सामाजिक समरसता.

सामाजिक समरसता. 
“सामाजिक समरसता म्हणजे नेमकं काय हो?” जेवण करता करता बायको ना अचानक गुगली टाकली. “बापरे !तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना! म्हणजे आज अगदी सामाजिक विषय वगैरे… “मी फिरकी घेण्याच्या मूडमध्ये होतो. “अहो सांगा ना! याचा अर्थ सर्व समाजाने एकसारख्या चालीरीती पाळणे, एकसारख्या जीवन पद्धतीचा अवलंब करणे, विज्ञानाच्या भाषेत सर्व समाज होमोजीनियस असणं असं अभिप्रेत आहे का?” “अच्छा, तू परमपूजनीय सरसंघचालकांचे भाषण ऐकलंस वाटतं. अगं, समाज होमोजीनियस असणे ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. मुळात हाताची पाच बोटे, एका आईच्या पोटी जन्म घेतलेली, एका संस्कारात वाढलेली लेकरे एकसारखी नसतात. मग समाजाने एकसारखे असण्याचा प्रश्नच येत नाही. तू प.पू. सरसंघचालकांचे भाषण नीट ऐकलेले दिसत नाही. विविधता हा प्रकृतीचा स्थायीभाव आहे. सर्व जगालाच एका रंगात रंगवून टाकण्याची प्रवृत्ती असणारीही काही मंडळी आहेत या जगात. जी धर्माच्या नावावर जगभरात धुमाकूळ घालत असतात. जे आपल्या मताला मानत नाहीत, त्यांना एकतर आपल्या रंगात रंगवणे किंवा त्यांना संपवणे हा प्रकार जगातील अनेक देशांमध्ये चाललेला आहे. सनातन धर्म मात्र हे मानत नाही. निसर्गातील विविधतेचा आपल्या धर्माने नेहमीच आदर केलेला आहे. वेगवेगळे पंथ, जाती, जीवनपद्धती अनेक वर्षांपासून आजतागायत आपल्या भारतभूमीत गुण्यागोविंदाने नांदल्यात. शत्रू देखील असला तरी त्याला पूर्ण सन्मानाने वागविण्याचे संस्कार आपला धर्म आपल्याला देतो. हिंदू धर्माने अनेक पंथ, विचारधारा यांचा नेहमीच आदर केला. त्यांना फुलण्याची बहरण्याची पूर्ण संधी दिली. समाजात विविध व्यवसाय करणारे बारा बलुतेदार यांची त्या त्या व्यवसायानुरूप विविध जातींमध्ये विभागणी झाली, ही केवळ सोय म्हणून. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचा तो एक भाग होता. परंतु त्याचे पर्यावसान असे झाले की समाज हा धर्मकेंद्रित न होता जाती केंद्रित झाला.
वास्तविक पाहता धर्म म्हणजे आचरण पद्धती. ‘धारयति इति स: धर्म:’,  अर्थात जो धारण केला जातो तो धर्म. अशी धर्माची व्याख्या आहे. हिंदू विचारधारेला मानणारे 18 पगड जातींचे लोक हिंदुत्वाच्या एका समान धाग्याने बांधले गेलेले आहेत. परंतु हा प्रगल्भ विचार हळूहळू लोप पावत चालला आहे की काय असे वाटते. जाती जातीतील संघर्ष सांप्रत पराकोटीला पोचला आहे. राजकीय स्वार्थासाठी दुहीच्या या विषवृक्षाला खतपाणी घालण्याचे काम विविध राजकीय पक्ष सातत्याने करत असतात. आरक्षण हा मुद्दा हाताशी धरून हिंदूंना किती काळ असे झुंजवत ठेवणार हे परमेश्वर जाणे ! 
मग ही परिस्थिती बदलायची ती कशी? ही बदलवणे पूर्णपणे समाजाच्याच हाती आहे परमपूजनीय सरसंघचालकांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात एक मंत्र दिला. ते म्हणतात,” वाल्मिकी जयंती फक्त वाल्मिकी समाजानेच का म्हणून साजरी करावी? इतरांनी त्यात भाग का घेऊ नये?” आपले सण समारंभ हे समाजाला एकत्र आणण्याचे एक अतिशय उत्तम माध्यम आहेत. तुला गंमत वाटेल, पण सध्याची परिस्थिती पाहता हे सण समारंभ थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी या सर्वांवर विशिष्ट जातीवाचक गटाचा वरचष्मा दिसतो. जणू जातींनी या थोर पुरुषांना हायजॅक केले की काय असे वाटते. अगं, या महापुरुषांचा संघर्षच मुळात जातीव्यवस्थेविरुद्ध होता. महात्मा ज्योतिबा फुले, संत तुकाराम महाराज अशी अनेक उदाहरणे आहेत. शोकांतिका अशी आहे की समाजाने याच महापुरुषांना एका विशिष्ट जातीचे प्रतीक बनविलेले आहे. इतके हे जातीचे विष समाजाच्या नसानसात भिनले आहे.
 ‘जे जातीभेदाविरुद्ध लढले दिनराती,
त्या संतांच्याच आम्ही काढितो आज जाती. 
जाता जात नाही तिला म्हणतात जात, 
जातीने या केला मानव जातीचा घात.’ 
हिंदू समाज हा हिंदुत्व या एकमेव मुद्द्यावर एकत्रित आल्याशिवाय त्याचे सबलीकरण शक्य नाही. अन्यथा आपल्याच देशात एखाद्या निर्वासितांसारखे जगण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक समरसता ही एकच संजीवनी आता हिंदू समाजाला या जातीभेद रुपी शतकानो शतकाच्या मूर्छेतून बाहेर काढू शकेल. (Photo by google.)
– निकिता गजानन गावंडे 
न्यू सुभेदार लेआउट, नागपूर. 
९९७०६६३८१३

निकिता गजानन गावंडे, नागपुर.

लेखिका सामाजिक विषयाच्या अभ्यासक आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये नियमित स्तंभलेखन, विविध सामाजिक विषयांवर कविता, विशेषत्वाने हास्य कवितांचे लेखन करतात. मोबा - 9970663813.

जातिभेदजातीअंतसमरसता
Comments (0)
Add Comment