रामायण – महत्व आणि व्यक्ती विशेष.

रामायण – महत्व आणि व्यक्ती विशेष.

– पुस्तक परीक्षण मोहिनी हेडावू

श्री. विश्वास देशपांडे हे तरुण भारत मध्ये आसमंत पुरवणीत ‘थोडं मनातलं’ हे सदर चालवीत होते .तसेच छत्रपती संभाजी नगर मधून प्रकाशित होणारे ‘आधुनिक केसरी’ या वृत्तपत्रांमध्ये ‘उगवतीचे रंग ‘ ह्या सदरात लेख त्यांनी लिहिलेले आहे. ते चाळीसगाव येथील हायस्कूल मधून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
अनुवादक डॉक्टर मीना श्रीवास्तव या शिक्षणाने आणि व्यवसायाने डॉक्टर असून त्यांनी मॅनेजमेंट चे वेगवेगळे कोर्सेस केलेले आहे .त्यांचे मराठी, इंग्लिश हिंदी ,या,तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे .

रामायण हे पुस्तक रूढ अर्थानेने रामाची कथा नाही.
अथपासून इथपर्यंत अशी कथा नाही .तर त्यात त्यांनी सर्व पात्रांचे व्यक्तिरेखाटन केलेले आहे. राम, सीता ,भरत, शत्रुघन ,हनुमंत !रामायणातील सगळे पात्र ही आदर्श आहेत .परंतु एकदा आपण आदर्श त्यांना म्हटलं की ,आपण त्यांना ‘देवत्व’ बहाल करतो आणि मग आपण त्यांची पूजा करतो पण त्यांच अनुकरण करत नाही. म्हणूनच या पुस्तकाचं वैशिष्ट्ये आहे की ,त्यांना मानवी पातळीवरचे त्यांचे गुण सांगितले आहेत आणि त्यांचं आपण अनुकरण करावं ,अशी लेखकाचे अपेक्षा आहे.
या पुस्तकात तर संदर्भाची रैलचेल आहे . रामायणावर आधारित असल्यामुळे पांडुरंग शास्त्री यांचे वाल्मीकि रामायण दर्शन, महाभारत, ज्ञानेश्वरी ,रामदास स्वामी, तुकारामांचे अभंग वाणी, गदिमांनी लिहिलेले गीतरामायण , उत्तर रामा चरित्र ,तमिळ मधले काही रामायण कथा ,तुळशीदासाचे रामचरितमानस ,या सर्वां मधल्या संदर्भांची रेलचेल आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना तुम्ही सांस्कृतिक रित्या खूप समृद्ध होऊन जाता.

रुढ अर्थाने ही रामायण कथा नाही .हे पुस्तक आपल्याला रामायणाप्रति नवी दृष्टी देतं व स्वतःकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोनही! आपल्याला ते अंतर्मुख करतं !! रामायण कालीन समाज व्यवस्था कशी होती ,स्त्रीचे जीवन कसे होते, अर्थव्यवस्था कशी होती, प्रशासन कसे होते या संदर्भात खूप सुंदर विवेचन लेखक करतात. ‘लोक कल्याणकारी राज्याची’ (welfare state)संकल्पना रामायणामध्ये आपल्याला दिसून येते. त्यावेळेस महसूल लोक आनंदाने द्यायचे आणि या बदलत्यात राजा आपलं हित करेल, सगळी जबाबदाऱ्या पार पाडेल , असा प्रजेचा त्यांच्यावर विश्वास होता. ‘राम राज्याची’ संकल्पना मांडताना रामराज्य म्हणजे काय ?याची आदर्श मांडत असताना सद्यस्थितीत आपण काय केले पाहिजे, प्रजेने कसे दक्ष राहिले पाहिजे ,त्याचप्रमाणे आपले राज्या प्रति काय कर्तव्य आहे ?याचेही सुंदर भाष्य केलेले आहे .
मानसशास्त्रात अत्यंध्ययन (over learning)नावाची संकल्पना आहे .जसं बे पंचे दहा.. आपण हे पाठ केलेले असतं पण त्यामागचं तर्कशास्त्र विसरून जातो. तशीच रामायण कथा आपण अनेकदा ऐकली वाचली असते पण हे पुस्तक नुसतच आपल्याला रामायण कथा सांगत नाही तर लेखक या पुस्तकांमध्ये रामायणातील व्यक्तिरेखा ,त्यांच्या घटना, रामायण कालीन राजकीय, आर्थिक स्थिती याबाबत अवगत करून देतात. लेखकाने यावेळी चिंतन व मनन केलेलं आहेच पण एक संशोधकाच्या नजरेने रामायणाचे त्यांनी तार्किक दृष्ट्या विचार करून विश्लेषण केलेले आहे. त्यातील तथ्यांच विवेचन केलेलं आहे .तसेच शंभुकाची कथा असो, वाली वध असो यामध्ये रामावर आरोप केलेलेआहे, त्याचं सुंदर पद्धतीने तार्किक दृष्ट्या खंडन केलेलं आहे .
मी फार पूर्वी पांडुरंग शास्त्री आठवले यांचे’ वाल्मिकी रामायण दर्शन ‘वाचलेलं होतं त्या पुस्तकांनी जशी रमायणाबद्दल दृष्टी दिली तशीच याही पुस्तकांने दिलेली आहे .आणि तेही खूप साध्या सोप्या पद्धतीने! कुठेही पुस्तक बोजड होत नाही .आबालवृद्धांपासून वाचनीय असे ते पुस्तक आहे. आणि अनुवादकांची हिंदी तर खूप सुंदर आहे .त्या हिंदी भाषेतील भारदस्तपणा तसेच माधुरी एकाच वेळेस आपल्याला अनुभवता येते.डॉक्टर मीनाताई यांनी कुठेही आशयहानी न होता, आशयाला बाधा न पोहचता, त्या पुस्तकाचे अनुवाद किंवा ज्याला आपण स्वैर रूपांतर म्हणता येईल असे केलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक खरंच वाचनीय तसेच मननीय तसेच अनुकरणीय झाले आहे .रामायणातून काय बोध घ्यावा हे खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे. आदर्श राजाची कल्पना मांडलेली आहे की राजा हा ‘उपभोग शून्य स्वामी’ ही रामराज्याची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यामुळे जेव्हा आपण इतर देशातील तत्त्वचिंतकाच्या विचार करतो विशेषतः प्लेटो तेव्हा त्या कुठेतरी आपल्याला साम्य दिसतं. आदर्श राजा असो किंवा “उपभोगशून्य स्वामी” असो या दोघांचे मतितार्थ एकच आहे .हे पुस्तक तुम्हाला एक समृद्ध अनुभव देत सगळ्याच अर्थाने!
पुस्तकाची भाषा, विषय त्यातले संदर्भ आणि त्यातला आदर्शवाद !!!

डॉक्टर मीनाताई यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद पण केलेला आहे ‌.तो ही सुंदर आहे. विशेषतः आपण जेव्हा म्हणतो की आजकालची नवीन पिढी मराठी वाचत नाही ,ती फक्त इंग्रजीच वाचते ,तयंच्यासाठी हा अनमोल ठेवा आहे, असे मला वाटते .मीनाताईंचे हिंदी प्रमाणेच इंग्रजी भाषेवर देखील प्रभुत्व आहे, ते पुस्तक वाचताना पानोपानी लक्षात येते.त्यांचा इंग्रजी भाषेचे शब्द वैभव दिसून येते.
हे पुस्तक मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेत असल्यामुळे भारतातील सर्व लोकांपर्यंत रामाचे आदर्श तत्त्वज्ञान आणि लेखकाचा विशेष दृष्टिकोन पोहोचवण्याची उत्तम संधी आहे असे मला वाटते.

संदर्भ –

रामायण — महत्व आणि व व्यक्ती विशेष.
हिंदी अनुवाद
मुळलेखक –विश्वास देशपांडे अनुवादक– डॉक्टर मीना श्रीवास्तव
सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन चे हे प्रकाशन आहे.

  • पुस्तक परीक्षण मोहिनी हेडावू.

मोहिनी किंहीकर हेडावू.

लेखिका सध्या नागपूर येथे सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes) येथे कार्यरत असून त्यांना ललित व काव्य लेखनाची , वाचनाची आवड. लोकप्रभा, तरुण भारत, देशोन्नती,मातृ सत्ता व जन्मंगल अशा विविध वृत्तपत्र , मासिकांमधून लेखन. नुकताच 'मनातलं' हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित . मो.बा. - ९८२२९४०९१२

Comments (1)
Add Comment
  • Vishwas Deshpande

    पुस्तक परीक्षण खूप छान लिहिले आहे. धन्यवाद मोहिनी ताई 🙏🌹