शिक्षकदिन एक आठवण

शिक्षकदिन – एक आठवण

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर: गुरु: साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नम: ||
गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. प्रत्येकाच्या जीवनात गुरुंच महत्व हे अनन्य साधारण आहे.
५ सप्टेंबर शिक्षक दिन. आपल्या गुरुजनांप्रती आदर, सदभाव, आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
५ सप्टेंबर १९६२ पासून, दरवर्षी हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा शिक्षकदिन साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
शाळा शाळांमधून बालगोपाळांची लगबग असते. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातील बातम्या द्वारे जिल्हा, राष्ट्रीय, पुरस्कार प्राप्त गुरुजनांची माहिती मिळते.
५ सप्टेंबर २०१४. मी जरा लवकर उठून तयार झालो. माझा पेहराव जरासा वेगळा होता. आज मी कुर्ता पायजमा घातला होता. होय! कारणही तसच होत. आज शिक्षकदिन|. (मी आज पेशाने शिक्षक नाही, परंतु माझ्या नोकरीची सुरवात मात्र शिक्षक म्हणून झालेली). आज मोदी सर, शिक्षक आणि विद्यार्थ्यां सोबत संवाद साधणार होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे असं पहिल्यांदाच होणार होत. एक पंतप्रधान थेट विद्यार्थ्यांशी बोलणार, संबोधित करणार. सगळ्यांनाच कुतूहल होत याचं. पंतप्रधानपदाची शपथ घेवून केवळ तीनच महिने झाले होते. मी सुद्धा उत्साहित होतो, पंतप्रधान मोदींना ऐकायला.
एव्हाना, घरचा दूरध्वनी वाजला. आमच्या बाबांनी लगबगीने तो उचलला. शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. बाबा, फार भावविभोर झाले. गेली अनेक वर्ष आम्ही शिक्षकदिनी हे अनुभवायचो. माझे वडील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेचे शिक्षक होते. ८३ वर्षाचे शिक्षक आणि पासष्ट वर्षांचा त्यांचा विद्यार्थी. हे गुरू-शिष्याचं नातं, त्यांनी जपून ठेवलं होत. प्रा. लहुजी लांडगे, हे त्या विद्यार्थी, सेवानिवृत्त प्राध्यापकांच नाव. या जोडीस मनापासून साष्टांग नमस्कार.
त्याच वेळी, माझ्या मोबाईलवर (व्हाट्सअप) एक संदेश आला, “मी एक शिक्षक| आपण?”. उत्तरा दाखल मी संदेश पाठविला, “मी एक विद्यार्थी!”. आणि का कुणास ठाऊक मनात विचार आला, आपण आज आपल्या पहिल्या शाळेत जावू या. आणि खरच ठीक तीन वाजता, मी, साकोली तालुक्यातील “उमरी” येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पोहोचलो सुद्धा. दुचाकीवरून जवळ जवळ ४५ की.मी. अंतरावर ही माझी शाळा. अनेक वर्षानंतर मी माझ्या या गावी आलो होतो. तिथे, दीड तास शिक्षक वृंद, लहान-लहान विद्यार्थी आणि ग्रामस्थ मंडळी यांच्यासमवेत, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या भाषणाचा आस्वाद घेतला. अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुदूर भागात असूनही, संवाद साधता येतो, प्रश्न विचारता येतात, ऐकता येतं, हा विचार त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालमनावर ठसविला गेला.
अठरा लाख शाळांमधून हे भाषण लाईव्ह दाखवलं गेलं, होतं. देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग की ज्यात शिक्षक, विद्यार्थ्यां सोबत भारताच्या पंतप्रधानांनी शिक्षकदिनी संवाद साधला. यात शिक्षकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं होतं. शिक्षकी पेशाकडे वळायचा कल कमी आहे. गुरु-शिष्य परंपरा फार महान आहे, असं मोदिजी म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात “स्वच्छता अभियान संबंधी” नुकताच त्यांच्या जपान दौऱ्या वेळी घडलेला किस्सा सांगितला. समाजातील मुलांना शिकवण्याचा सल्ला दिला. डॉक्टर इंजिनियर अशा लोकांनी आपला थोडा वेळ तरी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घालवावा असे ते बोलले. भारत हा एक देश आहे. देश आणि समाजासाठी सगळ्यांनी आपले जीवन समर्पित केले पाहिजे. समाजाच्या जडण घडणीत शिक्षकांच्या अमुल्य योगदानाचा पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात आवर्जून उल्लेख केला. प्रश्नोत्तरे झालीत. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपल्या खुमासदार शैलीत मोदिजीनी उत्तर दिलीत. “मुलांसोबत संवाद साधून काय फायदा?” या प्रश्नाला उत्तर देताना मोदिजी म्हणाले “ खूप काम अशी असतात जिथे केवळ लाभ किंवा फायदा बघायचा नसतो.” तर दुसऱ्या एका इम्फालच्या विद्यार्थ्याने, “’मैं कैसे, देश का पीएम बन सकता हूं?”, असे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना, पंतप्रधान म्हणालेत, “’2024 के चुनाव की तैयारी करो. इसका मतलब हुआ कि तब तक मैं पीएम रहूंगा.’| मोदिजींच्या या हजरजबाबी आणि अत्यंत आत्मविश्वासपूर्ण उत्तराने, टाळ्यांचा प्रचंड कडकडात झाला. विद्यार्थ्यांनी मोज-मस्ती करावी आणि भरपूर खेळावे असा उपदेश त्यांनी केला. नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेच पाहिजे यावर पंतप्रधानांनी भर दिला. विजेची, पाण्याची बचत, साफसफाई यातून सुद्धा आपण देश सेवाच करतो, हा भाव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा असं मत त्यांनी मांडलं.
आभासी शाळा (व्हर्च्युअल स्कूल) ची संकल्पना, याद्वारे समोर आली. कोरोना काळात आपण बघतो जिकडे तिकडे online classes मध्ये आमचे हे विद्यार्थी आणि गुरुजन व्यस्त आहेत. अशा शाळेची खरी सुरवात झाली ती ५ सप्टेंबर २०१४ ला मोदिजीनी घेतलेल्या शाळेच्या माध्यमातून.
“मिळत नसेल भिक तर मास्तर की शिक” अशी काहीशी, निरुत्साही भावना शिक्षकी पेशाबद्दल होती. परंतु एक शिक्षकच भविष्यातील पिढीला घडवीत असतो. ओल्या बालमनाला आकार देण्याचं कार्य हे गुरुजन करीत असतात. म्हणूनच “एक शिक्षक” बनून “देशसेवा, समाजसेवा करीन” असं म्हणणारी पिढी निर्माण व्हावी, अशी आशा पंतप्रधानांनी बाळगली आहे. एक आदर्श विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा, असंही त्यांनी अगदी सोपे उदाहरण देऊन पटवून दिलं. म्हणूनच “तो शिक्षक दिन” खऱ्या अर्थाने गाजला, नव्हे साजरा झाला, तो पंतप्रधानांच्या या कल्पक आयोजन आणि भाषणाने. प्रारंभिक वादविवाद सोडले तर देशभरात शिक्षक दिनाचे महत्त्व खऱ्या अर्थानं सगळ्यांना कळलं. माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या शाळेत जाऊन मोदीजींचे भाषण ऐकत त्या वर्षीचा शिक्षकदिन साजरा करण्याची प्रेरणा व्हावी, हे मी माझं भाग्य समजतो.
माझी शाळा| पहिली ते चौथी पर्यंतची शाळा. १९६८ ते १९७२ या काळात, प्राथमिक शिक्षणाचे धडे मी याच शाळेत घेतले. आता परिचित अस कुणीही नाही. शाळा इमारत बदलून गेलेली. माझा बालमित्र “नीळकंठ उपरीकर” याला सोबत घेवून शाळेत गेलो. वातावरण नवीन, परंतु मला तिथं परकं वाटलं नाही. मी या शाळेचा माजी विद्यार्थी म्हटल्यावर, योग्य आदरातिथ्य झालं. शाळेत शिक्षक दिनानिमित्त “स्वयंशासन” असल्याने शिक्षकी पेहराव केलेले “बाल-गुरुजन”. प्रसन्न वातावरण. मन प्रफुल्लीत झालं. आम्ही सगळ्यांनी, पंतप्रधान मोदींना ऐकलं.
अर्थात, त्या दिवशी, या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भाषणातील काय आणि किती कळलं असणार हे सांगणं खूपच अवघड आहे. परंतु आम्ही भारताच्या पंतप्रधानांचे भाषण टीव्हीवर पाहिलं आणि “नरेंद्र मोदी”, हे “भारताचे पंतप्रधान” आहेत, हे या सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के मनापासून कळल, हे खरं|. कार्यक्रमा नंतर, विद्यार्थ्यांसोबत बोलताना हे जाणवलं. त्यामुळेच आपले पंतप्रधान काय बोलले, हे अगदी दोन मिनिटात मी सांगण्याचा प्रयत्न केला. मुलांना तेसुद्धा आवडलं. यातून मला झालेला आनंद वेगळाच. शुक्रवार, असल्याने या कार्यक्रमानंतर “सरस्वती पूजन” झालं. “हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली| तव ठाई वृत्ती नमली”, ही विस्मरणात गेलेली प्रार्थना पुन्हा गुणगुणायला मिळाली हे माझे भाग्यच. गुळ फुटाण्याचा prasad घेवून मी घरी परतलो.
या वर्षीचा शिक्षकदिन हा घरी बसूनच “आभासी” स्वरुपात साजरा करावा लागणार. गेली तीन महिने आपण लॉकडाऊन अनुभवतो आहोत, यात आपल्या स्वछंदीपणावर सीमा आल्या आहेत. परंतु ती आजच्या काळाची गरज आहे, हेही विसरून चालणार नाही. अशा वेळी शाळेचे दिवस प्रत्येकालाच आठवत असणार.
खडूची धारदार तलवार आणि फळ्याची ढाल पाठीशी घेवून आपल्या उद्दिष्टांच्या वाटेवर सदैव तत्पर असणारा शिक्षक एक विशाल वृक्ष आहे. एका शिक्षक कवीने “वारी शिक्षकाची” मध्ये फार सुंदर लिहिलय “जेव्हा येतात लेकरं, सुख दु:ख वाटायला| त्यांच्या रूपाने विठ्ठल येतो रोज भेटायला|”. मन भारावून टाकणाऱ्या या ओळी.
आपणा, सर्वाना घडविणाऱ्या गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि यथोचीत प्रणाम.

श्रीकांत भा. तिजारे

लेखक हे पोस्ट बीएससी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स झालेले असून एका खाजगी कंपनीत 26 वर्ष नोकरी केली. सध्या गुंतवणूक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, बाल विहार, गोकुळ साठी लिखाण आणि कार्यक्रम सादर. वृत्तपत्रांमध्ये समयोचित लिखाण. भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदेच्या कार्यात सहभाग. गेली चौदा वर्ष, कर्क रोग जनजागृती अभियान आणि समुपदेशन म्हणून कार्यरत. मोबा - ९४२३३८३९६६

Comments (0)
Add Comment