शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठे हरवते आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य,वैज्ञानिक दृष्टिकोन अन् पुरोगामित्व.

राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष...

राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष…

शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठे हरवते आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य,वैज्ञानिक दृष्टिकोन अन् पुरोगामित्व.

आज 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन आहे.स्वतंत्र राष्ट्रात व्यवस्थेने दीन करून ठेवलेल्या संपत्तीच्या निर्मात्याचे,पोशिंद्याचे तोंडपूजे स्मरण आज अनेक जण करतांना दिसतील.या निमित्ताने भारतीय शेती आणि शेतकरी यांच्या समोरील आव्हानांवर चर्चा झडून यावी हा लेखाचा उद्देश.
शेतकरी जो पंच महाभुतांच्या,निसर्गाच्या ऊर्जेला आपल्या श्रम,बुद्धी,गुंतवणुकीची जोड देत एका दाण्याचे हजार दाणे करीत संपत्तीचे सृजन करतो. ज्याच्या जीवावर सत्तातंत्राचे,संपत्तीचे सारे इमले उभे असतात.दुर्दैवाने तो शेतकरी आजही डाव्यांच्या पुस्तकात शोषक आहे तर उजव्यांच्या ग्रंथांत शूद्र आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य,वैज्ञानिक दृष्टिकोन,पुरोगामित्व, बुद्धिप्रामाण्यवाद अशा मोठं मोठ्या शब्दांच्या बाता मारणारे शेतकऱ्यांची जेंव्हा वेळ येते तेंव्हा नेमकी याच्या उलट भूमिका घेतांना दिसतात.
ज्या व्यवस्थेने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च उत्पादन खर्च भरून निघून येऊ दिला नाही.कर्जापायी लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात आजही रोज होत आहेत.त्या व्यवस्थेच्या कोंडवाड्या तून शेतकरी अजिबात बाहेर पडू नये म्हणून डावे,उजवे सारे एकजात एकत्र येऊन सर्वशक्तीनिशी प्रतिकार करतात.
आम्ही धोरणे राबवून,कायदे करून शेतकरी बाजारात लुटला अन् वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या गप्पा झाडत विज्ञान, तंत्रज्ञाना पासून शेतकरी कसा वंचित राहील या साठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत.आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे पण शेतकऱ्यांना आपलं शेतमाल कुठे विकावा,कुणाला विकावा,याचे स्वातंत्र्य मात्र शेतकऱ्यांना आम्ही कुठल्याच किंमतीवर शेतकऱ्यांना भेटू द्यायला तयार नाही.आम्हाला इंडिया डिजिटल हवा आहे,अगदी सगळी कसे ऑनलाईन हवे आहे पण भारतीय शेतकरी मात्र आहे त्याच सडक्या,शोषक व्यवस्थेत जगावा, मेला तर त्याचे नशीब या मानसिकतेच्या बाहेर यायला,त्याच्या प्रश्नांच्या मुळापर्यंत जायला मात्र आम्ही तयार नाही.
तंत्रज्ञान आणि बाजारपेठांमधली अडवणूक करून शेतमालाचे भाव पाडण्याची धोरणे आहेत. शेतकऱ्यांच्या लुटीचे,त्यांच्या आत्महत्यांची कारणे आहेत हे अगदी आज पर्यंत दररोज सिद्ध होते पण आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही.
जी गोष्ट बाजारपेठांची तीच तंत्रज्ञानाची.गेल्या कित्येक वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकरी गुलाबी बोंड अळी च्या संकटाने त्रस्त आहेत.कापूस हे एकमेव पीक असे आहे ज्या मध्ये संघर्ष करून भारतीय शेतकऱ्यांनी जैव तंत्रज्ञान मिळवले आहे. कापसा मधला जैव तंत्रज्ञानाचा आपला प्रवास मात्र BG 2 वरच थांबला आहे. वर्षानुवर्षे व्यवस्था शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी च्या व्यवस्थापनाचे धडे देत आहे.प्रतिवर्षी शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. गुलाबी बोंड अळी च्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी होणारी कापूस उत्पादनातील घट आपण पाहत आहोत.हे नुकसान फक्त शेतकऱ्यांचे नसून शेतमजूर,व्यापारी,हमाल,जिनिंग प्रेसिंग विव्हिंग वाले, गारमेंट उद्योजक, वितरक, रिटेलर्स, ट्रान्सपोर्ट वाले सर्वांना या नुकसानाची झळ पोहोचते.देशाच्या एकूण रोजगार क्षमते वरही त्याचा विपरीत परिणाम पडतो.HTBt व जगात उपलब्ध पुढील जनुक संशोधित कापूस बियाण्यांसाठी कित्येक वर्षांपासून शेतकरी संघर्ष करत आहेत.प्रतिबंधित HTBt कापूस व Bt वांग्याची जाहीर लागवड करून सविनय कायदे भंग आंदोलने ही ठिकठिकाणी झाली आहेत.एक लाख रुपये दंड व पाच वर्षांच्या कारावासाची तरतूद असतानाही 36 टक्क्यांपेक्षा अधिक कापूस उत्पादक शेतकरी चोरट्या मार्गाने HTBt.कापूस लावण्यास मजबूर होत आहेत.ही बाब शासकीय यंत्रणा व बीज उत्पादक कंपन्यांनीही वेळोवेळी अधोरेखित केली आहे. तरी आपण Bt. च्या पुढील ट्रायल्स तयार होत नाही या वरून शेती अन् शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार आणि व्यवस्था किती गंभीर आहे याचा प्रत्यय येतो.
जी बाब कापसाची तीच मका,वांगी अशा पिकांची सुद्धा आहे.लष्करी अळी च्या प्रादुर्भावाने मका उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे त्रस्त आहेत.जनुक संशोधित बियाण्यांना,चाचण्यांना मात्र परवानगी नाही.त्यामुळे पशुपालकांना ही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.भेसळीच्या दुधाबद्दल ओरड करणारे इथे मात्र दुर्दैवाने गप्प बसतात. कीटनाशकांच्या वाढत्या वापराने त्रस्त वांगी उत्पादक शेतकरी Bt.वांग्याची जाहीर,चोरट्या पद्धतीने लागवड करत आहे, चाचण्यांवर मात्र बंदी.
शेती क्षेत्रात जैव तंत्रज्ञान ही शाखाच एक प्रकारे सरकारांनी जणू बंद करून ठेवल्याने शेतकऱ्यांना व देशालाही विविध आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचा मागमूस ही देशात अनेकांना नसावा ही कृषी प्रधान म्हणवणाऱ्या देशात शेतकऱ्यांची मोठी कुचंबना म्हणावी लागेल.
जैव तंत्रज्ञाना मध्ये सर्वच पिकांमधील अवांछित गुण वजा करून वांछित गुणांची बेरीज करण्याची किमया साध्य होते.त्यामुळे जैव विविधता वाढण्यास मदत होणार असून सकस अन्ना सोबतच पोषण,आरोग्य या संबंधीच्या अनेक आव्हानांची उत्तरे दडलेली आहेत.
उत्पादन खर्च कमी करण्याची,उत्पादकता वाढविण्याची क्षमता ही जैवतंत्रज्ञाना मध्ये नक्कीच आहे.त्या दृष्टीने पुढे जाण्याच्या इच्छाशक्तीचा मात्र अभाव राज्यकर्त्यां मध्ये दिसून येतोय हे भारतीय शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
भारतीय शास्त्रज्ञांनी ओमेगा 3 विपुल प्रमाणात असणाऱ्या मोहरीचे बियाणे संशोधित करून ठेवले आहे.हृदय रोग्यांची प्रचंड संख्या देशात असूनही हे संशोधन मात्र परवानगी शिवाय पडून आहे.
कुपोषणाची मोठी समस्या असलेल्या आपल्या देशात पोषण मूल्य बहुल गोल्डन राईस चे संशोधन खितपत पडलेले आहे
कापसाच्या सरकी मधले गॅसिफोल वजा करण्याचे व सरकीला पोषक मानवी खाद्य म्हणून उपयोगात आणण्याचे तंत्रज्ञान ही तसेच पडुन आहे.
21 व्या शतकाचा पूर्वार्ध उलटून चालला असतांना भारतीय शेती समोरील सरकारी अनास्थेची ही आव्हाने उलथवून लावण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
मोठ्या संख्येने युवा जनसंख्या व शेतीला पोषक हवामान लाभलेल्या आपल्या देशाला खऱ्या अर्थाने शेती साठी सर्वस्वी नव्या धोरणांची गरज आहे.ज्या मध्ये तंत्रज्ञान व बाजारपेठांची मोकळीक असेल.जिथे संरचनांचे,प्रक्रिया उद्योगांचे,वितरणाचे जाळे असेल,जिथे भांडवल व नफा येण्याचे मार्ग मोकळे असतील,भांडवली पतपुरवठा असेल.
भारतीय शेतकऱ्यांना आहे त्याच व्यवस्थेत टनांनी आहेत त्या भावांनी कच्च्या मालाचे पुरवठा दार न ठेवता किमान प्रक्रिया केलेले,पोषण मूल्य असलेले अन्न पदार्थ कंझुमर फ्रेंडली पॅक्स मध्ये विकणाऱ्या उद्योजक बनवणाऱ्या पर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे.या प्रवासातच शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान असून बेरोजगारी व अर्थ व्यवस्थेपुढील आव्हानांची उत्तरे ही दडलेली आहेत.
गरज आहे ती द्रष्टेपणाने,आस्थेने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघून धीरोदात्तपणे या प्रश्नांना हातावेगळे करण्याच्या राजकीय इच्छाशक्तीची.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायला ते स्वतःच समर्थ आहेत.सरकारांनी आजवर भाव पाडण्याची धोरणे राबविली असल्याने त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, वीजबिलातून मुक्ती,संरचना,पोषक धोरणे,तंत्रज्ञान व बाजारपेठांची मोकळीक,भांडवली पत पुरवठा आदींचा समावेश असलेला मार्शल प्लॅन मात्र हवा आहे.

फोटो गुगल साभार.

डॉ. निलेश पाटील

लेखक हे शेतकरी संघटना युवा आघाडी विदर्भ प्रमुख आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते असून शेतकरी, शेती, समूह शेती, बचत गट अशा विविध विषयाचे अभ्यासक आहेत.

Comments (0)
Add Comment