्याचा संघर्ष मात्र दिसत नाही हे फार मोठे दुर्दैव आहे. भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि आज याच देशात शेतकऱ्यांच्या जीवनात एवढी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे की, बघून क्षणभर डोळ्यातून अश्रू वाहत असतात.गेल्या काही दिवसात व्यवस्थितपणे पाऊस पडत होता सारे पीक अगदी शेतात लहऱ्या मारताना दिसत होते.आज कदाचित तेही निसर्गाला बघावे वाटले नसावे म्हणून रुद्र रूप धारण करून हिरवेगार पिकांची मातीमोल करून निघून गेला हा तर निसर्गाचा कोप आहे. पण, ज्या धरणातून पाणी सोडले गेले त्यामुळे पाण्याची वाढ झाल्यामुळे एवढा महाभंयकर पूर आला की, हिरवेगार पीकात तीन दिवस पूर राहिल्याने आज ते पीक कुठे गेले…? दिसेनाशे झाले याला जबाबदार कोण असावा…? आज या महापूराच्या पायी पीक गेले व त्या जागी फक्त माती दिसत आहे ही परिस्थिती बघून बळीराजाची काय अवस्था असेल फक्त त्यालाच माहीत.  ज्यावेळी खऱ्या अर्थाने शेतीला पाण्याची आवश्यकता असते आणि त्यावेळी तो, इकडे, तिकडे धडपडत करत फिरत असतो तेव्हा, त्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात धरणाचे पाणी पोहोचत नाही अशा वेळी त्याने कोणाला हाक मारावी. ..? फक्त पीक बहरत आले की, निसर्गही कोपते आणि धरणातून सोडलेला पाणी पिकाला जमीनदोस्त करत असतो मात्र सर्वजण न, समजल्यासारखे गप्प राहतात अशा या दुर्लक्षितपणामुळे बळीराजाचा विकास होईल का…? एवढेच नाही तर काही भागात बघायला गेले तर वनप्राण्यांनी आपली वाटचाल शेताकडे वळवली आहे उभ्या पिकात घसून पूर्ण पीक मातीमोल करत आहेत, दरवर्षी ह्याच अशा भंयकर संकटांमुळे बळीराजा चिंतेत पडताना दिसत आहे. मातीमोल झालेल्या पीकामुळे वर्षभर तो खाणार तरी काय हाच प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर उभा आहे. सोबतच घर कशाप्रकारे चालवणार ही सर्वात मोठी समस्या आणि अडचण आहे.

संकटे त्याच्या पक्तीत बसले
अन् तो संघर्ष करत आहे
नाव त्यांचे जगाचा पोशिंदा
पदवी पुरते मर्यादित उरले आहे

त्याला पदवी तर फार मोठी मिळाली आहे पण,नुसते पदवीमुळे जगणे होईलच असे नाही. त्याचे जीवन इतरांपेक्षा वेगळे आहे. संघर्षमय जीवन जगणारा बळीराजा आणि जगाला कळणार की नाही कळणेच कठीण दिसत आहे. आजची त्याची परिस्थिती बघितले तर फार वाईट दिसत आहे. मात्र त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे दिसत नाही ही सुद्धा फार मोठी शोकांतिका आहे. जेव्हा, त्याच्या पिकात भाववाढ होते तेव्हा मात्र सर्वजण आरडाओरडा करत फिरत असतात “अरे, बापरे भाजीपाला किती महाग झाले ” आज त्याच्या शेतात पूराने व वनप्राण्यांनी, रोगराईंनी धुमाकूळ सोडले हे मात्र दिसत नाही किंवा त्याची मदत करण्यासाठी कोणी हात पुढे करत नाही. त्याच्यासाठी आंदोलन करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. मग जगाचा पोशिंदा म्हणून दिखावूपणा करण्यात काय अर्थ. ..? बळीराजा हा शेवटी बळीराजा राहिला आहे त्याचा दररोजच क्षणोक्षणी बळी घेतला जात आहे मग तो बळीराजा कसला. ..? आज याच समाजात राहणाऱ्या लोकांच्या समस्याचे क्षणात निवारण होते, त्यांच्या हाकेला धावुन मदत केली जाते मात्र जगाच्या पोंशिद्याची हाक कोणाच्याही कानावर पडत नाही एवढे बहिरेपणा, मुकेपणा, आंधळेपणा आलेले बघून बळीराजाचा कोणी वाली असेल असे दिसत नाही. बळीराजा आधीही कळला नाही आजही कळला नाही आणि समोर कळेलच असेही नाही कारण त्याच्यासाठी कोणाकडेच वेळ दिसत नाही. रानटी हत्तीचा कळपाने पिकांची नासधूस करून निघून गेले, पूराने डाव साधला व निसर्गाने संधी साधली आपापले काम त्यांनी केले बळीराजा मात्र परीक्षा देत आहे सर्वजण त्याची परीक्षा घेण्यासाठी टपून बसले आहेत आज तेच चित्र दिसत आहे. पण,बोलते चालते माणसे परीक्षा बघण्यात दंग असतील तर त्याने जगावे तरी कसे हा फार मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा आहे.

बळीराजा जगाचा पोशिंदा
म्हणतात हो सर्वजण
तो, मरत आहे क्षणोक्षणी
त्याची नाही कोणालाच जाण

जे दिसत आहे ते खोटे नाही सत्य परिस्थिती बघूनही त्याकडे लक्ष दिली जात नाही म्हणून आतातरी सर्वच शेतकरी बांधवांनी जागे होणे काळाची गरज आहे. एकत्रित येणे आवश्यक आहे जगाचा पोशिंदा असताना जर सर्वांनी पाठ फिरविले मग कोणाला मदत करून मोठे करून देण्यापेक्षा स्वतः च्या हक्कासाठी लढणे केव्हाही बरे,आज हेच दिसत आहे म्हणून बळीराजाच्या मदतीला धावून येताना कोणीच दिसत नाही हे न कळण्यासारखे कोणीच अडाणी नाही. म्हणून आता बळीराजा खऱ्या अर्थाने जागलाच पाहिजे

सौ.संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
७८२१८१६४८५

सौ.संगीता संतोष ठलाल.

लेखिका ह्या सामाजिक कार्यकर्ता आहेत. अनेक वृत्तपत्रातून ज्वलंत विषयावर लिखाण करीत असतात. अनेक सामाजिक संस्थेच्या सदस्य असून विविध पुरस्काराने सन्मानित आहेत.

कृषिप्रधान देशबळीराजा
Comments (0)
Add Comment