रेणुका राजन देशकर च्या कर्तृत्वा साठी.

रेणुका राजन देशकर च्या कर्तृत्वा साठी.

आपल्या हिंदू धर्मात आपला
विश्वास आहे की, माणूस जन्माला येतो ते त्याचे पूर्व संचित घेऊन. सत्कर्म चांगले असतील तर चांगले जीवन तुमच्या वाट्याला येते. त्या जीवनाने समाजातील अनेक लोकांना आनंद मिळतो .अशाच आशयाचे सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असलेले जीवन जगणारी व्यक्ती नागपूरकरांसाठी सुपरिचित आहे. असे म्हणता येईल की ,साक्षात सरस्वतीने तिच्या शिरावर आपला वरदहस्त ठेवला आहे ,आणि वागदेवतेच्या प्रतिभेचे लेणं घेऊन ती जन्माला आलेली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून अव्याहतपणे आपल्या अभिजात, सुमधुर आणि ओजस्वी वाणीने नागपूर ,महाराष्ट्र ,भारत, नव्हे तर साता समुद्राच्या पलीकडे थेट अमेरिकेपर्यंत पोहोचून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी, समृद्ध भाषेच्या श्रीमंतीची निवेदिका, आणि नागपूरकरांचा अभिमान ,रेणुका देशकर पूर्वाश्रमीची शुभांगी वसंत आळशी .नवरात्रीचा आजचा शब्द जागर रेणुकाच्या कर्तुत्वासाठी.

रेणुकाला लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. रेणुकाच्या आईला म्हणजे सुनीती आळशी यांना देखील नाटकांची आवड होती. त्यावेळी रेणुका मंजुषा कॉन्व्हेंट मध्ये शिकत होती. तेथील वटाणे मॅडमने रेणुकाला गॅदरिंग मध्ये सहभागी करून घेतले. सुरुवातीपासूनच तिचे पाठांतर अतिशय उल्लेखनीय होते. वाटाणे मॅडमने तिच्याकडून पाच सहा प्रकारचे मोनो ऍक्ट बसवून घेतले. उदाहरणार्थ कैकयी, कुंती, झाशीची राणी. विविध ठिकाणी सादरीकरणासाठी वाटाणे मॅडम रेणुकाला सोबत घेऊन जायच्या. दुसऱ्या वर्गापासूनच स्टेज चा अनुभव रेणुकाला मिळाला. ती सांगते की, शिवाजी महाराज तर तिने अनेक वेळेला साकारलेले आहेत .

रेणुका सांगते की ,सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे वाचनाचा संस्कार घरातून मिळाला. घरी खोका भरून पुस्तके होती. लहानपणीच वाचनाची सवय लागली. त्यासोबतच वडील मंत्र आणि स्तोत्र पठण करून घ्यायचे. त्यामुळेच बालवयात आवाजाला घडण मिळाली. पुढे सोमलवार शाळेत प्रवेश घेतला. नववी दहावीला असताना बालरंजन तर्फे, अलबत्या गलबत्या, ज्ञानियांचा राजा, या नाटकात काम केले. त्या माध्यमातून धनवटे रंगमंच परिचयाचा झाला. त्यानंतर आकाशवाणीची युगवाणी परीक्षा दिली. अर्थात ती पास झाल्यावर युगवाणीचे युवकांसाठी काम सुरू झाले .त्याचे मुख्य स्वरूप होते मुलाखती आणि भाषणे .पुढे अकरावी बारावीनंतर वडिलांनी नाटक करण्यास संमती नाकारली. मात्र रेणुका सांगते की ,माईक आणि स्टेजचे आकर्षण तिला लहानपणापासूनच होते. कदाचित तिचे गंतव्य स्थान तिथे जाण्याचे होते .तो गर्भित इशारा असावा असे मला वाटते .

आकाशवाणीचे काम ऑफिसच्या वेळात होते .त्यामुळे त्याला गती मिळत गेली. पुढे पदवीचे शिक्षण झाल्यावर रेणुकाचे लग्न झाले. लग्नानंतर यजमानांचे पहिले पोस्टिंग पेण ला होते. क्वार्टर पेण पासून दहा किलोमीटर दूर इरिगेशन कॉलनीत होते .त्यामुळे थोडा एकटेपणा होता. मात्र तिच्या यजमानांना वाचण्याची सवय होती .त्यांच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणात पुस्तके होती. तिथे रेणुकाचा वाचनात खूप पुस्तके आली .किंबहुना वाचन हाच एकमेव विरंगुळा होता. नंतर नाशिकला बदली झाली. तिथे रेणुकाने योग विद्याधाम येथे योगाच्या क्षेत्रातील योगप्रवीण ही परीक्षा दिली. ती सांगते नाशिकला देखील खूप सुंदर वाचनालय होते. आणि मुळात वाचनाची आवड, त्यामुळे तिने यजमानांसह एक एक लेखक ठरवून ,त्यांची सर्व पुस्तके वाचणे, अशा प्रकारचे वाचन केले. त्यानंतर तोतला डोह येथे त्यांची बदली झाली. मात्र तिथून नागपूरला येणे जाणे करून रेणुकाने आपले सांस्कृतिक जीवन सुरू केले .

2000 मध्ये स्वराली संस्थेकडून निवेदनाबाबत पहिल्यांदा रेणुकाला विचारणा झाली. रेणुकाच्या मावशी हेमा पंडित या सतार वाजवायच्या. अर्थात रेणुकालाही स्वतःचे विश्व तयार करायचे होते. ती म्हणते स्वरालीने विचारणा केल्यावर आयुष्याचा सूर गवसला. शांतताई शेळके म्हणतात त्याप्रमाणे, छंदातून धंदा व धंद्यातून मिळणारे श्रमाचे साफल्य, तसेच काही माझ्या आयुष्यात सुरू झाले. रेणुकाने निवडलेला मार्ग तिच्यासाठी आनंद देणारा व तिच्या सोयीचा होता .त्यामुळे मुलांच्या परीक्षेच्या वेळी ती काम थांबवत असे .कधी व्यवसायाचा त्रास झाला नाही. तिच्या सोयीनुसार ती काम करू शकत होती .मुळात तिला स्टेजवर माईकची आवड होती .स्वरालीमुळे तिच्या डेस्टिनीच्या पाऊलवाटा तयार झाल्या. रेणुका म्हणते मुळात मी खूप “चुझी” आहे .त्यामुळे आज पर्यंत दर्जेदार कार्यक्रमांमध्येच सहभाग घेतला. अशी एक गाण्याची ओळ आहे की, कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा .मात्र रेणुका सांगते, या मोहात मी कधीच पडले नाही. कलेच्या क्षेत्रात मोहाच्या फुलबागा भरपूर असतात .मात्र ठरवून त्यात मी अडकले नाही .

रेणुकाच्या हातात जेव्हा पहिल्या कार्यक्रमाचे पाकीट मिळाले, तेंव्हा ते देवा समोर ठेवल्यावर तिने वडिलांना नमस्कार केला. तेंव्हा तिचे वडील म्हणाले की, आज तू घराच्या बाहेर पडलीस. तेंव्हा एक पाय बाहेर व एक पाय उंबरठ्याच्या आत ठेव. बाहेरचा पाय कधीही आत घेता येईल. मात्र आतला पाय कधीही बाहेर पडू देऊ नकोस. कारण तू मुलांना जन्म दिला आहेस. रेणुका ने देखील वडिलांचा विश्वास निष्ठेने जोपासला. आपल्या विवेक आणि करारी स्वभावाने तिची वाटचाल सुरू राहिली.

सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वच आयामांच्या क्षेत्रात, रेणुकाने काम केले आहे. ती सांगते की, नाटक नृत्य संगीत या क्षेत्रात तर काम केलेच. त्यासोबत सामाजिक ,राजकीय ,
वैद्यकीय ,क्षेत्रातही तिने काम केले आहे. सर्व प्रकारच्या विषयातील तज्ञ डॉक्टरांची मुलाखत तिने घेतलेली आहे. शेतीच्या संदर्भातल्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. दूरदर्शनवर शेती विषयक सदर चालविली आहेत.

सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाने आणि आनंदाने सांगायचे झाल्यास, लता मंगेशकर, हरिप्रसाद चौरसिया, झाकीर हुसेन, शिवकुमार शर्मा, इत्यादी जगप्रसिद्ध कलाकारांसोबत स्टेजवर उभे राहण्याची संधी रेणुकाला मिळालेली आहे .हृदयनाथ मंगेशकर यांचे सोबत तर तिने बरेच काम केलेले आहे .श्रीधर फडके आणि अन्य नाट्य कलाकारांच्या मुलाखती तिने घेतल्या आहेत. दीड ते 2000 लाईव्ह टॉक शो घेतले आहेत .या व्यतिरिक्त पुस्तक प्रकाशन सोहळे, विविध लेखकांच्या मुलाखती, तिने घेतलेल्या आहेत .हे सर्व सांगत असताना, आठवणींच्या हिंदोळ्यांवर रममाण झालेली रेणुका आम्हाला अनुभवायला मिळाली.

रेणुका सांगते की, नागपूरचे भूषण नानासाहेब शेवाळकर तिला मुलगी मानायचे .त्यांच्या शेवटच्या दिवसात फोन करून तीन वाजता चहासाठी ते तिला बोलवायचे. त्या चहा गप्पांच्या मैफिलीत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, यांच्या संदर्भात भरपूर माहिती त्यांनी दिली .त्यामुळे या संतांकडे पाहण्याचा रेणुकाचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. विचार करण्याची पद्धत बदलली. वैचारिक स्तर प्रगल्भ होत गेला .

नानासाहेब शेवाळकरांसोबतच शांताबाई शेळके, प्रवीण दवणे, शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे, यांचेही सोबत कार्यक्रम करण्याचा योग रेणुकाला आला, आणि त्यांनी देखील रेणुकाला घडविले आहे असे ती सांगते.

अशीच एक आठवण कवी ग्रेस बद्दल सांगताना रेणुका म्हणते की, त्यांच्या “कावळे उडाले स्वामी “या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे तिने निवेदन केले. उद्घाटन भारती मंगेशकर यांचे हस्ते होते .समोर हृदयनाथ मंगेशकर आणि महेश एलकुंचवार होते .त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात पुस्तकाच्या सर्व प्रती संपल्या .त्यामुळे कवी ग्रेस यांनी रेणुकाला नंतर फोन करून सांगितले की ते पुस्तकाचे प्रत घेऊन उद्या तिच्या घरी येणार. कवी”ग्रेसांना पुरण खूप आवडायचे. त्यामुळे रेणुकाने आदल्या दिवशी पुरण करून ठेवले .आणि मग कवी ग्रेस आल्यावर इतर विषयांसोबत पुरणावर देखील चर्चा झाली. पुरणाचा रंग ,रूप ,रस ,गंध ,पोत यावर कवी ग्रेस भरभरून बोलत होते .त्या बैठकीत त्यांनी रेणुकाच्या घराला नाव दिले “देशीकार लेणे “.रेणुका म्हणते ,हा माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी सुखद क्षण आहे. सात पिढ्या अभिमान करतील अशी आमच्या घरातील ही घटना आहे की ,कवी ग्रेसांनी आमच्या घराला नाव दिले .

आठवणीच्या ओघात रेणुका सांगते की, बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या घरी तीन वेळेला येऊन गेले. एकदा तर त्यांनी पिठलं भाकरी खाण्याची इच्छा व्यक्त केली .त्यावेळी त्यांच्यासोबत चार-पाच जण होते. जेवण झाल्यावर निघताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाबासाहेब थांबले .मग अनौपचारिक गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पांच्या ओघात एक ते दीड तासाच्या कालावधीत बाबासाहेबांनी गागाभट्ट यांचा कुळवृत्तान्त त्यांच्यासमोर मांडला. ती रेणुका साठी फार मोठी आठवण आहे.

रेणुकापुढे सांगते की ,राजकीय क्षेत्राचा विचार करायचे झाल्यास ,नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनेक कार्यक्रमांचे निवेदन तिने केलेले आहे. गडकरींच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून चार वेळा मोठ्या स्टेजवर त्यांच्या मुलाखतीही घेतलेल्या आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र शासन ,माती परीक्षण, भारत सरकार, यांच्यासोबत आणि फॉरेन्सिक लॅबोरेटरी पोस्टमार्टम या सर्व विषयांवर काम केले आहे .त्यामुळे त्या त्या विषयाचा अभ्यास देखील झाला. या सर्व कार्यक्रमात वेळेचे बंधन असायचे. त्यामुळे त्या विशिष्ट वेळेतच विषयाचा अभ्यास करावा लागायचा.

रेणुकांनी शिक्षण क्षेत्रात देखील काम केलेले आहे .सोबतच दिव्यांगांसाठी सुद्धा कार्यक्रमांचे निवेदन केले आहे. विशेषतः अंध मुलांच्या ऑर्केस्ट्रासाठी.

सामाजिक आशया सोबत रेणुका ने आरती अंकलीकर ,देवकी पंडित यांच्या कार्यक्रमांचे देखील निवेदन केले आहे. श्रीधर फडके यांचे सोबत गीत रामायणाचे भरपूर कार्यक्रम झाले .त्यासोबतच गीत रामायणाचे अमेरिकेत तीन ठिकाणी कार्यक्रम झाले. आजपर्यंत जवळपास 5200 च्या वर निवेदनांचे कार्यक्रम झाले आहेत. केवळ लावणी वरच काम झालेले नाही .

भूतकाळाकडे वळून पाहताना रेणुका समाधानाने सांगते की, एक एक विषय मिळत गेला. त्यावर एखाद्या प्रबंधकासारखे काम झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे गदिमा, शांताबाई शेळके, बा. भ. बोरकर ,भा.रा. तांबे, सुधीर फडके, कवी अनिल, कवी ग्रेस, सुरेश भट, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, यांच्या साहित्याचा व कवितांचा रेणुकाने अभ्यास केला आहे .पाडगावकर आणि अरुण दाते यांच्यासोबत तर निवेदनाचे कार्यक्रम देखील केले आहेत. ती म्हणते की मला माझ्या कामामुळे पैसा आणि प्रतिष्ठा तर मिळालीच. सोबत समाधान आनंद आणि विचारांची व्यापकता मिळाली.
रेणुका चे म्हणणे आहे की ,निवेदन करताना जाणवते की ,समोर तीन प्रकारचे श्रोते असतात. एक म्हणजे साधे लोक. जे श्रवणाचा आनंद घेतात. दुसरा श्रोतावर्ग की ,त्यांना निवेदकाबाबत उत्सुकता असते .तिसरा वर्ग बुद्धिमान लोकांचा वर्ग असतो. ते त्या विषयातील तज्ञ असतात .म्हणजे तीनही प्रकारच्या श्रोत्यांना निवेदन करताना समाधान देणे, हे निवेदनकर्त्याचे मोठे आव्हान असते .यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे .आतापर्यंत श्रोत्यांचे भरपूर आशीर्वाद मिळाले .

रेणुका गेले 25 वर्षांपासून सप्तक या नागपुरातील नावाजलेल्या संस्थेशी जुळलेली आहे. नागपुरात 40 वर्षे जुनी ही संस्था आहे. या संस्थेने रेणुकाला खूप मोकळीक दिलेली आहे .जेंव्हा जेंव्हा रेणुकाने त्यांना नवनवीन कल्पना सांगितल्या तेंव्हा तेंव्हा सप्तकने त्या अतिशय चांगल्या पद्धतीने उचलून धरल्या. याचे समाधान रेणुकाला आहे .

गेल्या अनेक वर्षांपासून रेणुकाने स्वतःच्या कॅनव्हास वर काम करणे सुरू केले आहे. त्यामध्ये संकल्पना, निर्मिती, व निवेदन तिचेच असते. या आधारावर तुका आकाशाएवढा ,हा कार्यक्रम होता. तर या अंतर्गत कैवल्याचा पुतळा या कार्यक्रमाचे आयोजन तिने केले आहे .यासोबतच
बा. भ .बोरकरांचा कार्यक्रम जीवन त्यांना कळले हो याचेही यशस्वी आयोजन झालेले आहे.

रेणुका सांगते, सर्वात गाजलेला कार्यक्रम म्हणजे वेगळ्या वाटा. या कार्यक्रमाची मूळ कल्पना म्हणजे, शिक्षण वेगळ्या क्षेत्रात घेतले व आयुष्याची वेगळीच वाट निवडली. उदाहरणार्थ सलील कुलकर्णी, राणी बंग, अभय बंग, प्रकाश आमटे ,रवी कोल्हे ,स्मिता कोल्हे, देवेंद्र फडणवीस, कौशल इनामदार, कमलेश भडकमकर ,गिरीश ओक हे सर्व या कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर आहेत .त्याचे स्वरूप असे होते की ,एका वेळी चार माणसे स्टेजवर असायचे .त्यापैकी दोन नामांकित गाजलेली नावे आणि दोन कर्तुत्ववान पण प्रसिद्ध झोतात न आलेले, न गाजलेली नावे .त्यावेळी सुनंदा पाटील यांना मुंबईला जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मिळाला होता .सुनंदा पाटीलने नांगराला स्वतः जुंपून शेती केली .कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला .या कार्यक्रमानंतर सुनंदा पाटील यांच्या जीवनावर एक सिनेमा देखील निघाला .या कार्यक्रमात, “यश म्हणजे नेमकं काय असते,” हे सांगताना सुनंदा पाटील यांनी खूप सुंदर उत्तर दिले. त्या म्हणाल्या की माझ्यासारखी एक व्यक्ती जेव्हा मी घडवीन, तेव्हा मी यशस्वी होईल .तसेच वेगळ्या वाटांबाबतच्या अजून एका कार्यक्रमाविषयी रेणुकाने सांगितले की, लक्ष्मण गोळे हा तरुण वयात चुकीच्या मार्गाला लागला. त्याने त्याचे आयुष्यात खून देखील केला .मात्र पुढे कारागृहात असताना गांधी विचारांकडे आकर्षित झाला. सकारात्मक आचरण केले .त्यामुळे त्याची शिक्षा माफ झाली. आता तो गांधी विचारांवर भाषण देत असतो. एका अर्थाने वाल्याचा वाल्मिकी झाला .रेणुकापुढे म्हणाली की मनोरंजनासोबत अंजनाची ही गरज असते. केवळ धांगडधिंगा नको तर चांगले कलाकार तयार व्हायला हवेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला विचार देता आला पाहिजे. मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांच्या कार्यक्रमात जेव्हा “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” या गाण्यावर रेणुकाने निवेदन केले ,तेंव्हा तीन-चार तरुण मुले तिला येऊन भेटले. त्यांनी तिला सांगितले की ,त्यांनी आज पासून सिगारेट सोडण्याचा निश्चय केला आहे. रेणुका म्हणते माझ्यासाठी हा फार मोठा पुरस्कारच आहे.

बरेच वेळेला कार्यक्रम झाल्यावर मुली मुलं बायका आपल्या वैयक्तिक गोष्टींची रेणुका सोबत चर्चा करतात. त्यामुळे प्रेम करणारी माणसे खूप मिळाली असे तिला वाटते.

रेणुका राष्ट्रसेविका समितीशी जोडलेली आहे. ती स्वतः एक सेविका आहे .मावशी केळकर यांचे रामायण जगात जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचविता येईल तिथे पोचवायचे, हे तिच्या आयुष्याचे ध्येय आहे .आज पर्यंत वंदनीय मावशींच्या रामायणावर तिने अनेक प्रवचने केले आहेत.

रेणुकाशी बोलताना विषय संपत नव्हते .तिच्या क्षेत्रातील सर्वदूर अनुभव खुल्या दिल्याने ती आम्हाला सांगत होती. थोडक्यात काय तर ,समोर अथांग समुद्र व त्यामध्ये अमूल्य अशा मोत्यांच्या राशी .काही मोती ती आमच्या ओंजळी टाकत होती, तर काही आम्ही वेचत होतो .माझ्यासोबत माझी मैत्रीण जयश्री अलकरी होती. रेणुका सोबत त्या दिवशी वार्तालाप करून आम्ही दोघेही तृप्तीचा अनुभव घेत होतो. बोलण्याच्या ओघात रेणुकाने सांगितले की, तिने दोन महत्त्वाचे कार्यक्रम सेट केले .त्यातील एक म्हणजे सामवेदातून संगीत उत्पत्ती .हा कार्यक्रम रेणुकाने आरती अंकलीकर यांचे सोबत केला. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामवेद स्टेजवर आणला. त्या अनुषंगाने नांदेडचे चार सामवेदी पंडित स्टेजवर बोलाविले. तसेच त्यांच्यासोबत कर्नाटकच्या रुद्रवीणा मास्टर ज्योती हेगडे यांना विणा वादनासाठी बोलाविले होते. कार्यक्रमाचा सराव करताना ज्योतीताईंना रुद्रवीणा लावायला वेळ लागायचा .त्यासंबंधी रेणुका ने त्यांना विचारले असता ज्योती त्यांनी सांगितले की ,तारांची लय आणि ठेका जोपर्यंत माझ्या हृदयाच्या ठोक्याची जोडल्या जात नाही, तोपर्यंत मी साथ संगत सुरू करत नाही. मला वाटते की भारतीय कला संस्कृतीमधील हा अत्यंत श्रेष्ठअविष्कार आहे.

रेणुकाला किशोरीताई अमोणकरांसोबतही वार्तालापाचा योग आला. श्रुती पासून तर सर्वच विषय खूप सुंदर पद्धतीने त्या बोलल्या. त्यांच्या वाणीतील एकेक शब्द सुगंधी फुलाप्रमाणे कानात प्राण आणून रेणुका वेचित होती.

रेणुकाच्या 25 लेखांची एक लेखमाला तरुण भारताने प्रकाशित केली. आहे तसेच 25 लेखांची लेखमाला महाराष्ट्र टाइम्सने देखील प्रकाशित केली आहे. रेणुकाच्या घरी शंकराचार्य येऊन गेलेत .अर्थात सांगण्याच्या ओघात तीने सांगितले .पुन्हा संकोचाने हे देखील सांगितले की, हा लिहिण्याचा विषय नाही .मात्र मला ते आवश्यक वाटला. मला वाटते सर्व थोरामोठ्यांच्या येण्याने रेणुकाचे घर पावन झाले आहे .पूजनीय शंकराचार्य जेव्हा तिच्या घरी आले, तेंव्हा तिच्या यजमानांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आर्वीकर गुरुजीं द्वारा घरी विष्णू यागाचे आयोजन केले होते .त्यांचे आशीर्वाद रेणुकाच्या परिवाराला मिळाले आहेत.

मला एक गोष्ट आठवते की, सचिन तेंडुलकर यांच्या कार्यक्रमाचे सुद्धा निवेदन रेणुकाने केले आहे. मला वाटते आचरेकर गुरुजींच्या सत्काराचा तो कार्यक्रम होता.

निवेदनाच्या निमित्ताने रेणुकाचा भारतभर व परदेशात भरपूर प्रवास झाला आणि कार्यक्रम झाले .दूरदर्शन, आकाशवाणी, वर्ल्ड क्लास लोकांच्या शेकडोंच्यावर मुलाखती, खूप सार्‍या डॉक्युमेंटरी यांना रेणुकाने आवाज दिला ,हे सर्व रिवार्डिंग वाटते.

स्वतःच्या आयुष्याविषयी रेणुका खूप तृप्त आणि कृतज्ञ आहे .माझ्यासाठी देखील आनंदाची आठवण म्हणजे, श्रीधर फडकेंच्या गीत रामायणावरील कार्यक्रम जेव्हा अकोल्याला झाला तेंव्हा, रेणुकाचा माझ्याकडे मुक्काम झालेला आहे .तेव्हापासूनच ऋणानुबंध सुरू झाले.

माझ्या एक लक्षात आले की रेणुका डाऊन टू अर्थ आहे. याबाबत तिच्याशी बोलताना ती म्हणाली की, इतक्या मोठमोठ्या, पण मनाने साध्या लोकांचा सहवास मिळाला त्यामुळे, चढू शकत नाही. मला वाटते रेणुकाचे यश तिच्या सहजपणात, विनम्रतेत ,समाधानात आणि कृतज्ञतेत आहे . तिच्या आजपर्यंतच्या समृद्ध वाटचाली करता हार्दिक अभिनंदन. आणि भविष्यातील योजना यशस्वी होण्याकरिता मनापासून हार्दिक शुभेच्छा…..

 

ऍड. मनीषा कुलकर्णी
नागपूर
9823510335

एड. मनीषा कुलकर्णी

लेखिका प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असून, अनाथ बालक - बालिकांसाठी अनाथाश्रमाच्या माध्यमातून सेवा कार्य करतात. मोबाईल नं - 9823510335

Comments (0)
Add Comment