पुस्तक समीक्षण – गावगप्पा

वर्‍हाडी बोली भाषेतील, वाचकाच्या चष्म्यातून

पुस्तक समीक्षण – गावगप्पा.

सप्टेंबर महिन्यात जवळपास हप्ताभर उमरावतीच्या यका दवाखान्यात मी भरती असतानीच आमचे परममित्र प्रसिद्ध कथाकार आदरणीय संजयभाऊ महल्ले ह्याईचा यक दिवस फोन आलता …तव्हा तैनं म्हटलं होतं का.. मह्यावाले दोन पुस्तकं मी तुम्हाले पोस्टानं धाडून रायलो. अन् मले असं वाटते का बा… तुम्ही ह्या दोन्हीबी पुस्तकाईवर प्रतिक्रिया लिहाव…मी नक्कीच लिहीन असा तैले शब्द देल्ल्यावर दवाखान्यातून घरी येऊन पाह्यतो तं माह्या अगदूरच पुस्तकाइचं पार्सल घरी पोहोचलं बी होतं.
दोन-तीन दिवसानं…. असंच मंग यकडाव रात्री झोप येत न्होती.. म्हणूनशान थ्या दोन पुस्तकाइपैकी यक वाचाले हाती घेतलं.. तं थ्या पुस्तकाचं कव्हर पाहूनच मले थे लय आवडलं..त्याच्यावरच्या चित्रंगावरूनच मले समजलं का. हे आपल्या गावखेड्या कडल्या गप्पागोष्टीचं पुस्तक आहे. कारण त्याचं नाव बी असंच ठीवलं.. गावगप्पा. ईशेष म्हणजे वर्‍हाडी बोली भाषेत असल्यानं मंग दुधात साखरच पळली. अन् दवाखान्यातून आल्यावर असंच काहीतरी हलकं-फुलकं मनाची करमणूक करनारं वाचाले पायजे होतं..
‘गावगप्पा’ ह्या पुस्तकाच्या सुरुवातीलेच प्रसिद्ध लेखक, समीक्षक डॉ.संजयजी लोहकरे यायची एकदम अघय पघय प्रस्तावना हाये. लागूनच लेखक संजय भाऊ महल्ले साहेबांचं मनोगतबी छापेल हाये.. त्या दोघालेबी फाटा देऊन म्या डायरेक्ट पुस्तकातल्या गोष्टी वाचाले सुरुवात केली…. कारण का…प्रस्तावना, परिचय, मनोगत हे वाचाले लागलो का मंग पुस्तकातली हवाच निघून जाते…वाचाची मजा येत नाही….. म्हणून डायरेक पहिल्या गोष्टी पासून वाचाले सुरुवात केली. तुम्हाले खरंच सांगतो… जवळपास विसक गोष्टी अकातल्यावानी यका मांगं यक…. वाचून काढल्या.
संजय भाऊच्या वर्‍हाडी बोली भाषेतल्या लिखाणाच्या स्टाईलनं माह्यावर एकदम मोहिनीच घातली. पह्यली गोष्ट वाचली….मंग दुसरी…. तिसरी… अन् त्याच्या पुढं अखीन काय असीन ?…..हे जाणून घ्याची ओढच लागली. प्रत्येक गोष्ट वाचतानी ….. थ्या गोष्टीतून गाव खेड्यातले, आपले अनुभव, काही आइकले सवरले प्रसंग यकदम डोयासमोर जिवंत झालेत… यकदम जसेच्या तसेच…. यव्हढी संजयभाऊच्या लिखाणात ताकत हाये…..म्हणून कोणतीबी गोष्ट वाचाले लागलं का… आणखीन वाचतच राहावं वाटते….
‘गावगप्पा’ ह्या पुस्तकामंधी ज्या गोष्टी आमच्या संजयभाऊनं लिवल्या हायेत… थ्या गोष्टीच्या रुपानं आमच्या वर्‍हाडातलं शेतकरी, कष्टकर्‍याचं दररोजचं जगणं रेखाटलं हाये. म्हणूनश्यानं ह्या सार्‍या गोष्टी वर्‍हाडातल्या प्रत्येक वाचकाले वाचूशाच वाटते….कारण थ्या आपल्या वर्‍हाडी बोली भाषेत लिवल्या हायेत. वाचकाले थ्या आपल्यासंग घळलेल्या घटनाच वाटते….
‘गावगप्पा’तल्या प्रत्येक गोष्टीतून वर्‍हाडी जीवन अन् त्या कष्टकरी लोकाईच्या समस्या, आर्थिक प्रश्‍न, अंधश्रद्धा, ह्यासारख्या ज्वलंत विषयाले हात घातलेला दिसते. ह्या गोष्टीच्या आडून राजकारणी लोकाईवर आसूड बी ओढले हायेत. गोष्टी सांगतानी वर्‍हाडी समाज जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला हाये. ग्रामीण कुटुंब व्यवस्था,कुटुंबातले रुसवे-फुगवे, भांडण-तंटे….. तेवढ्याच प्रमाणात घरातल्या एकमेकांविषयी असलेली आपुलकी, जिव्हाया हे नाजूक साजूक कंगोरे गोष्टीतल्या हलक्या-फुलक्या संवादातून संजयभाऊनं मोठ्या शिताफीने गुंफले हायेत.
‘गावगप्पा’ ह्या लहान-लहान वर्‍हाडी गोष्टीतून ग्रामीण भागातल्या गंमती जमती मस्त रंगवल्या हायेत. मी तं असं म्हंतो का बा….. संजयभाऊच्या वर्‍हाडी लिखाणाचा गाभा ईनोद निर्मिती हाच हाये. जेणेकरून गोष्ट वाचताना वाचकाले हरीख वाटला पायजे….. तैच्या थकल्या भागल्या जीवाची करमणूक झाली पायजे….. दुःख, दारिद्र्य, आर्थिक समस्या, घराघरातील वाद…. या सार्‍या ईवंचनेतून वाचकाचे मनोरंजन झाले पायजे….त्याच्या मनावरचा ताण हलका झाला पायजे….. असाच अनुभव ‘गावगप्पा’ तल्या गोष्टी वाचल्यावर आल्या बिगर राह्यत नाही. अन मले तं वाटते का बा….. हेच खरं लिखाण हाये….. साहित्य का काय म्हणते थे हेच खरं !….
लिखाणाचा प्रकार कोणता बी असो…. त्यातून समाजातल्या घटना-प्रसंग, घळामोळीचे चित्र दिसले पायजे…. समाजातल्या वाईट प्रथा,परंपरा, अंधश्रद्धा ह्या समाजाच्या, कुटुंबाच्या प्रगतीसाठी किती बाधक असते…. हे प्रबोधन वर्‍हाडी लिखाणातून व्हायले पायजे….. तव्हा ते लिखाण मंग… कविता,कथा,ललित,प्रवास वर्णन काहीबी असो….वाचकाले आपलं वाटन …. तव्हा वाचकाची वाचन कराची इच्छा व्हईन. त्या मानानं संजयभाऊनं लय मोठा पल्ला गाठला हाये बा ………………
‘गावगप्पा’ तल्या गोष्टी म्या दोन दिवसातच वाचून कडावर केल्या. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकातल्या गोष्टी वाचल्यावर अंथरुणावर आंग टाकल्यावर बी लय वाळखुय पावतर या गोष्टीतले डायलॉग माझ्या डोयापुढं तरयत रायले…. एखाद्या गोष्टीचं नाव आठोलं का मग थे पूर्णच्या पूर्ण कथा…. त्याचं चित्र डोयापुढ उभं रायते …एखाद्या सिनेमासारखं. या गोष्टीतल्या पात्रांईचा बह्याडपणा,साधेपणा, निरागसता पाहून मले सोतालेच हासू येत होतं….
अन् कवा कवा तं वाटते ….का बा…. किती साधे भोये लोक हायेत आपल्या खेळ्यापाळ्यातले…….? दिवसभर वावरात राबराब राबुन सांजच्या पायरी आपल्या शेना मातीच्या….कवेलूच्या घरात आपल्या लेकरा बायात रमून जानं…. आपल्या लेकरावर दाखवतो तेवढीच माया आपल्या संग जंगलात राबणार्‍या ढोरा-वासरावर बी करणारा हा कष्टकरी, शेतकरी,शेतमजूर…… बाहेरून जसा थो रांगडा दिसते, त्याउलट अंदरून लोण्यासारखा मुलायम,प्रेमळ अन् प्रसंगी भावनिक बी हाये….. हे आपल्याले ‘गावगप्पा’ तल्या गोष्टी वाचल्यावर समजते.
‘गावगप्पा’ हया पुस्तकात लहान लहान सहज वाचल्या जातीन अशा बेचाळीस गोष्टी हायेत. त्यातल्या सार्‍याच यकदम लक्षात राह्यणं शक्य नाही म्हणा….. पण जर यखांद्या गोष्टीचं टायटल का सांगतलं तं थ्या गोष्टीत कोणता प्रसंग, घटना हाये….. कोणकोणते पात्रं हायेत हे मात्र कोणीबी बिनपाठ सांगू शकन. इतक्या गुयचट भाषेत सार्‍या गोष्टी ‘गावगप्पा’मधी रेखाटल्या हायेत. गोष्टीतल्या वर्‍हाडी डायलॉगमूळं…….शेवंता,इलास,विठ्ठल, मन्या, शांताक्का हे पात्रं बी जिवंत झाले हायेत…..
प्राथमिक/ माध्यमिक शाळेतल्या लेकरायले जर हे पुस्तक तैच्या मायबापानं ……नाही तं मंग गुरुजीनं जर का सहज यखाद्या रिकाम्या टायमाले वाचाले देल्लं तं… ह्या नव्या पिढीले आपलं ग्रामीण जीवन कसं हाये याचं दर्शन होईन… जे अन्नधान्य, फळे ,भाजीपाला आपण दररोज खातो, गाई-म्हशीचे दूध पेतो त्या साठी शेतकरी-शेतमजूराले अन् घरातल्या तैच्या बायकाईले किती कष्ट अन् हाल-अपेष्टा सहन करा लागते….हे शहरातल्या कॉन्व्हेंटच्या लेकरायले समजन…..
‘गावगप्पा’ मंधी ग्रामीण भागातले जवळपास बेचाळीस प्रसंग,घटना ,आपल्या कसदार लेखन शैलीच्या जोरावर संजयभाऊनं जिवंत केले हायेत. त्यातल्या काही गोष्टी मधून अंधश्रद्धा, बुवाबाजी, समाजातल्या कूप्रथा-परंपरा यावर ताशेरे ओढले हायेत. काही गोष्टींमधून ग्रामीण शेतमजूराले, शेतकर्‍याले कशाप्रकारे लुबाडल्या जाते….त्याचा साधेपणा, भाबडेपणा चितारला हाये….
गाव खेड्यातली कष्टकरी,शेतकरी,शेतमजूर जनतेची…. तिच्या ढोरा वासरावर…. झाळामाळावर…. दगड धोंड्या वरील निर्मय श्रद्धा अन् अज्ञानापायी अंधश्रद्धाळू कशी बनली? हे गावगप्पातल्या गोष्टीतून आपल्याले वाचताना जाणवते…
गावगप्पातल्या वर्‍हाडी गोष्टी वाचल्यावर….. “मराठीतल्या अमक्या प्रसिद्ध साहित्यिकाची आठोन होते…. अन् तमक्या कथाकाराच्या शैली सारखी संजयभाऊची लिखाण शैली मिळती-जुळती दिसते”…. असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण संजयभाऊची आपली सोताची साधी, सोपी, सहज, ईनोदी लेखन शैली हाये. तिची तुलना कोणा दुसर्‍या साहित्यिका संग करणं माह्या मनाले अजिबात पटत नाही. कारण प्रत्येक लेखकाची यक अलग स्टाईल असते. आन थो त्याच्या लिखानाच्या स्टाइलमुळं प्रसिद्ध होते. पुढ थेच त्याची ओळख बनते. म्हणूनशानं…….”असंच लिहिलं पाहिजे….तसं लिहू नये” …..असा कोणता काही नियम बनवला नाही. कोणाले काही ठेका बी देल्ला नाही. ज्याले वाटते त्यानं…. त्याले पटते त्या पद्धतीनं लिहाव…..आन् आपली वर्‍हाडी भाषा समृद्ध कराव ….असं मले वाटते ……..अन् मी काही समीक्षक गिमीक्षक नाही बॉ…. यक साधा सुधा वाचक हाये….जे माह्या वाचकाच्या चष्म्यातून मले दिसते…. थेच आपल्या मोडक्या तोडक्या वर्‍हाडीत लिवत असतो….
गावगप्पाच्या ह्या टायटल मंधीच सहजता अन् गावठीपणा दिसून येते. गावातल्या चौकात, ओट्यावर अन् घराच्या वसरीत झाक पळल्या पासून तं राती उशिरा पावतर रंगणार्‍या गप्पा-गोष्टीतून ग्रामीण जीवनाचे, मानवी स्वभावाचे पापुद्रे अलगदपणे उलगडून दाखवले हायेत….
‘दुबार पेरणी’, ‘गड्या आपुला गाव बरा’, ‘महादेवाचा नंदी’, ‘नदीला आला पूर’, ‘… यासारख्या गोष्टी मधून खेड्यातल्या लोकाईचं जीवन कसं कष्टमय अन् अधांतरी असते ते वाचकाले पटवून देण्यात लेखक यशस्वी झालेले दिसते……..
“गाव गप्पा” हे पुस्तक वाचल्यावर माह्या हे ध्यानात आलं का….. माणसाकळं पाहण्याचा दृष्टिकोन, लेखकाची निरीक्षणशक्ती, अन् त्यातून जागृत होणारी त्याची ईनोदबुद्धी……हे सारे गुण लेखकापाशी असल्याबिगर त्याले ईनोदी लिहिता येणार नाही…… एवढंच नाही तं…… जे आपण पायलं ,अनुभवलं थे वाचकाले रूचन अशा शब्दात मांडता आलं पायजे. तीच वृत्ती अन् वाचावसं वाटन अशी वाचनीय लेखन शैली संजय भाऊनं विकसित केलेली दिसते…..
‘आग आग’, ‘राष्ट्रपती पुराण’, ‘शेतकर्‍याची दैना’ यासारख्या गोष्टीतून राज्यकर्त्यांचा कावेबाजपणा, बायकाईची राजकारणातली सध्याची परिस्थिती, शेतकर्‍याचे आपल्या कुटूंबाविषयी भावनिक बंध ….. शेतकर्‍यापासून जास्तीत जास्त नफा खाण्याची नियत….काबाडकष्ट करणार्‍या कास्तकाराचं शोषण कसं केलं जाते हे ग्रामीण जीवनातलं वास्तव गावगप्पातून मार्मिकतेने मांडलं हाये…..
‘गड्या आपला गाव बरा’ या गोष्टीतून खेड्यातला माणूस…. नोकरी पाण्याच्या निमित्तानं गावापासून दूर शहरात जरी गेला असन… तरी त्याची गावाकडच्या आपल्या माणसाईशयीची ओढ जिवंत असल्याची आस व्यक्त होते…..
‘महादेवाचा नंदी’ या गोष्टीतून आयुष्यभर कष्ट करून शरीरानं थकल्या म्हातार्‍या बैलाले ईकून ट्रॅक्टर घेण्याचा पोराचा इरादा ……अन् बैल म्हणजे महादेवाचा नंदी अशी श्रद्धा जपणारा भोळा बाप….या दोघांतला संवाद वाचकाले भावनिक अन् अंतर्मुख केल्याबिगर राह्यत नाही….
‘महागाईचा फटका’या गोष्टीतून कास्तकाराचं आर्थिक मागासलेपण…..घरातलं अठराविश्‍व दारिद्र्य….. या सार्‍यावर मात करून संसार नेटानं करणारं कुटुंब प्रमुखाचं शहाणपण दाखोल हाये….
गप्पांच्या ओघात देशाचं राजकारण अन् भ्रष्टाचारावर ‘काळा कोळसा धगधगणारा’ या गोष्टीतून गाव खेड्यातील माणसाची तिखट प्रतिक्रिया उमटलेली दिसते….
सरकारच्या योजना कशा बेभरवशाच्या असतात…. त्यामधून सामान्य जनतेचं पोषण होण्यापरीस शोषणच जास्त होते…. हे सत्य ‘घरघर सिलेंडर’ या गोष्टीतून व ईनोदी ढंगान मांडलं हाये….
“गावगप्पा” तल्या गोष्टी जरी गाव खेड्यातल्या असल्या तरी …शयरी वाचकाले बी मनोरंजनाबरोबरच ईचार करायले भाग पाडते…..ही ताकद या लिखाणात जाणवते….
देवधर्माच्या नावावर सोवळ्याचा कांगावा करून सर्वसामान्य कष्टकरी जनतेले लुबाडणार्‍या ढोंगी लोकाईच्या विरोधात सामान्य माणसानं घेतलेला पवित्रा …..‘खरा यज्ञ’, ‘म्हातारीचं सोवळं’ या गोष्टीतून अतिशय परखडपणे पेरलेला दिसते….
‘फटफटीचं खुळ’, ‘दिवाळीचा फराळ’ ह्या दोन्ही गोष्टीतून ग्रामीण कुटुंबातलं सहजीवन….. कोणताही बडेजावपणा न मिरवता नि:स्वार्थ सेवाभाव लेखकानं सहज-सोप्या उदाहरणातून दाखवला हाये……
दिल्लीत कसाबले फाशी देल्ली… त्याचे पडसाद गल्ली पावतर कसे उमटले… हे लेखकानं ‘कसाबची फाशी’ या गोष्टीतून कलात्मक पद्धतीनं अशाप्रकारे शब्दबद्ध केली का वाचक बी अवाक झाल्याबिगर राहत नाही…..
‘शिक्षणाचा धंदा’ अन् ‘पाटी लेखणी’ ह्या सारख्या गोष्टीतून शिक्षण व्यवस्थेले लागलेली कॉन्व्हेंटची कीड सहज चर्चेतून उलगडून दाखोली हाये …
‘झेंडावंदन’, ‘ऊखाना’, ‘गंगामाईच तीर्थ’, ‘खरी तीर्थयात्रा’, ‘क्रिकेटची मॅच’, ‘प्रेमाचं भांडण’, ‘भागवताची कथा’, ‘कवीची पुण्यतिथी’, ‘जयंती पुराण’ यासारख्या गावगप्पांमधून सहज होणारी ईनोद निर्मिती लेखकाच्या निरीक्षण शक्तीची कमालच म्हणाले पायजे…
‘गावगप्पा’ घरातल्या सार्‍याईनंच वाचण्यासारखं हाये. पयले ते घरातल्या मोठ्या लोकाईनं वाचाव ……तैच पाहून लहान लेकर बी वाचाले लागतीन. म्हणून प्रत्येक वर्‍हाडी माणसानं ‘गावगप्पा’ इकत घिवून वाचाले पायजे ……अन् आपल्या बोली भाषेले मोठं कराले पायजे. थ्या निमित्तानं वर्‍हाडी लेखकाले बी लिवाची प्रेरणा भेटत राहीन. आपोआपच वर्‍हाडी साहित्यात भर पडन. वर्‍हाडी वाचक वाढविण्याच्या कामात प्रत्येकानं फूल नाही तं फुलाची पाकई म्हणून यक वर्‍हाडी बोली भाषेतलं पुस्तक ईकत घेऊन हातभार लावला पायजे……..
बोलीभाषा कोणती बी असो….. जो पावतर त्या भाषेतलं साहित्य….. कथा, कविता, लेख ,प्रवास वर्णन, गझल, ललित यासारख्या साहित्य प्रकारामधी शब्दबद्ध होत नाही……थो पावतर त्या बोली भाषेले साहित्याचा दर्जा मिळणार नाही. संजयभाऊनं ह्या ‘गावगप्पा’ च्या रूपानं वर्‍हाडी बोली भाषेचं संवर्धन करण्याचा केलेला प्रयत्न लयच कौतुक करण्या जोकता हाये….. असाच प्रयत्न वर्‍हाडातील साहित्यिकाईनं आपल्या परीन करून….. ह्या वर्‍हाडी मायची सेवा कराचं पुण्य पदरी पाडून घ्यावं. एवढीच अपेक्षा करून थांबतो !………

वाचू वर्‍हाडी ! बोलू वर्‍हाडी !! लिहू वर्‍हाडी !!!जय वऱ्हाडी!!!!

©®अजय देशपांडे.

***********
पुस्तकाचं नाव: ‘गावगप्पा’
लेखक: संजय महल्ले
प्रकाशन: मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती
पृष्ठ संख्या:140
मूल्य:रु.150/-
साहित्य प्रकार: स्फुट गोष्टी
***********

अजय देशपांडे

लेखक हे पत्रकार, कवी, गझलकार,निवेदक ,वक्ता, समुपदेशक, शिक्षक आहेत. प्रकाशित साहित्य - ऋतुगंधा (ललित लेख संग्रह ), थेट भेट (मुलाखत संग्रह ) , Learn English easily. great Indian leaders, English primer. तसेच यशवंत माऊली व संत अच्युत महाराज या चित्रपटा करिता कथा,पटकथा,संवाद लेखक केले असून मा. मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते शोध वार्ता पत्रकारिता पुरस्कार प्राप्त व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. मो. - 9527673067 Email - ajaydeshpandewarud@gmail.com

Comments (0)
Add Comment