श्री गणेश गीता
कोणत्याही संप्रदायाचे तत्त्वज्ञान यथार्थरीत्या समजून घ्यायचे असेल तर त्यातील प्रस्थानत्रयी चा अभ्यास करणे आवश्यक असते. श्रुती अर्थात वैदिक ग्रंथ स्मृती अर्थात आचरण ग्रंथ तर सूत्र अर्थात त्या तत्त्वज्ञानाचे गूढार्थ सांगणारे ग्रंथ अशा तीन ग्रंथांना प्रस्थानत्रयी असे म्हणतात.
गाणपत्य संप्रदायाच्या दृष्टीने श्री गणेश अथर्वशीर्ष, श्री गणेश गीता आणि श्रीमुद्गलपुराण यांना प्रस्थानत्रयी असे म्हणतात.
यापैकी श्री गणेश गीता हा श्री गणेशपुराणात शब्दबद्ध केलेला भगवान श्री गणेशाच्या गजानना अवतारात त्यांनी माहिष्मती चा राजा वरेण्य याला केलेला दिव्यतम उपदेश.
अर्थात गणेश गीता हा अत्यंत गूढार्थ परिपूर्ण असा विषय. मात्र या अत्यंत गहन विषयाला अत्यंत सुबोध पद्धतीने, रसाळ शैलीत आपल्याला पटवून देणारा ग्रंथ म्हणजे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड लिखित श्री गणेश गीता सार्थ विवेचन.
गणेश गीतेचे महत्त्व सांगण्यासाठी प्रस्तावनेत लेखकाने एक संख्यात्मक तुलना दिली आहे. ही केवळ तुलना आहे त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असे सांगणे नाही अशी भूमिका आधीच स्पष्ट करून लेखक म्हणतात की भगवद्गीतेच्या अठरा अध्यायात असणाऱ्या सातशे श्लोकांवर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी नऊहजार ओव्या असणारी भावार्थदीपिका रचली.
याउलट गणेश गीतेचा विस्तार केवळ ११ अध्याय आणि ४२८ श्लोक असूनही त्यावर श्री गणेशयोगींद्राचार्य महाराजांनी रचलेली श्री योगेश्वरी ही टीका तब्बल १००३१ ओव्यांची आहे.
यातून गणेशगीतेच्या व्यापकतेचा आपल्याला अंदाज येईल.
राजा वरेण्यासमान परम कृतार्थ, शरणागत भक्त, विवेक, वैराग्यशील ज्ञानी असाच श्रोता असल्यामुळे श्रीगणेश गीतेच्या वर्णनाला एक वेगळीच उंची आहे. लेखकाने प्रस्तुत ग्रंथात दिलेला अर्थ आणि अत्यंत गहन सिद्धांतांचे केलेले अतीव सुगम निरूपण आपल्याला वाचता वाचता त्या उंचीवर नेते, यात संशय नाही.
भारतीय संस्कृतीत अनेक गीता प्रचलित आहेत. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या आरंभी अशा अनेक गीतांची सूचीच दिली आहे. सामान्यतः सर्व गीतांमध्ये आलेले मूलभूत विषय समानच आहेत. थोडाफार फरक पडतो तो परिस्थितीसापेक्ष विवेचनात. म्हणजे जसे भगवद्गीतेत ते सर्व तत्त्वज्ञान सांगून अर्जुनाला युद्धाला सिद्ध करणे हा भगवंताचा एक अधिकचा उद्देश होता. मात्र गणेश गीते समान ग्रंथात श्रोता राजा वरेण्य आधीच शरणागत असल्याने त्याचे प्रश्नोपप्रश्न किंवा त्याला समजावून सांगणे या गोष्टी आपोआपच येथे कमी झाल्या आहेत.
परम अशुद्ध तत्वज्ञान मांडणे आणि हाच तुझ्या मुक्तीचा मार्ग आहे असे सांगितले की येथील काम भागते.
पण त्याच वेळी या सगळ्यामुळे तत्वज्ञान सोपे होते असे नाही. मात्र संस्कृत विषयाचे प्राध्यापक, शांकर वेदांताचे अभ्यासक आणि गाणपत्य परंपरेचे अधिष्ठान असा तिहेरी योग जुळून आलेले लेखक असल्याने यातील गहनतम वेदांत सहज सुलभ शब्दात आपल्यासमोर उलगडला गेला आहे.
भगवान श्री गणेशां कडे पाहण्याची अद्वितीय तात्विक वृत्ती हवी असेल आणि गीता तत्वज्ञान समजून घ्यायचे असेल तर सगळ्यात सोपा मार्ग आहे श्री. स्वानंद पुंड निरूपित श्री गणेश गीता.