रोहतांग बोगदा ते अटल बोगदा निर्माण.
प्रसिद्ध अश्या रोहतांग पास च्या खालून जाणारा रोहतांग बोगदा चे नामकरण ‘अटल बोगदा’ असं केलं गेलं. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वा समजला जाणारा हा बोगदा मानला जातो. भारताला लेह-लडाख सोबत जोडणारा मनाली- लेह महामार्ग हा जवळपास ८ महिने अति- बर्फ़वृष्टीमुळे बंद असतो. त्यामुळे ह्या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटतो व दरम्यानच्या काळात दळण वळण व इतर महत्वाच्या कामा करिता मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या अडचणीवर मात करण्याच्या दृष्टीने संपुर्ण वर्षभर लेह-लडाखच्या भागासोबत संपर्कात राहण्यासाठी ह्या महामार्गावर संपूर्ण वर्षभर वाहतूक करण्यास सक्षम असेल असा बोगदा असावा असा क्रांतिकारी विचार फार पूर्वी मांडला गेला होता. पण अस्तीत्वात असणार्या अनेक सरकारनी ह्याकडे फार लक्ष दिलं नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी ३ जून २००० रोजी ह्या बोगद्याची घोषणा केली. पण राजकीय नेतृत्व बदलल्यामुळे हवी तशी गती ह्या कामाला आली नाही. ह्या शिवाय अनेक तांत्रिक अडचणी ह्या कामात समोर उभ्या राहिल्या त्यावर मात करण्यासाठी बराचसा कालावधी लागला. या बोगद्याची पायाभरणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली परंतु त्यांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्यास्मृती कायम राहण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्रमोदींनी या बोगद्याला अटल बोगदा असे नामकरण केले.
समुद्र सपाटीपासून जवळपास ३१०० मीटर (१०,१७० फूट) उंचीवर असणारा जगातील सर्वात लांबीचा तब्बल ८.८ किलोमीटर आहे. जगातील १०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर इतका लांब असणारा हा एकमेव बोगदा आहे. पीर – पांजालच्या पर्वत रांगाखालून जाणारा हा बोगदा मनाली बाजूने धुंडी गावापासून सुरु होऊन पलीकडच्या बाजूला जुन्या लेह- मनाली रस्त्याला तेलींगकडे जोडतो. ह्या बोगद्यामुळे मनाली ते केलोंग ह्या मधील अंतर जवळपास ४६ किलोमीटर ने कमी झालं आहे. हे अंतर कमी झाल्यामुळे मनाली ते लेह – लडाख हा प्रवास वर्षातील जवळपास सगळ्या महिन्यात शक्य होणार आहे. रोहतांग पास ओलांडण्यासाठी होणाऱ्या अडथळ्यातून सुटका होणार असून वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. ह्याशिवाय प्रदूषण ही कमी होईल. ह्या सर्वाचा फायदा पर्यायाने सगळ्यात जास्ती भारताच्या सैन्याला होईल यात दुमत नाही. ह्याशिवाय रोहतांगला भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे होणाऱ्या ट्राफिकला बाजूला सारून सैन्याला वाहतूक करता येणार आहे.
केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी अटल बोगदा बांधायला जवळपास ३८०० कोटी रुपये खर्च आला असून, ३००० चे आसपास कंत्राटी कामगार आणि ६५० बी.आर.ओ. चे कर्मचारी २४ X ७ ह्या रस्त्याचं बांधकाम करत होते. ह्या बोगद्याच्या निर्मितीत अनेक अडचणी अभियांत्रिकीच्या दृष्टीने समोर आल्या. एकतर इतक्या उंचीवर हिमालयाच्या पर्वतरांगांना पोखरून बोगदा बांधणं खूप जोखमीचं होतं त्यात ह्या बोगद्याच्या मार्गात असलेल्या पाण्याच्या वाहिनीमुळे खूप मोठा धोका समोर उभा राहिला होता. पोखरून काढलेली ८००,००० घन मीटर दगड माती कुठे टाकायची हा प्रश्न ही मोठा होता. ह्याशिवाय रोज जवळपास ३ मिलियन लिटर प्रति दिवस निघणार पाणी नियंत्रित करणं खूप मोठी अडचण ह्या बोगद्याच्या निर्मितीत होती. पण ह्या सगळ्यावर मात करत ह्या बोगद्याचे अशक्य वाटणारे काम भारतीय अभियंतांनी पूर्ण तर केलं. ह्याच बरोबर अतिशय नाविन्यपूर्ण सुरक्षतेतीच्या क्षमतेने निर्माण केला गेला गेलेला हा बोगदा आहे.
ह्या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर वर टेलीफोन ची सोय आहे. प्रत्येक ६० मीटर वर आग विझवण्यासाठी नळ बसवलेला आहे. प्रत्येक ५०० मीटर वर आपात कालीन निकास आहे. प्रत्येक किलोमीटरवर हवेच प्रदूषण मोजण्याची आणि नियंत्रण करण्याची सोय आहे. प्रत्येक २५० मीटरवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे. ह्या बोगद्यातून वाहनांचा वेग ८० किलोमीटर/ तास इतका नियंत्रित करण्यात आला आहे. दररोज जवळपास ३००० कार आणि १५०० ट्रक ह्यांची वाहतूक होणार आहे. जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असणार आहे. हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून ह्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत ज्याची यंत्रणा डी.आर.डी.ओ. ने विकसित केली आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे अटल बोगदा देशातील अभियांत्रिकीचा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ह्याच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, कामगार, आणि ह्याचे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात तयार करणाऱ्या सर्व यंत्रणा ह्यांचे खरोखरच करावे तेवढे अभिनंदन थोडे आहे.
फोटो – mahamtb.com साभार.