तियानन्मेनच्या नंतर..
तिबेट, तायवान अन तियानन्मेन चौक ! चिनी मुस्कटदाबीची देशांतर्गत आणि बाहेरची हि काही ठळक उदाहरणे. त्यातहि आद्याक्षर इंग्रजी ‘T’ हे कॉमन आहे, जणू ‘ट्रेसपासिंग’ किंवा ‘टेरर’ ह्या शब्दांचे सूचक असावे.
त्यातही पहिली दोन उदाहरणे चीन बाहेरची असली तरी तिसरे हे ‘बांबू कर्टन’ वाल्या चीनच्या आतील बेजिंग शहरातले आहे. तियानन्मेन चौकात १९८९ साली काय काय घडले, त्यावर खूप काही आधीच लिहिले गेले आहे. आज भारतासह अन्य देशातही चिनचे गोडवे गाणाऱ्या तथाकथित पुरोगामी आणि स्वघोषित बुद्धिजीवी, अशा तद्दन दुटप्पी लोकांच्या जिव्हेला आणि लेखणीला लुळीपांगळी करणारा हा शब्द आहे- तियानन्मेन ! त्यावर्षी १५ एप्रिल पासून तिथे विद्यार्थ्याचे जबरदस्त आंदोलन सुरु झाले. त्यांना लोकतांत्रिक मूल्यव्यवस्था हवी होती. वर्तमानपत्रांना स्वातंत्र्य आणि सर्वांकरिता अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हवे होते. हे तरुण विद्यार्थी देशाचे शत्रू होते काय? नाही. त्यांना चीन ची हानी करायची होती काय? नाही. मात्र तरीही, त्यांना मिळाली दडपशाही. ४ जून ला माणुसकीला काळिमा फासण्यात आला. अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद पद्धतीने टँक्स आणि असौल्ट रायफल्स च्या मदतीने सैन्यातर्फे ते आंदोलन चिरडण्यात आले. ३१ वर्षांपूर्वी आधुनिक शिक्षणाने सभ्य, सुसंस्कृत होऊ लागलेल्या तत्कालीन जगाला हा चीन चा फार अनपेक्षित चेहरा होता. भारताने तो चेहरा १९६२ सालीच पाहिला होता. कुणामुळे? भारतीय सैन्याला शेतात शेती करायला पाठवण्याची मूर्ख स्वप्ने पाहणाऱ्या स्वघोषित रोमँटिक सत्ताधीशांच्या अव्यवहारिकतेमुळे ! पंचशील चे गोडवे गाणाऱ्या आणि ‘हिंदी चिनी भाई भाई’ अशा भोळसट घोषणा देणाऱ्या तत्कालीन भारतीय सत्ताधीशांच्या अदूरदर्शीपणामुळे ! त्यानंतरहि चीन ने त्याचा असली विस्तारवादी दृष्टिकोन कधी लपवला नाही. भारताबद्दल बोलायचे तर अरुणाचल, डोकलाम, लडाख अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. ही यादी संपत नाहीये.
१९६२ च्या चिनी आक्रमणापूर्वीच श्री गुरुजींनी सावधतेचा इशारा दिला होता हा इतिहास आहे. जेव्हा डॉ. मनमोहनसिंगांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत चिनी ड्रॅगन भारताच्या सभोवती विळखा घालण्याच्या दृष्टीने हालचाली करीत होता तेव्हा प. पू . सरसंघचालकांच्या त्याकाळातील उद्बोधनात सातत्याने त्याचा परामर्श होता आणि इशारा देखील. पण त्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उभारणे, ठोस पाऊले उचलणे तर सोडा, तत्कालीन सत्ताधीशांकडून साधे भारतीय लष्कराला अत्याधुनिक करण्याचे दृष्टीने काही एक करण्यात आले नव्हते. हा देखील इतिहास आहेच की.
आता अलिकडे नेपाळ च्या वर्तमान सरकारचा वापर करून पाहण्याचा प्रयत्न सुरु आहे. असं म्हणतात की, सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेपाळी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि पक्षप्रमुख पुष्प कमल दहल यांच्या दरम्यान सत्तासंघर्ष विकोपाला जाण्याची चिन्हे दिसताच नेपाळमधील चिनी राजदूतावासाने दोघांना दोघांना एकत्रित संगठितपणे भारताविरुद्ध मोर्चे बांधणीचा आदेश दिला. त्यानंतर नेपाळी सत्ताधारी सूर इतका भारतविरोधी झाला.
म्हणजे इथेही मुळात चिनी कम्युनिस्ट पक्षाची विस्तारवादी महत्वाकांक्षा आणि दडपशाहीची धोरणे असावीत हा संशय घ्यायला पुरेपूर वाव आहे. नेपाळचे आजचे सत्ताधारी नेते हे विसरले आहेत की तियानन्मेन चौकातच सुमारे सहा दशकांपूर्वी माओ झेडांग यांनी चीनच्या पाच बोटांचे स्वप्न बोलून दाखवले होते आणि त्यातील एक बोट नेपाळ होय. नेपाळी स्मरणशक्ती क्षीण झाली असेल पण चीनच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. तिथे लोक बदलतात, मार्ग बदलतात पण उद्दिष्टे कायम राहतात.
जगाच्या बाबतीत म्हणाल तर चीनचे काम त्याचे पोवाडे गाणार्या तुणतुणेबाज लेफ्ट लिबरल मंडळींच्या जोरावर छान चालले होते. ही कामी-वामी मंडळी आपापल्या मायदेशांचे हित विसरुन चीनला पोषक व प्रमोशनल असे सबकुछ -वाट्टेल ते करीत असतात. त्याकरिता आपापल्या देशाची धोरणेच काय, कायदेसुद्धा बदलून घेण्यास ते आतुर असतात. पण, एका अर्थाने व्हायरस मुळे एक बरं झालं. आजच्या आधुनिक जगाला ‘वुहान व्हायरस’ च्या निमित्ताने चीनचा अक्राळविक्राळ चेहरा पुन्हा दिसला असे कुणी म्हटल्यास ते फारसे चूक होणार नाही.
अधिकांश मोठी राष्ट्रे एकीकडे आणि चीन दुसरीकडे अशी सध्या परिस्थिती आहे. युध्दासारखी परिस्थिती येऊ नये असे सगळ्यांनाच वाटते. पण ती जवाबदारी दोन्ही बाजूंवर असते. तुटेपर्यंत ताणायचे आणि त्यातून समोरच्याची, त्याच्या प्रतिक्रियेची निरीक्षणे करायची हा तर त्यांचा आवडीचा खेळ जणू. राज्यकर्ता नेता बदलला तरी तिथे त्यात फरक नाही. कारण, शेकडो वर्षापर्यंतच्या परिस्थितीचे आकलन करणे, आडाखे बांधणे, त्यानुसार डावपेच ठरविणे हे तर त्यांचे कामाचे ब्रीद.
नव्या आक्रमकपणा मागील कारणे..
‘सारे काही करून चोर तो चोर -पुन्हा शिरजोर’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. चीन च्या एकूण अशा वागणुकीच्या पद्धतीवर ती चपखल बसते . हा देखील पूर्वानुभव आहे. आज जगभरातील कित्येक चिनी राजदूत त्यांच्या देशावर टीका होताच ‘डिप्लोमसी’च्या संकेतांना वाऱ्यावर सोडून आक्रमक होताहेत, उर्मट भाषा वापरून जगाला उग्र चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. ‘अटॅक इज बेस्ट डिफेन्स’ च्या धर्तीवर स्वरक्षणार्थ आक्रमक होण्याचा हा प्रयत्न असेल ही पण त्यातून सारे काही आलबेल नसल्याचेही संकेत मिळतात. थोडा इतिहास बघूया. शी जिनपिंग यांचे वडील शी झोन्गशन कम्युनिस्ट पक्षाचे मोठे कार्यकर्ते असले तरी ते माओ च्या विरोधकांत गणले जात. त्यांना पक्षातून काढण्यात आले होते, त्यांना आणि कुटुंबियांना खूप त्रास झाला होता, हा इतिहास आहे. जिनपिंग यांच्या अध्यक्षपदावरील पहिल्या भाषणात माओ चा उल्लेख सापडला नाही म्हणून तेथील आणि बाहेरचे कित्येक लोक चकित झाले हि वस्तुस्थिती आहे. ‘हा माझा मार्ग वेगळा’ अशी ती नव्या नेत्याकडून देण्यात आलेली नांदीच होती जणू.
आज सर्वेसर्वा असले तरी आरंभापासून शी जिनपिंग यांना पक्षांतर्गत विरोधाच्या बातम्या काही नवीन नाहीत. ते निवडून आल्यानंतर त्यांच्या विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आले आणि त्याला भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा रंग देण्यात आला. असे असले तरीही जिनपिंग यांच्या आधी पदावर असलेले चीनचे सरवोच्च नेते हू जिंताओ यांना हे नापसंद असल्याचे संकेत खुलेपणाने द्यावे लागले होते. चीन मध्ये हे असे रोज रोज घडत नाही. त्यामुळे वुहान व्हायरस नंतर त्यात काय बदल घडतोय याकडे आंतर राष्ट्रीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे. कोरोना मुळे तिथे जीव गमावलेल्यांचा जो आकडा चीन ने सांगितला तो कितपत खरा असावा हा देखील प्रश्न आहे. तो खरे मानायची एक चांगला शेजारी या नात्याने तुमची कितीही इच्छा असली तरी तसे मानाने महा कठीण आहे. कारण, वस्तुस्थितीदर्शक पुरावे खूप वेगळेच सांगताहेत. तेव्हा तिथेही लाखो जीव घेणाऱ्या वुहान व्हायरस ने तेथील जनमानस हि ढवळलेले असणे नैसर्गिक आहे. चिनी ड्रॅगन ला त्याने किती फरक पडतो हे सांगणे कठीण आहे. मात्र, तेथील उद्योगांनी परतीची पाऊले टाकायला, बाहेर जायला सुरुवात केल्याने चिनी महत्वाकांक्षा दुखावली गेलीय हे नक्की आहे. त्यामुळे चिनी वर्तमानपत्रातून भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय औद्योगिक हब बनण्याच्या प्रयत्नांवर स्वस्थ टीका नव्हे तर चक्क हिणकस शेरेबाजी केली जात आहे. उदयोगांच्या ह्या अशा परतण्याला उद्या गती प्राप्त झाली तर चीनचा जळफळाट वाढणार आहे. त्यावरून चीनच्या कारवाया वाढल्या, तर नवल नाही.
अगदी शत्रू सारखा जरी वागला तरी शेजाऱ्याचे अनिष्ट चिंतण्याची आपली परंपरा नाही. हा उदात्त पणा आपण जपूही. पण समजा तिकडे चिनी भिंतीच्या आत लोकशाही आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या मागणीने जर जोर धरला तर त्यात आश्चर्य वाटायला नको. समजा त्यात आंदोलकांना यश मिळाले तर त्यात चिनी जनतेचे, लोकशाही मूल्यांचे आणि पर्यायाने जगाचे ही वाईट नाही. त्याआधीच चीन ने योग्य पाउले टाकावित, देशातील जनतेला आणि बाहेर जगाला विश्वासात घ्यावे, फुकट आक्रमकपणा सोडून कोरोनाविषयी, व्हायरस चे संशोधन करणार्या प्रयोगशाळांविषयी माहिती शेयर करण्यात त्यांचे व जगाचे कल्याण आहे. चीन जर वन्य प्राण्यांना खाणे सोडणार असेल, शाकाहार कडे किंचित जरी कलणार असेल तर ती देखील चांगली सुरुवात ठरु शकते.
- संजय तिवारी
8668387626